न्यूट : ट्रायट्यूरस वंशातील प्राण्यांना सॅलॅमँडर असे संबोधले जाते, ते चूक आहे. ट्रायट्यूरस वंशातील प्राणी हे सॅलॅमँडर नसून न्यूट आहेत. जरी सॅलॅमँडर आणि न्यूट हे प्राणी उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहाणाऱ्या) वर्गातील यूरोडेला (कॉडेटा) गणातील प्राणी असले, तरी दोघांचे वंश भिन्न आहेत आणि शास्त्रीय दृष्ट्या दोन्हींमध्ये अनेक फरक आहेत.
न्यूटच्या सर्वाधिक जाती यूरोपात आढळतात. उ. आफ्रिका, आशियातील समशीतोष्ण कटिबंधीय भाग, जपान व उ. अमेरिका या भागांतही याच्या काही जाती आढळतात.
न्यूटच्या दोन्ही जबड्यांत व टाळूवर दात असतात पुढच्या पायांना चार व मागच्या पायांना पाच बोटे असतात शेपूट दोन्ही बाजूंनी चेपलेले असते त्वचेवर ग्रंथी असतात त्वचा ओलसर व सामान्यतः खडबडीत असते.
प्रौढ न्यूट स्थलचर असतो. फक्त जननाच्या वेळी न्यूट पाण्याकडे जातात. डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) जलीय असतो. जनन नेहमी पाण्यात व वसंत ऋतूत होते. त्या वेळी नरामध्ये अनेक बदल होऊन तो सुंदर व आकर्षक दिसू लागतो. त्याच्या अंगावरील रंग अधिक उठावदार व चकचकीत होतात. पाठीच्या कण्यावर त्वचेपासून उत्पन्न झालेला तुऱ्यासारखा भाग दिसू लागतो. हा तुऱ्यासारखा भाग पृष्ठीय (पाठीच्या) मध्य भागावर डोळ्यांच्या पाठीमागे सुरू होऊन शेपटीच्या पश्च (मागच्या) टोकापर्यंत पसरलेला असतो. मागच्या पायांवर शृंगी कटक (शिंगाच्या द्रव्याच्या शिखा) दिसू लागतात. हा सर्व बदल मादीला आकर्षिण्याकरिता असतो. निषेचन (फलन) आंतरिक (शरीरात) असते. अनुनयानंतर शुक्राणूधर (शुक्राणू धारण करणाऱ्या पिशव्या) मादीच्या अवस्करात (ज्यामध्ये आतडे, युग्मक वाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात अशा शरीराच्या मागील टोकाकडे असणाऱ्या समाईक कोष्ठात) नेले जातात आणि तेथे बोटाच्या आकाराच्या एका कप्प्यात मादी ते साठविते. मादी अंडी पाण्यात घालते व ती पाण्यातील वनस्पतींना चिकटलेली आढळतात.
अंडी घातल्यापासून दोन आठवड्यांनी अंड्यांमधून डिंभ (टॅडपोल) बाहेर येतात. न्यूटच्या डिंभालाही टॅडपोल (भैकेर) म्हणतात. टॅडपोलला अग्रपाद अगोदर फुटतात व नंतर पश्चपाद फुटतात. पूर्ण वाढ झालेल्या टॅडपोलला शाखित क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) तीन जोड्या असतात. टॅडपोलचे रूपांतरण (प्रौढावस्था प्राप्त होताना रूप व संरचना यांत होणारे बदल) होऊन न्यूट उत्पन्न होतो. रूपांतरणाला तीन महिने लागतात. काही डिंभांचे रूपांतरण न होता ते कायम डिंभावस्थेत राहतात. डिंभावस्थेत असूनसुद्धा ते प्रौढ न्यूटसारखे जननक्षम असतात. [→ चिरडिंभता]. जलचर डिंभाचे रूपांतर स्थलचर प्रौढात होते. प्रौढ स्थलचर असतात. फार थोडे न्यूट प्रौढावस्थेत जलचर असतात (उदा., ट्रायट्यूरस क्रिस्टेटस) व जननऋतूखेरीज ते पाण्यात जात नाहीत. ते दिवसा दमट, ओलसर जागी लपून बसतात आणि रात्री भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडतात. कीटक, कृमी, अळ्या आणि गोगलगायी हे त्यांचे अन्न होय.
उ. अमेरिकेतील ट्रायट्यूरस व्हिरिडेसेन्सच्या अंगावर लाल ठिपके असतात, याला लाल ठिपक्यांचा न्यूट असेही म्हणतात. याच्या डिंभाचे क्लोम नाहीसे झाल्यावर तो पाण्याबाहेर येतो व तीन वर्षे स्थलचर असतो. त्यानंतर त्याची खडबडीत कातडी गुळगुळीत होते आणि शरीराचा रंग हिरवा होतो. असे बदल झालेला न्यूट जमीन सोडून पाण्याकडे जातो व कायमचा जलचर होतो.
जोशी, मीनाक्षी
“