ईस्टर : एक महत्त्वाचा ख्रिस्ती सण. पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकानी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले त्यानंतर तिसऱ्या दिवशी (रविवारी) येशू परत जिवंत झाला. ह्या प्रसंगाचे स्मरण म्हणून वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार, हा ईस्टर म्हणून साजरा केला जातो. तथापि हा रविवार नेमका कोणता याबाबत सर्व पंथांचे एकमत नाही. साधारणतः २२ मार्च ते २५ एप्रिल या दरम्यानच्या विशिष्ट रविवारी हा सण येतो. इ. स. दुसऱ्या शतकापासून येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबाबतची मेजवानी या स्वरूपात सर्व ख्रिस्ती लोक हा सण साजरा करताना दिसतात. ख्रिस्ती संतांच्या चारही गॉस्पेल्समध्ये ख्रिस्ताच्या मृत्यूचे व नंतरच्या त्याच्या दर्शनाचे संपूर्ण वर्णन आढळते. परंतु त्याच्या ⇨ पुनरुत्थानाच्या प्रत्यक्ष कृतीसंबंधाने कोठेही उल्लेख आढळत नाही. असे असले तरी  ‘येशूचे पुनरुत्थान झाले’  या श्रद्धेचे प्रतिबिंब नव्या करारातील प्रत्येक पानावर दिसून येते. 

जगातील सर्व आबालवृद्ध ख्रिस्ती लोक हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतात. चर्चवर आकर्षक रोषणाई केली जाते तसेच क्रूस, कोकरू, अंडी इ. कलात्मक धार्मिक प्रतीकेही ह्या सणाप्रित्यर्थ तयार केली जातात. नवीन वस्त्रे परिधान करून ख्रिस्ती लोक चर्चमध्ये जातात व घरी गोडधोड करून हा सण आनंदाने साजरा करतात. 

आयरन, जे. डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.)