आ.१ आरमारी नांगर : (१) हळस, (२) आकडा, (३) फाळ, (४) जोखड.

नांगर जहाजाचा : पाण्यात उभे केलेले जहाज पाण्याच्या प्रवाहाने किंवा वाऱ्याच्या प्रेरणेने दुसरीकडे वाहत जाऊ नये म्हणून त्याला अटकाव करण्यासाठी बांधलेल्या साखळीचे दुसरे टोक अडकवून ठेवण्याचे साधन. पूर्वी या कामासाठी एखादा मोठा दगड किंवा शिसे भरलेल्या आकडेदार ओंडक्याचा उपयोग करीत असत. लोखंडाची अवजारे प्रचारात आल्यानंतर या कामासाठी चिखलात रूतून बसतील असे फाळ असलेला लोखंडी नांगर वापरण्यात येऊ लागला.

आ.२. मार्टिन नांगर : (१) हळस, (२) आकडा (३) फाळ, (४) जोखड.

आरमारी नांगर : सु. तीनशे वर्षे वापरात आलेला आरमारी नांगर आ. १ मध्ये दाखविला आहे. या नांगराच्या उभ्या दांड्याला हळस म्हणतात. या हळसाच्या खालच्या टोकावर नाक असलेले दोन आकडे असतात. या आकड्यांच्या टोकावर बदामी आकाराचे फाळ बसवलेले आहेत. पाण्यात सोडलेला नांगर तळाशी गेला म्हणजे कलंडलेला फाळ चिखलात शिरतो. हळसाचे वरचे टोक जहाजाच्या साखळीने टांगलेले असते. या टोकाजवळच आकड्यांच्या पातळीशी काटकोन करून एक आडवा दांडा बसवतात त्याला जोखड म्हणतात. हळसाच्या खालच्या भागात नांगर मागे ओढण्याची दोरी बांधण्यासाठी दोन कडी बसविलेली असतात. खडकाळ भागात सोडलेला नांगर एखादे वेळी अडकून बसतो आणि सहजपणे वर उचलून घेता येत नाही. अशा ठिकाणी तो नांगर मागे ओढून घेतला, तर तो खडकातून सुटतो व सहज वर उचलून घेता येतो. म्हणून खडकाळ भागात नांगर सोडताना त्याला मागे ओढण्याची दोरी बांधूनच पाण्यात सोडतात. हा नांगर पाण्याच्या तळाला टेकल्यावर जर फाळाच्या बाजूने कलंडला नाही, तर तो जोखडाच्या एका टोकावर तात्पुरता कलंडतो व नंतर फाळाच्या बाजूने कलंडतो आणि फाळाच्या रुतण्यास मदत करतो. हा नांगर जहाजावर चढविताना त्यातील जोखड काढून घेतात व पाण्यात सोडताना ते जोखड पुन्हा अडकवितात. जोखड काढण्याची आणि घालण्याची दगदग वाचविण्यासाठी जोखडाची जरूरीच नसलेला म्हणजे आपोआप कलंडणारे आकडे किंवा फाळ बसवलेला नांगर वापरात येऊ लागला.

मार्टिन नांगर : मध्यंतरीच्या काळात लहानशा जोखडाच्या मदतीने सहज कलंडणारे फाळ असलेला मार्टिन नांगर प्रचारात आला. त्याची रचना आ. २ मध्ये दाखविली आहे. हा नांगर तळावर टेकल्याबरोबर आडवा पडतो आणि त्याचे फाळ चिखलात शिरतात. त्यामुळे जहाजाला आपली जागा सोडता येत नाही. हा नांगर जहाजांवर ओढून घेताना त्याचे जोखड काढावे लागत नाही.

आ. ३. स्मिथ नांगर : (अ) समोरील देखावा (आ) बाजूचा देखावा : (१) हळस, (२) आकडा, (३) फाळ (बाणाच्या दिशेने फाळ उचललेले), (४) खीळ.

