नरमेध : धार्मिक श्रद्धेतून किंवा जादूटोण्याच्या उद्देशाने मानवांनी केलेली मानवाचीच विधियुक्त हत्या म्हणजे नरमेध, नरबळी वा पुरुषमेध होय. ‘मेध’ या संस्कृत धातूचा अर्थ ‘हत्या करणे’ असा आहे. यज्ञ, विधियुक्त हत्या, यज्ञात बळी द्यावयाचा पदार्थ इ. या शब्दाचे अर्थ आहेत. ‘नर’ या शब्दाचा ‘पुरुष’ असा मुख्य अर्थ असला, तरी लक्षणेने स्त्रिया व मुले यांचाही या शब्दाच्या अर्थात समावेश होतो. ज्याची हत्या करावयाची त्याला ‘मेध्य’ किंवा ‘बळी’ म्हटले जाई. मानवी रक्त हे अत्यंत पवित्र व सामर्थ्यशाली असते, मानव ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती असल्यामुळे त्याचे बलिदान हे सर्वश्रेष्ठ बलिदान होय, इ. समजुतींमुळे नरमेध हा सर्वश्रेष्ठ यज्ञ, असे काही लोकांना वाटत असे. नरभेध का आद्य यज्ञ असून त्यातूनच यज्ञसंस्था विकसित झाली, असेही एक मत आहे.

 

मानवी हत्या अनेक उद्देशांनी घडते परंतु सर्व प्रकारच्या मानवी हत्येला नरमेध म्हणता येत नाही. क्रोध, द्वेष, सूड इत्यादींमुळे केलेला खून, गुन्हेगारांना व युद्धकैद्यांना दिलेला मृत्युदंड, युद्धातील हत्याकांड इ. गोष्टी तत्त्वतः नरमेधाहून वेगळ्या आहेत. अर्थात, अशा हत्यांना धार्मिक स्वरूप दिल्यास त्यांचे नरमेधात रूपांतर होऊ शकते. उदा., मूळ प्राचीन मेक्सिकन लोकांनी गुन्हेगारांना द्यावयाच्या सर्व प्रकारच्या देहान्त शिक्षांना नरमेधाचे स्वरूप दिले होते. मुलांच्या रक्तात स्नान केल्यास कुष्ठरोग बरा होतो, या समजुतीने काही ठिकाणी हत्या घडे. अशा हत्येला नरमेध म्हणावे की नाही, याविषयी मतभेद आहेत.

 

अनेकदा देवता व मानव यांचे नाते दृढ करणे किंवा पापामुळे ते नष्ट झाले असल्यास देवतेचा क्रोध दूर करून ते पुन्हा प्रस्थापित करणे किंवा देवता वा अन्य अदृश्य राक्षसी पिशाचादिक संतुष्ट करणे किंवा मेध्य नर हा जेव्हा राजा, गणमुख्य इ. प्रकारचा श्रेष्ठ माणूस असतो तेव्हा त्याच्यातील विशेष शक्ती प्राप्त व्हावी असा नरमेधामागचा उद्देश असे. देवतांपैकी ग्रामदेवता, जलदेवता, वृक्षदेवता, कृषिदेवता, भूमिदेवता इत्यादींना विशेषेकरून बळी दिले जात.

पिशाच, दुष्ट शक्ती, मृत, स्वतःची तलवार इत्यादींनाही नरबळी दिले जात. दुष्काळ, साथीचे रोग, युद्ध इ. संकटे येऊ नयेत व आली तर ती दूर व्हावीत, असाही उद्देश असे. व्यक्तिगत वा सामाजिक पापाबद्दल प्रायश्चित घेणे, नवस फेडणे, विजय साजरा करणे, गुप्तधन प्राप्त करणे, स्त्री व जमीन यांची जननक्षमता वाढविणे, भूतबाधा हटविणे, पावित्र्य निर्माण करणे, दुष्ट शक्तीला हाकलणे, विहिरीला किंवा तळ्याला पाणी आणणे, देवाला सेवक पाठविणे इ. अनेक उद्देशांनी नरमेध केले जात. मेक्सिकन लोक सूर्याची उष्णता, प्रकाश आणि गती टिकविण्यासाठी रक्त वाहत असलेली मेध्यांची हृदये सूर्याला अर्पण करीत. माणसांच्या काही अवयवांत विशिष्ट शक्ती असते, नरबळींमुळे भविष्य कळते किंवा अधोलोकातील शक्तींचे साहाय्य प्राप्त होते इ. समजुतींनी नरबळी देण्याची रोमन लोकांची पद्धत जादूटोण्याशी संबंधितच होती.

