ह्वे : (ह्यूए) . व्हिएटनाममधील थुआ थिएन-हुए प्रांताची राजधानी व पूर्वीच्या एन्गायेन घराण्याच्या साम्राज्याची व फ्रेंच संरक्षित राज्य अनामाची (मध्य व्हिएटनाम) राजधानी. लोकसंख्या ३,४०,००० (२०११). मध्य व्हिएटनामधील ॲनामितिक पर्वतश्रेणीतील टेकड्यांच्या पायथ्यालगत दक्षिण चिनी समुद्रकिनाऱ्यापासून ८ किमी.वर हुए (परफ्यूम) नदीकिनारी हे वसलेले आहे.

चिनी लष्करी जनरल झाओ तुओ (त्रिबुदा) याने इ. स. पू. २००मध्ये स्थापन केलेल्या नाम व्हिएट राज्याची राजधानी येथे होती. हेचंपा राज्यात सु. इ. स. २०० मध्ये होते. तद्नंंतर हे चीनच्या अखत्यारीत होते व १३०६ मध्ये दाई व्हिएट (व्हिएटनाम) मध्ये समाविष्ट झाले. १८०२ मध्ये एन्गायेन घराण्यातील आन (गीऑ लाँग) याने दाई व्हिएट या साम्राज्याची येथे राजधानी केली. तसेच एन्गायेन सम्राट नामधारी असलेल्या फ्रेंच संरक्षित राज्य अनामाची १८८३–१९४५ पर्यंत येथे राजधानी होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ह्वे हे जपानच्या आधिपत्या-खाली होते. येथे १९४५–४९ पर्यंत कम्युनिस्टेतर व्हिएटनाम कमिटीचे मुख्यालय होते. १ जुलै १९४९ रोजी हो-चि-मिन्ह सिटी (सायगाव) या शहरास दक्षिण व्हिएटनामची राजधानी केल्यानंतर ह्वे शहराचे महत्त्व कमी झाले.

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर व्हिएटनामी युद्धात १९४०–७०या तीन दशकांच्या कालावधीत ह्वे शहराचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये येथील अनेक ऐतिहासिक इमारती, बौद्ध धार्मिक स्थळे यांची हानी झाली. युद्धोत्तर काळात शहराची पुनर्बांधणी केली आहे.

शहराचे जुने शहर व नवीन शहर असे दोन भाग असून हुए नदीच्या किनारी वसलेले आहेत. हे दोन्ही भाग पुलांद्वारे जोडण्यात आलेले आहेत.याच्या आसमंतातील तांदूळ, ऊस, कापूस, रताळी, मसाल्याचे पदार्थ, नारळ इ. शेतमालाचे हे व्यापारी केंद्र आहे. येथे वराहपालन, मासेमारी, सिमेंटनिर्मिती इ. व्यवसाय भरभराटीला आले आहेत. हस्तकलाकेंद्र म्हणूनयास विशेष महत्त्व आहे. हे दळणवळणाचे केंद्र असून रस्ते व लोहमार्गाने हो-चि-मिन्ह सिटी व इतर शहरांशी जोडलेले आहे. याच्या नजीकच दा नांग हे बंदर असून हे ह्वेशी रस्ते व लोहमार्गाने जोडले आहे. तसेच येथे फू-बै हा विमानतळ आहे.

ह्वे हे शैक्षणिक केंद्र असून येथे इम्पीरिअल कॉलेज ऑफ ॲड-मिनिस्ट्रेशन व ह्वे विद्यापीठ (१९५७) आहे. युनेस्कोने १९९३ मध्ये जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांत येथील कॉम्प्लेक्स ऑफ ह्वे मॉन्युमेंटचा समावेश आहे. तसेच येथील थिएन मू पॅगोडा, एन्गायेन घराण्याचा चिनी शैलीतील नगरदुर्ग, फ्रेंच शैलीतील क्योक र्‍ह्योक शाळा, हेवन मंदिर, ह्वे रॉयल अँटिक्विटी म्यूझीयम इ. प्रसिद्ध आहेत. यामुळे अनेक पर्यटक या शहरास भेट देतात.

आवटी, अनिता