निकाराग्वा : मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठा प्रजासत्ताक देश. एकूण क्षेत्रफळ १,४८,००० चौ. किमी. पैकी पाण्याखाली सु. ९००० चौ. किमी लोकसंख्या २१,२३,७५९ (जून १९७४). विस्तार १०° ४५′ उ. ते १५° १०′ उ. व ८३° १५′ प. ते ८७° ४०′ प. यांदरम्यान. या जवळजवळ समभुज त्रिकोणाकृती देशाच्या उत्तरेस हाँडुरस व दक्षिणेस कोस्टा रिका हे देश, तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र व पश्चिमेस पॅसिफिक महासागर असून, वायव्येस फॉन्सेकाचे आखात आहे. राजधानी मानाग्वा (लोकसंख्या ४,९९५६८–१९७४). अधिकृत भाषा स्पॅनिश आहे.
निकाराग्वाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. देशाच्या दक्षिण भाग चिंचोला व त्याजवळच समुद्र आणि मोठी सरोवरे असल्याने, पनामा कालव्यासारखा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर जोडणारा जलमार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. क्यूबाचे सान्निध्यही अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
भूवर्णन : भूरचनेच्या दृष्टीने या देशाचे तीन भाग पडतात : (१) मध्यवर्ती डोंगराळ-पठारी प्रदेश, (२) पॅसिफिक महासागराचा किनारा, (३) अटलांटिक महासागराचा किनारी प्रदेश.
(१) निकाराग्वाच्या मध्यभागी असलेल्या पर्वतश्रेणी, हाँडुरसच्या सीमेजवळ रुंद असून दक्षिणेकडे अरुंद आहेत. त्यांत उत्तरेकडे मोगोतोन (२,१०७ मी.) व सास्लाइया (१,९९४ मी.) ही उंच शिखरे आहेत. अलास्कापासून पनामापर्यंत पसरलेली रॉकी पर्वताची सलगच्या सलग अशी ओळ, निकारग्वात थोडी खंडित होऊन मग पुढे जाते. हा खंडित भाग म्हणजे अलास्का ते टिएरा डेल फ्यूगोपर्यंतच्या या रांगेतील सर्वांत कमी उंचीचा भाग होय.
(२) पॅसिफिक महासागराची किनारपट्टी ३५० किमी. लांबीची असून, उत्तरेकडे रुंद व सपाट आहे. डोंगराळ भाग आणि पॅसिफिक किनारा यांदम्यान सु. ९,५०० चौ. किमी क्षेत्रात चाळीस ज्वालामुखींची एक रांग आहे. त्यांच्या आणि मध्यवर्ती पर्वतश्रेणीदरम्यानच्या द्रोणी प्रदेशात निकाराग्वा, मानाग्वा व मासाइया ही मोठी सरोवरे आहेत. ज्वालामुखींपैकी सान क्रीस्तोबाल (१,७४५ मी.), कन्सेप्शन (१,६१० मी.) व मोमोतोम्बो (१,२८० मी.) हे प्रमुख आहेत. पर्वतश्रेणींदरम्यान सुपीक द्रोणी प्रदेश आणि खोरी आहेत. या देशात भूकंपाचे धक्के बऱ्याच वेळा जाणवतात. १९७२ चा धक्का फारच जोरदार होता, त्याने राजधानीच उद्ध्वस्त झाली होती.
(३) अटलांटिकचा म्हणजेच कॅरिबियन समुद्राचा किनारा ५३८ किमी. लांबीचा आहे. हा किनारी प्रदेश कित्येक ठिकाणी ८० किमी. पर्यंत रुंद आहे. तो दलदलींनी भरलेला, सखल आणि सपाट आहे. किनाऱ्यावर त्रिभुज प्रदेश, खारकच्छ, वाळूचे दांडे, प्रवाळभिंती आणि जवळच बेटे व वाळूचे बांध आहेत. या त्रिकोणाकृती देशात अनेक सरोवरे आहेत. निकाराग्वा सरोवर सर्वांत मोठे (८,२६२ चौ. किमी.) असून, त्यातील ओमेतेपे बेटावर कन्सेप्शन व मादेरा (१,३९४ मी.) हे ज्वालामुखी आहेत. गंधकयुक्त तीपितापा नदीने ते मानाग्वा सरोवराशी जोडलेले आहे. या दोन्ही सरोवरांचे पाणी सॅन वॉन नदीमार्गे अटलांटिकमध्ये जाते. या सरोवरांचा आणि नदीचा उपयोग करून पनामासारखा जलमार्ग तयार करण्याची योजना आहे.
