ड्रायझर, थिओडोर : (२७ ऑगस्ट १८७१–२८ डिसेंबर १९४५). विख्यात अमेरिकन कादंबरीकार. इंडियाना राज्यातील टेरी हट ह्या ठिकाणी एका गरीब पण अत्यंत धार्मिक वृत्तीच्या कुटुंबात जन्मला. लहानपण हलाखीत गेले. धर्मसंस्थांतून आरंभीचे काही शिक्षण झाले. इंडियानातील वॉर्‌सॉ येथेही अल्पकाळ शिक्षण घेतले.

बाल्झॅक, टी. एच्. हकस्‌ली, हार्डी व हर्बर्ट स्पेन्सर ह्यांचा त्याच्यावर प्रभाव पडला. प्रारंभी वृत्तपत्रकार म्हणून काम केल्यावर सिस्टर कॅरी (१९००) ही आपली वास्तववादी कादंबरी त्याने लिहिली. तथापि कनिष्ठ मध्यम वर्गातील एक मुलगी सुखोपभोगासाठी स्वतःच्या शीलाचा बळी देते, असे तीत दाखविले असल्यामुळे प्रकाशकाने तिच्या प्रसिद्धीविक्रीविषयी उदासीनतेची वृत्ती ठेवली. परिणामतः तिचा फारसा खप झाला नाही. एका कलावंताच्या कलंदर जीवनावरील द जीनिअस (१९१५) ह्या त्याच्या कादंबरीने तर तत्कालीन सोवळ्या अमेरिकन समाजात वादळ उठविले. ॲन अमेरिकन ट्रॅजिडी (१९२५) ह्या कादंबरीने ड्रायझरला कादंबरीकार म्हणून मोठी मान्यता मिळवून दिली. सुखोपभोगांना लालचावलेला दुबळ्या मनाचा एक युवक एका निष्पाप मुलीच्या मरणाला कारणीभूत होऊन देहान्ताची सजा भोगतो, असे तीत दाखविलेले आहे, इहवादी समाज हा त्या खुनाला खुनी तरुणाइतकाच जबाबदार आहे, हे ड्रायझरने ह्या कादंबरीत परिणामकारकपणे दाखवून दिलेले आहे.

‘कॉपरवुड ट्रिलॉजी’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या द फिनन्सिअर (१९१२), द टायटन (१९१४), व द स्टोइक (१९४७) ह्या तीन कादंबऱ्या एका उद्योगपतीच्या जीवनावर आधारलेल्या आहेत. द बुलवर्क (१९४६) ह्या कादंबरीचा नायकही एक उद्योगपतीच आहे. नैतिक मूल्यांतच खरे सुख आहे, हे त्याला अखेरीस कळते.

ड्रायझरच्या कादंबऱ्यांत रचनासौष्ठवाचा अभाव आहे. मानवी मनोव्यापारांना शास्त्रीय चौकटीत बसविण्याचा त्याचा हव्यास खटकतो. त्याची शैलीही सपक, वर्तमानपत्री आहे. तथापि त्याची प्रांजळ, वास्तववादी दृष्टी, अमेरिकन भोगवादाचे त्याने केलेले कठोर विश्लेषण आणि जीवनाचा मर्मस्पर्शी साक्षात्कार घडविण्याची प्रक्षोभक शक्ती ह्यांमुळे अमेरिकन कादंबरीकारांत त्याचे स्थान वरचे आहे. कथालेखन आणि आत्मचरित्रात्मक लेखनही त्याने केलेले आहे.

संदर्भ : 1. Dreiser, Helen, My life with Dreiser, 1951.

           2. Kazin A. Shaptro, C. The Stature of Theodore Dreiser, 1955.

           3. Matthiessen, F. O. Theodore Dreiser, 1951.

           4. Moers, Ellen, Two Dreisers, 1969.

            5. Swanberg, W. A. Dresier, 1965.

 

नाईक, म. कृ.