पुरोहित : मानव आणि अतिमानवी शक्ती यांच्यामध्ये धर्माच्या आधारे मध्यस्थी करणारी अधिकृत व्यक्ती म्हणजे पुरोहित होय. मानवाने केलेली पूजाही कर्मे अतिमानवी शक्तीपर्यंत पोहोचविणे, त्या शक्तीला मानवाविषयी वाटणारा कोप, कृपा वा प्रसन्नता त्याच्यापर्यंत पोहोचविणे आणि त्या अनुषंगाने आवश्यक ठरणारे कर्मकांड करणे, हे प्रामुख्याने पुरोहिताच्या मध्यस्थीचे स्वरूप असते अशी ख्रिश्चन धर्माची ‘पुरोहित’ ही संकल्पना आहे. हा असा मध्यस्थ प्रॉटेस्टंट पंथास अमान्य आहे. ‘पुरोहित’ हा शब्द ‘पुढे ठेवणे’ वा ‘नेतृत्व देणे’ या अर्थाच्या ‘पुरस् + धा’ या संस्कृत शब्दांपासून बनलेला असून ‘धर्मकृत्यांमध्ये नेतृत्व करणारा विशेषज्ञ’ असा त्याचा अर्थ आहे. हिंदू धर्मात पुरोहित हा कर्मकांड यथासांग जाणणारा म्हणून कर्मकांडाच्या नेतृत्वास आवश्यक असलेले पुण्य अंगी असणारी व्यक्ती होय. मात्र सर्वच कर्मकांडास पुरोहिताच्या नेतृत्वाची आवश्यकता नसते. उदा. संध्या, पूजा इ. पुरोहितावाचून करण्याचा यजमानास अधिकार असतो. पुरोहिताच्या कार्याला ‘पौरोहित्य’ वा ‘पुरोहिती’ असे म्हणतात. जगातील बहुतेक सर्व समाजांतून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुरोहितांचे अस्तित्व आढळते.

पुरोहितसंस्थेचा उगम व विकास : धर्माची सुरुवात झाली, तेव्हापासूनच पुरोहितसंस्था अस्तित्वात आहे, असे एक मत आहे. ती फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, एवढे मात्र निश्चितच. मोहें-जो-दडो व हडप्पा येथील समाजांत ती सुप्रतिष्ठित होती, असे दिसते. प्रागैतिहासिक काळातील गुहांतून पुरोहितांची चित्रे व मूर्ती आढळल्या आहेत. यूरोपात पुराणाश्मयुगाचा प्रारंभीचा काळ सोडला, तर इतर सर्व काळात पुरोहितांचे अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले आहेत. पुराणाश्मयुगाच्या मध्यकालात व उत्तरकालात पुरोहित हा बहुधा जमातीचा प्रमुख आणि चित्रकारही होता. नवाश्मयुगात शेतीला महत्त्व आले. नांगरणी, पेरणी, सुगी इत्यादींशी संबंधित विधी करण्यासाठी पुरोहिताची अधिकाधिक गरज भासू लागली आणि पुढे त्याचे महत्त्व वाढतच गेले. धर्माच्या प्रारंभीच्या काळात पुरोहित नव्हते, प्रत्येक व्यक्ती स्वतःची धर्मकृत्ये स्वतःच करीत असे, असेही एक मत आढळते. धर्मकृत्यांचे कर्मकांड क्रमाक्रमाने गुंतागुंतीचे होत गेल्यामुळे सर्वसामान्य माणसाला  स्वतःच्या उपजीविकेचे इतर व्यवहार सांभाळून हे कर्मकांड विधिपूर्वक पार पाडणे अशक्य झाले. मग श्रमविभागणीच्या व विशेषीकरणाच्या तत्त्वानुसार विशिष्ट व्यक्तींकडे ही धर्मकृत्ये सोपवली गेली. सर्वसामान्य लोकांना देवतेशी संपर्क साधता येत नाही परंतु या विशिष्ट व्यक्तींमध्ये काही अलौकिक सामर्थ्य असल्यामुळे त्यांना मात्र देवतेशी संपर्क साधता येतो, असे मानले जाई. मग असे लोक पुरोहित बनत. योहानेस मारिंजर यांनी पुरोहितसंस्थेच्या विकासाची काही सामाजिक व आर्थिक कारणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत : यज्ञ व कर्मकांडाचे स्तोम, जेथे नित्य वा नैमित्तिक पूजा केली जाते अशा मंदिरांचे अस्तित्व, आध्यात्मिक व्यवहारांसाठी रिकामा वेळ, श्रमविभागणी होऊन स्थिर झालेला समाज आणि आर्थिक सुबत्ता, ही ती कारणे होत. सर्वसामान्यांची अंधश्रद्धा आणि पुरोहितांचे प्रभावी व्यक्तिमत्व यांमुळे पुरोहितसंस्था अधिकाधिक दृढमूल होत गेली. परंतु आधुनिक काळातील वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक इ. कारणांमुळे आता पुरोहितांचा प्रभाव खूपच कमी झालेला आहे.

