नायट्रोबॅक्टिरिएसी : वनस्पतींना आवश्यक असणारी नायट्रोजनयुक्त संयुगे मृदेत तयार करणारे सूक्ष्मजंतू. स्यूडोमोनेडेलीझ गणातील स्यूडोमोनेडिनी या उपगणातील नायट्रोबॅक्टिरिएसी हे एक कुल आहे. या कुलातील सूक्ष्मजंतू स्वपोषित असून फक्त अकार्बनी पदार्थांचा अन्न म्हणून उपयोग करणारे आहेत. ह्या सूक्ष्मजंतूंच्या कोशिकांच्या (पेशींच्या) टोकावर असणाऱ्या कशाभिकांमुळे (हालचालीत उपयोगी पडणाऱ्या धाग्यासारख्या वाढीमुळे) त्यांचा स्यूडोमोनेडेलीझ या गणात समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे ते प्रकाशसंश्लेषी (सूर्यप्रकाशात कार्बन डाय – ऑक्साइड व पाणी यांचे कार्बोडायड्रेटांत रूपांतर करणारी प्रक्रिया करू शकणारे) नसल्याने त्यांचा अंतर्भाव स्यूडोमोनेडिनी या उपगणात केलेला आहे. नायट्रोबॅक्टिरिएसी कुलातील सूक्ष्मजंतू हे शलाकाकार, अंडाकार, गोलाणुकार अथवा सर्पिलाकार असून त्यांपैकी काही ग्रॅम-रंजक-व्यक्त (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग टिकून राहणारे), तर काही ग्रॅम-रंजक-अव्यक्त असतात. ते जीवोपजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारे) नाहीत. हे सूक्ष्मजंतू मृदेत वा वाहत्या पाण्यात आढळतात.

मृदेत अमोनियाचे ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] सूक्ष्मजंतूंमुळे होऊन नायट्रेट तयार होते. ही क्रिया दोन तऱ्हांनी होते (१) अमोनियापासून नायट्राइटे व (२) नायट्राइटांपासून नायट्रेटे. ह्या दोन्ही क्रियांना काही वेळा नायट्रीकरण असेही म्हणतात. दोन्ही क्रियांमध्ये भाग घेणारे सूक्ष्मजंतू वेगवेगळे व निराळ्या वंशांतील असतात. सामान्यतः मृदा उदासीन (अम्लीय वा क्षारीय – अल्कलाइन – नसणारी) वा क्षारीय असणे आवश्यक असते. नायट्रोसोमोनॅस, नायट्रोसोकॉकस, नायट्रोसोस्पिरा, नायट्रोसोसिस्टीसनायट्रोसोग्लोइया ह्या वंशांतील सूक्ष्मजंतूंमुळे अमोनियाचे ऑक्सिडीकरण होऊन नायट्राइटे तयार होतात, तर नायट्रोसिस्टिस आणि नायट्रोबॅक्टर ह्या वंशांतील सूक्ष्मजंतूंमुळे नायट्राइटांटे नायट्रेटांत रूपांतर होते. दुसऱ्या प्रकाराचे सूक्ष्मजंतू दोन प्रकारांचे असतात, हे एस्. विनोग्रॅडस्की या रशियन सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांनी दाखविले आणि १८९० मध्ये वेगळेही करून दाखविले.

नायट्रोसोमोनॅस यूरोपिया, नायट्रोसोमोनॅस मोनोसेल्ला, नायट्रोबॅक्टर विनोग्रॅडस्की नायट्रोबॅक्टर एजाइल ह्या महत्त्वाच्या जाती आहेत.

पहा : सूक्ष्मजीवविज्ञान.

संदर्भ : 1. Frobisher, M. Fundamentals of Microbiology, Tokyo, 1961.

            2. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, New York, 1961.

            3. Stanier, R. Y. Dondoroff, M. Adelberg, E. A. General Microbiology, London, 1963.

कुलकर्णी, नी. बा.