नैसर्गिक निवड : जैव क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) सिद्धांताचे [→ क्रमविकास] समर्थन करण्यासाठी जे सिद्धांत मांडले गेले त्यांमध्ये ⇨ चार्ल्‌स रॉबर्ट डार्विन (१८०९–८२) यांच्या ‘नैसर्गिक निवड’ या सिद्धांताचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. बायबलमध्ये ‘ईश्वराने सृष्टीच्या आरंभी प्रत्येक प्राणी स्वतंत्र रीतीने निर्माण केला’ असे लिहिले आहे. क्रमविकासवाद्यांचे म्हणणे तर याच्या उलट पडले. अर्थातच पोप आणि त्यांचे अनुयायी यांच्यापुढे क्रमविकासवाद्यांना पुष्कळ वर्षे डोके वर काढता आले नाही परंतु हळूहळू शास्त्रीय सत्याच्या प्रभावामुळे ही स्थिती बदलत गेली व पुष्कळ लोक बायबल मधील उपपत्तीच्या खरेपणाबद्दल शंका घेऊ लागले. क्रमविकासाच्या तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्यांत मुख्यतः जी. एल्. एल्. ब्यूफाँ, जे. बी. लामार्क, एच्. स्पेन्सर आणि डार्विन या शास्त्रज्ञांची गणना होते.

डार्विन यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी दक्षिण अमेरिकेकडे जाणाऱ्या ‘बीगल’ या जहाजावर प्रकृतिवैज्ञानिक म्हणून ५ वर्षे (१८३१–३५) प्रवास केला. या मुदतीत त्यांनी दक्षिण अमेरिकेतील व त्याच्याजवळ असणाऱ्या गालॅपागस या बेटांवरील प्राणी आणि वनस्पती यांच्यासंबंधी विपुल माहिती गोळा केली. विशेषतः कबुतरांच्या निरनिराळ्या जातींचे त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले. या सर्व निरीक्षणांचात्यांनी नंतर वीस वर्षे अभ्यास केला. यामुळे डार्विन यांना बायबल मध्ये दिलेल्या सृष्टीच्या उपपत्तीविषयी शंका आली. स्वतः केलेल्या निरीक्षणावरून त्यांची अशी पक्की समजूत झाली की, या जीवसृष्टीमध्ये ज्या अर्थी विविधता आणि व्यवस्थितपणा आढळून येतो त्या अर्थी या सर्व गोष्टींचे कारण दैवी शक्ती अथवा ईश्वरी इच्छा हे नसून या विविधतेचा पाया काही नैसर्गिक आणि नियमबद्ध अशा गोष्टींवर रचला असला पाहिजे. याच सुमारास टी. आर्. मॅल्थस यांचा लोकसंख्येच्या वाढीसंबंधीचा एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हा प्रबंध डार्विन यांच्या वाचनात आला. या प्रबंधात लेखकाने असे प्रतिपादन केले होते की, मनुष्यजातीमध्ये प्रजेची वाढ गुणोत्तर श्रेणीमध्ये (जिच्या लगतच्या दोन संख्यांचे गुणोत्तर नेहमी स्थिर असते अशा श्रेणीमध्ये) होते पंरतु अन्नादी साधनसामुग्रीची वाढ समांतर श्रेणीमध्ये (जिच्या लगतच्या दोन संख्यांमधील फरक स्थिर असतो अशा श्रेणीमध्ये) होते. रोग. दुष्काळ, युद्धे इत्यादींमुळे प्रजेची वाढ ठराविक प्रमाणातच राहते. तशी ती न राहिल्यास या जगाच्या पाठीवर लोकसंख्या अनिर्बंध वाढून मानवाला फक्त उभे राहण्यापुरतीच जागा मिळेल. डार्विन यांनी हा सिद्धांत प्राणी व वनस्पती यांना लावून पाहिला आणि असे अनुमान काढले की, मॅल्थस यांचा मनुष्यजातीबद्दलचा सिद्धांत इतर प्राणी आणि वनस्पती यांच्या बाबतीतही लागू पडत असून प्राण्यांची व वनस्पतींची संख्या ठराविक प्रमाणाबाहेर वाढली, तर अन्न व निवारा यांचा तुटवडा पडेल. या आवश्यक गरजांसाठी आणि प्रजोत्पादनासाठी प्राण्यांमध्ये चुरस निर्माण होऊन जे धूर्त, चपळ आणि मजबूत असतील अशांनाच या गोष्टी मिळून इतरांची उपासमार होऊन ते मरतील. ही एक प्रकारची नैसर्गिक निवड आहे. अशा तऱ्हेने विशिष्ट वरचढ गुण असणारे प्राणी निवडले जातात व आनुवंशिकतेमुळे त्यांच्या पुढील पिढीतही हे श्रेष्ठ गुण उतरतात. हाच क्रम पिढ्यान्‌पिढ्या चालला, तर शेवटच्या पिढीतील प्रजा मूळ पिढीपेक्षा अगदी वेगळी झाल्याचे आढळते. अशा तऱ्हेने क्रमविकासाचे कारण जीवनार्थ कलह आणि नैसर्गिक निवडीमुळे जगण्यास लायक अशाच प्राण्यांचा निभाव लागणे हे आहे.

