नजीर अकबराबादी : (१७३५ – १८३०). प्रसिद्ध उर्दू कवी. मूळ नाव वली मुहंमद, वडिलांचे नाव मुहंमद फारूक. जन्म दिल्ली येथे. अठराव्या शतकाच्या मध्यात नादिरशाह आणि अबदाली यांच्या आक्रमणांमुळे निर्माण झालेल्या अराजकाला वैतागून वयाच्या बाविसाव्या वर्षी नजीर दिल्ली सोडून आग्रा (अकबराबाद) येथे गेले. तेथेच त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. फार्सी, अरबी, पंजाबी, हिंदी, मारवाडी, पूरबी आणि व्रज या भाषांचे त्यांनी अध्ययन केले. वैद्यकशास्त्र, सुलेखनकला, खगोलशास्त्र यांचाही त्यांनी अभ्यास केला. जीवनातील बुहतांश काळ त्यांनी अध्यापनात व्यतीत केला. फार्सी कवींपैकी सादी, हाफिज आणि खुसरौ हे त्यांचे काही आवडते कवी होते. साधे, सोज्वळ आणि समाधानी असे ते सूफी कवी होते. अयोध्या व भरतपूर यांच्या दरबारचे निमंत्रण त्यांनी नाकारले होते. कुत्‌बुद्दीन बातिन व महाराजा बलवंतसिंग राजा हे त्यांच्या शिष्यांपैकी होत. सूफीपंथीयाला साजेसा त्यांचा विशाल दृष्टिकोन होता. जगाची अशाश्वतता विचारात घेऊन नैसर्गिक, समाधानी जीवनाचा त्यांनी उपदेश केला. हिंदू व मुसलमान, श्रीमंत व गरीब यांच्याशी ते सारख्याच समत्वाने आणि मित्रत्वाने वागत.

हिंदु जीवनपद्धतीत व परंपरेत समरस झालेले त्यांचे आयुष्य पाहता भारतीय परंपरेशी निकट संबंध असलेला त्यांच्यासारखा दुसरा कोणताही उर्दू कवी आढळत नाही. केवळ सलीम चिश्ती यांच्याबद्दलच नव्हे, तर श्रीकृष्ण व गुरू नानक यांचीही स्तुतिस्तोत्रे ते गातात  ईदपेक्षा दिवाळी व होळी यांचीच गाणी त्यांनी अधिक गायिली आहेत. त्यांचे अवलोकन अत्यंत मार्मिक होते. आग्रा येथील जलतरण, पतंग उडविणे व क्रीडामहोत्सवांची त्यानी सुस्पष्ट चित्रे रेखाटली आहेत. भराडी आणि गारुडी यांचे अस्वल व माकड यांच्याबरोबरचे खेळही त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. जे जे त्यांनी पाहिले त्या सर्वांचे सूक्ष्म तपशिलांसह त्यांनी वर्णन केले आहे.

ते जनसामान्यांचे कवी होते. त्यामुळे स्वाभाविकपणेच त्यांची रचना ही सामान्यांमध्ये विशेष लोकप्रिय होती. त्यांची गीते ही फकीर व चनाजोरगरमवाले यांच्या जिभेवर दीर्घकाळ घोळत होती. त्या अराजकाच्या अस्थिर वातावरणातील त्यांची ही लोकप्रियता कदाचित त्यांच्या काव्यातील जीवनाच्या भोगवादी तत्त्वज्ञानामुळे त्यांना प्राप्त झाली असेल, असे काही अभ्यासकांचे मत आहे. मृत्यू हाच सर्वश्रेष्ठ समताप्रस्थापक आहे, तो अटळ आहे आणि कोणत्याही क्षणी तो येऊ शकतो. त्यामुळे श्रीमंती व दारिद्र्य, सुख व दुःख यांची चिंता कशाला करावी, असे ते म्हणत. आपल्याजवळच्या मर्यादित साधनांनी जीवनाचा मनसोक्त आनंदोपभोग का घेऊ नये, अशी त्यांची विचारसरणी होती. त्यांनी स्वतः चिंतामुक्त, ‘बोहीमियन’ (बंधमुक्त, कलंदर) जीवन व्यतीत केले.

भाषिक दृष्टिकोनातून त्यांच्या काव्याचे परीक्षण केले असता, ⇨ मीर अनीस यांनादेखील मागे सारील असे शब्दवैभव त्यात आढळते. जनसामान्यांचे ते प्रतिनिधी असल्यामुळे वाणी, सावकार, कुस्तीगीर आणि फकीर इ. समाजातील वेगवेगळ्या व्यवसायांमधल्या सामान्यांचे वाग्वैभव त्यांच्या भाषेत दिसून येते. त्यांच्या काव्यातील सामान्य माणसाची आणि अडाणी लोकांची भाषाशैली पाहून शेफ्‌तासारखे समीक्षक त्यांना ‘बाजारी’ कवी (हलक्या प्रतीचा) म्हणत असत. पण शहबाज, डॉ. फेलन आणि त्यानंतर लतीफ अहमद, अकबराबादी, सक्सेना, नियाझ, मजनू गोरखपुरी व एहतेशाम हुसेन यांच्यासारख्या विसाव्या शतकातील साक्षेपी समीक्षकांनी मात्र त्यांच्या काव्यातील सौंदर्यांचे स्पष्टीकरण केले. निगार या नियतकालिकाने त्यांच्यावर एक विशेषांक (निगारा-नजीर-नंबर) काढला आहे (जानेवारी १९४०).

भारतीय परंपरेशी इमान राखणारे आणि ग्रंथ किंवा केवळ कल्पना यांच्यावर नव्हे, तर स्वतःच्या निरीक्षणावर, अनुभवावर ज्यांची कविता आधारली आहे, असे उर्दूतील एक श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचे सदैव स्मरण केले जाईल.

उर्दू गद्यातील फहमे करीन शिवाय त्यांनी फार्सी भाषेतही पाच गद्य पुस्तिका लिहिल्या आहेत.

त्यांचा कवितासंग्रह प्रथम मीरत येथे ‘मतबए इलाही’ मध्ये प्रसिद्ध झाला. तेथेच तो पुन्हा ‘मतबए अहमदी’ मध्ये हिजरी सन १२८२ मध्ये  प्रकाशित झाला. अब्दुल गफूर शहबाझ यांनी इ. स. १९०० मध्ये लखनौ येथून त्यांचा संग्रह कुल्लियात-इ-नजीर या नावाने संपादून प्रसिद्ध केला. मिर्झा फरहतुल्ला बेग यांनी त्यांच्या गझलांचा ‘दीवान’ (संग्रह) दीवान-इ-नजीर अकबराबादी नावाने संपादून १९४२ मध्ये दिल्ली येथून प्रकाशित केला.

त्यांचे उर्दू गझल, ‘नज्म’ (कविता) तसेच त्यांच्या फार्सी कविता यांचा कुल्लियात-इ-नजीर या नावाने १९५१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आवृत्तीत टीपांसह अंतर्भाव आहे.

नईमुद्दीन, सैय्यद