नेदर्लंड्‌स : वायव्य यूरोपातील एक देश. त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा एकतृतीयांशापेक्षाही अधिक भाग समुद्रसपाटीखाली आहे. क्षेत्रफळ ओहोटीच्या वेळी उघडा पडलेला भाग धरून ४१,१६० चौ.किमी.पैकी ३३,८११चौ.किमी. भूभाग आहे. लोकसंख्या १,३७,३३,५७८ (१९७६ अंदाज). विस्तार ५०° ४६ उ. व५३° ३३ उ. व ३° २२ पू. ते ७° १५ पू. यांदरम्यान. नेदर्लंड्‌सला हॉलंड असेही नाव आहे. वास्तविक हॉलंड हे या देशातील एका प्रांताचे नाव आहे परंतु या प्रांताच्या महत्त्वामुळे सर्व देशालाच हे नाव पडले. नेदर्लंड्‌सच्या उत्तरेस व पश्चिमेस उत्तर समुद्र, दक्षिणेस बेल्जियम व पूर्वेस पश्चिम जर्मनी असून याचा दंतुर किनारा ७५६ किमी. आहे. शासकीय दृष्ट्या नेदर्लंड्‌स ११ प्रांतांत विभागला आहे. राजधानी ॲम्स्टरडॅम आहे, परंतु शासनकेंद्र मात्र हेग येथे आहे. देशाची भाषा डच असून लोकांनाही डच म्हणतात. नेदर्लंड्‌सच्या राज्यांत नेदर्लंड्‌स अँटिलीस या यूरोपबाहेरील बेटांचा अंतर्भाव होतो.

भूवर्णन : नेदर्लंड्‌समध्ये पूर्वेकडील उंचवट्याचा प्रदेश, पश्चिमेकडील वालुकाभित्तींचा प्रदेश व या दोहोंच्या मधील खोलगट भाग असे तीन प्रकारचे भूभाग स्पष्टपणे दिसून येतात. पूर्वेकडील उंचवट्याचा प्रदेश वाळू व बारीक खडे असलेल्या गाळाचा बनलेला आहे. त्यावर मधूनमधून पीट आढळतो. हे थर हिमयुगीन प्रवाहांमुळे व म्यूज,ऱ्हाईन इ. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने बनलेले आहेत. आग्नेयीकडील लिंबर्ग प्रांतातील व्हालसरबर्ग (३२१मी.), नाइमेगनजवळील सु. ९६मी. उंचीचा प्रदेश व व्हेल्यूव्ह विभागातील टॉरेनबर्ग (४०४मी.) हेच काय ते विशेष उंच भाग आहेत. यूरोप खंड व ब्रिटिश बेटे यांमधील खोलगट भागात उत्तर समुद्राच्या भरतीचे पाणी शिरून वालुकाभित्तींचा प्रदेश झालेला आहे. काही अंशी भूभाग खचल्याने व काही अंशी हिमयुगीन बर्फाचे थर वितळल्याने आलेल्या पुरांमुळे वाळूचे ढीग साचून हा भाग निर्माण झाला असावा. कित्येक ठिकाणी वादळांमुळे वाळूच्या बांधांना तडे जाऊन लांबवर पसरलेल्या उत्तरेकडील पश्चिम फ्रिझियन बेटांसारखे किंवा दक्षिणेकडील झीलंड यांसारखे प्रदेश झाले आहेत. प्राचीन काळी पूर्वेकडील उंचवट्याचा प्रदेश व पश्चिमेकडील वाळूचे बांध यांमधील भागात अनेक खाजणे होती. त्यांत नद्यांच्या गाळाने भर पडून व झुडुपे वाढून कालांतराने दलदलीचा झुडुपी भूभाग उत्क्रांत झाला.

नेदर्लंड्‌सचा सर्वांत सखल भाग हा रॉटरडॅमच्या उत्तरेकडील अलेक्झांडर पोल्डर व झायडर झीच्या आसपासचा प्रदेश असून, तो काही ठिकाणी समुद्रसपाटीपासून ६–७मी. पर्यंतही खाली आहे.

ऱ्हाईन (खालचा भाग), म्यूज, लेक व व्हाल या नेदर्लंड्‌सच्या मुख्य नद्या असून या नद्यांचा त्रिभुज प्रदेश विस्तृत व सुपीक आहे. आयसल नदी झायडर झीला मिळते आणि बेल्जियममधून आलेल्या स्केल्ट नदीची नदीमुखखाडी नेदर्लंड्‌समध्ये आहे.

नेदर्लंड्‌सचा काही भाग समुद्रसपाटीपेक्षा १०० ते ३०० मी. पर्यंत उंच,वरचा भाग केवळ ५–१० मी. उंच व अर्ध्यांच्यावर भाग समुद्रसपाटीच्या ६–७ मी. खाली असल्यामुळे नद्यांच्या पुरांखाली वा समुद्राच्या प्रचंड लाटांखाली देशाचा बराच भाग गडप होण्याचा किंवा निदान अपार हानीचा धोका कायमचाच आहे. हा धोका टाळण्यासाठी व वाढत्या लोकसंख्येला पुरेशी पिके काढण्यासाठी, नद्यांच्या काठी बांध घालून व शक्य झाल्यास समुद्र मागे हटवून जास्तीत जास्त जमीन लागवडयोग्य करणे अत्यावश्यक आहे. डच लोकांच्याशतकानुशतकांच्या एतद्विषयक प्रयत्नांमुळेच ‘देवाने पाणी (समुद्र) निर्माण केले, पण मानवाने जमिनीची निर्मिती केली’ ही म्हण प्रचारात आली. असलेली जमीन टिकवून धरण्याचे व नसलेली निर्माण करण्याचे डच लोकांचे प्रयत्न पाहिले, म्हणजे वरील म्हण अन्वर्थक असल्याचे पटते. समुद्राचे अतिक्रमण थोपविण्यासाठी काही ठिकाणी भक्कम बांध घालण्यात आले आहेत. समुद्राच्या, सरोवराच्या किंवा नदीच्या तळाची जमीन लागवडीस योग्य करण्यासाठी, विशिष्ट भागाभोवती बांध घालून आतील पाणी पंपांनी उपसून टाकावयाचे आणि रासायनिक क्रियेने जमिनीतील क्षार काढून टाकून ती लागवडीखाली आणावयाची, काढून टाकलेले व नंतर येणारे पाणी कालव्याच्या जाळ्यांनी वळवून नदीत व समुद्रात सोडावयाचे व शिवाय कालव्यांचा उपयोग जलवाहतुकीसाठी करावयाचा, असे डचांचे याबाबतचे परंपरागत चिकाटीचे तंत्र आहे. अशा प्रकारे मिळविलेल्या जमिनीला येथे पोल्डर लॅंड म्हणत असून असे शेकडो पोल्डर या देशात आहेत. बांध घातल्यानंतर आतील पाणी उपसून टाकण्यासाठी पूर्वीपासून पवनचक्कीवर चालणाऱ्या पंपांचा उपयोग करीत. नंतरच्या काळात वाफेच्या वा डीझेल एंजिनांचा किंवा विद्युत् एंजिनांचा वापर होऊ लागला.

ख्रिस्तपूर्व काळातील नेदर्लंड्‌सचे रहिवासी पुरांपासून बचाव करण्यासाठी मातीच्या किंवा वाळूच्या कृत्रिम टेकड्यांवर–टर्पेन–चढून बसत. बांध घालून पूरनियंत्रणाची व भूमिसंपादनाची युक्ती नंतरच्या हजारबाराशे वर्षांत अमलात आली. अलीकडील झायडर झी व डेल्टा प्रकल्प हे या बाबतीतील प्रसिद्ध प्रकल्प आहेत. फ्रिझियन बेटे व मुख्य भूमी यांमधील व्हाड झीच्या भूमिसंपादनाची योजनाही मूर्तरूपघेत आहे.

नद्यांच्या पुरांनी किंवा वादळी लाटांच्या तडाख्यांनी बांध उद्‌ध्वस्त होऊन वा शत्रूला थोपविण्यासाठी बांध फोडल्यामुळे आलेल्या प्रचंड पुरांनी अपार हानी झाल्याची अनेक उदाहरणे डच इतिहासात आहेत. मात्र १फेब्रुवारी १९५३च्या वादळाने प्रत्यक्ष प्रलयकाळ झाल्याचाच नेदर्लंड्‌सच्या जनतेला भास झाला. या पुरात अठराशे माणसे वाहून गेली, लक्षावधी नागरिक बेघर झाले, दीड लक्ष हेक्टर शेतजमीन बेकाम झाली व सु. २७०कोटी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली पण या जबर तडाख्याने भांबावून न जाता नेदर्लंड्‌स शासनाने डॉ. योहान व्हॅन व्हेन या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली डेल्टा प्लॅन हा विख्यात पूरनियंत्रण प्रकल्प तयार करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. हा प्रकल्प बहूद्देशीय असून यातील, एक भाग म्हणून ऱ्हाईन, म्यूज व स्केल्ट यांच्या त्रिभुज प्रदेशांतील चार नदीमुखखाड्यांवर बांध घालून लाटांचे पाणी आत जाणार नाही, अशी योजना आहे. या योजनेत हिवाळ्यात नद्यांत साठलेला बर्फ समुद्रात वाहून जाण्यासाठी पोलादी दरवाजेही ठेवण्यात आले आहेत. या प्रकल्पाचा पहिला टप्पा १९६१मध्ये पूर्ण झाला. झायडर झी व डेल्टा प्रकल्प यांवरून भौगोलिक परिस्थितीचे आव्हान डच लोकांनी कसे स्वीकारले आहे, याचे उत्कृष्ट दिग्दर्शन होते.

नेदर्लंड्‌सचा बराच भाग पूर्वी जलव्याप्त असल्याने याचे भूपृष्ठ अतिशय सपाट दिसते. जिकडे तिकडे हिरवीगार कुरणे, त्यांत संथपणे चरणारी काळी-पांढरी गुरेढोरे, मधूनच लाल विटांची झोपडीवजा घरे-गावे, विस्तृत भूभाग आणि यांभोवतीचे नैसर्गिक वाळूचे ढीग किंवा मुद्दाम उभारलेले बांध, भिंती, पाण्याचा निचरा करणारे कालवे व त्यांवर इतस्तत: विखुरलेल्या पवनचक्क्यांमुळे नेदर्लंड्‌सचे नैसर्गिक दृश्य चेतोहारी आहे.

