ड्युइसबुर्क : पश्चिम जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन–वेस्टफेलिया प्रांतातील औद्योगिक शहर. हे ड्युसेलडॉर्फच्या उत्तरेस २४ किमी.वर ऱ्हाईन आणि रुर यांच्या संगमावर वसले आहे. लोकसंख्या सु. ४,५७,९०० (१९७०). मूळ शहर रुरच्या दक्षिणेस होते व रोमन काळापासून ते व्यापारी केंद्र होते. सध्याचे शहर ऱ्हाईनपर्यंत कालव्याने जोडले असून शहरापर्यंत जहाजांची ये–जा होते. नदीकाठावरील या बंदराने ६३२ हे. क्षेत्र व्यापले असून कालव्यांच्या व वाहतुकीच्या सोयींमुळे हे व्यापार उद्योगांचे मोठे केंद्र बनले आहे. येथे तेलशुद्धीकरण, पोलादी –लोखंडी वस्तू, अवजड यंत्रे, रासायनिक द्रव्ये, सुती व लोकरीचे कापड, तंबाखू, साबण इ. उत्पादनांचे कारखाने आहेत. नेदर्लंड्समधील ॲम्स्टरडॅम व रॉटरडॅम ही औद्योगिक शहरे जलमार्गाने ड्युईसबुर्कशी जोडलेली आहेत. जगातील मोठ्या भू–अंतर्गत बंदरापैकी हे एक बंदर आहे. येथील गोद्यांची एकूण लांबी सु. ४२ किमी. आहे. जलमार्गाने व लोहमार्गाने येथे मोठा व्यापार चालतो. येथे स्थानिक कला–इतिहासाची संग्रहालये, प्राणिसंग्रहालय तसेच प. जर्मनीतील सर्वांत मोठे जलजीवालय आहे.