स्मिथ नांगर : मार्टिन नांगरापेक्षा जास्त सोईस्कर असा स्मिथ नांगर आ. ३ मध्ये दाखविला आहे. या नांगराचे दोन्हीकडील फाळ पोलादी खुंटीवर सैलसे बसविलेले असतात. त्यामुळे ते फाळ हळसाच्या दोन्हीकडे ३०° ते ४५° सहज वळू शकतात. हा नांगर पाण्याच्या तळावर टेकल्याबरोबर दोन्ही फाळ आपल्या वजनानेच खुंटीभोवती फिरतात व चिखलात अडकतात. हा नांगर जहाजावर चढविताना आहे त्या स्थितीतच टांगून ठेवता येतो व त्याला जोखडाची जरूरीच लागत नाही.

नांगराची संख्या, वजन इत्यादी : एका नांगरावर अडकविलेले जहाज नांगराचा साखळदंड व जहाजाच्या लांबीच्या त्रिज्येत कोठेही सरकू शकते. दोन नांगरांवर अडकविलेले जहाज त्यामानाने पुष्कळच मर्यादित जागेत राहते म्हणून बहुतेक जहाजांत पुढच्या टोकावरून दोन्ही बाजूंनी दोन स्वतंत्र नांगर सोडतात. जहाजाच्या मागच्या बाजूसही एक नांगर सोडता येतो. चालू असलेले जहाज थांबवावयाचे असताना मागचा नांगर पाण्यात सोडला म्हणजे जहाज थांबविण्यास मदत होते व नंतर जहाज एका ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. याशिवाय मागच्या बाजूस एक साहाय्यक नांगर (केज अँकर) ठेवलेला असतो. तो एका नावेत ठेवून दूर अंतरावर नेऊन पाण्यात सोडता येतो. त्याच्या मदतीने जहाज पाहिजे त्या दिशेमध्ये स्थिर उभे करता येते. हा साहाय्यक नांगर नेहमी जहाजाच्या मागच्या गच्चीवर ठेवतात व तो नावेत सोडण्यासाठी मागच्या यारीने उचलून नावेत ठेवतात. या नांगराला साखळीच्या ऐवजी तारदोर बांधतात. त्यामुळे त्याचा उपयोग करणे सोपे जाते. प्रत्येक जहाजावर आणखी एक लहानसा नांगर ठेवतात. त्याला तीन किंवा चार वाकविलेले आकडे असतात. हा नांगर किनाऱ्यावरील वाळूत नेऊन ठेवता येतो. हा टांगण्यासाठी नारळाच्या काथ्याचे दोरखंडही चालते. जहाजावरच्या नांगरांची संख्या, त्यांची कार्यक्षमता, त्यांना टांगण्याचे दोर आणि साखळ्यांचे आकार हे लॉइड्सारख्या एखाद्या मान्यवर विमा कंपनीच्या नियमानुसार ठेवावे लागतात. नांगराचे वजन हे जहाजाची बांधणी व त्याच्या एकूण वजनावर अवलंबून असते पण स्थूलमानाने जहाजाची लांबी १२५ मी. असल्यास जोखडरहित नांगराचे वजन २·७५ टन असावे असे मानतात. अंदाजे ३,००० टनाच्या जहाजावर पुढच्या बाजूसाठी तीन व अन्य तीन मिळून एकंदर सहा नांगर ठेवतात. पुढच्या नांगरांचे वजन २ ते ३ टन असते व त्यांना १०० टन खेच सहन करणारा ६०–१२० मी. लांबीचा साखळदंड जोडलेला असतो. हा साखळदंड ओढण्यासाठी यांत्रिक रहाट वापरावा लागतो. नांगर वर ओढून घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेचे वर्णन ‘जहाजातील यंत्रसामग्री’ या नोंदीत दिलेले आहे. जगातील सर्व नाविक दलांतील अधिकारी धैर्याचे प्रतीक म्हणून नांगराच्या चिन्हाचा आपल्या गणवेशात उपयोग करतात.

तांबे, मु. शं.