हवामान : समुद्रसान्निध्य व गल्फ प्रवाह यांमुळे नेदर्लंड्‌सचे हवामान सौम्य असून जानेवारीचे सरासरी तपमान २°से. व जुलैचे १७°से. असते. हवा नेहमीच ढगाळ असून हिवाळ्यात दाट धुके असते. पाऊस वर्षभर थोडाथोडा पडत असून वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७९सेंमी. आहे. सर्वांत जास्त पाऊस ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये पडत असून ६०दिवस धुके व हिमतुषार असतात. वर्षभर बहुधा आकाश अभ्राच्छादित असते. उन्हाळ्यात क्वचितच मधूनमधून आकाश स्वच्छ होते. अझोर्सजवळचा उच्च भारप्रदेश व आइसलॅंडजवळील नीच भारप्रदेश यांदरम्यान हा देश असल्यामुळे, दोन्हींकडून येणाऱ्या हवेच्या लोटांमुळे येथील हवा पुष्कळदा उन्हाळ्यात अस्थिर होते. वसंत ॠतूत कधीकधी रात्री उत्तरेकडील वाऱ्यांमुळे दहिवर पडते. देशाच्या सपाटपणामुळे वाऱ्यांना अडथळा होत नाही. त्यामुळे पवनचक्क्या हे देशाचे वैशिष्ट्य झालेले आहे.

वनस्पती व प्राणी : समशीतोष्ण हवामानात सापडणारे प्राणी व वनस्पती नेदर्लंड्‌समध्येही सापडत असत परंतु मानवी वस्तीसाठी मूळची अरण्ये साफ केली असून आता फक्त उंच भागात ओक, पाइन, बीच इत्यादींचे अवशेष दिसतात. मात्र रस्त्यांच्या कडेने व घरांभोवती मुद्दाम लावलेली झाडे विपुल आहेत. वन्य प्राण्यांपैकी ससेच काय ते शिल्लक असून मोठे वन्य पशू नाहीतच. तसेच बिजू, ससाणा, नदी शेवंडा व दलदली कासव आता कोठे दिसत नाहीत परंतु अनेक जातींचे मासे, रेड ग्राउज यांची मात्र नव्याने भर पडली आहे. अनेक प्रकारचे पक्षी, पाणपक्षीही आहेत व किनारपट्टीच्या प्रांतांत मधूनमधून कुरवांचे थवेच्या थवे दिसतात. नेदर्लंड्‌सचे खरे वैभव म्हणजे तेथील विविध व समृद्ध पुष्पसंपत्ती. विविध फुलांची लागवड व उत्पादन यांसाठी नेदर्लंड्‌स विशेष ख्यातनाम आहे. डच ट्यूलिपची लागवड हार्लेम प्रांतात विस्तृत क्षेत्रात होते व दरवर्षी याचे मणोगणती कंद परदेशी निर्यात होतात. डेझी, बटरकप, परपल, हीदर इ. वन्य फुलेही सप्टेंबरात सर्वत्र दिसतात.


इतिहास : हजारो वर्षांपूर्वीही नेदर्लंड्‌समध्ये मानववस्ती असल्याचे पुरावे सापडतात. मात्र ख्रि.पू. ५७ मध्ये ज्यूलियस सीझरने हा देश जिंकला त्यापूर्वीचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. सीझरच्या वेळी या देशात केल्टिक, बेल्गा, मेनापी, एबुरोन, बटेव्हाय या जर्मन टोळ्यांचा संघर्ष चालू होता. सु. चार शतकांच्या रोमन अंमलात रोमन संस्कृतीचा नेदर्लंड्‌समध्ये प्रसार झाला. रोमन काळाच्या अखेरी-अखेरीस येथे ख्रिस्ती धर्म आला. रोमन अंमलानंतर माजलेल्या बेबंदशाहीत फ्रॅंक टोळ्यांनी नेदर्लंड्‌सचा दक्षिण भाग व सॅक्सनांनी पूर्व भाग व्यापला. शार्लमेनच्या कारकीर्दीत या देशाला काही काळ राजकीय स्थैर्य लाभले पण त्याच्या मृत्यूनंतर कॅरोलिंजिअन साम्राज्याचे विघटन होऊन नेदर्लंड्‌समध्ये काउंट, ड्यूक इ. स्थानीय उमरावांची लहानलहान राज्ये उदयास आली. पंधराव्या शतकाच्या मध्यास ह्या देशाचा बहुतांश भाग बर्गंडीच्या ड्यूकांच्या आधिपत्याखाली गेला. यावेळी नेदर्लंड्‌सच्या सतरा प्रांतांत दक्षिणेकडील फ्लॅंडर्स, ब्राबांट व उत्तरेकडील हॉलंड प्रमुख होते. मेरी ऑफ बर्गंडीचा विवाह १४७७ मध्ये भावी पवित्र रोमन सम्राट, हॅप्सबर्ग घराण्याचा मॅक्सिमिल्यन याच्याशी होऊन हे राज्य हॅप्सबर्ग घराण्याकडे गेले. मॅक्सिमिल्यनचा नातू सम्राट पाचवा चार्ल्‌स स्पेनचाही राजा होता. चार्ल्‌सच्या राज्यत्यागानंतर नेदर्लंड्‌सचे राज्य त्याचा मुलगा स्पेनचा राजा दुसरा फिलिप याला मिळाले (१५५५).

ही राजकीय स्थित्यंतरे चालू असतानाच नेदर्लंड्‌समध्ये शहरांचा विकास होऊन वजनदार व्यापारी वर्ग उदयास आला. या वर्गाचा देशाच्या राजकारणावरही प्रभाव होता व त्याच्या पाठिंब्याचे महत्त्व काउंट, ड्यूक वगैरे स्थानिक उमराव जाणून होते. साहजिकच फिलिपच्या निरंकुश कारभाराला या प्रभावी व्यापारी वर्गाचा विरोध होता. याच कालखंडात यूरोपमध्ये धर्मसुधारणेची चळवळ होऊन उत्तर नेदर्लंड्‌समध्ये कॅल्व्हिनप्रणित प्रॉटेस्टंट पंथाचा प्रसार झाला होता. दुसरा फिलिप निरंकुश राजसत्तेचा अभिमानी असून कट्टर कॅथलिक पंथीय होता. त्याला नेदर्लंड्‌सवासीयांचा स्वतंत्र बाणा पटणे शक्यच नव्हते. त्याचा सेनापती ड्यूक ऑफ ॲल्बा याने देशातील प्रतिनिधी सभेला–स्टेट्‌स जनरल–डावलून कारभार करण्यास व प्रॉटेस्टंटांना छळण्यास सुरुवात करताच असंतोष शिगेला पोचला. या कारभाराला विरोध करणाऱ्या हॉर्न व एगमाँटच्या ड्यूकांना शिरच्छेदाची आणि विल्यम ऑफ ऑरेंजला हद्दपारीची शिक्षा ठोठावण्यात आल्याने,नेदर्लंड्‌समध्ये स्पॅनिश सत्तेविरुद्ध बंड झाले. १५६८ मध्ये उद्‌भवलेल्या ह्या बंडाचेच नेदर्लंड्सच्या स्वातंत्र्ययुद्धात रूपांतर झाले. हे युद्ध ऐंशी वर्षे चालले. यावेळी अवघ्या यूरोपात धार्मिक आणि राजकीय संघर्ष चालू असल्याने नेदर्लंड्‌सचे स्वातंत्र्य हा लवकरच आंतरराष्ट्रीय प्रश्न झाला. ॲल्बानंतर ऑस्ट्रियाचा डॉन जॉन याच्याकडे नेदर्लंड्‌स स्वारीची सूत्रे सोपविली गेली. त्याने उत्तर आणि दक्षिण प्रांतांतील धार्मिक मतभेदांचा फायदा घेऊन बंडखोरांत फूट पाडली. दक्षिण प्रांतीयांनी कॅथलिक पंथाच्या हितासाठी स्पेनच्या ताबेदारीस मान्यता दिली, तेव्हा उत्तरेकडील सात प्रांतांनी उत्रेक्तच्या कराराने (१५७९) स्पेनविरुद्ध लढा चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला व दोन वर्षांनी स्वातंत्र्य जाहीर करून नेदर्लंड्‌सच्या संयुक्त राज्याची घोषणा केली. नेदर्लंड्‌सच्या या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व विल्यम द सायलेंटने (१५३३–८४) स्वीकारले होते. हा फ्रान्समधील ऑरेंज संस्थानचा अधिपती राजप्रतिनिधी म्हणून नेदर्लंड्‌सच्या काही प्रांतांचा कारभार करीत असे. स्वातंत्र्यलढ्यातील त्याच्या असामान्यकर्तबगारीमुळे पाश्चात्य पुरुषश्रेष्ठांत त्याची गणना केली जाते. १०जुलै १५८४ रोजी विल्यमचा खून झाल्याने नेदर्लंड्‌सच्या स्वातंत्र्यलढ्याची मोठी हानी झाली पण या संकटाने हतबल न होता डच लोकांनी यान व्हान ऑल्डेन बार्नेव्हेल्ट व विल्यमचा पुत्र मॉरिस यांच्या नेतृत्वाखाली स्पेनविरुद्ध संघर्ष चालू ठेवला. उत्रेक्तच्या घोषणेपासून दक्षिणेकडील प्रांतांना बेल्जियम व उत्तरेकडील प्रांतांना नेदर्लंड्‌स (हॉलंड) नाव पडले.

मॉरिस व बार्नेव्हेल्ट यांच्या आक्रमक डावपेचांनी व अन्य क्षेत्रांतील वाढत्या अडचणींमुळे त्रस्त होऊन १६०९मध्ये स्पेनने शस्त्रसंधी करार केला. त्या करारानुसार हा लढा १२वर्षे स्थगित राहिला. १६२१मध्ये युद्धास पुन्हा तोंड फुटले व सत्तावीस वर्षे युद्ध चालून, १६४८च्या वेस्टफलियाच्या तहाने नेदर्लंड्‌सच्या स्वातंत्र्यास विधिवत आंतरराष्ट्रीय मान्यता मिळून डच प्रजासत्ताकाची स्थापना झाली.

