नॉव्हमस्कॉफ्‌स्क : स्टालिनोगॉर्स्क. यूरोपीय रशियाच्या तूला प्रांतातील एक औद्योगिक केंद्र. लोकसंख्या १,४३,००० (१९७५). हे मॉस्कोच्या दक्षिणेस सु. २०६ किमी. डॉन नदीच्या उजव्या तीरावर वसले असून, रस्ते व लोहमार्गांनी मॉस्कोशी जोडलेले आहे. याची स्थापना १९३० मध्ये झाली असून, १९३४ पर्यंत ‘बाब्रिकी’, तर १९६१ पर्यंत ‘स्टालिनोगॉर्स्क’ या नावाने हे ओळखले जात होते. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने हे जिंकले, परंतु लवकरच ते रशियन सैन्याने आपल्या ताब्यात घेतले. याच्या आसमंतात डन्स्कॉई, झडॉन्यी, नव्हऊगल्नी ही कोळसाक्षेत्रे असून, येथील बहुतेक सर्व कारखाने कोळशाच्या औष्णिक शक्तीवर चालतात. उत्तर कॉकेशस पर्वतातून नळाद्वारे आणलेला नैसर्गिक वायू येथील रसायन कारखान्यात वापरला जात असून, खते व प्लॅस्टिक ही या कारखान्यातील प्रमुख उत्पादने होत.

चौधरी, वसंत