आवश्यक पात्रता : पुरोहित होण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने ‘बृहस्पतिसव’ करावा, असे श्रौतसूत्रांतून म्हटलेले आहे. केवळ वंशपरंपरा, केवळ गुणवत्ता किंवा वंशपरंपरेसह गुणवत्ता या गोष्टींना महत्त्व देऊन पुरोहितांची निवड करण्याच्या भिन्नभिन्न पद्धती आहेत. उमेदवाराला अतिमानवी शक्तीशी संपर्क साधता येणे, ही अत्यंत महत्त्वाची अट असते. अंगात येणे, विशिष्ट स्वप्ने दिसणे, दृष्टांत होणे इ. मार्गांनी हा संपर्क साधल्याचे स्पष्ट होते. त्याखेरीज कुल, शील, विद्वत्ता इ. सद्‌गुण अंगी असावे लागतात. विशिष्ट वयाचीही अट घातली जाते. ज्योतिष, राजकारण, कायदा, न्यायदान इत्यादींचे ज्ञानही त्याच्याकडून अपेक्षित असते. त्याला शारीरिक व्यंग असू नये, असे सामान्य मत असले, तरी काही वेळा कुरूप, अपंग व तऱ्हेवाईक लोकांनाच पुरोहित केले जाते कारण, त्यातच त्यांचे इतरांहून वेगळेपण असते. पुरोहितपद हे बहुधा विधिपूर्वक स्वीकारले जाते. कधीकधी त्यासाठी लहानपणापासूनच शिक्षण घेतलेले असते. निवड करताना ब्रह्मचर्य, उपवास, अग्नी हातात धरणे, सर्पदंश इ. बाबतींतील व्यक्तीची सहनशीलता पाहिली जाते. काही वेळा, पूज्य मानलेल्या एखाद्या प्राण्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणे किंवा त्याने त्याच्या दारात उभे राहणे, यांसारख्या घटनांवरूनही पुरोहिताची निवड केली जाते. ईजिप्तमध्ये पुरोहितपद विकता येत असे. ग्रीकांमध्येही काही वेळा लिलाव करून ते विकले जाई.

पुरोहिताचे कार्य : पवित्र व लौकिक यांचे नाते जोडणारा कर्मकांडाचा जाणकार, ही पुरोहिताची मुख्य भूमिका असते. मानवसमूहाचा वा काही व्यक्तींचा प्रतिनिधी या नात्याने त्या समूहाच्या वा त्या व्यक्तींच्या वतीने तो आपले कार्य करीत असतो. जन्म, वयात येणे, विवाह, मृत्यू इ. महत्त्वाच्या प्रसंगी आणि विशेष अशा इतरही काही प्रसंगी त्याला बोलावले जाते. हिंदू लोक सोळा संस्कारांचे विधी करताना पुरोहिताची मदत घेतात. कर्मकांडाशी संबद्ध असलेली वा नसलेली अशी इतरही विविध कामे त्याला करावी लागतात. पुराणकथा, मंत्र, धर्मग्रंथ इत्यादींचे वाचन व पठण, मंदिरांचे रक्षण, पुराणकथांचे नाट्यीकरण, नृत्यांचे व मिरवणुकीचे नेतृत्व, संगीताची योजना इ. कृत्यांची जबाबदारी त्याच्यावर असते. त्याला देवतेचे रूप घेऊनही वावरावे लागते. उदा. ईजिप्तमध्ये हाथरदेवीच्या पुरोहित असलेल्या स्त्रिया तिचे रूप घेऊन नृत्य करतात. मुहूर्त पाहणे, ज्योतिष पाहणे, शुभाशुभ फल सांगणे, शकुनांचा अर्थ लावणे, भूत काढणे, धार्मिक चित्रे रेखाटणे, पूजेस लागणारे पदार्थ तयार करणे इ. कृत्येही तो करतो. न्याय देणे, संघर्ष मिटविणे, सदाचरणाचा उपदेश करणे ही कामेही त्याला करावी लागतात. सुफलता, शिकार, मासेमारी, हवापाण्यावर नियंत्रण, कृषी इत्यादींसाठी त्याची मदत घेतली जाते. भारतात पुत्रप्राप्तीसाठी पुरोहितांकडून नियोग करून घेतल्याची उदाहरणे आहेत. एकंदरीत, पुरोहित हा समाजाला स्थैर्य देणारी विविध कृत्ये करीत असतो. ही कृत्ये करीत असताना त्याला विविध ⇨निषिद्धांचे पालन करावे लागते.