शस्त्रसंधीच्या काळातच डच ईस्ट इंडिया कंपनीची व डच वेस्ट इंडिया कंपनीची स्थापना होऊन नेदर्लंड्‌सच्या व्यापारी व आरमारी उत्कर्षास सुरुवात झाली. तसेच राजप्रतिनिधी मॉरिस व बार्नेव्हेल्ट यांच्यात मतभेद होऊन काही काळ आपसांत दुफळी माजली. वेस्टफेलियाच्या तहानंतरचे अर्धशतक म्हणजे नेदर्लंड्‌सच्या इतिहासातील सुवर्णयुगच होय. या काळात इंग्लंडशी दोन, फ्रान्सशी एक व फ्रान्स-स्पेनशी एक (स्पॅनिश वारसा युद्ध) अशा चार युद्धांत नेदर्लंड्‌सला भाग घ्यावा लागला. या काळात यान दे व्हिट व तिसरा विल्यम या महापुरुषांच्या पराक्रमांनी नेदर्लंड्‌सचा इतिहास घडविला. १६५१मधील ग्रॅंड असेंब्लीने स्टॅडहोल्डरची जागा स्थगित ठेवून दे व्हिटला सर्वाधिकारी नेमले. इंग्लंडशी झालेल्या युद्धात दे व्हिटने विशेष कर्तबगारी दाखविली परंतु फ्रान्सच्या चौदाव्या लुईशी होणाऱ्या संघर्षात ऑरेंज कुटुंबाच्या नेतृत्वाशिवाय आपला निभाव लागणार नाही, अशा श्रद्धेने विल्यम द सायलेंटचा पणतू तिसरा विल्यम याची स्टॅडहोल्डरपदी नियुक्ती केली (१६७२). विल्यमने चौदाव्या लुईच्या डावपेचांना दाद दिली नाही. १६७८ च्या नाइमेगनच्या तहाने नेदर्लंड्‌सला काही काळ विश्रांती मिळाली. फ्रान्सशी संघर्ष अपरिहार्य आहे हे जाणून विल्यमने भावी संकटास तोंड देण्याची तयारी केली. त्याचा विवाह इंग्लंडची राजकन्या मेरीशी झाला होता. त्यामुळे १६८८च्या क्रांतीनंतर विल्यम-मेरी यांना संयुक्त रीत्या इंग्लंडचे राजपद मिळाले. इंग्लंड-हॉलंडच्या या युतीमुळे १७०२मध्ये सुरू झालेल्या स्पॅनिश वारसा युद्धात फ्रान्सला यश मिळू शकले नाही. युद्ध सुरू होण्यापूर्वीच तिसरा विल्यम निधन पावला पण त्याने केलेल्या पूर्वतयारीमुळे फ्रान्सचा पराभव झाला.

याच अर्धशतकात जावा, सुमात्रा, बोर्निओ, श्रीलंका,द. आफ्रिका, ब्राझील, जपान या देशांत डच वसाहती भरभराटीस आल्या तसेच साहित्य, संगीत, चित्रकला, विज्ञानादी क्षेत्रांत नेदर्लंड्‌सची प्रगती होऊन देशाचे सांस्कृतिकजीवनही समृद्ध झाले आणि म्हणूनच हा कालखंड म्हणजे डच इतिहासातील सुवर्णयुग होय.

उत्रेक्तच्या तहानंतर नेदर्लंड्‌सच्या वैभवाला उतरती कळा लागली.अर्धशतकाच्या युद्धाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर खूपच ताण पडला, वसाहतींच्या उत्पन्नात घट येऊन व्यापार मंदावला व सट्टेबाजीमुळे अनेक व्यापाऱ्यांची दिवाळी निघाली. ऑस्ट्रियन वारसा युद्ध, सप्तवार्षिक युद्ध, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध या युद्धांचेही नेदर्लंड्‌सवर प्रतिकूल परिणाम झाले.

फ्रेंच राज्यक्रांतीमुळेही नेदर्लंड्‌समध्ये अनेक राजकीय उलाढाली झाल्या व सुरुवातीला बटेव्हीयन रिपब्लिक, नंतर ल्वी बोनापार्टची राजवट व त्याच्या राज्यत्यागानंतर फ्रान्समध्ये विलीनीकरण अशा स्थित्यंतरांतून गेल्यावर नेपोलियन बोनापार्टच्या पराभवानंतर (१८१४) व्हिएन्ना परिषदेने हॉलंड–बेल्जियम–लक्सेंबर्गचे संयुक्त राज्य स्थापन करून, त्याचे आधिपत्य ऑरेंज घराण्याकडे दिले.


१८१५ च्या नव्या संविधानानुसार डच प्रजासत्ताकाचा अंत होऊन नेदर्लंडस्‌मध्ये नियंत्रित राजेशाही स्थापन झाली परंतु व्हिएन्ना परिषदेने घडवून आणलेल्या एकीकरणास बेल्जियमच्या राष्ट्रवाद्यांचा कसून विरोध असल्याने पहिल्या विल्यमला (पाचवा विल्यम–क्रांतिपूर्व काळातील स्टॅडहोल्डर) राज्य चालविणे जिकिरीचे झाले. शेवटी १८३० मध्ये बेल्जियमने व्हिएन्ना परिषदेचे निर्णय धुडकावून नव्या राजवटीविरुद्ध बंड पुकारले व आपण स्वतंत्र असल्याचे जाहीर केले. सु. नऊ वर्षे हे प्रकरण चिघळल्यावर बेल्जियमच्या स्वातंत्र्यास मान्यता मिळाली. यानंतर लवकरच पहिल्या विल्यमने राज्यत्याग केला व त्याचा मुलगा विल्यम दुसरा गादीवर बसला. बेल्जियमच्या स्वातंत्र्याने बदललेल्या परिस्थितीत संविधानात योग्य फेरबदल आवश्यक झाल्याने १८४८ च्या नव्या संविधानास राष्ट्राची मान्यता मिळाली.

नेदर्लंड्‌समध्ये १८४८ ते १९१४ या काळात सामान्यतः शांतता आणि सुबत्ता नांदली. आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रांत देशाची प्रगती झाली. प्रॉटेस्टंट व कॅथलिक यांच्या तंट्यातून उद्‌भवलेला शिक्षणाच्या पुनर्रचनेचा वाद, समाजवादाच्या प्रसारामुळे उद्‌भवलेले मालक-मजूर वाद व त्यांबद्दलचे कायदे इ. घटनांमुळे निवडणुका चुरशीच्या होऊन मंत्रिमंडळात वारंवार परिवर्तन होण्याचे प्रसंग आले. १८९० मध्ये राजा तिसरा विल्यम मृत्यू पावला व त्याची अल्पवयी मुलगी व्हिल्हेल्मीना गादीवर आली.

पहिल्या महायुद्धात नेदर्लंड्‌सने मोठ्या शिकस्तीने तटस्थता टिकविली तथापि नेदर्लंड्‌सच्या आरमाराची फार हानी होऊन व्यापार दुरापास्त झाला. युद्धोत्तर काळातही आर्थिक मंदी, बेकारी, नाझी तत्त्वांचा व कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार इ. कारणांमुळे जनता व शासन त्रस्त झाले.

दुसऱ्या महायुद्धातही तटस्थ राहण्याचा नेदर्लंड्‌सने आटोकाट प्रयत्‍न केला परंतु १० मे १९४० च्या आकस्मिक जर्मन आक्रमणाचा प्रतिकार करणे, अशक्य झाल्याने शरणागती पतकरणे डचांना भाग पडले. राजघराणे व मंत्रिमंडळाला कैद करण्याचा हिटलरचा डाव मात्र फसला. परिणामत: राणी व्हिल्हेल्मीनाच्या नेतृत्वाखाली लंडनला अस्थायी डच शासनाची स्थापना होऊन, तेथून डच स्वातंत्र्याचे प्रयत्‍न सुरू झाले.

झाइसिंगक्व्हार्ट या नाझी कमिशनरच्या जुलमी शासनाला डच नागरिकांनी निर्धाराने तोंड देऊन, भूमिगत प्रतिकाराने नाझी लष्कराचे अतिशय नुकसान केले. तरीही पाच वर्षांच्या नाझी राजवटीत सर्व देश बेचिराख झाला, रॉटरडॅमसारखी संपन्न शहरे अर्धीअधिक उद्‌ध्वस्त झाली व उद्योगधंदे, शेती इ. क्षेत्रात उत्पादन अशक्य होऊन डचांची अन्नान्न दशा झाली. १९४२ ते सप्टेंबर १९४४ या काळात जर्मन सैन्याने डचांचा छळ करून त्यांना गुलाम म्हणून वागविले.

मे १९४५ मध्ये नेदर्लंड्‌समधील नाझी लष्कराने शरणागती पतकरली राणी व्हिल्हेल्मीना इंग्‍लंडहून परतली व मजूर पुढारी व्हिलेम स्केर्मेरहॉनचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन युद्धोत्तर पुनर्रचनेच्या कामास गती मिळाली. त्यानंतर डॉ. लुई बील व व्हिलेम ड्रीस (तीनदा) नेदर्लंड्‌सचे महामंत्री झाले.

नेदर्लंड्‌सचा द्वितीय महायुद्धोत्तर इतिहास म्हणजे आर्थिक व राजकीय पुनर्रचनेची गाथा. राणी व्हिल्हेल्मीनाचा राज्यत्याग व यूलीआनाचे राज्यारोहण (४ सप्टेंबर १९४८), बेनेलक्सची–बेल्जियम, नेदर्लंड्‌स व लक्सेंबर्ग यांच्या आर्थिक संघटनेची–स्थापना व विकास,इंडोनेशियाचा स्वातंत्र्यलढा हे या काळातील प्रमुख प्रश्न होत. बऱ्याच संघर्षानंतर संयुक्त राज्य संघटनेच्या सहकार्याने इंडोनेशियाचा प्रश्न समाधानकारकपणे सुटला. विस्तृत साम्राज्य लयास गेल्याने नेदर्लंड्‌सच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होणे अपरिहार्य होते. मात्र जिद्दीच्या परिश्रमांनी अनेक संकटांवर मात करून भावी काळातील उत्कर्षाची भक्कम पायावर उभारणी करण्यात डचांनी यश मिळविले आहे, हे नि:संशय.

१९४५ नंतर नेदर्लंड्‌सने तटस्थतेची भूमिका सोडून देऊन यूरोपची एकता पुरस्करण्यात पुढाकार घेतला. पश्‍चिम यूरोपीय संघटना व नाटो यांचा तो सदस्य झाला. यूरोपीय आर्थिक समूह–ईईसी–चा तो संस्थापक सदस्य आहे. देशात कॅथलिक आणि समाजवादी (१९४५–५९),कॅथलिक व प्रॉटेस्टंट (१९५९–६५) आणि १९६५–६६ च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर १९६७ मध्ये पीत दे याँगचे कॅथलिक–प्रॉटेस्टंट–उदारमतवादी अशी संयुक्त शासने अधिकारावर आली. एप्रिल १९७१ मध्ये निवडणुका होऊन नवीन समाजवादी पक्षाने बारेंट बिशेव्हेलच्या संयुक्त शासनात सहभाग घेतला. तथापि ते शासन १९७२ मध्ये दोघा मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे कोसळले. मे १९७३ मध्ये यूप डेन यूल या मजूरपक्षाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली पाच पक्षांचे संयुक्त शासन अधिकारावर आले. या शासनाने आर्थिक पुनर्रचनेने संपत्तीच्या फेरवाटणीत प्रगतीचे धोरण अंमलात आणून प्रौढ कामगारांस विविध स्तरांवर किमान वेतनाची हमी दिली. ईईसीच्या विभागीय निधी धोरणाबाबत सौम्य धोरण पतकरले आणि निकडीच्या घरगुती प्रश्‍नांचा नाटोच्या विरोधास न जुमानता संरक्षण खर्चात कपात केली.

