क्षरण : (भूविज्ञान) . जमिनीच्या खडकांची झीज होऊन तिच्या पृष्ठाची उंची कमी होते. अनेक नैसर्गिक क्रियांचा परिणाम होऊन क्षरण घडून येते. जमिनीच्या खडकांचा अपक्षय (वातावरणक्रिया) होऊन तयार झालेला दगडी चुरा व विद्राव्य पदार्थ मूळ जागी टिकून न राहता, ते वारा, वाहतेपाणी व वाहते हिम-बर्फ यांनी दुसरीकडे वाहून नेले जातात. जेथूनअसे पदार्थ निघून जातात तेथल्या खडकांचे पृष्ठ झिजते. शिवाय वाहतूक होत असताना वाहत जाणारा दगडी चुरा, त्याच्याशी संपर्क होणाऱ्याखडकांच्या पृष्ठांवर घासटत, आदळत किंवा घरंगळत जातो त्यामुळेत्या चुऱ्याची व ज्या खडकांशी संपर्क होत जातो त्यांचीही झीज होते.केवळ वारा, वाहते पाणी किंवा हिम-बर्फ घासटत जाण्याने किंवाआदळण्याने खडकांची विशेषशी झीज होत नाही. तर ती मुख्यतःत्यांच्यातील दगडी चुरा आदळत, घासटत जाण्यामुळे होते. म्हणून प्रवाहा-बरोबर जाणारे दगडी पदार्थ हे क्षरणाची हत्यारेच ठरतात. नदीच्या पाण्यात तयार झालेल्या भोवऱ्याबरोबर तिच्यातील दगडी चुरा एका जागी फिरत राहिला, म्हणजे त्याच्या घर्षणाने पाण्याच्या तळाशी असलेल्या खडकात खळगे (कुंभगर्त) खोदले जातात. नदीचे पाणी ओसरले असताना तिच्या खडकाळ पात्रात लहान-मोठे खळगे सामान्यतः आढळतात, ते अशा रीतीने तयार झालेले असतात [→ कुंभगर्त].

नद्यांमुळे होणारे क्षरण हे त्यांच्या पाण्याच्या परिमाणावर व वेगावर अवलंबून असते. डोंगराळ प्रदेशातील तीव्र उतारावरून वाहणाऱ्या मोठ्या नद्यांबरोबर पुष्कळ चुरा व मोठाले धोंडेही वाहून नेले जातात. तेथील क्षरण पुष्कळ व उदग्र असते आणि ज्यांच्या बाजूचे उतार तीव्र आहेत अशादऱ्या खोदल्या जातात. मैदानात उतरल्यावर नद्यांचा वेग बराच कमी होतो. बारीक चुरा नेण्याचेच सामर्थ्य त्यांच्या अंगी असते. उदग्र क्षरण अल्प किंवा अत्यल्प असते. होणारे क्षरण मुख्यतः पार्श्विक (बाजूंचे) असते. दरी खोल करण्याऐवजी ती रुंद करण्याचेच कार्य मुख्यत: होत असते. अगदी मंद गतीने वाहणाऱ्या प्रवाहामुळे फारसे क्षरण होत नाही. त्यांच्या पाण्यात गाळ नसला तरी काही विरघळलेले पदार्थ असतात व ते जमिनीच्या खडकांपासून आलेले असतात. म्हणजे त्यात लेशमात्र तरी क्षरण होत असते. पृथ्वीवरील प्रमुख नद्यांच्या पुरेशा दीर्घकाल केलेल्या पाहणीवरून असे आकलन करण्यात आलेले आहे की, नद्यां-बरोबर वाहत येऊन समुद्रात लोटल्या गेलेल्या पदार्थाचा सरासरी भार दर वर्षास सुमारे आठ अब्ज टन इतका असतो व त्यापैकी सुमारे तीस टक्क्यांइतक्या भाराचे पदार्थ विरघळलेल्या स्थितीत जात असतात. यावरून नद्यांमुळे होणाऱ्या क्षरणाच्या मानाची कल्पना येईल.

समुद्राच्या पाण्यामुळे होणारे क्षरण मुख्यत: किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात होत असून ते पुढील रीतींनी होत असते : (१) लाटांच्या विशेषतः वादळाच्या वेळच्या लाटांच्या आघातामुळे किनाऱ्यालगतचे खडक भंग पावतात व त्यांचे खिळखिळे झालेले तुकडे गळून पडतात. (२) लाटांच्या पाण्या-बरोबर आणि समुद्रातील प्रवाहांच्या पाण्याबरोबर कमी-अधिक दगडीचुरा वाहत जात असतो. त्या चुऱ्याच्या घासटत जाण्याने किंवा आदळण्याने किनाऱ्यालगतचे खडक झिजतात. समुद्रातील प्रवाहांमुळे दगडी चुऱ्याची वाहतूक होत असते आणि चुरा दुसरीकडे वाहून नेणारे प्रवाह प्रामुख्यानेअसतील, अशा किनाऱ्यालगतच्या जमिनीची व उथळ पाण्याखालीअसणाऱ्या खडकांचीही झीज होते.

