नरसोबाची वाडी: महाराष्ट्र राज्यातील दत्त संप्रदायाचे तीर्थक्षेत्र. हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यात, शिरोळच्या दक्षिणेस ५ किमी. व मिरज–कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर स्थानकाच्या आग्नेयीस सु. १३ किमी., कृष्णा–पंचगंगा संगमावर वसले आहे. दत्तात्रेयाचे प्रथमावतार म्हणून मानले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ हे येथे होऊन गेले, तर दत्तात्रेयाचे दुसरे अवतार समजले जाणारे (श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार) नरसिंहसरस्वती यांचे येथे बारा वर्षे वास्तव्य होते, म्हणून या ठिकाणास वाडी नरसिंह, वाडी नरसोबा, नरसोबावाडी, नरसोबाची वाडी अशी नावे पडली. गुरुचरित्रात या क्षेत्राचा उल्लेख आढळतो. येथे दत्तपादुकांची स्थापना करून नरसिंहसरस्वती गाणगापुरास गेले. दत्तपादुकांचे मंदिर कृष्णेच्या घाटावर आहे. हा घाट संत एकनाथांनी बांधला, असे म्हणतात. भूतबाधा व कुष्ठरोग यांचे निवारण होते, या समजुतीने बरेच लोक येथे येऊन राहतात. चातुर्मास सोडून दर शनिवारी श्रींची पालखी निघते. भाविक लोक गुरुचरित्राची पारायणे व सप्ताह करतात. येथे दत्तात्रेयाचे व नारायणस्वामींचे अशी दोन मोठी मंदिरे आहेत. दत्तजयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा) आणि गुरुद्वादशी (आश्विन वद्य १२) इ. सांप्रदायिक उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे होतात.

कांबळे, य. रा.