पिचब्‍लेंड : खनिज. याच्या स्फटिकी प्रकाराला युरॅनिनाइट म्हणतात मात्र स्फटिक विरळाच आढळतात. स्फटिक घनीय, अष्टफलकी, क्वचित अष्ट व द्वादशफलकांसह घन [ ⟶ स्फटिकविज्ञान]. सामान्यपणे याच्या संपुंजित वा गुच्छाकार राशी आढळतात.त्याच्याभोवती बदल होऊन तयार झालेले तेजस्वी रंगांचे पदार्थ असतात. भंजन शंखाभ ते खडबडीत [ ⟶ खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ५.५ वि.गु. स्फटिकांचे ९-९.७ आणि संपुंजित प्रकाराचे ६.४ पेक्षा जास्त. चमक किंचित धातूसारखी, चरबीसारखी किंवा डांबराप्रमाणे निस्तेज. अपारदर्शक. रंग डांबरासारखा काळा, हिरवट, तपकिरी वा मखमली काळा. कस उदसर काळा व काळसर हिरवा. हे तीव्र किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे) असून ते लवकर वितळत नाही. याचे रा. सं. बदलते असल्याने त्याचे निश्चित सूत्र देता येत नाही, मात्र ते UO2 व U3O8 दरम्यान असते. यात युरेनियमाच्या जागी थोरियम, रेडियम, टँटॅलम, झिर्कोनियम वगैरे मूलद्रव्ये थोड्या प्रमाणात आलेली असतात शिवाय किरणोत्सर्गाद्वारे बनलेले शिसे व हीलियमही यात असतात. १७८९ साली एम्. एच. क्‍लापरोट यांना युरेनियम तर १८९८ साली प्येअर व मारी क्यूरी आणि जी. बेमाँट यांना हीलियम ही मूलद्रव्ये याच खनिजात आढळली. पृथ्वीवर हीलियम हे मूलद्रव्यही प्रथम याच्यातच आढळते.

ग्रॅनाइट, पेग्मटाइटाच्या भित्ती व उच्च तापमानात तयार झालेल्या धातुयुक्त शिरा यांत पिचब्‍लेंड आढळते. अग्‍निज खडकांत हे गौण खनिज म्हणून आढळते. शिवाय चांदी, शिसे, तांबे, कथिल इत्यादींच्या धातुकांबरोबर (कच्या रुपातील धातूंबरोबर) हे द्वितीयक (नंतरच्या क्रियांनी बनलेले) खनिज म्हणूनही आढळते. हे खनिज अस्थिर असून त्याचे निक्षालन होऊन (धुपून जाण्याने) ऑटुनाइट, टॉर्बर्नाइट इ. खनिजे तयार होतात. पिचब्‍लेंड युरेनियमाच्या अशा द्वितीयक खनीजांबरोबर आढळते. याचे सर्वांत मोठे साठे झाईरे व कॅनडा (ग्रेट बेअर सरोवर) येथे असून झाईरेमध्ये सु. ३ मी. व्यासाचे आणि २० टन वजनाचे पुंजके आढळेले आहेत, तर कॅनडात हे चांदीच्या धातुकांबरोबर सापडते. यांशिवाय सॅक्सनी, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, नॉर्वे, स्वीडन, कॉर्नवाल, रूमानिया, बोहीमिया इ. प्रदेशांतही हे आढळते. भारतात बिहारमधील सिंगभूम आणि गया प्रदेशांत पेग्मटाइटांच्या शिरांमध्ये हे खनिज आढळते आणि सिंगभूममध्ये याचे खाणकामही चालते. यांशिवाय नेल्‍लोर व अजमेर भागांत पेग्मटाइटांमध्ये, हजारीबाग भागात घुमटी पट्टिताश्मांत व त्रावणकोर भागातही हे आढळते.

पिचब्‍लेंड हे युरेनियम व रेडियम यांचे महत्वाचे धातुक असून यात युरेनियम ५० ते ८०% असते आणि १ टन युरेनियममागे ३२० मिग्रॅ. रेडियम मिळते. यांशिवाय याच्यापासून पोलोनियम व अक्टिनियम ही मूलद्रव्येही मिळवितात. अशा प्रकारे अणुउर्जेच्या निर्मितीसाठी लागणारे हे महत्वाचे खनीज आहे. खडकांचे वय ठरविण्याच्या दृष्टीनेही हे खनिज उपयुक्त आहे.

डांबरासारखे दिसत असल्याने याला ए.एफ्.क्रून्स्टेट (१७२२-६५)यांनी डांबर अर्थाच्या मूळ जर्मन शब्दावरून पिचब्‍लेंड हे नाव दिले (१७५८).

पहा : युरेनियम.

ठाकूर, अ.ना.