नेमॅटोमॉर्फा : हे मुक्तजीवी (स्वतंत्ररीत्या जगणारे), जलीय, कृमिरूप प्राणी असून त्यांचा ॲस्केलमिंथिस संघात समावेश करीत असत हल्ली या प्राणिसमूहाला स्वतंत्र संघाचे स्थान देण्यात येते. नेमॅटोमॉर्फामध्ये गॉर्डिइडी आणि नेक्टोनेमॅटिडी ही दोन कुले आहेत. गॉर्डिइडी कुलातील प्राणी गोड्या पाण्यात राहणारे असून गॉर्डियस ॲक्वाटिकस हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे. नेक्टोनेमॅटिडी कुलातील नेक्टोनेमा हा समुद्री प्राणी आहे.

हे कृमिरूप प्राणी लांब व बारीक असतात. अग्र (पुढचे) टोक गोल व बोथट असून पश्च (मागचे) टोक गोल किंवा द्विपालिक अथवा त्रिपालिक (दोन किंवा तीन पाळ्यांचे) असते. लांबी १–३० सेंमी. व व्यास ०·३ ते २·५ मिमी. असतो. मादी नरापेक्षा जास्त लांब असते. शरीराचा रंग पिवळसर, तपकिरी किंवा काळा असतो. शरीरावर पातळ उपत्वचेचे आच्छादन असून त्यावर सूक्ष्म पिंडिका (मऊ पेशीसमूहाचे निमुळते लहान उंचवटे) असतात. उपत्वचेच्या खाली बाह्यत्वचा आणि तिच्या खाली अनुदैर्घ्य (उभ्या) स्नायूंचा एक स्तर असतो.देहगुहा (शरीरातील पोकळी) मोकळ्या मृदूतकाने (पातळ भित्ती असलेल्या पेशींच्या बनलेल्या मऊ स्पंजासारख्या पेशी समूहाने) भरलेली असून तिला उपकलेचे अस्तर असते. अल्पवयी कृमींचा आहारनाल (अन्नमार्ग) पूर्ण असून त्याच्या शेवटावर अवस्कर (ज्यात गुदद्वार, मूत्रवाहिन्या व जननवाहिन्या– प्रजोत्पादक पेशी वाहून नेणाऱ्या नलिका–उघडतात असा सामाईक कोष्ठ) असतो. प्रौढाच्या आहारनालाचा ऱ्हास होतो. परिवहनांगे (रक्ताचे अभिसरण करणारी इंद्रिये), श्वसनांगे किंवा उत्सर्जनांगे (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारी इंद्रिये) नसतात. ग्रसिकेभोवती (मुखापासून आतड्यापर्यंतच्या अन्न मार्गाभोवती) तंत्रिकावलय (मज्जातंतूचे कडे) असून ते मध्य अधर तंत्रिका रज्जूला  जोडलेले असते. कदाचित एक किंवा दोन साधे डोळे असतात. थोडे संवेदी दृढरोम (संवेदनाशील राठ केस) असतात. लिंगे भिन्न असून देहगुहेत जनन ग्रंथींची एक जोडी असते. जननवाहिन्या दोन असतात, त्या जनन ग्रंथींना जोडलेल्या नसून अवस्करात उघडतात.

मादी पाण्यात अंडी घालते आणि त्यांच्या लांब श्लेषी (जेलीसारख्या पातळ द्रव्याने युक्त) माळा जलीय वनस्पतींवर आढळतात. अंड्यामधून बाहेर पडलेला डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसलेली सामान्यतः क्रियाशील असणारी पूर्व अवस्था) आपल्या अंकुश (आकडा) व शूक (ताठर केस) असलेल्या शुंडाने (सोंडेसारख्या अवयवाने) एखाद्या जलीय संधिपादाचे शरीर वेधून आत शिरतो. तेथे त्याची वाढ होते. काही जातींमध्ये डिंभाचे दमट वनस्पतींवर पुटीभवन होऊन ही पुटी योग्य पोषकाच्या (हा स्थलचर कीटकदेखील असू शकतो) खाण्यात आली, तर त्याच्या शरीरात डिंभाची वाढ होऊन प्रौढ कृमी तयार होतो व तो पोषकाच्या शरीरातून बाहेर पडतो. पोषकात होणारी वाढ काही महिने चालू असते.

पहा : गॉर्डियस.

कर्वे, ज. नी.