न्यिक्यीत्यिन, अफानस : (पंधरावे शतक). भारताला भेट देणाऱ्या या पहिल्या रशियन प्रवाशाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. मॉस्कोच्या वायव्येस सु. १६० किमी. असलेल्या कालीनिन या शहरी हा व्यापार करीत असे. व्यापारनिमित्त तो दूरदूरचा प्रवास करी. १४६६ मध्ये तो व्होल्गा नदीमार्गे तिच्या मुखाशी असलेल्या बाकू या कॅस्पियन समुद्रावरील बंदराशी आला. तेथून इराणला निघालेल्या बोटीने तो इराणमध्ये आला आणि तेथे दोन वर्षे त्याने भ्रमंती केली. १४६९ मध्ये तो इराणमधील ओर्मुझ बंदरामध्ये वास्तव्य करीत असता, भारताला निघालेले जहाज त्याला मिळाले. त्यामधून तो भारतात आला. येथील तीन वर्षांच्या वास्तव्यात त्याने भारताच्या दक्षिण भागातही प्रवास केला. १४७२ मध्ये तो आफ्रिकेतील सोमाली लँडला गेला व तेथून इराण, तुर्कस्तान व काळ्या समुद्रामार्गे काफा बंदराला गेला. ट्रॅव्हल ऑन थ्री सीज या त्याच्या पुस्तकात त्याने आपल्या प्रवासवर्णनाचा अहवाल दिला आहे. त्यात तत्कालीन यूरोप आणि रशिया यांमध्ये भारताविषयी असलेल्या भ्रामक समजुती त्याने खोडून काढल्या. रिम्‌स्कि – कॉर्साकॉफ याच्या सॅडको नावाच्या संगीतिकेत हिंदुस्थानला भेट देणारा व्यापारी नायक हाच आहे.

शाह, र. रू.