राणा यूलीआनाचा पती प्रिन्स बेर्नहार्ट १९७६ मध्ये डच वायुदलाला अमेरिकेची लॉकहीड विमाने पुरविण्याबाबतच्या भ्रष्टाचार प्रकरणात सापडला आणि राणीच्या राज्यत्यागापर्यंत तणाव वाढून अखेर बेर्नहार्टला सार्वजनिक क्षेत्रांतील सर्व अधिकारपदांचा राजीनामा द्यावा लागला.

राज्यव्यवस्था : पूर्वीच्या नेदर्लंड्‌सच्या प्रजासत्ताकाचे १८१३ मध्ये वैधानिक राजतंत्रात्मक देशात रूपांतर होऊन ऑरेंजनॅसॉ घराण्याकडे येथील राजपद गेले व राजप्रतिनिधी (स्टॅडहोल्डर) पाचव्या विल्यमचा मुलगा पहिला विल्यम म्हणून नेदर्लंड्‌सच्या सिंहासनावर बसला. तेव्हापासून वंशपरंपरागत हक्काने, कायद्यानुसार या घराण्याकडेच येथील राजपद आहे. सिंहासनाधिष्ठित राजाला मुलगा नसल्यास कन्येलाही सिंहासनप्राप्ती होऊ शकते. तदनुसार १८९० मध्ये राजकन्या व्हिल्हेल्मीना गादीवर आली व १९४८ पासून तिची मुलगी यूलीआना नेदर्लंड्‌सच्या गादीवर आली. तिला चार मुलीच असल्याने राजकन्या बीआट्रिक्स आज गादीची वारस आहे.

नेदर्लंड्‌सचा राज्यकारभार १८१४ च्या घटनेनुसार चालत असतो. या घटनेत वेळोवेळी आवश्यक दुरुस्त्या झालेल्या आहेत. घटनेनुसार नेदर्लंड्‌सच्या राजाला मंत्रिमंडळाच्या व कौन्सिल ऑफ स्टेटच्या सल्ल्यानुसार कारभार चालवावा लागतो. मंत्रिमंडळ संसदेला जबाबदार असल्याने मंत्र्यांच्या सल्ल्याविरुद्ध राजाला सहसा जाता येत नाही.

राजाला व मंत्रिमंडळाला सल्ला देण्यासाठी १५ व क्वचित २५ सभासदांचे कौन्सिल ऑफ स्टेट असते. राजाच कौन्सिलचा अध्यक्ष असून उपाध्यक्षाची व अन्य सभासदांची तोच नेमणूक करतो. प्रत्येक मंत्र्याच्या खात्यानुरूप कौन्सिल ऑफ स्टेटच्या उपसमित्या असतात.

नेदर्लंडसच्या संसदेत अनेक पक्षोपपक्ष असल्याने कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळणे कठीणच. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या नेमणुकीच्या बाबतीत बरीच गुंतागुंत निर्माण होऊ शकते. निवडणुका झाल्यावर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करून राजा मंत्रिमंडळाच्या नेमणुकीसंबंधी विचार करतो. प्रधानमंत्रिपदाचा घटनेत उल्लेख नसल्याने राजा संसदेतील एखाद्या प्रमुखाला मंत्रिमंडळाच्या नियुक्तीबद्दल सल्ला विचारतो. याला मंत्रिमंडळ नियुक्तिसूचक म्हणतात. त्याच्या सल्ल्यानुरूप मंत्र्यांची नेमणूक होत असून तो स्वतःही मंत्रिपद स्वीकारू शकतो. नियुक्त मंत्र्यांतून मंत्रिमंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची नेमणूक केली जाते व व्यवहारात हा अध्यक्ष प्रधानमंत्री मानला जातो.


नेदर्लंड्‌सची संसद द्विगृही असून तिला स्टेट्‌स जनरल म्हणतात. या सभेची विभागणी दोन सभागृहांत होते. लोकांतून थेट निवडले गेलेले १५० प्रतिनिधी द्वितीय सभागृहात बसतात व ११ प्रांतांच्या विधिमंडळांनी निवडलेले ७५ प्रतिनिधी पहिल्या सभागृहात बसतात. तीन वर्षांनी पहिल्या सभागृहाचे निम्मे सभासद निवृत्त होतात आणि तितकेच नव्याने निवडले जातात. कनिष्ठ सदनातील सभासद दर चार वर्षांनी निवडले जात असल्याने, प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात त्यांचे प्रतिनिधी संसदेत असतात.

नेदर्लंड्‌स प्रजासत्ताकाचे अकरा प्रांत असून, प्रत्येकाचा कारभार संसदीय पद्धतीनुसार नियुक्त राज्यपालाच्या आणि निर्वाचित प्रांतिक विधिमंडळाच्या देखरेखीखाली चालतो.

नेदर्लंड्‌समधील एकूण ८६५ स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य करतात. त्यांचे सभासद लोकनियुक्त, पण नगराध्यक्ष शासननियुक्त असतो.

अर्वाचीन काळाच्या आरंभापासून नेदर्लंड्‌समध्ये राजकीय आणि धार्मिक संघर्ष सतत चालल्याने अनेक राजकीय पक्षोपपक्ष निर्माण झाले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी येथे पन्नासच्यावर पक्ष होते. हल्ली आठ पक्ष महत्त्वाचे असून त्यांपैकी कॅथलिक पीपल्स पार्टी व लेबर पार्टी प्रमुख आहेत.

नेदर्लंड्‌समध्ये न्यायखाते स्वतंत्र असून ६२ कनिष्ठ, १९ जिल्हा, ५ उच्च व एक सर्वोच्च न्यायालय अशी कमीअधिक अधिकार असलेल्या न्यायालयांची उतरंडच आहे. ज्यूरीची पद्धत आणि फाशीची शिक्षा येथे नाही.

दुसऱ्या महायुद्धात नेदर्लंड्‌सचे जवळजवळ सर्वच सैन्य नष्ट झाल्याने युद्ध संपल्यावर राष्ट्रीय लष्कराची प्रारंभापासून सिद्धता करावी लागली. २० ते ३५ वर्षांच्या सर्व पुरुषांस १४ ते २१ महिने सैनिकी सेवा आवश्यक आहे. हल्ली नेदर्लंड्‌सच्या भूदलात ७५,००० आरमारात १८,२०० व हवाईदलात १९,००० आणि सैनिकी आरक्षकदलात ३,७०० सैनिक आहेत. हा देश संयुक्त राष्ट्रांच्या व नाटो संघटनेचा सभासद आहे.

आर्थिक स्थिती : सतराव्या शतकात जागतिक व्यापारात आघाडीवर असलेल्या नेदर्लंड्‌सची नंतरच्या स्पर्धेमुळे व दोन्ही महायुद्धांतील प्रचंड हानीमुळे बरीच पीछेहाट झाली. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात योजनापूर्वक अविश्रांत परिश्रम केल्याने डच लोक आर्थिक दृष्ट्या प्रगतिपथावर आहेत. भौगोलिक दृष्ट्या यूरोपचे प्रवेशद्वार या मोक्याच्या जागी असल्याने, यूरोपच्या आयात-निर्यात व्यापारात नेदर्लंड्‌सला महत्त्वाचे स्थान असून, बॅंकिंग,विमा,जलवाहतूक आदींसंबंधी आर्थिक व्यवहारांची केंद्रे येथे विकसित झाली आहेत.

वाढती लोकसंख्या व उपलब्ध शेतजमीन यांच्यातील व्यस्त प्रमाणामुळे सघन शेतीचा व औद्योगिकीकरणाचा मार्ग शोधणे डचांना अपरिहार्य झाले. युद्धोत्तर काळात औद्योगिक व कृषिक्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती झाली असली तरी चलन फुगवटा,श्रमिकांचा तुटवडा, परकीय चलनांची चणचण आदी कारणांमुळे देशाच्या विकासात अनेक अडथळेही आले. शिवाय औद्योगिक उत्पादनासाठी कच्चा माल आयात करावा लागत असल्याने, जागतिक स्थित्यंतरांचा नेदर्लंड्‌सच्या आर्थिक जीवनावर तात्काळ परिणाम होतो. त्यामुळे उत्कर्षाबरोबर नव्या समस्याही निर्माण होतात. चलन फुगवटा, महागाई, वेतनवाढ यांच्या दुष्टचक्रामुळे उत्पादन मूल्य व किंमतीही वाढून आर्थिक जीवन अस्थिर झाले आहे. १९५० च्या दरम्यान नैसर्गिक वायूचा शोध लागल्यामुळे डच अर्थकारणावर चांगला परिणाम झाला त्या उत्पादनातील एकतृतीयांश भाग फ्रान्स,जर्मनी व बेल्जियम या देशांना पाठवून त्याने कर्जाची भरपाई केली.

दुसरे महायुद्ध संपताच नेदर्लंड्‌स शासनाने आर्थिक,सामाजिक व वित्तीय बाबतींत सामंजस्य निर्माण करण्यासाठी एक संशोधन आणि सल्लागार मंडळ नेमले. चलनविषयक सुधारणा करून चलन फुगवट्याला आळा घातला. कामगार, कारखानदार यांच्यात सहकार्य प्रस्थापित करून औद्योगिक क्षेत्रातील संघर्ष टाळले आणि आर्थिक व्यवहारांवरील परवाना पद्धती, शिधावाटप इ. नियंत्रणे हटवून मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला.

कृषी : अन्य देशांप्रमाणेच कृषी हाच नेदर्लंड्‌सचाही प्रमुख व्यवसाय होता. सतराव्या शतकानंतर औद्योगिकीकरणास प्राधान्य मिळाले, तरी वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीविकासाकडे लक्ष देणेही आवश्यक झाले. आजही केवळ अंतर्गत उपयोगासाठीच नव्हे, तर निर्यातीसाठीही शेतमालाला वाव आहे. सध्या राष्ट्रीय उत्पादनातील ७% उत्पन्न शेतीमधून मिळते. तथापि शेतमाल, उद्यान–उत्पादने, कंद व दुग्धपदार्थ मिळून निर्यातीचा चौथा हिस्सा होतो.

