निरंजन माधव : (अठरावे शतक). पेशवेकालीन मराठी कवी. कर्नाटकातील कंची नावाच्या प्रांतात त्याचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव ‘महादो बनाजी’ असे सांगितले जाते. ‘बनाजी’ हे त्याचे उपनाव असावे. काही अभ्यासकांच्या मते बनाजी हे निरंजनमाधवाचेच मूळ नाव होय. दत्तो वामन पोतदार ह्यांच्या मते निरंजनमाधवाच्या पित्याचे नाव महादो बनाजी नसून ‘माधव तिमाजी’ असे होते. शाहू महाराजांच्या कारकीर्दीत सातारा येथे राहणारे आनंदसंप्रदायी बापुभट बर्वे ऊर्फ लक्ष्मीधर ह्यांच्यापाशी निरंजनमाधवाने व्याकरणादी अनेक शास्त्रांचा अभ्यास केला. सांप्रदाय परिमळ ह्या निरंजनमाधवाच्या नावावर मोडणाऱ्या ग्रंथात निरंजनमाधवाची गुरुपरंपरा अशी दिलेली आहे : दत्त–विमलानंद–ब्रह्यानंद–विमलानंद–सच्चिदानंद–ब्रह्मानंद–लक्ष्मीधर–निरंजनमाधव. हा ग्रंथ निरंजनमाधवाने आपल्या पत्नीस आपल्या गुरुपरंपरेची माहिती देण्यासाठी रचिला, असे म्हटले जाते. निरंजनमाधवाची बरीचशी चरित्रात्मक माहिती मुख्यत: ह्याच ग्रंथावरून मिळते. तथापि हा ग्रंथ खरोखरीच निरंजनमाधवाने लिहिला किंवा कसे, ह्याबद्दल विद्वानांत ऐकमत्य नाही. सांप्रदाय परिमळ निरंजनमाधवाच्या निरंजनदासनामक कोणी शिष्याने लिहिला असावा, असे मत दत्तो वामन पोतदार, द. सी. पंगू अशा काही विद्वानांनी व्यक्त केलेले आहे. निरंजनमाधव हा थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे ह्यांच्या राजनैतिक सेवेत होता. नोकरीनिमित्त तंजावर येथे असताना बापजी पंडित ह्या सिद्धेश्वरसंप्रदायी सत्पुरुषाचे शिष्यत्वही त्याने स्वीकारले होते, असे दिसते. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून पुढे सु. ३४-३५ वर्षे पेशव्यांकडे नोकरी केल्यानंतर उरलेले आयुष्य त्याने सर्वस्वी ग्रंथरचनेत घालविले.

निरंजनमाधवाने लिहिलेल्या ग्रंथात कृष्णानंदसिंधु, चिद्‌बोधरामायण, सुभद्राचंपू, ज्ञानेश्वरविजय, वृत्तावतंस, वृत्तमुक्तावलि आदींचा समावेश होतो. कृष्णानंदसिंधु आज उपलब्ध नाही परंतु सांप्रदाय परिमळात त्याचा उल्लेख आढळतो. चिद्‌बोधरामायणाचे फक्त बालकांडच आज उपलब्ध आहे.

सात सर्गांमध्ये अर्जुनसुभद्रेच्या विवाहाची कथा सांगणारे सुभद्राचंपू हे आख्यानकाव्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठीतील हे एकमेव चंपूकाव्य आहे. ज्ञानेश्वरविजय या संतचरित्रपर काव्याचे १७ अध्याय व १,०३८ श्लोक आहेत. निरंजनमाधवाने अनेक देवतांवर सुंदर स्तोत्रे लिहिली असून ती त्या त्या देवतांच्या मंदिरांना प्रत्यक्ष भेटी दिल्यावर लिहिली असावीत. श्रीरामकर्णामृत हे प्रदीर्घ स्तोत्र १११ श्लोकांचे आहे, तर मंत्ररामचरितनिर्वोष्ठ राघवचरित या स्तोत्रांत चित्रकाव्यरचना आहे. वृत्तावतंस वृत्तमुक्तावलि हे त्याचे छंदःशास्त्रावरील दोन ग्रंथ आहेत. मराठी कवितेत न आढळणाऱ्या सहदळा, प्रभद्रक, कामक्रीडा, लोला यांसारख्या वृत्तांची माहिती वृत्तमुक्तावलीत दिली आहे. भारतातील अनेक स्थळे व तीर्थक्षेत्रे निरंजनमाधवाने पाहिली होती. त्यांची वेधक चित्रे त्याने आपल्या प्रवासवर्णनपर काव्यांतून रेखाटली आहेत. अद्वैतबोध, यतिनृपतिसंवाद, वसिष्ठसुमशर्मासंवाद, श्रीमार्गवरामजन्मचरित्र अशी त्याची काही स्फुट प्रकरणे आहेत. अद्वैतामृतबोधप्रदीपिका हे शंकराचार्यांच्या ग्रंथांवरील टीकाग्रंथ निरंजनमाधवाचे वेदान्तविषयातील व्यासंग दर्शवितात. हे टीकाग्रंथ गद्य आहेत हा त्यांचा एक विशेष. विषय आणि वाङ्‌मयप्रकार अशा दोन्ही दृष्टींनी निरंजनमाधवाच्या लेखनामध्ये विविधता आढळते.

करंदीकर, वि. रा. कुलकर्णी, अ. र.