 

काही वेळा देवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रिय, निर्दोष आणि अत्युत्कृष्ट अशी व्यक्ती बळी दिली जाई. स्वतः, स्वतःचा पुत्र, पहिले अपत्य, राजा, पुरोहित, सरदार, पराक्रमी व देखणा तरुण, सुंदर तरुणी, अन्य एखादी महत्त्वाची व्यक्ती इत्यादींची मेध्य म्हणून निवड केली जाई. म्हणूनच रोगी, सदोष, नपुंसक, स्त्री इत्यादींना बळी देऊ नये, असे एक मत होते. याउलट जगण्यास अपात्र बनलेल्या, तसेच हीन व दुय्यम समजल्या जाणाऱ्या व्यक्ती बळी देण्याची प्रथाही होती. गुन्हेगार, युद्धकैदी, गुलाम, जातिबहिष्कृत, हीनजातीय, नास्तिक, रोगी, स्त्रिया इत्यादींना बळी देऊ नये, असे मानले जाई. लहान मुलांना बळी देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात होती. कधीकधी जोडपे बळी दिले जाई.

 

काही वेळा समाजहितासाठी एखादी व्यक्ती स्वेच्छेने आत्मबलिदान करण्यास तयार होई. येशू ख्रिस्ताने मानव जातीच्या कल्याणासाठी स्वेच्छेने आत्मबलिदान केले असे ख्रिस्ती लोक मानतात. कधी विकत (उदा., शुनःशेष) तर कधी एखाद्या जमातीला काही सवलती देऊन बळी मिळविले जात. गुन्हेगार व गुलाम यांना बळी देताना त्यांच्या संमतीचा प्रश्नच उद्‌भवत नव्हता. सामान्य माणसे, स्त्रिया व मुले यांना बहुधा जबरदस्तीनेच बळी दिले जाई. पळवून आणणे वा प्रवाशांना पकडणे हे प्रकारही चालत. अनेक ठिकाणी परदेशी, परधर्मी वा शत्रुपक्षीय लोकांना बळी दिले जाई. उदा., ज्यू लोक ख्रिस्ती मुलांना बळी देतात, अशी अफवा पसरत असे. माया, मेक्सिकन इ. लोक बळी मिळविण्यासाठी वारंवार युद्धे करीत. बळी देण्यासाठी सार्वजनिक वर्गणीतून काही लोक सांभाळल्याची उदाहरणेही आहेत. काही राजांना विशिष्ट मुदतीनंतर बळी देण्याच्या अटीवरच राजपद दिलेले असे. काही वेळा विशिष्ट पद्धतीने नशीब अजमावूनही बळी निवडला जाई.

 