नेदर्लंड्‌समध्ये शेते लहान आकाराची असून सामान्यतः कसणारेच जमीनमालक आहेत. युद्धोत्तर काळात खतांचा वापर आणि ट्रॅक्टर, पेरणी–कापणी यंत्रे इ. साधनांच्या उपयोगाने कृषी उत्पादनात २०–२५% वाढ झाली आहे तरीदेखील डच लोकांना अन्नधान्याची आयात करावी लागते. १९५०–६६ या काळात देशातील शेतमजुरांची संख्या निम्म्यावर व शेतांची संख्या दोनतृतीयांशावर येऊनही कृषिउत्पादन दुप्पट झाले यावरून उत्पादनक्षमतेच्या वाढीची कल्पना येते.

हॉलंडच्या ३६ लक्ष हे. भूमीपैकी ५३ लक्ष हे. शेतीसाठी उपलब्ध असून, तीपैकी २१·५ लक्ष हे. जमीन गवताच्या लागवडीखाली आहे. गवताच्या समृद्धीमुळे नेदर्लंड्‌सचे पशुधन धष्टपुष्ट असून १९७६ मध्ये एकंदर ४९,६९,००० गुरांपैकी निम्म्या गाई दुधाळ होत्या. डुकरे ७५,०६,०० कोंबड्या ६,०३,९७,००० मेंढ्या ७,७९,००० व घोडे १९,००० होते. वर्षाकाठी १·५ कोटी अंडी व अंड्याचे पदार्थ उपलब्ध होतात. १९७५ मध्ये १,०२,८४,००० मे. टन दूध २,०४,००० मे. टन लोणी ३,००,००० मे. टन चीज ४,६१,००० मे. टन संघनित दूध २,७५,००० मे. टन दूधभुकटी १३,३६,००० मे. टन मांस असे उत्पादन झाले. उत्तम जातीच्या गुरांची निपज व दुग्धपदार्थांचे उत्पादन यांसाठी हा देश प्रसिद्ध आहे. गहू, ओट, राय, बार्ली, बटाटे, वाटाणे, पावटे आणि बीट ही नेदर्लंड्‌सची प्रमुख पिके आहेत. १९७५ मध्ये ५०,०३,००० मे. टन बटाटे ५९,२७,००० मे. टन बीट ५,२८,००० मे. टन गहू ३,३६,००० मे. टन बार्ली १,५८,००० मे. टन ओट ६३,००० मे. टन राय २८,००० मे. टन अंबाडी २९,११,००० मे. टन भाजीपाला व फळे २,०५,००० मे. टन मार्गारीन (लोणी) आणि ८,४१,००० मे. टन साखर असे उत्पादन झाले.

पुष्पोत्पादन हे या देशाला एक वरदानच होय. हेग ते हार्लेमपर्यंतच्या रेताड जमिनीत गुलाब, कार्नेशन, ट्यूलिप यांचे व हार्लेम ते लायडनदरम्यान ट्यूलिप, हायसिंथ, डॅफोडिल्स, नार्सिसस यांचे प्रचंड उत्पादन होते. फुला-फळांच्या बागांखाली सु. १,२०,००० हे. जमीन असून, ट्यूलिप पुष्पांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते.

हेगच्या दक्षिणेकडील वेस्टलंड भागात विशिष्ट वनस्पतींच्या लागवडीसाठी पादपगृहे असून, त्यांत विविध फुल-फळझाडांची रोपे निर्यातीसाठी वाढवितात. शिवाय द्राक्षे, पीच, टोमॅटो, काकड्या आदींचे उत्पादनही होते. काचगृहांत फळाफळावळ पिकविण्याचा येथे मोठा उद्योग असून, यूरोपातील अशा प्रकारची निम्मी जमीन नेदर्लंड्‌समध्ये आहे.


मासेमारी : मासेमारी व्यवसायही नेदर्लंड्‌समध्ये किफायतशीर आहे. या व्यवसायात ट्रॉलर जातीच्या सु. ४०० बोटी असून, वर्षाकाठी सु. २–२·५ लक्ष मे. टन मासे मिळतात. यांत हेरिंग, प्‍लेस, कॉट, सील वकालवे आणि कोळंबी प्रामुख्याने असतात. आयमॉइडन हे प्रमुख मच्छीमार बंदर असून, झीलंड प्रांताच्या किनारी खडकाळ भागात कालवांचे थरच्या थर सापडतात.

खनिज संपत्ती : नेदर्लंडस्‌मध्ये कोळसा व अलीकडेच सापडलेले तेल व नैसर्गिक वायुसाठे सोडता अन्य खनिजे नाहीत. आग्नेय भागातील लिंबर्ग प्रांतात कोळशाच्या बारा खाणी असून, त्यांपैकी चार सरकारी मालकीच्या आहेत. अत्याधुनिक यंत्रांच्या वापराने आणि कुशल व कार्यक्षम कामगारवर्गामुळे अन्य देशांच्या तुलनेने येथील उत्पादनखर्च कमी आहे. तथापि कोळसा आयात करणे अधिक स्वस्त पडते. १९५८ ते १९७० या काळात कोळसा खाणकामगारांची संख्या ४८,००० वरून १२,००० वर आली. मात्र उत्पादन १९५८ च्या उत्पादनाच्या ४०% इतके झाले. कोळशाचे वार्षिक उत्पादन १९७४ मध्ये सु. ७·८५ लक्ष मे. टनांवर आले. कोळशापासून१९७५ मध्ये २६·८ लक्ष टन कोक आणि १,०६५ कोटी घ.मी. गॅसचेही उत्पादन होते. अलीकडेच सापडलेल्या खाणीतून वर्षाला सु. १४·५ लक्ष टन क्रूड तेल मिळते आणि देशाची एक-चर्तुर्थांश गरज भागते. नैसर्गिक वायूचे उत्पादन १९७५ मध्ये ९,०८५·३ कोटी घ. मी. झाले.

उद्योगधंदे : नेदर्लंड्‌समध्ये उद्योगधंद्यांना उशिरा म्हणजे १८७० मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून त्यांची सतत वाढ होत गेली. सध्या येथे विविध उद्योगधंदे असून उत्पादनवाढीमुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात नेदर्लंड्‌स औद्योगिक दृष्ट्या प्रगत झाला असून, शेतीपेक्षा कारखानदारीमुळे देशाच्या संपत्तीत पाचपट भर पडत आहे. देशभर विखुरलेल्या सुमारे अकरा हजार कारखान्यांत दहा लाखांच्यावर कामगार आहेत. बहुतेक कारखान्यांना कच्चा माल आयात करावा लागल्याने उत्पादनखर्च जागतिक आर्थिक स्थितीप्रमाणे कमीजास्त होतो. चलन फुगवटा, महागाई, वेतनवाढ या समस्यांना तोंड द्यावे लागते.

इमारतींच्या सामानास लागणारा कच्चा माल मात्र देशातच मिळतो. बहुतेक नद्यांच्या काठांवर विटा, कौले व फरशा यांच्या भट्‌ट्या लागलेल्या दिसतात. यांपैकी काही माल निर्यातही होतो. रासायनिक उद्योगात १९४० ते ७० या काळात दसपट वाढ झाली व त्यामुळे या देशातील बेकारीच्या प्रश्नाची बरीच सोडवणूक झाली.

कापड उत्पादन हा नेदर्लंड्‌सचा जुना व्यवसाय असून उत्तर ब्राबांटमध्ये तिलबर्ग, हेल्माँट,आयंटहोव्हेन येथे कापूस व लोकरीचे कापड होते. ते मुख्यतः देशातच खपते. एन्‌स्खदे, आल्मलो येथील कापडगिरण्यांचा माल इंडोनेशिया, आफ्रिकादी पूर्वीच्या डच साम्राज्यातील देशांत खपतो. रेयॉन कापडाच्या गिरण्याही अलीकडे निघाल्या आहेत. तयार कपड्याचे उत्पादन मुख्यतःॲम्स्टरडॅमच्या परिसरात होते. तथापि १९६० पासून कापड उद्योगात मंदी आली असून कित्येक गिरण्या बंद पडल्या आहेत.

नेदर्लंड्‌सचा महत्त्वाचा प्राचीन उद्योग म्हणजे जहाजबांधणी. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जगातील एक-दशांश नवी जहाजे नेदर्लंड्‌समध्ये तयार होत. युद्धोत्तर काळातही हा व्यवसाय भरभराटीत असून ॲम्स्टरडॅम,रॉटरडॅम, व्हलिसिंगेन येथील जहाजबांधणी गोद्या प्रसिद्ध आहेत.

रॉटरडॅम येथील तेलशुद्धीकरण कारखाने ऑस व नाईमेगन येथील मार्गारीन (लोणी) शिवाय चॉकोलेट व कोको यांचे कारखाने, पादत्राणे व अन्य कातडी वस्तू, काच सामान, छपाईचा व अन्य प्रकारचा दर्जेदार कागद, हिऱ्यांना पैलू पाडण्याचा व्यवसाय व ॲम्स्टरडॅम,स्खीडामच्या आसवन्या व मदिरेच्या भट्‌ट्या हे नेदर्लंड्‌सचे महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत.

नेदर्लंड्‌समध्ये लोखंड नसल्याने पोलादाच्या कारखान्यांना लागणारे अशुद्ध लोह फ्रान्स,स्वीडन आदी देशांतून आयात होते. मात्र व्हेल्‌झन व आयमॉइडन येथील पोलादाचा दर्जा जगप्रसिद्ध आहे.

नेदर्लंड्‌समधील बहुसंख्य कारखाने लहान वा मध्यम आकाराचे आहेत. मात्र अयंटहोव्हेनच्या फिलिप्सच्या वीज कारखान्यात ४०,००० कामगार आहेत. युनिलिव्हर या ब्रिटीश कंपनीत, पूर्वेकडील देशांतील नारळाच्या वाड्या आणि देशोदेशींच्या साबू, मार्गारीन उत्पादनात नेदर्लंड्‌सची किफायतशीर भागीदारी आहे. रॉयल डच पेट्रोलियम कंपनीची जगात तेलशुद्धी व वाटप केंद्रे आहेत. धातुउत्पादन हा अतिमहत्त्वाचा उद्योग आहे. रॉयल नेदर्लंड्‌स ब्‍लास्ट फर्निसेस आणि स्टील वर्क्स (आइमॉइडन) येथे ४० लाख टन कच्चे पोलाद तयार होते. ग्रोनिंगेन प्रांतातील डेल्फझाइल येथे नैसर्गिक वायूवर असणारा ॲल्युमिनियमचा कारखाना हा पारंपारीक शेती विभागातील औद्योगिक केंद्र आहे. नेदर्लंडस्‌मध्ये जलविद्युत उत्पादन होत नसून, तेल, कोळसा, इत्यादींवर वीज उत्पादन करावे लागते. १९७५ मध्ये ५,४२५·९ कोटी किवॉ. ता. वीजउत्पादन झाले. परदेशांतून नेदर्लंड्‌सच्या उद्योगधंद्यात अलीकडे वाढती भांडवल गुंतवणूक असून एकट्या अमेरिकेचीच गुंतवणूक युद्धोत्तर काळात तिप्पट झाली आहे.