मध्यवर्ती पर्वतश्रेणींवरून पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या मोठ्या आहेत. त्यांपैकी कोको ऊर्फ सिगोव्हीया ६८० किमी. लांब असून ती शेवटी ४७२ किमी. निकाराग्वा-हाँडुरस सीमेवरून जाऊन कॅरिबियन समुद्रास मिळते. तिचा जलसिंचनास चांगला उपयोग होतो. पूर्व किनाऱ्याच्या मध्यावर रीओ ग्रांदे दे मातागाल्पा आणि दक्षिणेस निकाराग्वा-कोस्टा रीका सीमेवरुन जाणारी सॅन वॅन या प्रमुख नद्या कॅरिबियनला मिळतात. मातागाल्पाची उपनदी तूमा हिच्यावर जलविद्युत् उत्पादन होते. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या छोट्या आहेत. त्यांपैकी रीओ नेग्रो व एस्टोरो रेअल या फॉन्सेकाच्या आखाताला मिळतात. रीओ एल् तामारेंदो पॅसिफिकला मिळते. बऱ्याच नद्या द्रोणी प्रदेशातील सरोवरांस मिळतात.
निकाराग्वात विविध प्रकारची खनिजे सापडत असली, तरी तंत्रज्ञ व पैसा यांच्या तुटवड्यामुळे तिचा योग्य प्रकारे विनियोग करता येत नाही. खाणींचा विकास होण्यास मुख्यत्वेकरून संयुक्त संस्थाने व कॅनडा यांची मदत झाली आहे. चोंतालेसजवळ सोने व चांदी यांच्या खाणी आहेत. ज्वालामुखीव्याप्त प्रदेशात गंधाकाचे साठे आहेत. याशिवाय लोखंड, तांबे व बांधकामास उपयुक्त दगड सापडतात. बोनांसा व स्यूना येथील खाणी मध्य अमेरिकेत मोठ्या समजल्या जातात. त्यांतून सोने व चांदी मिळते.
हवामान : देशाचे उष्णकटिबंधीय स्थान, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांचे सान्निध्य यांमुळे हवामान, विशेषत: किनाऱ्यावर, उष्ण व दमट असते. पूर्व व पश्चिम किनारपट्ट्यांवर सरासरी तापमान २६° से. आढळते. डोंगराळ प्रदेशात मात्र हिवाळ्यात १६° से. व उन्हाळ्यात २१° से. असते. पाऊस भरपूर (सरासरी २५० सेंमी.) पडतो. कॅरिबियन समुद्रकिनाऱ्यावर ईशान्य व्यापारी वाऱ्यांमुळे सॅन वॉन देल नॉर्ते म्हणजे पूर्वीचे ग्रेटाऊन येथे याहीपेक्षा जास्त म्हणजे ५९० सेंमी. पडतो. डिसेंबर ते एप्रिलपर्यंत कोरडा ऋतू असून, पूर्वेकडून पश्चिमेकडे पाऊस कमी होत जातो. पूर्वेकडील मस्कीतीया किनारी विभाग जगातील एक अत्यंत ओलसर विभाग म्हणून ओळखला जातो.
निकाराग्वाच्या बऱ्याच भागांत सदाहरित वनस्पती आढळून येतात. देशाचा ६०% पेक्षा जास्त भाग वनाच्छादित असून किनाऱ्याजवळील उंचवट्यांच्या प्रदेशाता दाट अरण्ये आहेत. अंतर्गत भागात वाहतुकीची सोय नसल्याने वनसंपत्तीचा योग्य वापर करता येत नाही. मॉहॉगनी व सीडार वृक्ष अरण्यात विपुल आहेत. बदाम, अक्रोड, अनेक प्रकारचे पाइन, अतिकठीण लाकडाचे क्वेब्रॅको, आयर्नवुड देणारे ग्वायाकम, राळ देणारे ग्वायापिनल व विशिष्ट फळ येणारे मेडलर इ. वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहेत. पश्चिमेकडील सखल प्रदेशात सॅव्हाना गवत उगवते. समृद्ध वनस्पतिजीवनामुळे समृद्ध प्राणिजीवनही आढळून येते. दलदलींच्या भागात सुसरी, सरडे, साप व कासवे आहेत. जंगलांत सरपटणारे प्राणी, माकडे, हरिण, प्यूमा, जॅगुआर, पेकारी, आर्मडिलो इ. प्राणी आढळतात. अनेक प्रकारचे पक्षी, कृंतक व कीटक आढळतात. नद्या, सरोवरे, खारकच्छ इ. ठिकाणी गोड्या व खाऱ्या पाण्यांतील निरनिराळे मासे व मृदुकाय प्राणी मिळतात. गोड्या पाण्यातील शार्क मासा जगात फक्त निकाराग्वा सरोवरातच मिळतो.