मेध्य हा देवाचा प्रतिनिधी वा प्रत्यक्ष देवच होय, असे अनेक ठिकाणी मानले जाई. उदा., शतपथ ब्राह्मणात मेध्य नर म्हणजे नारायण असे म्हटले आहे. देवाप्रमाणेच त्याची पूजा केली जाई. रोग बरा व्हावा म्हणून लोक त्याच्याकडे येत. काही ठिकाणी त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवून आपले पाप त्याच्यावर ढकलण्यासाठी लोक घराबाहेर धावत. निवड झाल्यानंतर विशिष्ट दिवस, महिने वा वर्षे लोटल्यानंतर प्रत्यक्ष बळी दिला जाई. या काळात त्याला सर्व प्रकारची सुखे उपलब्ध असत. काही ठिकाणी त्याला कामोपभोग वर्ज्य असे, तर काही ठिकाणी त्याला चार-चार स्त्रिया उपलब्ध असत. नरमेधाचा काळ हा उत्सवाचा काळ मानून नृत्य, संगीत इ. प्रकार चालत. लोकांचा जमाव हत्या पाहण्यासाठी जमलेला असे. बळीला सजवून मिरवणुकीने वधस्थानाकडे नेले जाई. काही वेळा आधी द्वंद्व होऊन बळी विजयी झाल्यास त्याला सुटकेची संधी मिळे पण एरव्ही तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या भोवती रक्षक असत. खोंडनामक आदिवासींमध्ये त्याला तेल-तूप लावून त्याच्या अंगावर गुलाल व फुले उधळली जात. बळीच्या अंगावरील एखादा केस, फुलाची पाकळी वा गुलालाचा अंश मिळविण्यासाठी लोक धडपडत, कारण या वस्तू शुभ मानल्या जात. वामाचारी लोक बळी व्यक्तीने स्नान केल्यावर त्याला देवीकडे नेऊन देवीची पूजा करीत. बळीचे तोंड पूर्वेला व वध करणाराचे उत्तरेला असे. बळीला नमस्कार करून, त्याच्या मस्तकावर फूल, पाणी इ. टाकून त्याचा मंत्रपूर्वक शिरच्छेद केला जाई व रक्त, मस्तक इत्यादींनी देवीची पूजा केली जाई. शिरच्छेद करताना बळीच्या तोंडून बाहेर पडणारा आवाज म्हणजे देवतेने बळी स्वीकारल्याचे चिन्ह मानले जाई. त्याचे धड व डोके खाली कसे पडते यावरून तसेच त्याचा आवाज व मलोत्सर्गादींवरूनही भविष्ये वर्तविली जात. मानवी हत्येसाठी वापरले जाणारे इतर बहुतेक सर्व प्रकार नरमेधातील हत्येतही वापरले जात. काही वेळा आधी वध करून नंतर पुरणे, जाळणे, तुकडे करणे इ. प्रकारे देवतेला बळी अर्पण करीत, तर काही वेळा जिवंत पुरणे, जाळणे इ. प्रकार चालत. बळीला मारताना दिलगिरी व्यक्त करणे, हे नरमेधाचे एक वैशिष्ट्य होय. त्यामुळेच बळी देणे म्हणजे खून वा पाप नव्हे, तर ते पुण्यच आहे ज्याची हत्या केली जाते तो मरत नाही, तर त्याला मोक्ष मिळतो इ. प्रकारे समर्थन करण्यात येई.

हत्येनंतर देवाला बळी अर्पण करणे, मूर्तीवर व लोकांच्या अंगावर रक्त शिंपडणे, मांसाचा अंश शेतात पुरणे, बियाणे किडू नये म्हणून काही अंश त्यात टाकणे वा ते रक्तात बुडविणे इ. प्रकार केले जात. प्राचीन मेक्सिकन लोक सोनेरी चमच्याने मांसाचा तुकडा मूर्तीच्या तोंडात ठेवत परंतु या सर्वांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेक्सिको, पेरू, भारत इ. अनेक ठिकाणी मेध्याचे मांस खाण्याची प्रथा होती. आधीच अस्तित्वात असलेल्या नरभक्षिता प्रथेतून नरमेध निर्माण झाला, असे एक मत आहे. कदाचित नरमेधाची कल्पना स्वतंत्रपणेही निर्माण झाली असेल, मेध्य हे देवतेचे अन्न आहे, अशी समजूत असल्यामुळे माणसे प्रसाद म्हणून ते मांस खाऊ लागली असण्याचीही शक्यता आहे. बळी हा देवाचा प्रतिनिधी असल्याने त्याचे मांस खाल्ल्याने व रक्त प्याल्याने त्याच्या दैवी शक्ती आपल्या अंगात येतात, त्या मासांत व रक्तात विशिष्ट सामर्थ्य् असते इ. समजुती असाव्यात. राजा, पुरोहित व इतर लोक यांनी कोणकोणते अवयव खावेत, याविषयी नियम असत. रक्तात बोट बुडवून चाटणे इ. प्रकार नरभक्षितेचेच अवशेष असावेत असे दिसते. नरमेध व नरभक्षिता यांचा नेहमीच संबंध असतो, असे मात्र नाही. अनेक ठिकाणी नरमेध असूनही मेध्याच्या मांसाचे भक्षण करीत नाहीत, तर ऑस्ट्रेलियातील काही जमाती नरमांसभक्षक असूनही नरमेध करताना आढळत नाहीत.

