नेदर्लंड्स अँटिलीस : कॅरिबियन समुद्रातील राजकीय दृष्ट्या नेदर्लंड्समध्ये समाविष्ट असलेला द्वीपसमूह. एकूण क्षेत्रफळ ९९३ चौ. किमी. लोकसंख्या २,३९,७८८ (१९७५). दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या उत्तरेस ६४ ते ११२ किमी. वरील १२° उ. ते १३° उ. आणि ६८° प. ते ७१° प. यांदरम्यानचा एबीसी [आरूबाक्षेत्र १९३ चौ. किमी. व लोकसंख्या ६१,९०२ (१९७५ अखेर) बॉनॅर –२८८ व ८,७८५ आणि कुरासाऊँ – ४४४ व १,५६,२०९] हा द्वीपसमूह आणि त्याच्या ईशान्येस ८०० किमी. वर १७°५′ उ. ते १८° ५′ उ. व ६२° ५८′ प. ते ६३° १४′ प. यांदरम्यान, प्वेर्त रीकोच्या पूर्वेकडील सिंट मार्टन–३४ व १०,४५८ सेंट यूस्टेशस–२१ व १,३६३, साबा– १३ व ९९१ या बेटांचा समूह असून, या दोन्ही द्वीपसमूहांचा समावेश नेदर्लंड्स अँटिलीस मध्ये होतो. सिंट मार्टन बेटाचा उत्तर भाग फ्रेंचांच्या ग्वादलूप अवलंबी प्रदेशात आहे. ही सर्व बेटे लेसर अँटिलीस द्वीपसमूहातील असून, १९४८ पर्यंत यांस डच वेस्ट इंडीज हे नाव होते. कुरासाऊँ बेटावरील व्हिलेमस्टाट ही राजधानी आहे.
भूवर्णन : एबीसी बेटे सखल व ज्वालामुखीजन्य असून त्यांच्या भोवती प्रवाळभित्ती आहेत. त्यांचा सर्वांत उंच भाग (सु. ३७२ मी.) कुरासाऊँ बेटावर आहे. ईशान्येची छोटी बेटेही ज्वालामुखीजन्य व खडकाळ असून ती जास्त उंचीची आहेत. त्यांचा सर्वोच्च भाग सु. ८८० मी. उंचीच्या ज्वालामुखी शंकूचा असून त्याचेच साबा बेट बनले आहे.
हवामान : या बेटांचे हवामान उष्ण व कोरडे आहे. समुद्रसान्निध्यामुळे व ईशान्य व्यापारी वाऱ्यांमुळे ते काहीसे सौम्य झालेले आहे. सरासरी तपमान उन्हाळ्यात २८° से. व हिवाळ्यात २३° से. असते. कुरासाऊँमध्ये वार्षिक सरासरी पाऊस ५६ सेंमी. पडतो.
वनस्पती व प्राणी : या बेटांवर निवडुंगाचे विविध प्रकार सर्वत्र वाढतात. त्यांशिवाय दिवि दिवी, ॲलो व अगेव्ह या वनस्पती सर्वत्र उगवतात. ॲलोपासून होणाऱ्या ॲलोईन या औषधी पदार्थाची निर्यात येथून जगभर होते. दिवि दिवीपासून टॅनीन काढतात. बॉनॅर बेट हंसक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. बेटे रुक्ष असून प्राणिजीवन विशेष लक्षणीय नाही.