इतिहास : कोलंबसाने १५०२ मध्ये निकाराग्वा पाहिला तेव्हा तेथे सुमो, मिस्कितो इ. कृषिप्रधान वन्य जमाती होत्या. १५२४ मध्ये फ्रॅन्सिस्को कॉर्दोबाने ग्रानाडा व लेओन शहरे वसवली. त्यानंतर तीन शतके ग्रानाडाहून निकाराग्वाची सूत्रे हालत होती. स्पेनच्या इतर वसाहतींबरोबर निकाराग्वाही १८२१ मध्ये स्वतंत्र झाला. काही वर्षे मध्य अमेरिकी संघराज्याच्या घटक राहिल्यावर ३० एप्रिल १८३८ रोजी त्याला स्वायत्तता मिळाली. त्यानंतर लेओनचे प्रागतिक व ग्रानाडाचे रूढिवादी यांच्यातील झगड्याने निकाराग्वाला ग्रासले. त्यामुळे १९१२, १९२६, १९२८ व १९३६ मध्ये संयुक्त संस्थानांनी आपले नौदल तेथे पाठवून शांतता प्रस्थापिली. १९३३ पासून सोमोसा कुटुंबाचे वर्चस्व निकाराग्वाच्या राजकीय क्षेत्रात प्रभावी आहे. त्या वर्षी नॅशनल गार्डचा प्रमुख ज. आनास्तास्यो सोमोसा हा अवचित क्रांतीने सत्ताधीश झाला. १९५६ च्या सप्टेंबरात त्याचा खून झाला. १९५७ मध्ये त्याचा मुलगा लुई सोमोसा राष्ट्राध्यक्षे झाला व दुसरा मुलगा आनास्तास्यो ताचितो सोमोसा हा नॅशनल गार्डचा प्रमुख झाला. १९६३ मध्ये लुई सोमोसा निवृत्त झाला व रेनेशिक गूत्येर्रेथ राष्ट्राध्यक्ष झाला. तो १९६६ मध्ये मरण पावल्यावर नॅशनल गार्डचा प्रमुख ज. आनास्तास्यो सोमोसा देबेले हा एप्रिल १९७२ पर्यंत राष्ट्राध्यक्ष होता. त्याचा लिबरल पक्ष व विरोधी काँझर्व्हेटिव्ह पक्ष यांत करार होऊन विधिमंडळाची दोन्ही गृहे १९७१ मध्ये बरखास्त करून, ज. सोमोसा यास १९७४ मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्ष होता यावे, यासाठी निवडणुका घेऊन घटना दुरुस्तीसाठी घटना समिती नेमावी असे ठरले. दरम्यानच्या काळात उभय पक्षांच्या सभासदांच्या संयुक्त मंडळाने कारभार केला. जानेवारी १९७३ मध्ये ज. सोमोसाने राष्ट्रीय आणीबाणी समितीचा अध्यक्ष बनून लष्करी कायदा पुकारला. सप्टेंबर १९७४ मध्ये निवडणुका होऊन तो प्रचंड बहुमताने राष्ट्राध्यक्ष झाला. जून १९७४ मध्ये निवडणुका होऊन तो प्रचंड बहुमताने राष्ट्रध्यक्ष झाला. १९७४ च्या अखेरीस गनिमांनी प्रमुख पुढाऱ्यांस पळवून नेल्यामुळे पुन्हा लष्करी कायदा जारी झाला. संविधानीय हमी निलंबित करण्यात आली आणि कडक अभ्यवेक्षण जारी करण्यात आले. शासकीय दडपशाहीमुळे पूर्वीच्या विरोधकांचा भवाळपणा जाऊन १९७५ मध्ये त्यांचे सामर्थ्य वाढले. निकाराग्वा संयुक्त राष्ट्रांचा व त्यांच्या अनेक संघटनांचा सदस्य आहे.
राजकीय स्थिती : हल्लीचे संविधान १९७४ मध्ये संमत झाले. संविधानाप्रमाणे राष्ट्रपती सार्वत्रिक मतदानाने सहा वर्षांसाठी निवडला जातो. तोच राष्ट्रप्रमुख असून आपले मंत्रिमंडळ व इतर अधिकारी नेमतो. निकाराग्वाचे विधिमंडळ द्विसदनी आहे. राज्यमंडळात (सीनेट) ३० व प्रतिनिधी मंडळात ७० सदस्य असतात. २१ वर्षांवरील सर्वांस, १८ वर्षांवरील साक्षरांस व विवाहितांस मताधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सात न्यायाधीश असून ते विधिमंडळाने निवडावयाचे असतात. कारभारासाठी देशाचे १६ विभाग आणि एक राजधानी विभाग केलेला असून त्यांचे प्रमुख राष्ट्रपतीने नेमलेले असतात. स्थानिक कारभार १२३ नगरपालिकांच्या स्वाधीन आहे.