काही नरमेध हे तात्कालिक असत. उदा., दुष्काळ दूर करण्यासाठी केलेला नरमेध. दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक आणि दर तीन, आठ, नऊ, बारा इ. वर्षांनी होणारे नियमित नरमेधही असत. तंजावर येथे दर शुक्रवारी कालीपुढे नरबळी दिला जाई. दर नऊ वर्षांनी एक याप्रमाणे आपल्या नऊ मुलांना बळी देणाऱ्या एका ट्यूटॉनिक राजाची कथा प्रसिद्ध आहे. नववर्षदिन, पेरणी, सुगी, ग्रहणे, विशिष्ट ग्रहयोग, जन्म, विवाह, मृत्यू, राज्याभिषेक इ. प्रसंगी नरमेध केले जात.

 

समाजमनाचे आकलन होण्याच्या दृष्टीने नरमेधामागच्या भ्रामक समजुती अभ्यसनीय आहेत. मृताला मृत्यूनंतर जीवनात सोबत हवी, म्हणून मृत राजा वा सरदार यांच्या बरोबर त्यांच्या स्त्रिया, गुलाम व सेवक यांना पुरण्याची वा त्यांनीच आत्महत्या करण्याची प्रथा चीन, जपान, कोरिया इ. ठिकाणी होती. भारत व इतर काही देशांतील ⇨ सती जाण्याची (सहगमनाची) चाल ही त्या समजुतीतूनच रूढ झाली होती. दुष्काळाला राजा जबाबदार आहे, असे मानून त्याला बळी देण्याची प्रथा अनेक ठिकाणी होती. राजा हा मानवातील देव असल्यामुळे त्याचे वार्धक्य व शक्तिक्षीणता यांमुळे जगावर संकटे येतील, वार्धक्याने त्याचे पौरुष नष्ट झाले, तर जगातील जननक्षमता नष्ट होईल इ. समजुतींमुळे त्याला नैसर्गिक मरण येऊ देत नसत. तो शक्तिमान असतानाच त्याचा वध करून त्याच्या आत्म्याचे समर्थ अशा दुसऱ्या वारसामध्ये स्थानांतरण केले जाई. काही वेळा पुरोहित व पाऊस पाडणारा शामान यांनाही अशी रीतीने बळी दिले जाई. विशिष्ट काळानंतर राजाची शक्ती क्षीण होतेच, हे गृहीत धरून १, ८, ९, १२ इ. वर्षांची मुदत संपल्यावर त्याला बळी देऊन पुन्हा विशिष्ट मुदतीसाठी नवा राजा नेमण्याची प्रथा होती. या प्रथेतूनच राजसंस्था निर्माण झाली, असे एक मत आहे. नरमेधाने जमिनीची सुफलता वाढते, अशीही समजूत होती. मेध्य पुरुष ही धान्यदेवता असून तिचा बळी दिल्यास तिचे पुनरुत्थान होऊन उत्तम पीक येते, असे मानले जाई. मेक्सिकन लोक मका पेरताना लहान मुलांचा, तो अंकुरल्यावर जरा मोठ्या मुलांचा आणि या क्रमाने तो तयार झाल्यावर वृद्ध माणसांचा बळी देत. नरमेध हा ⇨ सुफलताविधी असल्यामुळे बळी देण्यापूर्वी राजा व राणी यांचा संभोग हा एक विधी असे. पुढे राजाच्या प्रतिनिधीला गळा दाबून बळी देताना किंवा अश्वमेधातील अश्वाचा बळी देताना राणीच्या जननेंद्रियाचा मेध्याच्या जननेंद्रियाशी स्पर्श करून प्रातिनिधिक संभोग-विधी करावयास लावले जाई. सृष्टीची व्युत्पत्ती पुरुषमेधातून झाली, अशी कल्पना ऋग्वेदातील ‘पुरुषसूक्ता’त आढळते. पहिल्या नरमेधात देवतेलाच बळी दिले होते.