व्यापार : दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात नेदर्लंड्‌सच्या निर्यातीत झपाट्याने वाढ झाली, तरी व्यवहार शेषात अनुकूल-प्रतिकूलतेचे चक्र चालूच आहे. आयात-निर्यातीच्या किंमतीतील तफावत भरून काढण्यासाठी १९५५ मध्ये सु. पन्नास कोटी रुपयांचे सोने द्यावे लागले. गेल्या काही वर्षांत ही स्थिती थोडी सुधारली, तरी व्यवहार शेष नेदर्लंड्‌सला फारसा अनुकूल नाही. नेदर्लंड्‌सचा माल आयात करणारे प्रमुख देश म्हणजे प. जर्मनी, बेल्जियम, इंग्‍लंड, अमेरिका, फ्रान्स बेल्जियम १८ टक्के, प. जर्मनी १८ टक्के, अमेरिका १४ टक्के, इंग्‍लंड ८ टक्के, फ्रान्स ४ टक्के यांप्रमाणे बेल्जियमला निर्यात करणारे देश आहेत. औद्योगिक साहित्य व उपकरणे, कच्चा माल, लोखंड, पोलाद, अलोह धातू, इंधन, कागद, अन्नपदार्थ, रसायने, प्‍लॅस्टिके, यंत्रे इ. आयातीचे तर खनिज तेल, कोलटार, दुग्धोत्पादित पदार्थ, अंडी, मांस, फळे-फुले, रसायने, यंत्रे, अन्नपदार्थ, विजेचे सामान व कापडचोपड हे निर्यातीतील पदार्थ आहेत. १९७५ मध्ये ८,७३०·७ कोटी गिल्डर किंमतीची आयात व ८,८५२·६ कोटी गिल्डर किंमतीची निर्यात झाली.

कामगार : कामगारांच्या तीन प्रकारच्या संघटना असून, कॅथलिक, प्रॉटेस्टंट आणि समाजवादी असे गट आहेत. वाढत्या किंमतींमुळे औद्योगिक शांतता धोक्यात आल्याने चलनफुगवटाविरोधी धोरणाची एप्रिल १९७१ पासून कडक अंमलबजावणी सुरू आहे.

नेदर्लंडस्‌मधील कामगार संघटना प्रबळ असून, मालक-मजूर संबंध सलोख्याचे आहेत. बेकारी मात्र १९७६ मध्ये कामगार संख्येच्या ५·४ टक्के इतकी होती. एकूण आर्थिक परिस्थितीमुळे मजुरीचे दर वाढत आहेत.

नेदर्लंड्‌स फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स, द नेदर्लंड्‌स कॅथलिक वर्कर्स मूव्हमेंट, ख्रिश्‍चन नॅशनल फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स या देशातील प्रमुख मजूर संघटना आहेत.

मालक-मजुरांचे प्रतिनिधी असलेल्या लेबर फाउंडेशनशी विचारविनिमय करून सरकारनियुक्त समिती वेतनाचे दर निश्‍चित करते. हितसंबंधियांशी सतत विचारविनिमय होत असल्याने मालक-मजुरांत संघर्ष क्वचितच होतात.

नेदर्लंड्‌समध्ये श्रमिकांना, शासकीय व खाजगी व्यवसायांतील लेखनिकादी कामगारांना आरोग्य, बेकारी, निवृत्तिवेतन, अपघात यासंबंधीचे विमे, सवेतन सुट्ट्या आदी समाजकल्याण योजना अंमलात असून, कायद्यानुसार असलेल्या सर्व सवलती मिळतात. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या घरटंचाईच्या काळात घरबांधणीसाठी शासकीय साहाय्य भरपूर प्रमाणात दिलेले आहे.


अर्थकारण :गिल्डर किंवा फ्‍लॉरिन हे देशाचे अधिकृत चलन असून, एका गिल्डरचे १०० सेंट असतात. ऑक्टोबर १९७६ मध्ये, पौंड स्टर्लिंग = ४·०५ गिल्डर व १ अमेरिकी डॉलर = २·५३ गिल्डर असा विनिमय दर होता.

नेदर्लंड्‌समध्ये सरकारी बॅंकेव्यतिरिक्त पाच प्रमुख बॅंका असून, चलन काढण्याचा अधिकार सरकारी बॅंकेला आहे. बॅंकिंग व्यवसायात नेदर्लंड्‌स बराच आघाडीवर असून, येथील आर्थिक संस्थांना व शेअर बाजाराला जागतिक बाजारपेठांत महत्त्व आहे. अल्‌गेमेनी बॅंक नेदर्लंड्‌स व ॲम्स्टरडँम–रॉटरडॅम बॅंक या दोन बॅंका सु. ६० टक्के बॅंकिंग व्यवसाय हाताळतात.

वाहतूक व संदेशवहन : नेदर्लंड्‌समध्ये जलवाहतूक प्राचीन काळापासूनच विकास पावली असून,सर्व प्रकारच्या सु. १९,२३५ नौका अंतर्गत वाहतूक व्यापारात व ६१५ जहाजे सागरी व्यापारात आहेत. ऱ्हाईन नदीवरील वाहतूक व अंतर्गत व्यापारही मोठ्या प्रमाणावर जलमार्गानेच चालतो. रॉटरडॅम हे जलवाहतुकीचे जगातील मोठे केंद्र असून, नेदर्लंड्‌सच्या भौगोलिक स्थानामुळे पश्‍चिम यूरोप व उर्वरित जग यांतील ते द्वार ठरले आहे. या देशात नद्या व कालवे मिळून सु. ५,६०० किमी. लांबीचे अंतर्गत जलमार्ग असून ते बेल्जियम,फ्रेंच व जर्मन जलमार्गांशी जोडलेले आहेत. नद्यांशिवाय यूलिआना कालवा ॲम्स्टरडॅम – ऱ्हाईन (राइन) कालवा, म्यूज – व्हाल कालवा हे कालवे महत्त्वाचे आहेत.

नेदर्लंड्‌सच्या लोहमार्गांचे व सडकांचे जर्मनांनी अतोनात नुकसान केले,ते युद्धोत्तर काळात भरून काढण्यात आले आहे. देशात सु. ३,००० किमी. लोहमार्ग असून नेदर्लंड्‌स रेल्वेच्या भाग भांडवलात सरकारचा वाटा महत्त्वाचा आहे. नेदर्लंड्‌समध्ये ९२,००० किमी. सडका आहेत.

रॉयल डच एअरलाइन्स (के. एल्‌. एम.) यूरोपमधील प्रसिद्ध हवाई वाहतूक कंपन्यांपैकी एक असून, हिची विमाने जगातील सर्व प्रमुख शहरांत संचार करतात. या कंपनीचे ९५ टक्के भाग भांडवल सरकारचे आहे.

नेदर्लंडसमधील तार व दूरध्वनी व्यवस्था पोस्टाच्या कक्षेत असून, १९७५ मध्ये देशांत दोन हजारांवर तार कचेऱ्या व ५०,४७,००० दूरध्वनी, ३९ लाख रेडिओ व ३६,४६,००० दूरचित्रवाणी संच होते. त्या वर्षी १२,२०८ पुस्तके प्रकाशित झाली. १९७४ मध्ये आरंभी १८,५७५ टेलेक्स प्रेषणमार्ग व २०,७११ दूरमुद्रक होते.

लोक व समाजजीवन : डच लोकांत केल्टिक व जर्मनवंशीय फ्रिझियन, फ्रॅंक, सॅक्सन आदी टोळ्यांचा संकर झालेला दिसतो. अँग्‍लो- सॅक्सन फ्रिझिया वंश ईशान्येला व फ्रॅंकिश प्रभावाखालील हॉलंड वंश दक्षिणेकडील अशी वांशिक विभागणी आहे. ते धार्मिक स्वातंत्र्याचे भोक्ते असून, उत्तरेकडील बहुसंख्य नागरिक प्रॉटेस्टंट (डच रिफॉर्म्ड चर्च) व दक्षिणेकडील कॅथलिक आहेत. पूर्वी ज्यू नागरिकही पुष्कळ होते पण दुसऱ्या महायुद्धात जर्मन छावण्यांतील निर्घृण छळामुळे बहुसंख्य ज्यूं मृत्युमुखी पडल्याने आता नेदर्लंड्‌समध्ये ते अत्यल्प आहेत. देशातील सु. ३०% लोक प्रॉटेस्टंट, ४०% कॅथलिक व २६% निधर्मी आहेत.

नेदर्लंड्‌सची लोकसंख्या १९७१ मध्ये १,३०,६०,११५ होती. १९७६ मध्ये दर चौ. किमी. ला सरासरी घनता सु. ४०६·२ होती. तथापि १९७४ मध्ये नॉर्थ हॉलंड, साउथ हॉलंड व उत्रेक्त प्रांतात ती दर चौ. किमी. ला ८५३, तर ग्रोनिंगेन, फ्रीझलॅंड व ड्रेंता या उत्तरेकडील प्रांतात ती दर चौ. किमी. ला सु. १८३ होती, तर नॉर्थ व साउथ हॉलंड या दोन प्रांतांत सु. ३९% लोक होते. सु. ५७% नागरिक शहरी व ४३% ग्रामीण भागांत राहतात. १९७५ च्या सुरुवातीस २ लाखांवर वस्ती असलेली शहरे ॲम्स्टरडॅम (७,५७,९५८), रॉटरडॅम (६,२०,८७७), द हेग (४,८२,८७९) व उत्रेक्त (२,५६,०१६) ही असून, त्यांच्या नगरसमूहांची लोकसंख्या अनुक्रमे ९,९०,७९० १०,३२,१५२ ६,७८,९०५ व ४,६२,०१७ होती. यांशिवाय १२ शहरे १ लाखापेक्षा अधिक लोकवस्तीची होती. १९७१ च्या फेब्रुवारीत सु. ४८ लाख लोक आर्थिक दृष्ट्या क्रियाशील होते. त्यांमध्ये सु. १२·५ लाख स्त्रिया होत्या. १९७२ चे जननप्रमाण दर हजारी १६ वरून १९७५ मध्ये १३ वर व मृत्युप्रमाण ८·५ वरून ८·३ वर आले आहे. १९७१ मध्ये पुरुषांची व स्त्रियांची सरासरी वयोमर्यादा अनुक्रमे ७१ व ७६ वर्षे होती. १९५६-५७ पर्यंत प्रतिवर्षी ३० हजार लोक कॅनडा, संयुक्त संस्थाने व ऑस्ट्रेलियास जात. आता ते प्रमाण ९,००० वर आले आहे.