योगायोगाने याच सुमारास ए. आर्. वॉलिस (१८२३–१९१३) हे इंग्लिश संशोधक ईस्ट इंडीज बेटांमधील प्राण्यांचे निरीक्षण करीत असताना त्यांना असे आढळून आले की, प्राण्यांच्या निरनिराळ्या जाती निर्माण होण्यास नैसर्गिक निवड जबाबदार असते. वॉलिस यांनी आपले विचार डार्विन यांना कळविले. दोघांच्या विचारांतील साम्य पाहून डार्विन चकीत झाले परंतु डार्विन यांनी गोळा केलेल्या विपुल माहितीचे महत्त्व लक्षात घेऊन वॉलिस यांनी डार्विन यांना या संशोधनाचे जास्त श्रेय दिले. या दोघांनी संयुक्तपणे लंडन येथील लिनीअन सोसायटी या संस्थेच्या १ जुलै १८५८ रोजी भरलेल्या सभेत क्रमविकासासंबंधीची आपली नवीन उपपत्ती मांडली. या उपपत्तीचे संमिश्र स्वागत झाले. त्या काळी बहुतेक लोक पुराणमताभिमानी असल्याने बायबलमधील उपपत्तीच बरोबर असल्याचे मानून त्यांनी डार्विन यांच्या उपपत्तीला कसून विरोध केला परंतु डार्विन यांची विचारसरणी इतकी बिनचूक होती आणि तिची मांडणी इतक्या भक्कम पायावर झाली होती की, तिच्यावर कशाही प्रकारचे आघात झाले, तरी ती ढासळून पडणे शक्य नव्हते. डार्विन स्वतः वादविवादपटू नसले, तरी इंग्लंडमध्ये टी. एच्. हक्स्‌ली व जर्मनीमध्ये ई. एच. हेकेल यांसारख्या विद्वान व वादविवादपटूंनी आपल्या व्याख्यानांनी व लेखांनी डार्विन यांच्या नैसर्गिक निवडीच्या क्रमविकास तत्त्वाला दृढ स्थान मिळवून दिले. याच सुमारास जगातील विविध भागांत वनस्पती आणि प्रांणी यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनाही जी जाति-विविधता आढळून आली त्यामुळे डार्विन यांच्या सिद्धांताला त्यांच्याकडून पाठिंबा मिळाला. १८५९ साली डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पिशीज हा ग्रंथ प्रसिद्ध केला. डार्विन यांच्या उपपत्तीला ‘डार्विनवाद’ असेही म्हणतात. या मीमांसेत क्रमविकासाच्या अनेक कारणांची चर्चा केली आहे. ही कारणे म्हणजे (१) प्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी ही संख्या ठराविक मर्यादेपर्यंत राहते. उदा., कावळ्याची मादी प्रत्येक वेळी पाच अशी वर्षातून दोनदा अंडी घालते. वीस वर्षांच्या मुदतीत कावळ्याच्या एका जोडीपासून अंदाजे २०० कावळे निर्माण होत असले, तरी त्यांतील १९८ कावळे कोणत्या ना कोणत्या कारणाने जिवंत राहत नाहीत. यामुळे कावळ्यांची मूळ संख्या कायम राहते. कार्प मासा प्रतिवर्षी २,५०,००० अंडी घालतो आणि ५० वर्षांच्या कालावधीत १,२५,००,००० प्रजा निर्माण करतो परंतु काही ना काही कारणाने ही प्रजा नष्ट होऊन मूळ संख्या कायम राहते. (२) प्राण्यांची ही संख्येतील वाढ कायम राहण्याचे कारण जीवनार्थ कलह हे आहे. अन्न, निवारा आणि प्रजोत्पादन या मूलभूत गरजांसाठी या प्राण्यांत एक प्रकारची चढाओढ लागते. (३) या जीवनार्थ कलहामुळे प्राण्यामध्ये अनेक फरक घडून येतात. हे फरक पुढील पिढीत आनुवंशिकतेमुळे उतरविले जाऊन प्राण्यांमध्ये विविधता निर्माण होते. (४) या चढाओढीत नैसर्गिक निवडीमुळे फक्त बलिष्ठ प्राण्यांनाच जगण्याची संधी दिली जाते. दुर्बल प्राणी नाश पावतात. (५) आजूबाजूच्या परिस्थितीत घडणाऱ्या बदलाप्रमाणे प्राण्यांच्या शरीर रचनेतही बदल घडून येतात. (६) या सर्वांचा परिणाम म्हणजे प्राण्यांच्या नवीन जाती निर्माण होतात.