निकारग्वात १९७६ मध्ये ५,४०० सैनिकांचे भूदल, २०० सैनिकांचे नौदल व १,५०० सैनिकांचे वायुदल होते. राखीव सैनिक ४,००० होते.
स्वतंत्र न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय, अपील न्यायालय, कामगार न्यायालय, तडजोड व लवाद न्यायालय व स्थानिक न्यायालये असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची निवडणूक सहा-सहा वर्षांनी होते.
आर्थिक स्थिती : शेती हा निकाराग्वाच्या अर्थव्यवस्थेचा पाया असून ६५% कामगार याच व्यवसात आहेत. निर्यातीच्या ७५% मालही शेती उत्पादनाचाच असतो. कापूस, कॉफी, मांस यांखालोखाल साखर, लाकूड व केळी हे प्रमुख निर्यातपदार्थ आहेत. १९६१ मध्ये न्वेव्हा सिगोव्हीया येथे टंगस्टनचे साठे सापडले. सोने, चांदी, शिसे आणि जप्त यांच्या साठ्यांचा शोध उत्तर निकाराग्वात १९६८ मध्ये लागला. १९७४ मध्ये पॅसिफिक किनाऱ्याजवळ नैसर्गिक वायू सापडला, तेव्हापासून देशाच्या किनाऱ्याजवळ तेलासाठी शोध चालू आहे. उद्योगधंदे अद्याप वाढत आहेत. १९७२ च्या भुकंपामुळे १९७३ चे औद्योगिक उत्पादन ९% घसरले परंतु पुढील वर्षी अमेरिकेच्या एक अब्ज डॉलर मदतीने ते सावरले. ६ अब्ज डॉलरची १९७५–७९ ची पुनर्बांधणी व विकासयोजना असून, त्यांपैकी २ अब्ज डॉलर राजधानी पुन्हा उभारण्यासाठी खर्च व्हावयाचे आहेत. जीवनमान व रोजगार वाढविणे, विभागीय विकासास उत्तेजन व बाह्य मदतीवर कमीतकमी अवलंबून ही योजनेची ठळक उद्दिष्टे आहेत.
१९६३ मध्ये देशाचे ७·२% क्षेत्र शेतीखाली, ७·६% कुरणांखाली व ५३·३% जंगलांखाली होते. बाकीचे क्षेत्र पडीक जमीन, बांधकाम वगैरे इतर प्रकारचे होते. कापूस, ऊस, कॉफी, तीळ, मका, भात, जोंधळा, सुरण, कोको, घेवडे व कडधान्ये, तंबाखू, केळी आणि इतर फळे आणि भाजीपाला ही पिके मुख्यत: होतात.
१९७५–७६ मध्ये २५,३०,००० मे. टन ऊस १,९२,११४·४ मे. टन मका १,२४,२०० मे. टन कापूस ६२,८३१·४ मे. टन सोर्घम (जोंधळा) ५६,२७१·८ मे. टन भात ४४,२५२ मे. टन घेवडे वगैरे व ४,१४,००० मे. टन कॉफी असे प्रमुख पिकांचे उत्पादन झाले. केळी, अननस, मुसंबी, रताळी व सुरण ही स्थानिक उपयोगाची फळे-कंदमुळे आहेत. पनामा रोगामुळे सु. २० वर्षांपूर्वी केळीच्या बागा नष्ट झाल्या, त्यांची जागा आता कोकोच्या लागवडींनी घेतली आहे. मानाग्वाच्या दक्षिण किनाऱ्यावरील डोंगराळ प्रदेशातून कॉफीचे ३/४ पेक्षा उत्पादन होते. मातागाल्पाच्या वायव्येस ज्वालामुखीजन्य जमिनी असून, ओलसर प्रदेशात ऊस व थोड्या कोरड्या भागात कापूस ही पिके होतात. चींनांदेगा व लेओनमध्ये कापसाची लागवड महत्त्वाची आहे. मका व तांदूळ ही मुख्य अन्नधान्ये आहेत. इतर सर्व पिकांची लागवड व्यापारी प्रमाणावर केली जाते. तीपितापा व तूमा या जलसिंचन योजनांमुळे उत्पादन वाढले आहे. एकूण लागवडयोग्य जमिनीपैंकी ६५% प्रत्यक्ष लागवडीखाली