हैदर, कुर्रतुल ऐन : (२० जानेवारी १९२७–२१ ऑगस्ट २००७). एक श्रेष्ठ भारतीय उर्दू लेखिका आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकरी. ‘ऐनी आपा’ या नावानेही त्यांना संबोधले जात होते. त्यांचाजन्म अलीगढ (उत्तर प्रदेश) येथे वाङ्मयीन पार्श्वभूमी असलेल्या एका सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील स ज्जा द हैदर हे उर्दू साहित्यातील प्रसिद्ध कथाकार होते, तर आई नझर सज्जाद हैदर या नामवंत लेखिका होत्या. कुर्रतुल ऐन यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अलीगढ मध्ये झाले. पुढे त्यांनी लखनौ विद्यापीठातून इंग्रजी साहित्यांत एम्.ए. ही पदवी मिळवली (१९४७). १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत पाकिस्तानात स्थलांतर केले.
बदलत्या वास्तवाचे प्रभावी चित्रण करणारी लेखिका, असा कुर्रतुल ऐन यांचा लौकिक आहे. भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास आणित्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सामाजिक-राजकीय वास्तवाचे प्रभावीचित्रण हे त्यांच्या साहित्याचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. त्यांची फाळणीच्या पार्श्वभूमीवरील आग का दर्या (१९५९) ही कादंबरी पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध झाली. ही त्यांची सर्वाधिक खपाची अत्यंत लोकप्रिय कादंबरी होय. तिचे कथानक इ. स. पू. चौथ्या शतकात सुरू होऊन भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीव फाळणीपर्यंतच्या विस्तीर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमीचे दर्शन घडवते.या कादंबरीमुळे उर्दू साहित्यविश्वात खळबळ माजलीच शिवाय ती पाकिस्तान सरकारच्या विरोधी असल्याची टीकाही त्यांच्यावर झाली.अखेर पाकिस्तानातील वास्तव्य सोडून त्या इंग्लंडला गेल्या. लंडन येथे डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रात बातमीदार म्हणून तसेच बी.बी.सी.मध्ये वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले. १९६० मध्ये त्या मुंबईत आल्या. येथेच त्यांनी लेखन आणि पत्रकारितेला वाहून घेतले. मराठी भाषेबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. मराठी संत-साहित्यातील अनेक अभंगांचे अनुवादित दाखले त्यांनी आपल्या उर्दू साहित्यातून दिले. मुंबईतील इंप्रिंट या इंग्रजी नियतकालिकाच्या संपादक म्हणून (१९६४–६८) तसेच इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाच्या संपादन विभागात त्यांनी काम केले. शिवाय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. कॅलिफोर्निया, शिकागो, विस्कॉन्सिन, ॲरिझोना इ. विद्यापीठांतून त्यांनी अभ्यागत अधिव्याख्याता म्हणून व्याख्याने दिली. अलीगढ विद्यापीठआणि दिल्ली येथील जामिआ मिल्लिया इस्लामिया विद्यापीठ येथे त्यांनी काही काळ अध्यापन केले.
मेरे भी सनमखाने (कादंबरी, १९४७), सफीन-ए-गम-ए-दिल (१९५२), सीता हरन (१९६०), हाउसिंग सोसायटी (१९६३), फस्ल-ए-गुल-आई या अजल आई (१९६५), दिलरुबा (कादंबरी, १९६५), चाय के बाग (लघुकादंबरी, १९६५), पतझड की आवाज ( कथासंग्रह, १९६५), अगले जनम मोहे बिटियाँ न किजियो (कादंबरी, १९६७), कार-ए-जहाँ दराज है (कादंबरी, १९८०), रोशनी की रफ्तार (१९८२), गर्दिश-ए-रंग-ए-चमन (कादंबरी, १९८७), आखिर-ए-शब के हमसफर (कादंबरी, १९८९), चांदनी बेगम ( कादंबरी, १९९०) इ. त्यांची उल्लेखनीय साहित्यसंपदा.