नंतरच्या नरमेधातील मेध्य हा त्या आद्यदेवतेचा प्रतिनिधी असतो, अशीही समजूत होती. नवी इमारत बांधताना बळी दिल्यास तो त्या इमारतीचा रक्षक बनतो, अशी समजूत होती. अशा बळींविषयीच्या अफवा अजूनही ऐकावयास मिळतात. चीनच्या प्रचंड भिंतीखाली नरबळी दिले असावेत, असे एक अनुमान आहे. विशिष्ट देवता गर्भाशयात मुलांना अडवून ठेवते आणि तिला नरबळी दिला, की अडथळा दूर होऊन मुले होतात मूल हे पित्याची प्रतिकृती असल्यामुळे ते पित्याच्या जीवनाला धोका निर्माण करते, म्हणून त्याला बळी द्यावे एका नरमेधाने चंडी एक हजार वर्षे प्रसन्न राहते नरबळीच्या रक्ताने वंध्येला स्नान घातले तर तिला मुले होतात जलाशयातील देवता विशिष्ट काळानंतर नरबळी घेतात बळी हा देवतेकडे जाणारा आपला दूत असून त्याच्या बरोबर निरोप द्यावा इ. समजुती होत्या. पुरुषांचा प्रतिनिधी म्हणून एक पुरुष व स्त्रियांची प्रतिनिधी म्हणून एक स्त्री, असेही बळी दिले जात. झीलंडमधील एका मंदिरात दर नऊ वर्षांनी ९९ मानव, ९९ घोडे, ९९ कुत्रे व ९९ कोंबडे बळी देण्याच्या प्रथेत संख्येचे विशिष्ट महत्त्व दिसते.

 

नरमेधाला प्राचीन काळापासूनच विरोधही झालेला आहे. माणसांना बळी न देण्याविषयी अग्नीतून अशरीर वाणीने सांगितल्याची कथा शतपथ ब्राह्मणात आहे. नारदपुराणाने नरमेध हा कलिवर्ज्य मानला होता. देशोदेशींच्या सत्प्रवृत्त राजांनी प्राचीन काळातच नरमेधाला बंदी घातली होती. भारतात ब्रिटिश सरकारने नरमेध बंद केला. विरोध वाढल्यानंतर गुप्तपणे नरमेध करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली व अजूनही क्वचित असे नरमेध घडतात. संस्कृतीच्या प्रगतावस्थेत नरमेध बंद झाले, याचा अर्थ आदिम व अगदी रानटी लोकांत नरमेध अधिक होते, असा मात्र नाही. उलट, समाजाच्या अर्धसंस्कृत अवस्थेतच नरमेधांचे प्रमाण अधिक होते, असे एक मत आहे. एखाद्या जमातीला आपल्या वाढत्या सामर्थ्याची जाणीव होऊ लागे, तेव्हा नरमेधांचे प्रमाण वाढत जाई. आफ्रिकन लोकांत राष्ट्र जितके अधिक सामर्थ्यशाली, तितका नरमेध अधिक भव्य प्रमाणात केला जाई.

 

आपले पूर्वज नरमेध करीत होते, हे नाकारण्याची प्रवृत्ती बहुतेक ठिकाणी आढळते. परंतु सर्वच समाजांनी केव्हा ना केव्हा नरमेध केले आहेत, अर्थात त्यांचे प्रमाण कमीजास्त असू शकेल. उदा., प्राचीन मेक्सिकन लोकांमध्ये ते बहुधा सर्वात जास्त होते, तर पारशी लोकांत जवळजवळ नव्हतेच. शिलालेख, थडग्यांवरची चित्रे व लेख, उत्खनन इ. द्वारे (उदा., ईजिप्त, मोहें-जो-दडो इ. ठिकाणी) प्राचीन नरमेधांचे अनेक पुरावी पुढे आले आहेत. प्राचीन साहित्य, पुराणकथा, लोककथा इ. मधून नरमेधांची अनेक उदाहरणे आढळतात. उदा., एका राक्षसाला नियमितपणे एका कुमारिकेचा बळी द्यावयाचा, या क्रमाने राजकुमारीवर वेळ आली तेव्हा नायकाने राक्षसाला मारून तिला वाचविले, या अर्थाची कथा जगातील जपान, स्कॉटलंड, स्कॅडिनेव्हिया इ. बहुसंख्य देशांतून आढळते.

