वाल्चिया : पुराजीव महाकल्पात (कार्बॉनिफेरस कल्पातील म्हणजे सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या वरच्या खडकांपासून ते पर्मियन कल्पाच्या म्हणजे सु. २७.५ ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या खालच्या खडकांपर्यंत) आढळलेल्या शंकुमंत (कॉनिफेरेलीझ) वनस्पतींच्या पर्णयुक्त फांद्यांच्या जीवाश्मांचा एक रूप-वंश. अलीकडे फ्लोरीन यांनी ]उपत्वचेची संरचना व बीजधारी शंकू यांच्या आधारे ह्या वंशातील चौदा जातींचा अंतर्भाव लेबॅचिया या वंशामध्ये व एका जातीचा समावेश अनेंस्टिओडेंड्रॉनमध्ये केला आहे, याशिवाय अकरा जातींपैकी बहुतेकांचा अंतर्भाव वाल्चियातच करावा लागेल असे ते मानतात, कारण त्यांच्या त्वग्रंध्रांबाबत (त्वचेवरील सूक्ष्म छिद्रांबाबत) निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही. लेबॅचियात त्वग्रंध्रांच्या चार पट्ट्यांपैकी दोन दीर्घ पट्टे खालच्या बाजूस व दोन आखूड पट्टे वरच्या बाजूस असून या पट्ट्यात त्वग्रंध्रांची इतस्ततः विखुरलेली असतात. अनेंस्टिओडेंड्रॉनमध्ये प्रत्येक पट्ट्यात त्वग्रंध्रांची एकच रांग असते. लेबॅचियाची बारीक व सुईसारखी पाने खोडाच्या पृष्ठानजीक वाढतात, तर अनेंस्टिओडेंड्रॉनची पाने ताठर व जाडजूड असून खोडाशी काटकोनात वाढतात. या वनस्पतींच्या दुभंगलेल्या पानांच्या व छदांच्या जीवाश्मास गॉफोस्ट्रॉबस म्हणतात. उत्तर अमेरिकेच्या मध्य व उत्तर पेनसिल्व्हेनिया येथील खडकांत लेबॅचिया व वाल्चिया ह्यांचे जीवाश्म तुरळकपणे आढळतात, परंतु पर्मियन कल्पाच्या सुरुवातीच्या थरात ते अनेक ठिकाणी भरपूर आहेत. लेबॅचिया व वॉल्टझिएसीतील काही वंश पर्मियन कल्पात बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरले होते. तिन्ही वंशातील वृक्ष विद्यमान ऍरॉकॅरिया पक्सेल्सासारखे दिसत असावे (ऍरॉकॅरिया). शंकूंचा आकार चित्तीय किंवा अंडाकृती फुलोऱ्यासारख असून ते अंतिम फांद्यांवर टोकाशी असतात. पुं-केसर व बीजके भिन्न शंकूवर असतात. वाल्चिया (अनेंस्टिओडेंड्रॉन?) जर्मॅनिकाची बीजके उलटी (अधोमुख) असतात. बीजधारी शंकू, केसरदलाचे शंकू, बीजे व पराग यांना अनुक”मे वाल्चिओस्ट्रॉबस, वाल्चिअँथस, कॉर्डांइकार्पस व पोलेनाईटस् ही नावे वापरतात. शंकूंच्या व छदांच्या अंडाकृती आकारावरून ‘अंडशल्काश्म’ हे नाव दिलेले आढळते. बी सपाट कॉर्डांइकार्पंसप्रमाणे असते. (कॉर्डाइटेलीझ सायकॅडेलीझ).