कुळकर्णी, वामन लक्ष्मण : (६ एप्रिल १९११— ). एक प्रसिद्ध मराठी समीक्षक. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे जन्म. नासिक हायस्कूल, नासिक येथे शालेय शिक्षण. हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेज, नासिक विल्सन कॉलेज, मुंबई आणि गव्हर्नमेंट टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, मुंबई या महाविद्यालयांतून एम्. ए. बी. टी. पर्यंत शिक्षण. एम्. ए. ला चिपळूणकर मराठी पारितोषिक मिळविले (१९३५). १९३६ ते १९४४ पर्यंत मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक १९४४ ते १९५९ पर्यंत विल्सन कॉलेज, मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक व १९५९ पासून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे मराठी विभागाचे प्रमुख. १९७४ पासून मुंबई विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख.

वामन मल्हार : वाङ्‌मय-दर्शन (१९४४) हा वामन मल्हार जोशी यांच्या समग्र वाङ्‌मयाचे समालोचन व मूल्यमापन करणारा पहिला ग्रंथ. श्रीपाद कृष्ण : वाङ्‌मय-दर्शन (१९५९) आणि नाटककार खाडिलकार : एक अभ्यास (१९६५) हे अनुक्रमे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या वाङ्‌मयाचे समालोचन व मूल्यमापन करणारे ग्रंथ. मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास व वाङ्‌मय विचार (१९६५) या ग्रंथात एकोणिसाव्या शतकातील मराठी ज्ञानप्रसारक या नियतकालिकाच्या कार्याचे मूल्यमापन. वाङ्‌मयातील वादस्थळे (१९४६), वाङ्‌मयीन मते आणि मतभेद (१९४९), वाङ्‌मयीन टीपा आणि टिप्पणी (१९५३), वाङ्‌मयीन दृष्टी आणि दृष्टिकोण (१९५९), साहित्य शोध आणि बोध (१९६७) ह्या ग्रंथांमधून त्यांचे समीक्षात्मक स्फुट निबंध संगृहीत झालेले आहेत. साहित्यातील विविध प्रश्नांची, साहित्यप्रकारांच्या घाटाची आणि काही लेखकांची व साहित्यकृतींची समीक्षात्मक चर्चा यांतील स्फुट निबंधांमधून त्यांनी केली आहे. १९४५ नंतर मराठी साहित्यात सुरू झालेल्या नव्या वाङ्‌मयीन प्रवाहांवरील भाष्य आणि समीक्षाही या ग्रंथांतून केलेली आहे. साहित्य आणि समीक्षा (१९६३) या स्फुट निबंधसंग्रहातून त्यांची वाङ्‌मयविषयक भूमिका सलगपणे मांडली गेली आहे. कलाकृतीतील चैतन्यतत्त्वाला महत्त्व देणारी आणि कलेची स्वायत्तता मांडणारी कलावादी भूमिका त्यांच्या समीक्षणात्मक लेखनातून व्यक्त झाली आहे.

समीक्षक, साहित्य, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, प्रतिष्ठानसमीक्षा या नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले.

ते १९५७ सालच्या औरंगाबाद येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या समीक्षाशाखेचे अध्यक्ष १९५८ सालच्या मालवण येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनातील कथाशाखेचे अध्यक्ष १९६५ मध्ये मराठी महामंडळाच्या वतीने प्रथम भरवल्या गेलेल्या हैदराबाद येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या ४६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष १९७१ सालच्या महाड येथील बौद्ध साहित्य परिषदेचे उद्‌घाटक होते. १९६५ साली अमेरिकन सरकारच्या आमंत्रणावरून तेथील शैक्षणिक आणि वाङ्‌मयीन जीवनाची पाहणी करण्यासाठी त्यांनी अमेरिकेचा तीन महिन्यांचा दौरा कैला.

रसाळ, सुधीर