हेवुड, टॉमस : (सु.१५७०–१६ ऑगस्ट १६४१). उत्तर एलिझाबेथकालीन प्रसिद्ध इंग्रज नाटककार, नट व लेखक. जन्म लँकाशर, इंग्लंड येथे. हेवुड केंब्रिज विद्यापीठात शिकला असे दिसते; तथापि त्या संदर्भात लिखित पुरावा उपलब्ध नाही.
लंडन येथील फिलिप हेंझ्लो याच्या ॲडमिरल्स मेन या नाटक कंपनीत १५९८ पूर्वी हेवुड सहभागी झाला असावा. अल्पावधीतच नाट्यलेखक व कलाकार म्हणून तो प्रसिद्धिस आला आणि पुढे लंडनमध्ये स्थायिक झाला. त्याने २२० नाट्यकृती लिहिल्याची वदंता आहे. त्यांपैकी त्याने अंशतः वा पूर्णतः लिहिलेल्या २४ नाट्यकृतीच आज उपलब्ध आहेत. नाटककार म्हणून त्याने तत्कालीन अनेक नाटक कंपन्यांना सेवा दिली. उदा., डर्बीज मेन, वुर्सेस्टर्स मेन. त्याच्या बहुतेक नाट्यकृती बहुजिनसी व अनेकदा विसंगत कथानकाच्या मिश्रणात गुरफटलेल्या आढळतात. त्यांचा विषय भावनाप्रवण असूनसुद्धा त्यांचे नेपथ्य वास्तववादी आहे. त्यांतून लंडनमधील दैनंदिन जीवनाचे दर्शन होते.
द फोर प्रेंटिसीस ऑफ लंडन (१५९२) ही हेवुडच्या उपलब्ध नाट्यकृतींपैकी सर्वांत आधीची नाट्यकृती होय. ही नाट्यकृती कृतिशीलता, साहस आणि रोमान्स या गुणांना समर्पित केलेल्या नाट्यसमुहातील एक असून नंतर तिचे विडंबन ब्यूमाँट याने द नाइट ऑफ द बर्निंग पेसल यात केले आहे. या नाटकात लंडनहून आलेल्या चार नवशिक्यांचे (अप्रेंटिस) विलक्षण साहस वर्णन केले आहे; कारण ते पहिल्या धर्मयुद्धाची जबाबदारी अंगीकारतात. त्यांना राजपद मिळते आणि आपल्या बहिणीचे लग्न इटालियन राजपुत्राशी झाल्याचे त्यांना पाहावयास मिळते. ए वुमन किल्ड विथ काइंडनेस (सादरीकरण १६०३; प्रकाशित १६०७) ही त्याची सर्वोत्कृष्ट नाट्यकृती समजली जाते. मध्यमवर्गीय जीवनावर बेतलेली अगदी आरंभीच्या शोकात्मिकांपैकी ही एक होय. प्रियकराकरिता वासनेच्या आहारी गेलेली एक विवाहित स्त्री आणि त्याबद्दल सूड घेण्याऐवजी तिला अखेरीस क्षमा करणारा तिचा नवरा ह्यांचे संवेदनशीलतेने केलेले चित्रण ह्या नाट्यकृतीत आढळते. तिचा नवरा तिला एकाकी अवस्थेत एका वेगळ्या घरात राहायला लावतो. तेथे तिला सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतात; पण तिचा नवरा आणि मुले ह्यांचे दर्शन होत नाही. त्यामुळे ती अपराधीपणाच्या भावनेने एकाकी आयुष्य व्यतीत करते. अखेरीस ती मरणपंथाला लागलेली असताना तिचा नवरा तिला भेटतो व तिला क्षमा करतो. त्याच्या बाहुपाशातच तिचा अंत होतो. हेवुडच्या कलेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार भावनात्मक कौंटुबिकतेमध्ये होतो. एलिझाबेथकालीन नाट्यसाहित्यात एक उत्कृष्ट नाट्यकृती म्हणून तिला स्थान आहे. हेवुडच्या अन्य उल्लेखनीय नाट्यकृतींत द कॅप्टिव्ह्ज ऑर द लॉस्ट रिकव्हर्ड (सादरीकरण १६२४; प्रकाशित १८८५), ए प्लेझंट कॉमेडी, कॉल्ड ए मेडनहेड वेल लॉस्ट (१६३४) ह्यांचा समावेश होतो. त्याने काही मुखवटा नाट्ये (मास्क्स), तसेच काही मिथ्यकथात्मक आणि ऐतिहासिक नाटकेही लिहिली. उदा., इफ यू नो नॉट मी, यू नो नोबडी (१६०५-०६) हे पहिल्या एलिझाबेथविषयीचे नाटक होय. लोदिनी स्पेक्यूलम ऑर लंडन्स मिरर (१६३७) ही त्याची अखेरची नाट्यकृती ठरली.
हेवुडने अनेक पुस्तके आणि पुस्तकपत्रेही लिहिली. त्याचे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ॲन अपॉलजी फॉर ॲक्टर्स (१६१२) हे होय. अभिनेत्यांची समाजाला असलेली उपयुक्तता, त्यांचे समाजातील स्थान आणि प्रतिष्ठा ह्यांचे विवेचन त्यात आहे. लंडन येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Boas, F. S. Thomas Heywood, London, 1950.
2. Velte, F. M. The Bourgeois Elements in the Dramas : Thomas Heywood, New York, 1924.
गुडेकर, विजया म.