आहे. निर्वाह शेती व व्यापारी शेती या दोन्ही प्रकारची शेती होते. मोठाल्या जमिनी सोडल्या, तर शेती बैलांच्या किंवा माणसांच्या श्रमांवरच होते. ४·९% शेतकऱ्यांच्या मालकीची ५८·८% शेतजमीन आहे. पॅसिफिक किनारपट्टीवर पशुसंवर्धन महत्त्वाचे आहे. तेथे दीर्घकाळ पडणाऱ्या पावसामुळे चराऊ राने उगवतात. १९७५ मध्य देशात २५ लक्ष गुरे, ६ लक्ष डुकरे, ८ हजार बकरी, १·७५ लक्ष घोडे, ८ हजार गाढवे, ४० हजार खेचरे व ३५ लक्ष १४ हजार कोंबड्या होत्या. त्यांपासून त्या वर्षी ६४,००० मे. टन गुरांचे मांस ७,०५० मे. टन इतर मांसजन्य खाद्यपदार्थ ३,१३३ मे. टन चरबी २,२०,००० मे. टन गाईचे दूध ३,८७२ मे. टन लोणी १५,९५२ मे. टन चीज १७,१०० मे. टन कोंबड्यांची अंडी ८,१७५ मे. टन गुरांची कातडी असे उत्पादन झाले. १९७४ मध्ये १६,७०० मे. टन मासे मिळाले.
उद्योगधंदे : संयुक्त संस्थाने व दक्षिण अमेरिकेतील काही प्रगत देश यांचे सान्निध्य असूनदेखील निकाराग्वाची औद्योगिक प्रगती अद्याप फारशी झालेली नाही. उद्योगधंद्यांच्या वाढीस नैसर्गिक परिस्थीती मात्र अनुकूल आहे. शेतमालावर प्रक्रिया करणे, मद्ये, पेये, खनिज तेलशुद्धीकरण, सिगारेट, प्लॅस्टिक, साखर, कापड, सिमेंट, दारू गाळणे, आगपेट्या, कातडी सामान, रंग, साबण, दुग्धपदार्थ, तंबाखूप्रक्रिया, विरघळणारी कॉफी इत्यादींचे कारखाने आहेत. जंगलांपासून १९७४ मध्ये ८,१०,००० घ.मी. उद्योगधंद्यांस उपयुक्त लाकडाचे आणि २१,००,००० घ. मी. जळाऊ गोलटे आणि १९७३ मध्ये १,५०,००० घ. मी. सूचिपार्णी २,००,००० घ. मी. रुंदपर्णी १,००० घ. मी. रेल्वेस्लीपर एवढे कापीव लाकडाचे उत्पादन झाले.
१९७३ मध्ये ६९·९ कोटी व १९७४ मध्ये ८४·५ कोटी किवॉ. तास विजेचे उत्पादन झाले. तूमा नदीवरील जलविद्यूत् केंद्राची उभारणी चालू आहे. १९६४ मध्ये ७१ डीझेलवरील आणि ११ जलविद्युत् केंद्रे होती. ती १५·५९ कोटी किवॉ. तास वीजउत्पादन करीत. १९७४ मध्ये १,७७५ मे. टन तांबे ८ मे. टन चांदी २,२५३ किग्रॅ. सोने (निर्यातीचे) व १०,००० मे.टन मीठ अशी प्रमुख खनिजे मिळाली. १९७२ मध्ये ३ लक्ष मे. टन इंधन तेल व १·११ लक्ष मे. टन मोटार स्पिरिटचे उत्पादन झाले.
कॉर्दोव्हा हे निकाराग्वाचे चलन असून एका कॉर्दोव्हाचे १०० सेंटाव्हो असतात. ५, १०, २५, ५० सेंटाव्हो व १ कॉर्दोव्हा यांची नाणी आणि १, ५, १०, २०, ५०, १००, ५०० व १,००० कॉर्दोव्हांच्या नोटा आहेत. डिसेंबर १९७६ मध्ये १ पौंड स्टर्लिंग = ११·६४ कॉर्दोव्हा, १ अमेरिकी डॉलर = ७·०३ कॉर्दोव्हा आणि १०० कॉर्दोव्हा = ८·५९ पौंड = १४·२३ डॉ. असा विनियम दर होता. १९७४ च्या अर्थसंकल्पात १३६·५२ कोटी कॉर्दोव्हा आय व २,०९० कोटी कॉर्दोव्हाव्यय दाखविला होता. त्यात शिक्षण २५·४५ कोटी, वाहतूक व संदेशवहन २६·२ कोटी, संरक्षण १५·५९ कोटी कॉर्दोव्हा असा प्रमुख संकल्पित व्यय होता.