पुरोहितांचे वर्ग, श्रेणी इत्यादी : भारतात वैदिक काळी पुरोहितांचा स्वतंत्र वर्ग नव्हता, असे दिसते. त्यामुळे ब्राह्मणेतर व्यक्तीही पुरोहित झाल्याची उदाहरणे आढळतात. परंतु पुढे त्यांची स्वतंत्र जात बनली. ग्रीक लोकांत पुरोहितांचा स्वतंत्र वर्ग नव्हता. तेथे कोणालाही पुरोहित होता येई. मादागास्करमधील काही जमाती, अमेरिकन इंडियन इ. लोकांतही पुरोहितांचा स्वतंत्र वर्ग आढळत नाही. इतर अनेक ठिकाणी मात्र वंशपरंपरागत अशा पुरोहितांचे स्वतंत्र वर्ग बनल्याचे आढळते. पुरोहितांतील दैवी शक्ती, त्यांचे कार्य, विद्वत्ता आणि प्रतिष्ठा यांनुसार त्यांच्यामध्ये उच्चनीच श्रेणी आणि विविध प्रकार निर्माण होतात. मग एकापेक्षा अधिक पुरोहितांची नियुक्ती केली जाते. वैदिक यज्ञातील ऋत्विजांची, म्हणजेच पुरोहितांची, संख्या १७ इतकी होती. अवेस्तामध्ये आठ प्रकारचे पुरोहित निर्दिष्ट केले आहेत. ज्यू पुरोहितांचे २४ गट पाडलेले होते. रोमन, पारशी, ख्रिस्ती इ. लोकांतही पुरोहितांचे अनेक प्रकार आढळतात.

स्त्री-पुरोहित : जगातील अनेक समाजांतून स्त्रिया पुरोहित असल्याचे आढळते. निग्रो, अमेरिकन इंडियन, काही सैबेरियन जमाती, फिलिपीन्स बेटातील काही जमाती इ. लोकांत स्त्रिया पौरोहित्य करतात. ईजिप्तमध्येही स्त्रिया पुरोहित होत्या. रोममध्ये फ्लॅमेन डायालिस या पुरोहिताला आपली पत्नी फ्लॅमिनिका हिच्या निधनानंतर आपले पद सोडावे लागे कारण, तिच्याशी विवाह झाल्यामुळेच त्याला हे पद मिळालेले असे. आसाममधील खासी लोकांत स्त्रिया पुरोहित असतात. उग्रो-फिनिक, अंदमानी, काही ऑस्ट्रेलियन जमाती इ. लोकांमध्ये मात्र स्त्रियांना पुरोहित होण्यास बंदी घातलेली होती.

पुरोहितांचे खच्चीकरण : पुरोहितांनी खच्चीकरण करून घेण्याच्या प्रथेविषयी फ्रेझरने बरेच विवेचन केले आहे. निसर्गाचे पुनरुत्थान, पावित्र्याची प्राप्ती किंवा देवीचे स्वरूप आत्मसात करण्याची तीव्र इच्छा इ. हेतूंनी पुरोहित आपले खच्चीकरण करून घेतात, अशी विद्वानांची मते आहेत. रोममध्ये प्रजासत्ताकाचा शेवट होण्यापूर्वीच्या काळात ॲटिस या देवाचे गॅली नावाचे पुरोहित होते. त्यांचे खच्चीकरण केलेले असे. ॲटिसनेही स्वतःचे खच्चीकरण करून घेतल्याची कथा सांगितली जाते. रोममध्ये सिबिल व ॲटिस या देवतांच्या वसंतोत्सवात देवतेला पुनरुत्थानाची शक्ती मिळावी, म्हणून नवशिके पुरोहित आपले खच्चीकरण करून घेत असत. आशियातील सुफलतेच्या इतर काही देवींची सेवा क्लीब पुरोहितच करीत असत.


