सदाशिवगड – १ : कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. उत्तर कानडा जिल्ह्यातील चिताकुळ या छोटया गावात, कारवारच्या उत्तरेला सु. ७ किमी.वर काळीनदी लगतच्या पठारावर हा किल्ला आहे. नदीपात्रापासून त्याची उंची सु. ७२ मी. असून सभोवती तटबंदी आहे. हा किल्ला सोंडच्या बसवलिंग (१६९७-१७४५) या राजाने बांधला. सोंडचे हिंदू राजे हे विजयानगरच्या राजघराण्याच्या वारसांपैकी असून त्यांची राजवट इ. स. १५७० ते १७६२ पर्यंत होती. बसवलिंगाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यास सदाशिवगड हे नाव दिले. या किल्ल्याच्या नदीकडील बाजूस उभा कडा असल्यामळे तो दुर्भेदय होता. तथापि इ. स. १७५२ मध्ये पोर्तुगीजांनी थोडयाशा संघर्षानंतर हा किल्ला हस्तगत केला. पुढे १७५४ मध्ये मराठयांबरोबर युद्ध सुरू होताच त्यांनी तो किल्ला सोंडच्या राजाला परत केला. पुढे हैदर अलीचा सेनापती फज्ल-उल्लाह याने १७६३ मध्ये हा गड काबीज केला. तेव्हा तेथील राजाने गोव्यात पोर्तुगीजांकडे आश्रय घेतला. पुढे ब्रिटिशांच्या एका पलटणीने १७८३ मध्ये तो जिंकला. चिताकुळला सदाशिवगड बांधल्यापासून त्याचे नाव सदाशिवगड असे रूढ झाले.

देशपांडे, सु. र.