 

भारतात ऋग्वेदातील पुरुषसूक्त, तैत्तिरीय, शतपथ, ऐतरेय इ. ब्राह्मणे, वैतानशांखायन श्रौतसूत्रे, कथासरित्‌सागर, महाभारत, द्रोणसख जातक, कालिकापुराण, इतर पुराणे इ. मधून पुरुषमेधाचे निर्देश आढळतात. शुक्ल यजुर्वेद संहितेत ब्रह्मदेवतेला ब्राह्मण, क्षत्रदेवतेला क्षत्रिय इ. बळी द्यावेत, असे म्हटले आहे. वरुणासाठी नरबळी देण्याची प्रथा भारतात प्राचीन काळापासूनच असावी, असे शुनःशेषाच्या कथेवरून दिसते. सर्वस्वाचे अर्पण करून केला जाणारा पुरुषमेध प्रथम नारायणाने सांगितला, असे शतपथ ब्राह्मणात म्हटले आहे. पुरुषमेध हा सर्वात्मभाव प्राप्त करून घेण्याचा विधी होता. सर्वस्वाची दक्षिणा देऊन आत्म्याच्या ठिकाणी अग्नी स्थापिल्याची भावना केली जाई. पुरुषमेध पाच दिवस चालत असल्यामुळे त्याला पंचरात्र यज्ञऋतू म्हणत. चारही वर्णांतील लोक यज्ञमंडपात आणून त्यांचे पुरुषसूक्ताने स्तवन केले जाई. विशिष्ट विधीनंतर खांबांना बांधलेले पुरुष देवाला अर्पण करून मारले जात किंवा सोडून दिले जात. आदिपुरुषरूपी विश्वव्यापी परमेश्वर हाच मेध्य असल्याची कल्पना पुरुषसूक्तात आली आहे. प्राणांच्या ऐवजी दक्षिणा देत आहे, अशा अर्थाच्या सोमयागातील उद्‌गारांतून यज्ञातील प्राणार्पणाचा विचार सूचित होतो. वर्चस्व, सामर्थ्य व समृद्धी यांसाठी पुरुषमेध केला जाई. पुरुषमेधानंतर वानप्रस्थ स्वीकारावा लागे. परंतु पुरुषमेध हा केवळ प्रतीकात्मक होता आणि पुरुषांना न मारता सोडले जाई, असेही एक मत आहे. पुरुषसूक्त आणि शतपथ ब्राह्मणातील आत्मसमर्पणावर आधारलेल्या पुरुषमेधाचे स्वरूप हे भागवत धर्माचे मूळ होय, असे एक मत आहे. अश्वमेधातही एक नरबळी दिला जाई, असे दिसते.

 

व्यापक समाजहितासाठी व्यक्तीने केलेले आत्मसमर्पण हे निस्संशय श्रेष्ठ व उदात्त असते. आधुनिक काळातही अनेक हुतात्म्यांनी सर्वोच्च त्याग करून समाजाचे कल्याण साधले आहे. त्यांची बलिदाने ही एका अर्थाने नरमेधच होत. नरमेधातील बळीची हत्या तात्त्विक दृष्ट्या व्यक्तिगत द्वेषातून घडत नसे, हेही महत्त्वाचे होते. ज्याची आत्मबलिदानाची सिद्धता असेल, त्यालाच राजपद देण्याची प्रथा ही उच्चपदस्थांनी समाजधारणेसाठी सर्वस्वाचा त्याग करावा, हे सूचित करणारी आहे परंतु हे सर्व मान्य करूनही नरमेध हे अत्यंत क्रौर्याचे कृत्य होते, हे नाकारता येत नाही. विशेषतः बळीला अनेक घरांतून नेऊन प्रत्येक ठिकाणी बोटाचा एक-एक सांधा तोडणे, एकाच वेळी शंभर-दोनशे मुलांचे बळी देणे किंवा प्राचीन मेक्सिकोप्रमाणे दरवर्षी वीस-वीस हजार नरमेध करणे ही सामाजिक विकृती आणि क्रौर्याची परिसीमा होय. स्वतःचे हित साधण्यासाठी दुसऱ्याची हत्या करण्यामागे आत्मसंरक्षणाची स्वार्थी भावनास देवतेच्या कोपाची भीती, सृष्टीच्या कार्यकारणनियमांविषयी आत्यंतिक अज्ञान व चमत्कारिक अंधश्रद्धा होत्या. कधीकधी बळी म्हणून पकडले जाण्याच्या धास्तीने लोक एकटेदुकटे फिरायलाही भीत असत. ह्युएनत्संग हा चिनी प्रवासी भारतात भ्रमण करीत असता एकदा सुदैवानेच नरमेधातून वाचला होता. बळीला किती यातना होतात याची जाणीवच लोकांच्या मनात नसे. माणुसकी, दयाबुद्धी, सहानुभूती, संवेदनक्षमता इ. सद्‌गुणांचा जणू पूर्ण अभावच होता. स्त्रिया, मुले, दरिद्री लोक, रुग्ण इ. दुर्बलांचा बळी म्हणजे सामाजिक शोषण होत. याउलट, सर्वोत्कृष्ट व्यक्तींचा बळी देण्याला कित्येकदा कर्तृत्वशून्य पण महत्त्वाकांक्षी दुष्टांचा मत्सर कारणीभूत ठरे. रक्तपिपासू पुरोहित व जुलमी राजे यांचा रोष ओढवलेले कित्येक निष्पाप लोक बळी दिले जात होते. देशातील सर्व बियाणे गुप्तपणे जाळून कृत्रिम दुष्काळ निर्माण करणाऱ्या व खोटी भविष्यवाणी घडवून आणून स्वतःच्या सावत्र मुलाला बळी देऊ पहाणाऱ्या एका ग्रीक राणीची कथा ही नरमेधातील अपप्रकार स्पष्ट करणारी आहे. एकंदरीत, नरमेधाच्या प्रथेत व्यक्तीच्या हक्कांची इतकी पायमल्ली होत होती, की निरपराध असतानादेखील तिचे जगण्याचे स्वातंत्र्यही नाकारले जात होते.

