धारवाड : कर्नाटक राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ७७,१६३ (१९६१) हुबळी-धारवाड ३,७९,१६६ (१९७१). हे हुबळीच्या वायव्येस सु. २० किमी. व बेळगावच्या आग्नेयीस सु. ७६ किमी. वर वसले असून पुणे–बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील व लोहमार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. प्रशासकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक केंद्र म्हणून ते प्रसिद्ध असून समशीतोष्ण, आल्हाददायक हवामान आणि सभोवतीच्या टेकड्या व वनराजी यांनी वेष्टिल्यामुळे त्याचा उल्लेख छोटे महाबळेश्वर म्हणून कर्नाटकात सर्वत्र करतात. उंच टेकड्या व झाडी यांमुळे शहर दुरून दिसत नाही. पूर्वी शहराभोवती तटबंदी व पाच प्रवेशद्वारे होती. त्यामुळे काही तज्ञ धारवाड हा शब्द द्वार व वाट (वसती) या दोन शब्दांचे अपभ्रंशरूप असावे, असे मानतात. धारराव या विजयानगरच्या अधिकाऱ्याने १४०३ मध्ये येथे किल्ला बांधला. त्याच्या नावावरून हे नाव रूढ झाले असावे, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. तथापि यासंबंधी विश्वासार्ह पुरावा अद्यापि उपलब्ध नाही.

धारवाड शहर चार प्रमुख भागांत विभागले आहे : (१) किल्ला व त्याभोवतालचा प्रवेश, (२) मुख्य शहर, (३) उपनगरे आणि (४) नवीन वसाहती. किल्ल्याच्या पूर्वेस व दक्षिणेस मुख्य शहर पसरले असून धारवाड नगरपालिका ही जुनी स्थानिक स्वराज‌ संस्था आहे (१८५६). १९६१ मध्ये धारवाड व हुबळी या दोन जुळ्या शहरांची मिळून महानगरपालिका स्थापन झाली. त्यामुळे सर्व उपनगरे व नवीन वसाहती धारवाड शहराचेच भाग समजण्यात येतात.

धारवाडचा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाही तथापि बाराव्या शतकापासून या प्रदेशाचे उल्लेख मिळतात. सहावा विक्रमादित्य याच्या १११७ च्या कोरीव लेखात भास्करदेव नावाच्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत हा प्रदेश होता, असा उल्लेख मिळतो. याच काळातील होंबल येथील कोरीव लेखांत धारवाडचे उल्लेख आहेत. अली आदिलशाहने १५७३ मध्ये धारवाड जिंकले व पुढे १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी ते आपल्या ताब्यात घेईपर्यंत त्यावर विजापूरचा ताबा होता. मराठ्यांकडून १६८५ मध्ये मुअझ्झम या औरंगजेबच्या मुलाने ते घेतले व पुढे ते १७५३ पर्यंत मोगलांच्या आधिपत्याखाली होते. पुढे मराठे, हैदर, टिपू वगैरेंनी अधूनमधून काही काळ धारवाडवर अधिसत्ता गाजविली आणि अखेर एकोणिसाव्या शतकात ते ब्रिटिशांनी घेतले. स्वातंत्र्योत्तर काळात प्रथम ते मुंबई राज्यात व पुढे १९६० नंतर कर्नाटक राज्यात समाविष्ट झाले.

हिंदू, वीरशैव, मुसलमान, पारशी, जैन, ख्रिस्ती वगैरे धर्मीयांची येथे वसती व प्रार्थनामंदिरे आहेत. त्यांपैकी दुर्गादेवी, दत्तात्रेय, लक्ष्मीनारायण, हनुमान, वेंकटेश ही हिंदू मंदिरे जुम्मा, मदनी, मालापुरा, बारइमाम या मशिदी आणि ब्रिटिशांच्या काळात बांधलेली ऑल सेन्ट्स, द बॅसेल मिशन, द रोमन कॅथलिक वगैरे चर्चे प्रसिद्ध आहेत. दुर्गामंदिर प्राचीन असून बहुतेक मशिदींचे बांधकाम एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस व त्याआधी झाले असावे. बारइमाम व मालापुरा या मशिदी एकाच वास्तु–पद्धतीच्या आहेत. विश्रामधामाजवळचा शंकुस्तंभ (ऑबेलिस्क) कित्तूरच्या लढाईत मरण पावलेल्या अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ उभा आहे. धारवाडचा किल्ला प्रसिद्ध व जुना असून पूर्वी त्याची गणना अभेद्य किल्ल्यांत होत असे. याशिवाय ब्रिटिश अमदानीतील प्रशासकीय इमारती, मनोरा, सरकारी रुग्णालय, मनोरुग्णालय व इतर प्रशासकीय कार्यालये यांच्या इमारती प्रेक्षणीय आहेत.

धारवाड हे विद्येचे एक प्रमुख केंद्र असून त्याची तुलना महाराष्ट्रातील पुणे या शहराबरोबर केली जाते. येथे अनेक मान्यवर जुन्या शैक्षणिक संस्था असून कर्नाटक विद्यापीठ रम्य अशा टेकडीवर वसले आहे (१९४९). जुन्या संस्थांत कर्नाटक महाविद्यालय, कृषिमहाविद्यालय, बोर्स्टल विद्यालय, श्री जगद्‌गुरु शंकराचार्य संस्कृत पाठशाला, कर्नाटक विद्यावर्धक संघ, कर्नाटक हिस्टॉरिका सोसायटी, श्री मुरूघमठ वगैरे काही ख्यातनाम असून कर्नाटक हिस्टॉरिका सोसायटी पुराभिलेखविद्या या विषयाचे प्रशिक्षण देणारे एक विद्यालय चालविते. असे शिक्षण देणारी ही भारतातील एकमेव शिक्षण संस्था आहे. कर्नाटक विद्यापीठातील ‘कन्नड रिसर्च इन्स्टिट्यूट’ ही अलीकडच्या काळातील एक प्रगत संस्था असून तिच्याद्वारे प्राच्यविद्या विषयातील असंख्य कोरीव लेखांचे वाचन, संशोधन, संकलन व संपादन होत आहे. या संस्थेचे एक पुरातत्त्वीय संग्रहालय असून त्यात कोरीव लेख, प्रागैतिहासिक अवशेष व मूर्ती ठेवल्या आहेत.

धारवाड हे फर्निचर, कातडी वस्तू, पोहे, तांदूळ, कौले, विडी, हातमाग कापड यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. येथे नभोवाणी केंद्र व लघुउद्योग आहेत.

संदर्भ : Krishnamoorthy, K. Sunkapur, M. S. Pub. Souvenir : All India Oriental Conference XXVIII Session, Dharwar, 1976.

देशपांडे, सु. र.