निकाराग्वात राष्ट्रीय बँक, मध्यवर्ती बँक, कामगारांची बँक, दोन खासगी व्यापार बँका व काही परदेशी बँकांच्या शाखा आहेत.
निकाराग्वाचा विदेश व्यापार बेताचाच आहे. १९७४ मध्ये (सोने व शासकीय व्यापार सोडून) ५६·२७ कोटी अमेरिकी डॉलर किंमतीची आयात व ३८·१६ कोटी अमेरिकी डॉलर किंमतीची निर्यात झाली. आयातीत १२·५% औषधी व रासायनिक पदार्थ, ११·८% यंत्रसामग्री, १०% मोटारी व सुटे भाग, ९·१% पेट्रोल, ७·२% लोखंडी व पोलादी माल आणि ६·१% अन्नपदार्थ अशी प्रमुख टक्केवारी होती. मुख्यत: अमेरिकेकडून व त्याखालोखाल जपान, प. जर्मनी, एल् साल्वादोर, ग्रेट ब्रिटन, नेदर्लंड्स, बेल्जियम, पनामा, कॅनडा इ. देशांकडून आयात झाली. निर्यातीत कॉफी ४०%, कापूस १५% व त्याखालोखाल मांस, साखर, लाकूड, सरकी, सोने, केळी इत्यादींचा क्रम लागतो. निर्यात सर्वांत जास्त अमेरिकेला आणि त्याखालोखाल प. जर्मनी, जपान, एल् साल्वादोर, नेदर्लंड्स, बेल्जियम, कॅनडा, ब्रिटिश बेटे इ. देशांकडे होते. १९७५ मध्ये ३६३·१६ कोटि कॉर्दोव्हांची आयात व २६३·६ कोटी कॉर्दोव्हांची निर्यात झाली. कोरीन्तो या बंदरातून देशाचा ७०% व्यापार होतो. मानाग्वा या राजधानीच्या शहराशी ते रेल्वेने जोडलेले आहे. सॅन वॉन देल सूर हे पॅसिफिक महासागराच्या दक्षिण भागातील बंदर असून ब्लूफील्ड्स व प्वेर्तो कावेसास ही कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावरील, केळी आणि वनसंपत्ती निर्यात करणारी बंदरे आहेत. मानाग्वा ही १८५७ पासूनची राजधानी असून तिची लोकसंख्या पाच लाखांवर आहे. लेओन (लोकसंख्या ७५,९१२-१९७१ अंदाज) ही पूर्वीची राजधानी असून देशाचे सांस्कृतिक केंद्र आहे. ग्रानाडा हे रेल्वेचे दक्षिणेकडील केंद्र असून, मासाइया नैर्ऋत्येकडील आणि चीनांदेगा वायव्य भागातील कृषिसंपन्न केंद्रे आहेत.
वाहतूक व संदेशवाहन : ‘पॅन अमेरिकन’ या ४८५ किमी. च्या राजमार्गामुळे पश्चिम किनाऱ्यावरील भाग हाँडुरस व कोस्टा रीका या देशांशी जोडला गेलेला आहे. परंतु याला जोडणारे काही रस्ते वगळता इतर रस्त्यांची अवस्था बरी नाही. मुसळधार पावसामुळे त्यांना नेहमी खड्डे पडतात. रस्ते कमी व चांगल्या रस्त्यांचा अभाव यांमुळे अनेक विभांगातील सुपीक जमिनी लागवडीखाली आणता येत नाहीत. दोन्ही किनारे जोडणारा रुझवेल्ट मार्ग मानाग्वा व ब्लूफील्ड्स यांच्या दरम्यान तयार झाल्यामुळे अनेक विकसनक्षम विभागांत वस्ती वाढू लागली आहे. ग्रानाडा हे शहर लोहमार्गाने कोरीन्तोशी जोडलेले असून, निकाराग्वा सरोवर लोहमार्गाने पॅसिफिक महासागराशी जोडलेले आहे. अंतर्भाग रेल्वेने प्वेर्तो कावेसासशी जोडलेले आहेत. विमान वाहतुकीमुळे अंतर्गत भागाशी दळणवळण प्रस्थापित झाले आहे. देशात एकूण १४,४३६ किमी. सडकांपैकी १,३३५ किमी. फरसबंदी व ५,०४० किमी. वर्षभर चालणाऱ्या