 

नरमेधातील क्रौर्याची जाणीव होऊ लागल्यानंतर आणि विशेषतः स्वतःचे आणि आपल्या प्रिय व्यक्तीचे बलिदान होऊ नये असे वाटू लागल्यानंतर नरबळीला पर्याय निघू लागले. पुरुष या पहिल्या मेध्यातील मेध क्रमाने बैल, मेंढा, भूमी व तांदूळ यांत शिरला व तेथेच स्थिर झाला, ही ऐतेरय ब्राह्मणातील कथा या पर्यायांचा इतिहास सूचित करणारी आहे. स्वतःऐवजी स्वतःच्या पुत्राला बळी देणे, हा पहिला पर्याय होय. स्वतःचा प्रतिनिधी, विकत घेतलेली वा कनिष्ठ व्यक्ती, पशू इ. पर्यायही निघाले. गवत, धातू, मेण, कणीक, लाकूड माती इत्यादींच्या मानवी मूर्तीही बळी दिल्या जात. बळीला प्रत्यक्ष न मारता मारण्याचा अभिनय करून सोडून देणे, पदच्युत करणे, हद्दपार करणे, एखादा अवयव तोडून व्यंग निर्माण करणे, विशेषतः पुरुषाचे पुरुषत्व व स्त्रीचे चारित्र्य नष्ट करून त्यांच्या जीवनातील आनंदाचे बलिदान करणे, बळीचे थोडेसे रक्त अर्पण करणे इ. पर्यायही होते. चाबकाचे फटके मारणे, पशुला मेध्याचा वेष देऊन त्या पशूची हत्या करणे, व्यालेल्या गायीला प्रसूत स्त्री मानून तिच्या बछड्याला बळी देणे इ. प्रकारही प्राचीन ग्रीक लोकांत आढळतात. रक्ताळलेल्या सुऱ्यांनी दोन तरुणांच्या भुवयांवर रेघा ओढून नंतर त्या पुसून काढणे ही रोमन प्रथा होती. एकंदरीत नरमेधातील मानवी हत्या दूर होऊन हळूहळू त्याला प्रतीकात्मक स्वरूप आले.

 

पहा : यज्ञसंस्था.

 

संदर्भ : I. Frazer, J.G. The Golden Bough, London, 1963.

2. Hastings, James, Ed. Encyclopaedia of Religion and Ethics, Vol. VI. New York, 1955.

3. Westermark, E. A. The Origin and Development of the Moral Ideas. 2. Vols., London, 1906, 1908.

साळुंखे, आ. ह.