निसर्गाशी सतत चालणाऱ्या संघर्षामुळे डच लोक उद्योगी आणि गंभीर वृत्तीचे आहेत. ते स्वाभिमानी असून त्यांना स्वच्छतेची आवड आहे. डच घरे नीटनेटकी व स्वच्छ असतात. भरपूर सूर्यप्रकाशासाठी बहुतेकांना मोठ्या खिडक्या असतात. त्यांत बहुधा फुलझाडांच्या कुंड्या ठेवलेल्या असतातच. ग्रामीण व शहरी भागांतही कित्येक घरे कालव्याच्या काठी असून, जा–ये करण्यासाठी काढता–घालता येण्यासारखा पूल असतो. इतरांचा संपर्क टाळावयाचा झाल्यास पूल काढला की झाले. मात्र डच लोक माणूसघाणे नसून वृत्तीने समाजप्रिय आणि आतिथ्यशील असतात.

अलीकडील काळात डचांचा पोषाख अन्य यूरोपीय लोकांसारखाच असतो पण प्रांतोप्रांती व व्यवसायपरत्वे डचांचा प्राचीन पोषाख पहावयास मिळतो. जुने वैशिष्ट्यपूर्ण पोषाख मार्कन बेटात व व्होलंडान या मच्छीमारी खेड्यात दिसतात. पायघोळ विजारी व झगे,स्त्रियांच्या पांढऱ्या टोप्या, लाकडी जोडे इ. स्त्री-पुरुषांचे पोषाख विविधरंगी असल्याने आकर्षक वाटतात. डच स्त्री–पुरुषांना सोन्या–रुप्याचे दागिने वापरण्याची हौस आहे. बहुतेक सर्वच डच स्त्री–पुरुष ‘काम्पेन’ म्हणजे लाकडी जोडे वापरतात. हे बोजड वाटले, तरी या जोड्यांनी पाय नेहमी कोरडे राहतात. घरात प्रवेश करण्यापूर्वी काम्पेन दाराशी काढण्याचा प्रघात आहे.

डचांचा आहार विविध व भरगच्च असतो. सकाळी बिनदुधाचा सौम्य चहा, उकडलेले अंडे, ब्रेड, चीज व सामान्यतः मोरंबा घेतात. माध्यान्हीच्या भोजनाला कॉफीपान म्हणतात व यात कॉफीबरोबर ब्रेड, सॅंडविच वगैरे तर दुपारी चहाबरोबर बिस्किटे असतात. संध्याकाळी सहाच्या सुमारास दिवसाचे मुख्य जेवण होते. या जेवणात मांस, मासे,फळे, भाज्या, सूप (कढण) व दुधाची एखादी मिठाई असे पदार्थ असतात. यानंतरही मधून मधून चहा व झोपण्यापूर्वी कॉफी घेतात. डचांना विविध कढणे फार आवडतात. स्केटिंगच्या व्यायामानंतर वाटाण्याचे कढण घेण्याचा प्रघात आहे.

डचांना तंबाखू प्रिय असून चिरूट किंवा सिगारेट ओढणारांचे प्रमाण खूपच आहे. दुसऱ्या महायुद्धात तंबाखू दुर्मिळ झाली तेव्हा पर्याय म्हणून कृत्रिम चहाची पाने, कॅमोमिलची (एक वनस्पती) वाळकी पाने किंवा फुले आदींच्या सिगारेटीही डचांनी वापरून पाहिल्या.

सेंट निकोलस डे (५–६ डिसेंबर), नाताळ, नववर्षदिन, ईस्टर आदी सण नेदर्लंड्‌समध्ये पाळले जातात. सेंट निकोलस बालकांचा रक्षणकर्ता असून, तो सद्‌वर्तनी बालकांना बक्षीस व व्रात्य बालकांना दंड देत असल्याच्या समजुतीमुळे त्याच्याबद्दल अनेक दंतकथा आहेत. अलीकडे मे महिन्यात मातृदिन व ऑक्टोबरात पितृदिन पाळण्याचा प्रघात असून, मातृदिनाची लोकप्रियता वाढत आहे.


भाषा व साहित्य : नेदर्लंड्‌सचे लोक डच भाषा बोलतात. ही इंडो–यूरोपीय भाषा कुटुंबाच्या जर्मानिक शाखेची असून प्राचीन इंग्‍लिश आणि लो जर्मनशी मिळतीजुळती आहे. अकराव्या शतकात प्राचीन डच किंवा फ्‍लेमिश भाषा सर्वत्र प्रचारात होती. पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात नेदर्लंड्‌सच्या साहित्यप्रेमी नागरिकांनी वाङ्‌मयमंडळे स्थापन करून, भाषा व नाट्य यांच्या अभ्यासास उत्तेजन दिले. त्यांच्या प्रयत्‍नातूनच आजची डच भाषा विकास पावली. १६१९ मध्ये सरकारने बायबलच्या भाषांतरासाठी डच व फ्‍लेमिश भाषाशास्त्रज्ञांची एक समिती नेमली. त्यांच्या भाषांतरामुळे सर्व प्रांतांतील लिहिण्याबोलण्याच्या भाषेत एकसूत्रता येण्यास मदत झाली. अठराव्या शतकात देशात सर्वत्र लिहिण्याची एकच पद्धत रूढ झाली परंतु बोलण्याच्या भाषेत प्रांतोप्रांती भेद राहिलाच. डच लेखनपद्धती पूर्वी गुतागुंतीची होती. डॉ. कोलेक्जिन यांच्या प्रयत्‍नाने गेल्या काही वर्षांत डच लेखनपद्धती सुलभ झाली आहे.

नेदर्लंड्‌सबाहेर डच साहित्याचा विशेष प्रसार झालेला नाही. इरॅस्मस, स्पिनोझा व ग्रोशिअस हे डच विद्वान ख्यातनाम झाले ते लॅटिनमध्ये लेखन केल्याने. तथापि काव्य, नाटक, उपन्यास आदी क्षेत्रांत डच साहित्यिकांनी मौलिक लिखाण केले असून, नाटककारांत योस्ट व्हान डेन व्हाँडेल, पीरट होफ्ट, हेर्मान हाइयरमान्स कवींत कॉन्स्टाटानाइन हॉइगेन्स, व्हिलेम बिल्डरडाइक, ई. जे. पॉट्‌गीटर, पी. सी. बाउटेन्स, एम्‌. नायहोफ आणि कादंबरीकारांत बॉझ्‌बोम तूसॅन, लुई कूपेरस व ए. व्हान शेंडेल, आरव्ये डेकेन प्रसिद्ध आहेत.

वृत्तपत्रे : यूरोपातील पहिली वृत्तपत्रे १६१८ पासून ॲम्स्टरडॅम येथून प्रसिद्ध होत असत. उत्तम वृत्तांसाठी डच पत्रे प्रख्यात आहेत. देशात कायद्याच्या मर्यादा पाळून संपूर्ण वृत्तस्वातंत्र्य आहे. नेपोलियनच्या काळात त्याची गळचेपी झाली होती. १८४८ मध्ये जबर करांचाही प्रतिकूल परिणाम झाला होता. १९०० मध्ये पहिले समाजवादी वृत्तपत्र निघाल्यावर बहुतेक सर्व राजकीय व धार्मिक गटांची वृत्तपत्रे निघू लागली. १९४० मध्ये जर्मन वर्चस्वाखाली पुन्हा वृत्तपत्रस्वातंत्र्य मर्यादित झाले परंतु भूमिगत पत्रे निघू लागून ती चांगली टिकली. देशात ९ दैनिके असून, १०० च्या वर प्रांतिक वृत्तपत्रे आहेत. तसेच बरीच पत्रे सायंकाळी प्रसिद्ध होत असून त्यांचे कौटुंबिक वाचन होते. त्यांची विक्री रस्त्यावरील विक्रीपेक्षा वर्गणीनेच अधिक होते. शास्त्र किंवा वैद्यक यांसारख्या विशिष्ट विषयांस वाहिलेली नियतकालिकेही भरपूर आहेत. तथापि वृत्त व जाहिरात यांशिवाय रेडिओ व दूरचित्रवाणी यांच्या स्पर्धा वृत्तपत्रांस जाणवत असून, काही नामांकित वृत्तपत्रे बंद पडली आहेत. १९७२ मध्ये एकूण ४१ लक्षांहून अधिक खपाची ८२ दैनिके होती.

शिक्षण : १९२० च्या राष्ट्रीय शिक्षण कायद्यानुसार नेदर्लंड्‌समध्ये ७ ते १५ वर्षांच्या बालकांना शिक्षण निःशुल्क व सक्तीचे असल्याने निरक्षरांचे प्रमाण अत्यल्प आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणानंतर ६ वर्षांचा प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम संपविल्यानंतर विद्यार्थ्यांस विविध प्रकारच्या माध्यमिक शाळांत सामान्य किंवा तांत्रिक शिक्षण घेता येते. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर विश्वविद्यालयीन शिक्षणास विद्यार्थी पात्र होतो. लायडन, ग्रोनिंगेन आणि उत्रेक्त येथे नेदर्लंड्‌सची जुनी व प्रसिद्ध विद्यापीठे आहेत. यांशिवाय निरनिराळ्या धार्मिक गटांचीही स्वतंत्र महाविद्यालये आहेत. तांत्रिक उच्च शिक्षणाची व कृषिविद्येची महाविद्यालयेही पुष्कळ आहेत. नेदर्लंड्‌समध्ये खाजगी शिक्षणसंस्थाही महत्त्वाचे कार्य करतात आणि त्यांना सरकार कधीकधी १००% ही अनुदान देते. योग्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या आणि कर्जे मिळतात. बहुतेक शिक्षणसंस्थांतून सहशिक्षण प्रचलित आहे. डेल्पट, आयंटहोव्हेन व एन्‌स्खदे या खास संस्थांतून तांत्रिक शिक्षणाची सोय आहे. त्यांत सु. २,५०० शिक्षक व १६,५०० विद्यार्थी आहेत.