डार्विन यांचा वरील सिद्धांत प्रदीर्घ व खोल निरीक्षणावर आधारित असला, तरी त्यात काही उणिवा राहिल्या आहेत. प्रत्येक पिढीत आवश्यक ते बदल कशामुळे घडून येतात याची डार्विन यांना निश्चित माहिती नव्हती. म्हणून काही वेळा सोयीस्करपणे त्यांना लामार्क या फ्रेंच शास्त्रज्ञांची मते ग्राह्य धरावी लागली. लामार्क यांनी क्रमविकास तत्त्वाबद्दल आपली मते मांडताना असे सांगितले की, प्राण्यांच्या शरीराचे विशिष्ट अवयव त्यांच्या सतत उपयोगाने किंवा बिनउपयोगाने बदलतात. उदा., लोहाराचे हात लोखंड ठोकून ठोकून बळकट होतात. अशा प्रकारे बदललेले गुण पुढील पिढीत उतरतात. डार्विन यांच्या मते मातापितरांच्या शरीरातील जीवद्रव्याच्या (शरीराच्या प्रत्येक पेशीत असलेल्या व जीवनकार्याला आवश्यक असलेल्या द्रव्याच्या) साह्याने हे गुण पुढील पिढीत उतरतात. डार्विन यांचे मत चुकीचे ठरले. कारण १८६० साली बर्‌नॉ येथे ग्रेगोर मेंडेल हे वाटाण्याच्या वेलाच्या पैदाशीसंबंधी प्रयोग करीत होते. त्यांना असे आढळले की, या वेलात असणारे प्रभावी आणि अप्रभावी गुण पुढील पिढीत उतरतात व हे प्रमाण किती असेल हे गणिताच्या साह्याने सांगता येते. दुर्दैवाने डार्विन यांना या प्रयोगाची काहीच माहिती नव्हती परंतु १९०० साली एच्. द. व्ह्‌रीस या डच शास्त्रज्ञांनी मेंडेल यांचे संशोधन कार्य उजेडात आणले. द व्ह्‌रीस, के. ई. कॉरेन्स व ई. व्ही. चेर्‌माक यांनी असे दाखविले की, गुणसूत्रावर (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकावर) असणाऱ्या जनुकांमुळे (आनुवंशिक लक्षणे निदर्शित करणाऱ्या एककांमुळे) प्राण्यांची आनुवंशिक लक्षणे पिढीत उतरतात. हे संशोधन डार्विन यांच्या सिद्धांताला पूरक ठरून बळकटी आणणारे ठरले. मेंडेल, द व्ह्‌रीस, टी. एच्. मॉर्गन यांच्या संशोधनाने डार्विन यांच्या सिद्धांताला स्थैर्य आले. जे. बी. एस्. हॉल्डेन, आर्. ए. फिशर, एस्. राइट व एस्. एस्. चेटव्हेरिकोव्ह या शास्त्रज्ञांनी गणितशास्त्र दृष्ट्या असे दाखवून दिले की, क्रमविकासामध्ये जनुकांचे गुण, संख्या आणि निवड ही फार महत्त्वाची आहेत.

पहा : क्रमविकास.

संदर्भ : 1. Gray, E. Darwiniana, Cambridge, Mass., 1963.

   2. Huxley, J.  Hardy, A. C. Ford, E. B., Eds. Evolution as s Process, London, 1958.

   3. Simpson, G. G. The Meaning of Evolution, New Haven, 1949.

रानडे, द. र.