ड्रॅसीना : काही शोभिवंत पानांची झुडपे व काही वृक्ष यांचा समावेश असलेला ⇨ लिलिएसी अथवा पलांडु कुलातील हा एक वंश असून याचे मूलस्थान आशिया व आफ्रिका या खंडांतील उष्ण प्रदेश हे होय. भारतात सु. सहा जाती रानटी अवस्थेत व इतर अनेक उपजाती व प्रकार बागेत लावलेले आढळतात. खोडावर थोड्या किंवा अनेक फांद्या व एकाआड एक खड्गाकृती किंवा रुंद चिवट, लांब, साधी अंडाकृती हृदयाकृती, बहुसिराल (अनेक शिरांची), पिवळट हिरवी, लालसर वा अनेक रंगी पट्टे असलेली शोभिवंत पाने असतात. फुले पांढरी किंवा हिरवट पांढरी, लहान असून विविध फुलोऱ्यांत येतात. परिदले सहा व मंडल घंटाकृती, नलिकाकृती किंवा नसराळ्यासारखे असते. केसरदले सहा व किंजपुट तीन कप्प्यांचा असतो. प्रत्येक कप्प्यात एकच बीजक असते [⟶ फूल]. मृदुफळात किंवा बोंडात जाड कवचाची बीजे असतात. एकूण चाळीस जातींपैकी ड्रॅ. एलिप्टिका, ड्रॅ. कॉन्सिन्ना, ड्रॅ.गोल्डियाना या जाती भारतात सामान्यत: बागेत लावलेल्या आढळतात. कलमांनी व अधश्चरांनी (धावत्यांनी) त्यांची नवीन लागवड करतात. कॅनरी बेटांतील ड्रॅ. ड्रॅको (ड्रॅगॉन वृक्ष) याची उंची नऊ ते अठरा मी. आहे तो शाखायुक्त असून पानांची संख्या जास्त असते. ‘ड्रॅगन्स ब्लड’ नावाचा स्तंभक (आकुंचन करणारा) लाल राळेसारखा पदार्थ या झाडापासून मिळतो तो रोगणात, दंतधावन चूर्णांत व अनेक आसवांत घालतात.
जगताप, अहिल्या पां.
“