रिटर, कार्ल : (७ ऑगस्ट १७७९−२८ सप्टेंबर १८५९). प्रसिद्ध जर्मन भूगोलज्ञ आणि आधुनिक भूगोलशास्त्राचा जनक. जन्म पूर्व जर्मनीतील क्व्हेडलिनबुर्क येथे. वडील एफ्. डब्ल्यू. रिटर यांचा वैद्यकीय व्यवसाय होता. कार्लच्या जन्मानंतर अल्पावधीतच वडिलांचे निधन झाले. रिटरला दाखल करण्यात आलेल्या शाळेत अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर निसर्गाच्या सान्निध्यात नेले जाई. त्यामुळे या शाळेचा कायमस्वरूपी प्रभाव त्याच्यावर पडलेला दिसतो. निसर्गविज्ञानाने त्याचे उत्तम शिक्षण घेतले. शिवाय इतिहास व धर्मशास्त्राचा तो निष्णात पंडित बनला. १७९६ मध्ये दोन वर्षांच्या शिक्षणासाठी तो हाल येथील विद्यापीठात दाखल झाला. १७९८ मध्ये त्याने फ्रँकफुर्ट येथील होलव्हेख कुटुंबात खाजगी शिकवण्या घेण्याचे काम सुरू केले व तेव्हापासून तो भूगोल विषयाकडे विशेष आकृष्ट झाला. त्यामुळे त्याच्या लेखनात इतिहासाचे वर्णन भौगोलिक परीस्थितीसह आलेले दिसते. १८०२ पासून त्याने लेखन−प्रकाशनाला सुरुवात केली. स्विस शिक्षणतज्ञ योहान हाइन्रिलक पेस्टॉलोत्सी यांच्या शैक्षणिक तत्त्वांची व अध्यापनातील तीन पायऱ्यांची, जर्मन तत्त्ववेत्ता व धर्मवेत्ता गॉटफ्रीट फॉन हेर्डर यांच्या मानव-निसर्ग संबंधाबाबतच्या विचारांची, झां झाक रूसो तसेच हंबोल्ट यांच्या विचारांची छाप रिटरवर स्पष्टपणे दिसते. रिटरचा भर मुख्यतः तुलनात्मक अभ्यासावर होता. उदा., भू-गोलार्ध व जलगोलार्ध, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, जुने व नवे जग तसेच वेगवेगळ्या खंडांचा तुलनात्मक अभ्यास रिटरने केला. आधुनिक भूगोलशास्त्राचा पाया घालण्याचे श्रेय हंबोल्ट बरोबरच रिटरलाही दिले जाते. १८०४ व १८०७ मध्ये रिटरने यूरोपच्या भौगोलिक माहितीचे दोन ग्रंथ, तर १८०६ मध्ये यूरोपची नकाशामालिका प्रसिद्ध केली. या नकाशात केवळ पर्वतश्रेण्या व नद्या न दाखविता त्यांबरोबरच तेथील वनस्पती, हवामान, प्राणिसंपत्तीचे वितरण व प्रदेशातील लोकजीवनाची माहितीही दाखविली होती. रिटरने यूरोपभर खूप प्रवास केला असला, तरी आशियाचा प्रवास मात्र एकदाच केला. १८१३ मध्ये गटिंगेन विद्यापीठात एका विद्यार्थी मित्राच्या मदतीने रिटरचे संशोधन चालू होते. भौगोलिक नियतिवादाच्या तो जवळपास आला होता. रिटरने भूगोलाची व्याप्ती, मानव व निसर्ग यांचा परस्परसंबंध व भूगोलाचा इतर शास्त्रांशी असलेला संबंध स्पष्ट केला आहे.

‘अर्थ सायन्स इन रिलेशन टू नेचर अँड द हिस्टरी ऑफ मॅन’ हे इंग्रजी भाषांतरित शीर्षक असेलेले रिटरचे सर्वांत महत्त्वाचे तथापि अपूर्ण राहिलेले लेखन असून त्याचे १९ खंड १८५९ पर्यंत प्रकाशित झाले. या खंडातून आशियाची व आफ्रिकेची भूपृष्ठारचना, तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती व त्यांचे तेथील देशांच्या व लोकांच्या विकासावर झालेले परिणाम यांचे वर्णन केलेले आहे. वास्तविक रिटरचे यामध्ये जगाचा आढावा घेण्याचे उद्दिष्ट होते, परंतु ते पुरे होऊ शकले नाही. यांपैकी आफ्रिकेवरील त्याचा पहिला खंड १८१७ मध्ये प्रसिद्ध झाला. याच खंडाची सुधारित आवृत्ती १८२२ मध्ये निघाली. त्याचे बाकीचे खंड मुख्यतः आशियावर आहेत. १८९९ मध्ये रिटर विवाहबद्ध झाला. त्याच्या लेखनाच्या यशामुळे १८२० मध्ये त्याला बर्लिन विद्यापीठात भूगोलाचा प्राध्यापक म्हणून नोकरीची संधी मिळाली. अखेरपर्यंत तो तेथेच होता. रिटरच्या कंपॅरेटिव्ह जिऑग्राफी (१८५२) यापुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अनुक्रमे १८६५ व १८८१ मध्ये झाले.

रिटरचा भूगोलविषयक दृष्टिकोन वर्णनात्मक व अनुभवांवर आधारित होता. त्याच्या मते एखाद्या प्रदेशाचे हुबेहूब भौगोलिक चित्र स्पष्ट होण्यासाठी परंपरागत भौगोलिक विषयांचा (उदा., भूमिस्वरूपे) अभ्यास हवामान, वनस्पती व प्राणिजावन यांच्या संदर्भात केला पाहिजे. भूगोल हे अनुभवजन्य शास्त्र असल्यामुळे भूगोलाच्या पद्धतीशास्त्रात गृहीतकाकडून निरीक्षणाकडे न जाता एका निरीक्षणाकडून दुसऱ्या निरीक्षणाकडे गेले पाहिजे. त्याच्या मते भूपृष्ठावरील सर्व नैसर्गिक घटना परस्परावलंबी आहेत. प्रत्येक माणूस हा ज्या प्रदेशात जन्मतो व वाढतो, तेथील नैसर्गिक घटकांचा तो प्रतिनिधी असतो.

रिटरचा विद्यार्थी ए. एच. गीयो याच्या मते रिटर हा एक उत्तम प्रादेशिक भूगोलतज्ञ होता. बर्लिन जिऑग्रफिकल सोसायटीचा (स्था. १८२८) तो संस्थापक-सदस्य होता. बर्लिन येथे त्याचे निधन झाले.

चौधरी, वसंत