असून ३७३ किमी. शासकीय लोहमार्ग आहेत. केळीच्या बागांत खासगी लोहमार्ग आहेत. निकाराग्वा सरोवरात मोठ्या नौकांनी व बऱ्याच नद्यांतून छोट्या नौकांनी वाहतूक होते. कोरीन्तो, प्वेर्तो सोमोसा व सॅन वॉन देल सूर ही पॅसिफिकवरील आणि प्वेर्तो कावेसास, एल् व्लूफ व ब्लूफील्ड्स ही अटलांटिकवरील बंदरे आहेत. ‘लॅनिका’ ही शासकीय विमानकंपनी अंतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक करते. इतरही काही अमेरिकी कंपन्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक करतात. देशात ७,४७४ किमी. तारा यंत्रांचे मार्ग, २२१ तारकचेऱ्या, २३३ डाकघरे, ६,२८४ किमी. दूरध्वनी मार्ग व २०,४४७ दूरध्वनी असून न्यूयॉर्कशी तारेने संपर्क साधता येतो. राष्ट्रीय नभोवणीची ५१ प्रसारण केंद्रे असून १९७३ मध्ये देशांत ७ लक्ष रेडिओसंच व ७०,००० दूरचित्रवाणीसंच होते. मानाग्वा येथे दूरचित्रवाणी केंद्र आहे. मानाग्वात पाच व लेओन येथे दोन, अशी एकूण सात दैनिके प्रसिद्ध होतात. त्यांचा एकूण खूप ७५,००० आहे.
लोक व समाजजीवन : या भागात १५०४ ते १५२५ .या काळात स्पॅनिश आक्रमणे झाली. त्यापूर्वी ऑझटेक जमातीच्या वसाहती होत्या. त्यानंतर वांशिक सरमिसळ झाली. आता ७०% लोक मेस्तिसो असून त्यांपैकी बहुसंख्य पश्चिम किनाऱ्यावरील सुपीक प्रदेशात राहतात. एकूण लोकवस्तीपैकी ८०% लोक पॅसिफिक किनारा आणि सरोवरे यांदरम्यानच्या प्रदेशात राहतात. नागरी वस्तीचे प्रमाण ३९·७% असून शहरात एकूण १४% पैकी बहुसंख्य युरोपीय लोक आढळतात. राजकीय, सामाजिक दृष्ट्या पुढारलेले व देशाचे नेतृत्व करणारे लोक साधारणपणे यूरोपीयच आहेत. कॅरिबियन किनाऱ्यालगतच्या प्रदेशात निग्रो वंशीय लोक असून ते एकूण लोकसंख्य़ेच्या ८% आहेत. पर्ल खारकच्छाजवळ कॅरिब निग्रो लोक राहतात. केळी व कोको त्यांच्या मळ्यांत काम करण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी त्यांना आणलेले आहे. एकूण ४% लोक झांबो किंवा निग्रो व इंडियन या मिश्र वंशांचे आहेत. निकाराग्वात मिस्कितो आणि सुमो या दोन इंडियन जमाती आहेत.
ब्रिटिशांनी १६७८ मध्ये मिस्कितो इंडियन लोकांचे एक राज्य ब्लूफील्ड्जवळ स्थापन केले होते. त्यातील काही वंशज आता बोनांसा व स्यूना येथील सोन्याच्या खाणींत काम करतात. पाश्चिमात्य संस्कृतीचा त्यांच्यावर विशेष परिणाम झालेला नाही. सुमो इंडियन पिस पिस (वास्पूक) नदीच्या भागात राहतात. ते केळी पिकवून व कंदमुळे गोळा करून आपली उपजीविका करतात. ते विणकाम, कातडीकाम व मातीची भांडी बनवितात.
निकारग्वाची अधिकृत भाषा स्पॅनिश असली, तरी इंडियन लोक व मेस्तिसो लोक इतर अनेक भाषा बोलतात. शहरांत व बंदरांत इंग्रजी भाषा जाणणारे पुष्कळ लोक आहेत. स्पॅनिश भाषेतील नवकाव्याचा प्रणेता रूबेन दारीओ (१८६७–१९१६) हा निकाराग्वातीलच होता.