इतिहास व राज्यव्यवस्था : पंधराव्या व सोळाव्या शतकांत या द्वीपसमूहात स्पॅनिश लोकांनी वसाहती स्थापन केल्या. डचांनी १६३१ मध्ये सिंट मार्टन बेटावर वसाहतीचा प्रयत्न केला, परंतु स्पॅनिशांनी त्यांना हुसकावले. १६३६–४० या काळात डचांनी येथे पुन्हा वसाहती केल्या. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकन गुलामांची तेथे विक्री चालत असे. हा व्यापार १७७८ पर्यंत चालू होता. अठराव्या शतकात सेंट यूस्टेशस बेट यूरोपीय वस्तूंची बाजारपेठ बनले. डिसेंबर १९५४ च्या करारान्वये या द्वीपसमूहास स्वायत्त दर्जा मिळाला आहे. राज्यपाल प्रशासनप्रमुख असून तो कार्यकारी मंडळ व २२ सभासदांचे कायदेमंडळ यांच्या साहाय्याने कारभार करतो. केवळ परराष्ट्रसंबंध व संरक्षण या दोन बाबी नेदर्लंड्सच्या मुखत्यारीत आहेत. १९६९ मधील कामगारांच्या दंग्यामुळे मुख्य प्रधानास राजीनाम द्यावा लागला. ऑक्टोबरमधील निवडणुकांनंतर फेब्रुवारी १९७० मध्ये नवीन राज्यपालाच्या नेमणुकीवरून समाजवादी प्रशासन कोसळले. १९७१ मध्ये नवीन आर्थिक उपाययोजनांवर संसदेत पराभव होऊन पेट्रोनियाचे शासन गडगडले. ऑगस्ट १९७३ मध्ये निवडणुका होऊन ह्वान्चो एव्हर्ट्झचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. १९८० पर्यंत संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याच्या संबंधात डच सरकारशी वाटाघाटी चालू आहेत.
आर्थिक स्थिती : येथे शेती, पशुपालन व उद्यानविज्ञान यांची वाढ व्हावी म्हणून शासनाचा प्रयत्न असला, तरी शेती हा येथे प्रमुख व्यवसाय नाही. ॲलो, दिवि दिवी, जोंधळा, भुईमूग, थोडा कापूस व ऊस, सुरण, घेवडे, भाजीपाला व फळे ही प्रमुख उत्पन्ने आहेत. १९७५ मध्ये ८,००० गुरे ६,००० डुकरे २१,००० शेळ्या, ८,००० मेंढ्या, व ६१,००० कोंबड्या होत्या.
उद्योगधंदे : येथील प्रमुख उद्योग म्हणजे व्हेनेझुएलातून आणलेल्या खनिज तेलाचे शुद्धीकरण हा असून तोच येथील आर्थिक स्थितीचा खरा पाया आहे. कुरासाऊँ व आरूबा बेटांवर प्रमुख तेलशुद्धीकरण कारखाने आहेत. तेथे दररोज ७,५०,००० पिपे तेल शुद्ध होत असून यांची गणना जगातील प्रमुख कारखान्यांत होते. निर्यातीची सु. ९५% किंमत तेलशुद्धीकरणाने मिळते. तेलवाहतुकीची दोन प्रमुख केंद्रे येथे असून, जगातील मोठ्या कोरड्या गोद्यांपैकी एक कुरासाऊँत आहे. कुरासाऊँत सापडणाऱ्या वार्षिक १ लक्ष टन कॅल्शियम फॉस्फेटपासून खते बनवितात. पपनसापासून कुरॅको मद्यार्क काढणे, पनामा हॅट्स बनविणे असे किरकोळ उद्योग चालतात. आरूबात काही खनिज तेल रसायन कारखाने आहेत. कुरासाऊँत एक रंग कारखाना, दोन सिगारेट कारखाने, एक कापडगिरणी, एक आसवनी व इतर लहान उद्योगधंदे आहेत. दोन इलेक्ट्रॉनीय कारखाने उपकरणे आणि इतर वस्तू निर्मितात. बॉनॅरमध्ये कापडगिरणी व आधुनिक मीठ कारखाना, सिंट मार्टनवर एक मद्य कारखाना असून तेथे मासेमारी व्यवसायही चालतो. उपभोग्य आणि उत्पादनासाठी लागणारा बहुतेक सर्व माल आयात करावा लागतो. तथापि पर्यटन व्यवसायाने आर्थिक स्थितीस बराच हातभार लावला आहे. १९७५ मध्ये सु. अडीच लाख पर्यटक येऊन गेले. १९७४ मध्ये १६० कोटी किवॉ. ता. विजेचे उत्पादन झाले. नेदर्लंड्स अँटिलीस गिल्डर किंवा फ्लॉरिन हे या बेटांचे चलन असून, डिसेंबर १९७६ मध्ये १ स्टर्लिंग पौंड = २·९६६ ने. अँ. गि. आणि १ अमेरिकी डॉलर = १·७९० ने. अँ. गि. किंवा १०० ने. अँ. गि. = ३३·७२ पौंड = ५५·८७ डॉलर असा विनिमय दर होता.