नैसर्गिक पाण्याची रासायनिक क्रिया होऊन चुनखडकांचा अंश पाण्यात विरघळतो व पाण्याबरोबर निघून जातो. इतर सामान्य खडकांवर पाण्याचा रासायनिक किंवा विद्रावक (विरघळविणारा) परिणाम विशेष होतनाही. जमिनीखाली चुनखडक असले, तर जमिनीत मुरणाऱ्या पाण्याच्या क्रियेने त्यांची झीज होऊन त्यांच्या जागी भुयारे तयार होतात. वाऱ्यामुळे पुढील दोन रीतींनी क्षरण घडून येते : (१) वाऱ्याबरोबर येणारी वाळू आदळण्याने व घासटत जाण्याने खडकांचे पृष्ठ झिजते. सामान्यत: जमिनीच्या पृष्ठापासून थोड्या उंचीपर्यंतच्या वाऱ्याच्या भागातच वाळूचे कण असतात व वाऱ्याच्या मार्गात येणाऱ्या राशींच्या पायांकडचेच भाग झिजविलेजातात. भिंतीसारख्या राशींच्या पायाकडचे खडक झिजून ओवऱ्या तयार होतात. स्तंभासारख्या खडकांचे पायाकडचे भाग झिजून बारीक होतजातात आणि अखेरीस स्तंभ कोसळून पडतात. (२) कोरड्या व सुट्या कणांच्या खडकांतील वाळूचे व धुळीचे कण उचलून घेऊन दुसरीकडे नेण्याचे सामर्थ्य वाऱ्याच्या अंगी असते. असे कण निघून जाण्याने होणारी जमिनीच्या पृष्ठाची झीज क्षुल्लक वाटली, तरी मनुष्याच्या दृष्टीने तिचेपरिणाम घातक ठरतात. अर्धशुष्क जलवायुमानाच्या प्रदेशात, कोरड्या ऋतूत वादळे झाली म्हणजे शेतजमिनीच्या पृष्ठाची सुपीक माती वाऱ्या-बरोबर निघून जाते व विस्तीर्ण क्षेत्रे शेतीसाठी निरुपयोगी होतात.

हिम-बर्फाच्या अचल राशींमुळे खडकांचे रक्षणच होते. त्या वाहू लागल्या म्हणजे मात्र क्षरण घडून येते. बर्फाचे थर (हिमस्तर) व हिमनद्या अशा दोन प्रकारच्या हिम-बर्फाच्या चल राशी आढळतात. हिमस्तरांचा विस्तार व जाडी प्रचंड असतात. अंटार्क्टिकावरील थरांचे क्षेत्र सव्वाकोटी चौ. किमी. पेक्षा व ग्रीनलंडावरील थरांचे क्षेत्र सव्वासतरा लक्षचौ. किमी.पेक्षा थोडे अधिक आहे. या थरांखालील जमिनीचे पृष्ठ अनियमित, उंच सखल आहे. जमिनीचे पृष्ठ व तिचा विस्तार कसाही असो वरील प्रदेशांच्या सुमारे मध्याजवळच्या भागापासून बर्फाचे थर सभोवार वाहतात.

माथ्याकडील भागात हिम साचत राहून हिमक्षेत्रे तयार होतीलइतकी उंची असणारे पर्वत ऑस्ट्रेलियाखेरीज इतर खंडांत आहेत. अशा पर्वतातील हिमक्षेत्रातून निघून आधीच अस्तित्वात असलेल्या दऱ्यांवाटे खाली वाहत येणाऱ्या हिमनद्या त्या पर्वतात आढळतात.

हिम-बर्फाच्या चल राशींकडून पुढील दोन रीतींनी क्षरण घडून येते :(१) खालील खडकांचे लहान मोठे तुकडे उपटून किंवा खणून काढून घेण्याचे सामर्थ्य हिम-बर्फाच्या चल राशीत असते आणि उपटून किंवाखणून घेतलेले पदार्थ टिपून घेऊन बर्फ पुढे जाते. (२) तळाच्या बर्फात रुतलेला दगडी चुरा खालील खडकांच्या पृष्ठावर घासटत जाण्यामुळेत्या पृष्ठावर चरे-खोबणी पडतात, पृष्ठाचे काही भाग छाटले किंवा तासले जातात व त्याला झिलई येते. खडकांच्या पृष्ठाचा नाश होऊन तयारझालेला चुरा टिपून घेऊन बर्फ पुढे सरकते. हिमनद्यांच्या काठाजवळील उघड्या खडकांपासून आलेला दगडी चुरा त्यांच्या बर्फावर व बर्फातील भेगांत पडतो आणि तोही वाहून नेला जातो.

क्षरण घडवून आणणाऱ्या कारकाचा प्रकार, त्याचे आकारमान वत्याचा वेग, जमिनीचे स्वरूप जमिनीच्या उताराचे मान, क्षेत्राचे जलवायुमान, क्षरण होणाऱ्या खडकांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म आणि त्यांच्या रचना इ. अनेक गोष्टींवर क्षरणाचा वेग अवलंबून असतो.