पतझड की आवाज या त्यांच्या कथासंग्रहात आपली मुले सोडूनअन्यत्र जाणे भाग पडलेल्या लोकांच्या व्यथा, वेदनांचे चित्रण आहे, तर कार-ए-जहाँ दराज है ही त्यांची द्विखंडात्मक आत्मचरित्रपर कादंबरीआहे. आखिर-ए-शब के हमसफर या कादंबरीतून त्यांनी फाळणी-पूर्व इतिहास, स्वातंत्र्योत्तरकालीन घटना आणि बांगला देश निर्मिती-पर्यंतच्या कालपटाचा वेध घेतला. वेगवेगळ्या ऐतिहासिक कालखंडांतील सामाजिक-राजकीय वास्तवाचे प्रभावी चित्रण त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून केले. मेरे भी सनमखाने या त्यांच्या पहिल्या कादंबरीतकाही आदर्शवादी युवकांच्या टोळक्यांच्या जीवनाचे आणि त्यांच्या मनावरील फाळणीच्या प्रभावाचे चित्रण होते. काही समीक्षक या कादंबरीची गणना उर्दूतील दहा श्रेष्ठ कादंबऱ्यांमध्ये करतात. त्यांनी लंडनमधील वास्तव्यात लिहिलेल्या द एक्झाइल्स (१९५२) या लघुकादंबरीत महायुद्धानंतर यूरोपमध्ये शरणार्थी, विस्थापित तरुणांचा जो लोंढा आला होता, त्यांच्या मानसिकतेचे, व्यथा व समस्या यांचे चित्रण आहे. त्यांची अगले जनम मोहे बिटियाँ न किजियो ही कादंबरी लखनौमधील चिकन कारागिरीचा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणावर भाष्य करते, तर चाय के बाग या त्यांच्या लघुकादंबरीत त्यांनी चहाच्या मळ्यातील वेठबिगार व भूमिहीन शेतमजूर यांच्या व्यथा व समस्या यांचे प्रभावीचित्रण केले आहे. सामाजिक-राजकीय वास्तवाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून नैतिक मूल्यांचे भानही प्रकटले आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शैली व नवनवी तंत्रे यांचा वापर करून आपल्या कथा-कादंबऱ्यांची प्रत्ययकारिता वाढवली. त्यांच्या बहुस्तरीय प्रभावशाली शैलीमुळे उर्दू साहित्यात एक नवा प्रवाह सुरू झाला. स्वतंत्र लेखना-व्यतिरिक्त त्यांनी हेन्री जेम्स यांच्या पोर्ट्रेट ऑफ अ लेडी आणि टी. एस्. एलियट यांच्या मर्डर इन द कॅथीड्रल या नाटकांचे उर्दू भाषांतर केले.अली सरदार जाफरी यांच्याबरोबर त्यांनी गालिबचे काव्य आणि पत्रे हा टीकाग्रंथ लिहिला. खुशवंतसिंग यांच्या सहयोगाने स्टोरीज फ्रॉम इंडिया या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले.
कुर्रतुल ऐन या अविवाहित होत्या. राजकारण आणि चळवळी यांपासून त्या नेहमीच अलिप्त राहिल्या; तथापि राजकीय-सामाजिक परिस्थितीचे समग्र भान त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून प्रकट केले. पतझड की आवाज या कथासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार (१९६७), अनुवाद–कार्यासाठी सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार (१९६९), गालिब ॲवॉर्ड (१९८५), इक्बाल सन्मान (१९८७), आखिर-ए-शब के हमसफर या कादंबरीला ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक सन्मान (१९८९), साहित्य अकादमीची अधिछात्रवृत्ती (१९९४), दिल्ली उर्दू अकादमीचा बहादूरशाह जफर पुरस्कार (२०००), भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९८४) व पद्मभूषण (२००५) इत्यादी मानसन्मान देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.
नोएडा येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
शेख, आय्. जी.; मिठारी, सरोजकुमार