इ. स.१९७२ चा केंद्रीय अर्थसंकल्प १२,१७,९६,७०० ने. अँ. फ्लॉ. आय आणि १२,१२,३१,५०० ने. अँ. फ्लॉ. व्यय असा होता. १९७४ मध्ये आयात ६,४८,३२,२२,००० ने.अँ. फ्लॉ. आणि निर्यात ५,८१,४४,७४,००० ने. अँ. फ्लॉ. होती. व्हेनेझुएला, अमेरिका, नेदर्लंड्स, ब्रिटन, कोलंबिया, त्रिनिदाद, गाबाँ इत्यादींकडून आयात व अमेरिका, कॅनडा, नेदर्लंड्स, ब्रिटन, ब्राझील, जपान, अर्जंटिना इत्यादींकडे निर्यात झाली.
वाहतूक व संदेशवहन : या बेटांवर लोहमार्ग नाहीत. परंतु प्रत्येक बेटाला एक चांगले बंदर व विमानतळ आहे. १९७२ मध्ये कुरासाऊँ ९२९ किमी., आरूबा ३८९ किमी., बॉनॅर १२५ किमी., सिंट मार्टन ६० किमी. लांबीच्या बारमाही वाहतुकीस उपयुक्त सडका होत्या. बहुतेक सर्व बेटांवरून आठ प्रक्षेपण केंद्रांतून अनेक भाषांतून आकाशवाणी प्रक्षेपण व कुरासाऊँ आणि आरूबा येथून दूरचित्रवाणी प्रक्षेपण होते. १९७६ मध्ये १,३२,००० रेडिओ संच व ३५,००० दूरचित्रवाणी संच होते.
लोक व समाजजीवन : येथील सु. ८५% लोक निग्रो किंवा मुलॅटो (मिश्रवंशीय) आहेत. आरूबाच्या लोकजीवनावर इंडियन वंशाचा परिणाम आहे. परंतु कुरासाऊँ व बॉनॅर येथे निग्रॉइड वंश आहे. डच ही अधिकृत शासकीय भाषा असून स्पॅनिश व इंग्रजी भाषाही बोलल्या जातात. पॅपियामेन्टो ही फ्रेंच, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज, इंग्रजी व आफ्रिकी इ. भाषामिश्रित बोली आहे. बहुतेक लोक ख्रिस्ती असून त्यांपैकी सु. ८७% रोमन कॅथलिक व ८% प्रॉटेस्टंट आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे नसले, तरी मोफत असून अर्थसंकल्पापैकी सु. ३३% शिक्षणावर खर्च होतो. १९७३–७४ मध्ये १२६ प्राथमिक शाळांतून ३८,१७० विद्यार्थी व १,४९२ शिक्षक ३४ कनिष्ठ माध्यमिक शाळांतून ९,४१० विद्यार्थी व ४५५ शिक्षक ४ वरिष्ठ माध्यमिक शाळांतून २,६९४ विद्यार्थी व १७६ शिक्षक खास २३ शिक्षणसंस्थांतून १,७१५ विद्यार्थी व १७३ शिक्षक होते. आरूबा येथे विद्यापीठ असून तेथे १५० विद्यार्थी व १५ शिक्षक होते.
कुरासाऊँ व आरूबा येथे १९७३ मध्ये ११,००० प्रेक्षक बसतील अशी १३ चित्रपटगृहे होती. शिवाय कुरासाऊँ, आरूबा व सिंट मार्टन येथे अनुक्रमे ५०० ३५० २०० प्रेक्षकांची मोटारीतच बसून चित्रपट पाहण्याची (ड्राइव्ह-इन चित्रपटगृहांची) सोय होती. १९७३ मध्ये बेटांत ११ रुग्णालयांतून २,०३७ रुग्णशय्या उपलब्ध होत्या. १५५ डॉक्टर, ५५ विशेषज्ञ, ३३ दंतवैद्य व १८ औषधनिर्माते होते. उत्तम संगीतरचना व गीतरचना यांसाठी ही बेटे प्रसिद्ध आहेत.
पर्यटकांसाठी निवासस्थाने वगैरे सर्व सुखसोयी होत असून, हा व्यवसाय वेगाने वाढत आहे.
ओक, द. ह . तावडे, मो. द.
“