क्षरणाच्या कारकांपैकी सर्वांत महत्त्वाचा कारक म्हणजे वाहते पाणी होय. शीत व उष्ण, शुष्क प्रदेश वगळले तर इतर सर्व प्रदेशांत त्याचे कार्य होत असते. वाऱ्याचे कार्य विस्तीर्ण क्षेत्रात मुख्यत: वाळवंटात होत असते, पण बारीक कणांचीच वाहतूक वारा करू शकतो. हिम-बर्फाच्या प्रवाहांची वाहतूक करण्याची शक्ती प्रचंड असते व प्रचंड आकारमानाचे धोंडे तेनेऊ शकतात. पण त्यांचे कार्य शीत परिस्थितीतच होऊ शकते. त्यांच्या अस्तित्वास आवश्यक असे जलवायुमान असणाऱ्या आजच्या प्रदेशांचेक्षेत्र सापेक्षतः अल्प आहे. पूर्वीच्या काही युगांत हिम-बर्फाने व्यापिलेल्या जमिनीचे क्षेत्र आजच्यापेक्षा अधिक, पण एकंदरीत अल्पच असे.

दरडी कोसळणे, उतारांवरील सुटे पदार्थ किंवा सर्वच्या सर्व खडक किंवा मातीची सर्व राशी घसरून खाली सरकणे इ. गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या व प्राण्यांनी बिळे करणे, मनुष्याचे खाणकाम इ. जीवांमुळे होणाऱ्या क्रियांमुळे थोडेसे क्षरण घडून येते. 


काही खडक कठीण व काही मऊ, काही संसक्त तर काही सुट्या कणांचे व भुसभुशीत असतात. काहींत पुष्कळ भेगा, सांधे तर काहीत ते तुरळक असतात. मऊ भेगाळलेल्या किंवा भुसभुशीत खडकांचे क्षरण साहजिकच अधिक वेगाने होते. जमिनीचा उतार तीव्र असला म्हणजेक्षरणाने तयार झालेला चुरा अधिक वेगाने निघून जातो. चुनखडकांचे क्षरण नैसर्गिक पाण्याने होऊ शकते.

क्षरणाने उंचवट्याचे काही भाग खोदले जाऊन दऱ्या व अवशिष्टभागांचे डोंगर किंवा पर्वत तयार होतात. कालांतराने अवशिष्ट उंच-वट्यांचेही क्षरण होऊन जवळजवळ सपाट अशी समसपाट भूमी तयारहोते. आज दिसणारी बरीचशी भूमिस्वरूपे क्षरणाने तयार झालेली आहेत.

क्षरण अतिमंद गतीने घडून येत असते, पण केवळ क्षरणाचीच क्रिया पृथ्वीवर होत असती, तर जमिनीवरील कारक व सागर यांच्या कार्यामुळे सर्व जमिनीचा नाश फार पूर्वीच झाला असता, परंतु नव्या जमिनी निर्माण करणाऱ्या क्रियाही घडून येत असल्यामुळे जमिनी राहिलेल्या आहेत.

काही क्षरणविषयक संज्ञा अशा आहेत : (१) अपघर्षण : घासणे, तासणे, छाटणे, ओरखडणे, झिलई करणे, कुटणे इ. यांत्रिक क्रियांमुळे खडकांचे पृष्ठ झिजणे. उदा., बर्फाच्या खालील खडकास पडणारे चरे (२) अपवहन : वाऱ्याने वाळूचे कण उचलले व वाहून नेले जाणे (३) संनिघर्षण : वाहतुकीत होणाऱ्या घर्षणामुळे व आघातांमुळे वाहत जाणाऱ्या चुऱ्यातील पदार्थाचे आकारमान कमी होणे (४) संक्षारण : नैसर्गिक पाण्याच्या रासायनिक व विद्रावक क्रियांमुळे पात्राच्या खडकांची व पाण्याबरोबर वाहत जाणाऱ्या दगडी चुऱ्यातील पदार्थांची पृष्ठे झिजणे आणि (५) समपघर्षण : ज्याच्यात दगडी चुरा आहे अशा वाहत्या पाण्याच्या किंवा वाऱ्याच्या घर्षण, आघात इ. यांत्रिक क्रियांमुळे तळाच्या व काठाच्या खडकांची आणि वाऱ्याच्या मार्गात येणाऱ्या खडकांची झीज होणे.पहा : गाळाचे खडक झीज आणि भर भूमिरूपविज्ञान भूविज्ञान.

संदर्भ : 1. Fairbridge, R. W. The Encyclopedia of Geomorphology, 1968.

         2. Morgan, R. P. C. Soil Erosion and Conservation, 2005.

         3. Toy, T. J. et al, Soil Erosion Processes, Prediction, Measurements and Control, 2002.

         4. Troeh, F. R. Hobbs, J. A. Donahue, R. L. Soil and Water Conservation, 2003.

केळकर, क. वा.