यूफेससची आर्टेमिस व हायरॅपलिस येथील सिरियन ॲस्टार्टे या देवींचीही नपुंसक पुरोहितांकडून सेवा होत असे. त्यांच्या उत्सवाच्या वेळी संगीताच्या धुंद नशेत अनेकजण स्वतःचे खच्चीकरण करून घेत असत. काँगोतील काही तरुण लिंगपूजेसाठी खच्चीकरण करून घेत असल्याचे आढळते. अशा प्रकारचे पुरोहित स्त्रियांचाच वेष धारण करतात. आपल्याकडेही यल्लम्माचे जोगती स्त्रीवेषात वावरताना आढळतात. कर्नाटकाच्या बेल्लारी जिल्ह्यात त्याचप्रमाणे याच राज्यातील धारवाड व म्हैसूरच्या भागांत हुलिअम्म या देवीला नपुंसक मुले अर्पण केल्याचे निर्देश आढळतात.

पुरोहित व राजा : प्राचीन काळी राजा ( वा कुटुंबप्रमुख) हाच पुरोहितही असे. एकच व्यक्ती राजा व पुरोहित असल्याची उदाहरणे पॉलिनीशिया, मेलानीशिया, बॅबिलोनिया, प्राचीन यूरोप, ईजिप्त इ. अनेक ठिकाणी आणि निग्रो, अमेरिकन इंडियन इ. लोकांत होती. राजाला सर्व कामे स्वतः करणे अशक्य झाल्यावर त्याने धर्मकृत्ये करण्याची जबाबदारी स्वतंत्र अशा पुरोहितावर टाकून श्रमविभागणी केली. पूर्वी पितृपूजेचे कार्य ज्येष्ठांकडे सोपविण्याची पद्धत होती त्यानुसार कुटुंबप्रमुखाला, जमातप्रमुखाला वा राजाला पितृपूजेचा अधिकार दिला जाई आणि त्यातूनच राजाकडे पुरोहिताचे काम आले, असे काहीजण मानतात. फ्रेझरच्या मते यातुकाराचा प्रभाव वाढल्यानंतर तो यातुकारच पुरोहित-राजा बनला. पुरोहित आणि राजा यांची पदे वेगवेगळी झाल्यानंतर त्यांनी परस्परांना सहकार्य करून सत्ता भोगल्याची अनेक उदाहरणे आहेत. याउलट, प्राचीन काळापासूनच राजा आणि पुरोहित यांमध्ये संघर्ष झाल्याची उदाहरणेही आढळतात. भारतात त्रिशंकू, वेन, नहूष इत्यादींच्या कथांतून असा संघर्ष दिसतो. ईजिप्तमध्ये अम्मॉनचे पुरोहित व फेअरो यांच्यात तसेच ख्रिस्ती पोप व बादशहा यांच्यात संघर्ष झाल्याचे आढळते. सामाजिक, आर्थिक इ. क्षेत्रांतील नेतृत्वाशीही पुरोहितांचा संघर्ष झालेला आढळतो.

पुरोहित आणि यातुकार, शामान व प्रेषित : विविध समाजांच्या धार्मिक व धर्मसदृश क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुरोहित, यातुकार, शामान, प्रेषित, वैदू, ज्योतिषी, देवऋषी, भगत, मांत्रिक इत्यादींचा समावेश होतो. तात्त्विक दृष्ट्या या व्यक्तींमधील भेद दाखविता आला, तरी व्यवहारात मात्र त्यांच्यातील वेगळेपणा दाखविणे अवघड असते. कारण, कित्येकदा एकच व्यक्ती यांपैकी अनेकांचे कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या भूमिका परस्परांत मिसळून गेलेल्या असतात. पुरोहित हा देवता व मानव यांत मध्यस्थी करणारा, यातुकार यातूच्या आधारे इष्ट गोष्ट साधणारा, शामान चित्‌शक्तींच्या मदतीने कार्य सफल करणारा, वैदू हा रोग बरे करणारा आणि प्रेषित हा परंपरा मोडून नवी तत्त्वे सांगणारा असतो, असे स्थूलमानाने म्हणता येते.

