निर्जरा : जैनांच्या मते कर्माचे परमाणू जीवाच्या आसपास सतत फिरत असतात. जीवाकडून नैतिक दृष्ट्या काया, वाचा, मन यांपैकी कोणत्याही मार्गाने काही पाप घडले, तरी कर्मपरमाणूंना ती योग्य संधी लाभते आणि ते जीवात शोषले जातात, जीवात प्रविष्ट होतात, याला आस्रव म्हणतात. यामुळे शुद्ध, शुभ्र रंगाच्या जीवाचे वजन वाढत जाते व त्याला निरनिराळ्या रंगच्छटा येतात. पापाच्या वाढत्या प्रमाणात कर्मपरमाणूंमुळे शुभ्र जीवाच्या ठिकाणी तांबडा, पिवळा, करडा, निळा, काळा असे रंग किंवा ‘लेश्या’ उत्पन्न होतात आणि जीव संसाराच्या व पुनर्जन्माच्या खोल गर्तेत बुडून जातो.

आस्रवानंतरचे तत्त्व संवर आणि त्यानंतर निर्जरा. निर्जरा दोन प्रकारची असते : (१) अकाम किंवा सविपाक निर्जरा. काही कर्मपरमाणूंचा आपोआप परिपाक होतो, ते कुजून जाऊन त्यांचा उपशम होतो ‘प्रारब्ध-

कर्मांचा भोगाने क्षय होतो’, हा पहिला प्रकार. पण एवढ्यावरच थांबून भागणार नाही. कारण असे काही कर्मपरमाणू जरी यदृच्छेने नाश पावत असले, तरी नवीन कर्मपरमाणू जीवात सतत शिरत राहणारच. यासाठी जीवात नवीन कर्मपरमाणू शिरू नयेत म्हणून जीवाने संवर अथवा संयम केला पाहिजे. या संवराचे ५७ प्रकार जैन ग्रंथांत सांगितले आहेत. संवरामुळे जीवाची सर्व ४२ द्वारे बंद होतात व नवीन कर्मपरमाणूंचा लेप जीवावर चढत नाही त्यांचा रासायनिक परिणाम जीवावर होत नाही. परंतु मोक्ष मिळवण्यासाठी सर्वच कर्मांचा (कर्मपरमाणूंचा) नाश होणे अगत्याचे असल्यामुळे नुसत्या आपोआप होणाऱ्या कर्मनाशावर विसंबून चालणार नाही. (२) सकाम किंवा अविपाक निर्जरा. सर्वच कर्मांचा नाश होण्यासाठी बुद्धिपुर:सर प्रयत्न करणे जरूर आहे. ही सकाम वा अविपाक निर्जरा होय. हा मार्ग म्हणजे तपश्चर्येच्या योगाने जीवातील कर्मपरमाणू तापविणे किंवा तपाच्या तेजाने ते जाळून टाकणे. हे तप दोन प्रकारचे असते : बाह्य किंवा शारीरिक आणि आभ्यंतर किंवा मानसिक. बाह्य तप सहा प्रकारचे असते : (१) अनशन, उपवसथ वा उपास. काही एक न खाता आणि पाणीही न पिता उपास करून तत्त्वचिंतनात वेळ घालविणे, यासाठी जिनमंदिर, स्थानक किंवा विजनवास सोयीचा असतो. हे उपास एक दिवसापासून कितीही जास्त काळाचे करता येतात. (२) अनवाप्त, उनोदरिका वा अवमोदरिका. म्हणजे प्रतिदिनी क्रमाने आपल्या आहारात कपात करत जाणे. (३) व्रतपरिसंख्यान. म्हणजे काही अटींवर काही प्रकारचीच भिक्षा स्वीकारण्याचा मनात निश्चय करणे व तशी भिक्षा न मिळाली, तर अर्थातच उपास करणे. यालाच वृत्तिसंक्षेप असेही म्हणतात. (४) रसपरित्याग. म्हणजे साधुसाठी श्रावकाने मुद्दाम तयार केलेले अन्न स्वीकारणे तसेच दुध, दही, तूप, तेल, गोड पदार्थ आणि मीठ या वस्तूंचा आहारात क्रमाने त्याग करणे. (५) विविक्तशय्यासन अथवा संलीनता. म्हणजे एकांतात राहणे. (६) कायक्लेश. म्हणजे केशलुंचन, योगासने इ. करून मनाची एकाग्रता साधणे.

आभ्यंतर किंवा मानसिक तप म्हणजे योगाभ्यास. याचेही सहा प्रकार आहेत. (१) प्रत्याख्यात किंवा प्रतिक्रमण. म्हणजे दिवसातून दोनदा आपल्या ज्ञाताज्ञात दोषांची आलोचना म्हणजे कबुली देणे आणि त्यांबद्दल योग्य ते प्रायश्चित्त घेणे. (२) विनय. म्हणजे आपले धर्मनियम पालन करण्यात श्रद्धापूर्वक उत्साह बाळगणे आणि गुरुजनांच्या आज्ञा सादर व सस्नेह पाळणे. (३) वैयापृत्य. म्हणजे आजारी, वृद्ध आणि अपंग भिक्षूंना मदत करणे व समाजसेवा करणे. (४) स्वाध्याय. म्हणजे जैन आगमांचे अध्ययन करणे. (५) व्युत्सर्ग. म्हणजे स्वदेहाबद्दल निष्काळजी राहणे त्यावर आसक्ती न ठेवणे. कायोत्सर्ग करून ताठ, स्तब्ध व निष्क्रिय राहणे. (६) ध्यान. म्हणजे जैन तीर्थंकरांवर व जैन तत्त्वांवर मन एकाग्र करणे.

निर्जरेने सर्व कर्मांचा क्षय झाला, की शुद्ध व शुभ्र झालेला आत्मा हलका होतो, वर वर जातो व लोकाकाशाच्या अत्युच्च ठिकाणी असलेल्या प्राग्भार प्रदेशातील सिद्धशिलेवर जाऊन आत्मानंदात तल्लीन होतो. हाच मोक्ष व हेच परमात्मपद होय.

कोपरकर, द. गं.