रीम्झ : फ्रान्सच्या ईशान्य भागातील शँपेन-आर्देन प्रदेशाच्या मार्न विभागातील प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी शहर. लोकसंख्या शहर १,८१,९८५ महानगरीय १,९९,३८८ (१९८२ जनगणना). हे पॅरिसच्या पूर्व-ईशान्येस १३५ किमी. व्हेल नदीच्या (एन नदीची उपनदी) तीरावर वसलेले आहे. एन−मार्न कालव्यावरील हे मुख्य बंदर आहे. द्राक्षमळ्यांच्या सान्निध्यात रीम्झ वसलेले असून शँपेन मद्यनिर्मितीसाठी ते विशेष प्रसिद्ध आहे. मद्य साठविण्यासाठी शहरात तसेच परिसरात मोठमोठ्या भुयारांचे जाळेच तयार झालेले आढळते. मध्ययुगीन काळापासून येथील वस्त्रोद्योग महत्त्वाचा आहे. तेव्हापासून यूरोपातील व्यापारदृष्ट्या महत्त्वाच्या ठरलेल्या या ठिकाणी व्यापारोत्सव भरतो. याशिवाय यंत्रसामग्री, विमाने, सायकली, काच, बेकरी उत्पादने इ. उद्योगधंदे येथे चालतात.

फ्रान्सच्या इतिहासात रीम्झला विशेष महत्त्व दिल्याचे आढळते. ज्यूलिअस सीझरने गॉलिक युद्धावरील कॉमेंटरीज या आपल्या ग्रंथात रीमाई या गॅलिक जमातीचा उल्लेख केलेला आहे. ह्या जमातीची वस्ती येथे असल्यावरूनच त्याचे नाव रीम्झ असे पडले असावे. रोमन याचा उल्लेख द्युरकोर्तोन्म असा करीत. हे गॉलचे अग्रेसर शहर व रीमाईंची राजधानी होती. इ. स. तिसऱ्या शतकात ही रोमन गव्हर्नरचे निवासी तसेच आर्चविशपचे मुख्य ठिकाणी बनले. रोमनांच्या ताब्यात असताना त्याची विशेष भरभराट झाली. ४०६ मध्ये व्हँडालांनी व त्यानंतर ॲटिलाच्या सैनिकांनी या ठिकाणची लुटालूट केली. ४९६ मध्ये फ्रँक राजा पहिला क्लोव्हिस (कार. ४८१−५११) याला रीमाईचा बिशप (रीमीग्वीस) याच्याकडून ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यात आली व त्याला सर्व फ्रँकांचा राजा घोषित करण्यात आले त्यामुळेही रीम्झचे धार्मिक महत्त्व वाढले. ११७९ मध्ये फिलिर ऑगस्टस याचा राज्याभिषेक रीम्झमध्ये झाल्यानंतर १८३० पर्यंत बहुतेक सर्व फ्रेंच राजांचे राज्याभिषेक येथेच झाले. त्यांपैकी १४२९ मधील सातवा चार्ल्स याचा राज्याभिषेक विशेष उल्लेखनीय ठरला कारण तेव्हा जोन ऑफ आर्क उपस्थित होती. तेराव्या शतकात येथील कॅथीड्रलचे आगीमुळे खूपच नुकसान झाले. १५४७ मध्ये तिसरे पोप पॉल यांनी येथे विद्यापीठाची स्थापना केली. १८१४ मध्ये पहिला नेपोलियन याने आपला शेवटचा विजयोत्सव रीम्झ येथेच साजरा केला. पहिल्या महायुद्धकाळात हे जर्मनांनी बळकावले. जर्मनांनी केलेल्या बाँबहल्ल्यामुळे येथील कॅथीड्रल, नगरभवन (सतरावे शतक) व सेंट रीमाईच्या जुन्या चर्चसह शहराचे खूपच नुकसान झाले. १९२७−३८ या काळात कॅथीड्रलचे नूतनीकरण करण्यात आले. त्यासाठी रॉकफेलर प्रतिष्ठानकडून मोठी देणगी मिळाली. दुसऱ्या महायुद्धकाळातही रीम्झची खूपच हानी झाली. १९४०−४४ या काळातही ते जर्मनांच्याच वर्चस्वाखाली राहिले. ऑगस्ट १९४४ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे लष्कर येथे दाखल झाले होते. ७ मे १९४५ रोजी जर्मनांनी या शहरात बिनशर्त शरणागती स्वीकारली. १९६२ मध्ये येथे आणखी एका विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. शहरात अनेक जुन्या परंतु सुंदर वास्तू पहावयास मिळतात. तेराव्या शतकातील नोत्र दाम कॅथीड्रल−गॉथिक शिल्पकलेतील अप्रतिम कलावास्तू−हे रीम्झमधील प्रमुख आकर्षण आहे. झां बातीस्त कॉलबेअर व सेंट जॉन बातीस्त दे ला साले यांचे रीम्झ हे जन्मस्थान होय.

चौधरी, वसंत