बहुसंख्य लोक कॅथलिक पंथीय असून लोकांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य आहे. १९६४ मध्ये ८३·१% रोमन कॅथलिक, ३·३% प्रॉटेस्टंट व १३·६% इतर धर्मीय होते. देशातील संपत्ती प्रामुख्याने यूरोपीय लोकांच्या हातात आहे. १९७० मध्ये ५८·४% लोक साक्षर होते. सहा वर्षांपासून तेरा वर्षांपर्यंतच्या वयाच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे आहे परंतु शाळांची संख्या अजूनही कमी आहे. माध्यमिक व तांत्रिक शाळांची संख्या गेल्या दहा वर्षांत खूपच वाढली आहे. मानाग्वा व लेओन येथे विद्यापीठे आहेत. १९७०–७१ मध्ये २,०६३ प्राथमिक शाळांतून २,७८,७५२ विद्यार्थी व ७,३९१ शिक्षक, १५२ माध्यमिक शाळांतून ३८,१४९ विद्यार्थी व १,७५१ शिक्षक, २९ व्यावसायिक शाळांतून ३,७२२ विद्यार्थी व २७२ शिक्षक, २१ शिक्षक प्रशिक्षण संस्थांतून ३,७८४ विद्यार्थी व २५९ शिक्षक आणि उच्च शिक्षणाच्या ५ संस्थांतून ७,६६९ विद्यार्थी व ४४० शिक्षक होते. १९७४ मध्ये २,३७० प्राथमिक व माध्यमिक शाळांतून ४,०४,४५० विद्यार्थी व १०,५०० शिक्षक होते. मानाग्वा येथील विद्यापीठात २,४७७ विद्यार्थी व १६९ शिक्षक आणि लेओन येथील विद्यापीठात ९,५०० विद्यार्थी आणि ३९१ शिक्षक होते. अणुशक्ती संशोधनाची दोन केंद्रे आहेत. देशातील ४१·६% जनता निरक्षर असली, तरी मेस्तिसो लोकांत काहीजण खूप शिकलेले व दक्षिण आणि उत्तर अमेरिकेतील संस्कृत्यांमुळे प्रभावित झालेले आढळतात.
आरोग्य व समाजकल्याण : १९६९ मध्ये देशातील रुग्णालयांत ४,४१३ रुग्णशय्या व एकूण १,१४१ डॉक्टर होते. १९७० मध्ये ५५ रुग्णालयांत ४,८४१ रुग्णशय्या होत्या. हिवताप, पोटाचे विकार हे मुख्य आजार होत. देशातील लोकांस दररोज अन्नातून २,३५० कॅ. मिळतात. किमान गरज २,३७० कॅलरींची आहे. पॅसिफिक किनाऱ्यावरील सर्व विभागांत कामकऱ्यांसाठी सक्तीची राष्ट्रीय आरोग्य विमायोजना आहे. १९७६ च्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी १२ कोटी कॉर्दोव्हाची तरतूद आहे. १९६३ पासून देशात दररोज ६ कोर्दोव्हा किमान वेतन आहे. २०,००० पेक्षा जास्त वस्तीच्या शहरांत ते ४०% जास्त असते. शेतकामगारांस जादा अन्नभत्ता मिळतो.
कला व क्रीडा : मानाग्वातील ललितकला विद्यालयामुळे निकाराग्वात कलावंत उद्यास येत आहेत. बेसबॉल हा राष्ट्रीय खेळ असून फुटबॉल हळूहळू लोकप्रिय होत आहे. कोंबड्यांची झुंज व बैलांची साठमारी हे खेळ इंडियन लोकांना प्रिय आहेत. साठमारीत खेळाडू मस्त बैलावर स्वार होण्याचा प्रयत्न करतात. पोहणे व मासेमारी हे लोकप्रिय छंद आहेत. १९६५ मध्ये १०० चित्रपटगृहांतून ६०,००० प्रेक्षकांची सोय होती. प्रमुख शहरांत नाट्यगृहे आहेत.
पर्यटन : देशात पर्यटन व्यवसाय विकास पावत आहे. जागृत ज्वालामुखींच्या पर्वत प्रदेशातील वनश्री, मानाग्वाजवळ प्राचीन काळी ज्वालामुखीपासून दूर पळणाऱ्या लोकांच्या पावलांचे लाव्हातील ठसे, तीपितापाची खनिजयुक्त पाण्याची स्नानगृहे, समुद्र, सरोवरे व नद्यांतील मासेमारी ही पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत. मानाग्वा, लेओन, मातागाल्या, ग्रानाडा, चीनांदेगा, मासाइया, एस्टेली, दीर्यांबा, ब्वाको, हीगाल्या, ब्लूफील्ड्स, हीनोतेगा ही निकारग्वातील प्रमुख शहरे आहेत.
संदर्भ : 1. Cole, J. P. Latin America, London, 1965.
2. James, P. E. Latin America, New York, 1959.
शहाणे, मो. ज्ञा., भागवत, अ. वि.
“