इंग्‍लिश, फ्रेंच व जर्मन या भाषा नेदर्लंड्‌समध्ये आवर्जून शिकविल्या जातात. १९७४–७५ मध्ये ७,३२५ पूर्व- प्राथमिक शाळांतून ५,१४,००० ९,३४८ प्राथमिक शाळांतून १५,३०,००० १,५०३ माध्यमिक शाळांतून ७,४०,००० २,०२४ व्यावसायिक शाळांतून ४,७०,००० ३५० उच्च शिक्षणसंस्थांतून ९७,००० १४ विद्यापीठांतून १,१४,००० विद्यार्थी शिकत होते. ॲम्स्टरडॅम येथे दोन आणि रॉटरडॅम, ग्रोनिंगेन, नाइमेगन, व्हाखनिंगन येथील कृषिविद्यापीठ, लायडन तसेच उत्रेक्त येथे प्रत्येकी एक विद्यापीठ असून, त्या सर्वांमध्ये मिळून सु. ४,००० शिक्षक व ९५,००० हून अधिक विद्यार्थी होते. देशात १९७४–७५ मध्ये निरनिराळ्या शास्त्रांचे अध्ययन करणारे सु. ९०,००० विद्यार्थी होते. त्यांपैकी सु. १७,००० स्त्रिया होत्या. अणुसंशोधनाच्या नऊ संस्था असून, दोन अणुभट्‌ट्या ऊर्जा उत्पादन करतात.

कला व क्रीडा : सतरावे शतक कलेच्या दृष्टीने डच इतिहासात सुवर्णयुग ठरले. व्यापारात समृद्धी प्राप्त झाल्यामुळे कलाकारांना मोठे उत्तेजन मिळाले. डच लोक कलेचे भोक्ते असल्याचे त्यांच्या टुमदार घरांवरून, फुलांच्या आवडीवरून दिसून येते. त्यांच्या कलाप्रिय वृत्तीमुळे नेदर्लंड्‌समध्ये वास्तुशिल्प, चित्रकला, संगीतादी कलांचा विकास प्राचीन काळापासून होत आलेला आहे.

वास्तुकला : जुन्या रोमनेस्क व गॉथिक शैलींची चर्चे ॲम्स्टरडॅम, हेग, उत्रेक्त आदी शहरांत आहेत. त्यांवरून व गाउडा, हार्लेम वगैरे शहरांतील नगरभवनांवरून नेदर्लंड्‌समधील वास्तुशिल्पाच्या प्रगतीची कल्पना येते. सतराव्या शतकातील वास्तुकलेत धार्मिक छाप जवळजवळ नाही. महाल, राजवाडे अशीच बांधकामे विशेष झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी पीतर माँद्रीआनने आपल्या कलाविषयक तत्त्वज्ञानाने नगररचनेत व वास्तुशिल्पांत क्रांती घडवून आणली. त्याच्याच विचारपरंपरेतील व्हिलेम ड्यूडॉक, याकोबस योहानेस पीतर आउट, यान फ्रेडेरिक स्टाल आदी नगररचनाकार व वास्तुशिल्पज्ञ ख्यातनाम झाले आहेत.

चित्रकला : चित्रकलेतही पंधराव्या शतकापासून डचांनी विशेष प्रावीण्य मिळविल्याचे दिसते. डीरिक बाउट्‌स, ह्यूगो व्हान डरगूस व हिएरोनीमस बॉस आदी पंधराव्या शतकातील चित्रकारांच्या कलेपासून स्फूर्ती घेऊनच ल्यूकास व्हान लाइडेन व यान व्हान स्कोरेल यांसारख्या प्रबोधनकालीन चित्रकारांनी आपल्या सुंदर कृती रंगविल्या.

सतराव्या शतकातील डचांच्या पराक्रमाचे, वैभवाचे व बहुरंगी जीवनाचे चित्र त्यांच्या चित्रकलेत पहावयास मिळते. या शतकातील सर्वश्रेष्ठ डच चित्रकार रेम्बॅंटची गणना श्रेष्ठ जागतिक चित्रकारांत होते. जगातील प्रसिद्ध संग्रहालयांत त्याची चित्रे मिळविण्याची अहमहमिका अजूनही चालते. फ्रान्स हाल्स, पीतर माँद्रीआन, याकॉप व्हान रॉइस्डाल, व्हिन्सेंट व्हान गॉख, यान व्हरमेर हे चित्रकारही प्रसिद्ध आहेत.

सतराव्या शतकानंतर चित्रकलेला ओहोटी लागली पण एकोणीसाव्या शतकात डच चित्रकलेचे पुनरुज्जीवन होऊन योहान बार्तोल्ट याँग्‌किंट, हेंड्रिक व्हिलेम–मेस्डाक, मॉरिस व आन्टॉन माउव्हे बंधू, जॉर्ज हेंड्रिक ब्राइटनर आदींनी विविध प्रकारे कलासेवा करून डच चित्रकलेला उज्ज्वल यश मिळवून दिले आहे.

संगीत : सोळाव्या शतकातील संगीतकार यान पीतर्स स्व्हेलिंग्क याचे नाव यूरोपीय संगीताच्या इतिहासात गाजलेले आहे. ॲल्‌फॉन्स डीपेनब्रॉक, व्हिलेम पायपर व हेंक बेडाइंग्स हे अलीकडील काळातील सुप्रसिद्ध संगीतकार आहेत. निरनिराळ्या शहरांतील वाद्यवृंद समूह, संगीत समाज आदी संस्थाही संगीताच्या क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी बजावीत आहेत.


नाट्यकला : अन्य यूरोपीय देशांप्रमाणे नेदर्लंड्‌समध्येही नाट्यकलेचा विकास झाला, तो चर्चच्या सेवेसाठी. मध्ययुगीन शिलेदारांच्या साहसकथाही सणांवारी किंवा जत्रांतून दिग्दर्शित होत असल्याचे दिसते.

सतराव्या शतकातील वैभवशाली जीवनामुळे डचांचे अनुभवक्षेत्र विस्तारले. स्पॅनिश, फ्रेंच व इंग्लिश भाषांचा डच नाट्यावर बराच प्रभाव पडला. गेर्ब्रांट ब्रेडेरो व योस्ट व्हान डेन व्हाँडेल हे सतराव्या शतकाच्या प्रारंभीचे प्रमुख नाटककार होत.

अठराव्या शतकात मोलियरचा प्रभाव डच लेखकांवर विशेष होता. त्यांपैकी पीतर लॅंगेनडाइकने अनेक डच लोककथा रंगभूमीवर आणल्या.

यूरोपीय नाट्यवाङ्‌मयातील वास्तववादाने प्रभावित झालेल्या डच नाटककारांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी एतद्विषयक बरेच प्रयोग नेदर्लंड्‌समध्ये केले. त्यांपैकी हेरमान हाइयरमान्स याने अनेक सामाजिक दुःखांवर व जीवनातील वर्गकलहांवर झगझगीत प्रकाश टाकणारी नाटके लिहिली. त्यांपैकी द गुड होप फार लोकप्रिय झाले. त्याचे अनुवाद अनेक भाषांत होऊन अनेक देशांत त्याचे प्रयोग झाले. डच रंगभूमीला शासकीय प्रोत्साहन असून, झालेला तोटा शासन ४० टक्के व नगरपालिका ६० टक्के सोसतात. नेदर्लंड्‌स फिल्म अकॅडेमीकडून चित्रपट उद्योगाचा विकास होत आहे.

अन्य कला : इतर दुय्यम कलाकुसरीच्या व्यवसायांत नेदर्लंड्‌सच्या कारागीरांनी पुष्कळ ख्याती मिळविली आहे. काच सामान, डेल्फ्टची चिनी मातीची भांडी आदी नेदर्लंड्‌सच्या वस्तूंना जगात मागणी असते ती त्यांतील अप्रतिम कलागुणांमुळेच. देशात शासकीय साहाय्याने चालविलेली ३२ संग्रहालये असून, कला व संस्कृतिविषयक चारशे सार्वजनिक संग्रह आहेत.

डचांना मैदानी खेळ आवडतात. क्रिकेट, हॉकी, टेनिस आदी खेळ प्रचारात आहेत पण सर्व प्रकारचे लहानमोठे नागरिक बेभान होतात ते केवळ फुटबॉलनेच. त्यामुळे हॉलंड–बेल्जियमचा वार्षिक फुटबॉल सामना राष्ट्रीय महोत्सवासारखा वाटतो. नौका वल्हविणे, पोहणे, मासे धरणे, स्केटिंग हेही लोकांचे आवडते छंद आहेत. सायकलीवरून सहलीस जाणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी असते.

सायकल हे नेदर्लंड्‌सचे जणू राष्ट्रीय वाहनच आहे. सर्व प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सायकलमार्ग वेगळे असतात.

सिनेमा हे करमणुकीचे लोकप्रिय साधन असून, डच भाषेतील व अन्य यूरोपीय भाषांतील चित्रपटही लोक आवडीने पाहतात. १९७५ च्या अखेरीस ४१९ चित्रपटगृहे असून त्यात १,७१,९२० प्रेक्षकांची सोय होती.

पर्यटन : पर्यटन व्यवसायास उत्तेजन दिले जात आहे. ‘निसर्गाने सापत्‍न भावाने वागविलेला देश’, असे डच कवी पॉट्‌गीटरने नेदर्लंड्‌सचे वर्णन केले असले, तरी या देशात पुष्कळ रम्य स्थळे आहेत. बहुतेक शहरांतील प्राचीन रोमनेस्क व गॉथिक शैलींतील चर्चे, हार्लेमच्या परिसरातील ट्यूलिपांचे ताटवे, ठायीठायी दिसणाऱ्या पवनचक्क्या, कालवे, झाइडर झी, डेल्टा प्रकल्प व इतर कलावीथी आणि आधुनिक वास्तुशिल्प, ॲम्स्टरडॅम येथील व इतर ठिकाणची वस्तुसंग्रहालये ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. जवळपासची बेटेही निसर्गसुंदर आहेत. १९७५ मध्ये २६,००,१३९ पर्यटकांनी नेदर्लंड्‌सला भेट दिली.

संदर्भ : 1. Barnouw, A. J. The Pageant of Netherlands History, New York, 1952.

            2. Carew, Dorothy, The Netherlands, New York,1965.

            3. Ogrizek, Dore, Ed. The Netherlands, New York, 1951.

            4. Riemens, Hendrik, The Netherlands : The story of a Free people, New York, 1944.

ओक, द. ह. कुमठेकर, ज. ब.

हेग : नेदर्लंड्सची संसदीय राजधानी.

पोलाद कारखान्याचे केंद्र, आयमॉइडन.

आधुनिक यंत्रसज्ज डच दुग्धशाळा : एक दृश्य. नेदर्लंड्सची प्रगत यांत्रिक शेती
नेदर्लंड्समध्ये सर्वत्र आढळणारी पवनचक्की डच स्थापत्य अभियांत्रिकीचा विक्रम : आथसल्मेर जलपातळी नियंत्रित करणारा सागरी बांध.
राजधानी ॲम्स्टरडॅम येथील राजवाडा व त्यासमोरचा युद्धस्मारक स्तंभ. फुटबॉल : डचांचा आवडता व प्रभुत्वाचा खेळ.
ट्यूलिप फुले : देशातील महत्त्वाचे उत्पादन.