पुरोहिताने पुरोहितसंस्थेतील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून परंपरागत ज्ञान प्राप्त केलेले असते. यातुकार मात्र वैयक्तिक प्रयत्नांतून व अनुभवांतून ज्ञान प्राप्त करतो व वैयक्तिक चमत्कारांवर भर देतो. पुरोहितांची कायमची व सुसंघटित अशी एक संस्था असते, निश्चित अशी केंद्रे, मंदिरे इ. असतात, तशी यातुकारांची नसतात कारण, त्यांची कार्ये वैयक्तिक व प्रासंगिक असतात. पुरोहित परनियुक्त असतात, तर यातुकार स्वयंनियुक्त असतात. पुरोहितांचे पद वंशपरंपरागत असू शकते. यातुकारांचे बहुधा तसे नसते. पुरोहित धार्मिक कर्मकांडाद्वारे

देवतांना प्रसन्न करून इष्टकार्य घडवून आणतात. यातुकार यातूच्या व मंत्रांच्या जोरावर अतिमानवी शक्तींना नियंत्रित करतात.

पुरोहिताचे ज्ञान परंपरागत आणि शामानाचे ज्ञान व्यक्तिगत, हा फरक पुरोहित व ⇨शामान यांच्यामध्येही आढळतो. शामान पुरोहितांप्रमाणे मध्यस्थी न करता चित्‌शक्तींच्या मदतीने मानवांचे कल्याण करतो. त्याला चित्‌शक्तींच्या जगात सदेह ये-जा करता येते, त्या शक्तींवर त्याचे नियंत्रण असते आणि त्यांच्या मदतीने रोग बरे करणे, शकुन सांगणे इ. कामे तो करतो. पुरोहितांप्रमाणे शामानांच्या बहुधा संघटना नसतात. परंतु त्यांचे पद वंशपरंपरागत असू शकते व त्यांना ज्येष्ठ शामानांकडून ज्ञान प्राप्त करता येते. सामान्यतः ज्या समाजात पुरोहित असतो, तेथे शामान नसतो आणि जेथे शामान असतो तेथे पुरोहित नसतो. परंतु मैदानी प्रदेशातील लोकांचा या बाबतीत अपवाद आहे. अन्न गोळा करणाऱ्या भटक्या लोकांत शामान आढळतो, तर अन्न निर्माण करणाऱ्या कृषिसंस्कृतीत पुरोहित आढळतो. शामानाचे कार्य प्रासंगिक असल्यामुळे ते सामान्यतः पंचांगाच्या आधारे चालत नाही पुरोहिताचे कार्य मात्र पंचांगाच्या आधारे चाललेले असते.

पुरोहित हा परंपरेला जपत असतो, तर प्रेषित हा परंपरा मोडून पुरोहितांविरूद्ध बंड करतो आणि नवी तत्त्वे सांगतो. याचा अर्थ असा, की पुरोहित व प्रेषित यांच्या भूमिकांत मूलभूत संघर्ष असतो. म्हणूनच, पुरोहितवर्गातून सहसा प्रेषित जन्माला येत नाही. पुरोहितवर्ग प्रेषितांना वा सुधारकांना पाखंड म्हणून हिणवतो. ⇨प्रेषित हा साक्षात्कार, उत्स्फूर्तता व चमत्कार या वैयक्तिक गोष्टींच्या जोरावर समाजाला प्रभावित करतो पुरोहिताची भूमिका अशी वैयक्तिक नसते.

पुरोहितांची हत्या : फ्रेझरच्या मते क्षीण होणाऱ्या राजाप्रमाणेच क्षीण होणाऱ्या पुरोहिताचीही हत्या केली जाई [® नरमेध]. फ्रेझरने सांगितलेल्या हकीकतीनुसार ऑल्बन पर्वतातील एका उपवनात नग्न तलवार हाती घेतलेला एक पुरुष एका वृक्षाजवळ उभा असे. तो राजा व पुरोहित असे. दुसरा पुरुष तेथे येऊन पहिल्या पुरुषाची हत्या करी आणि स्वतः राजा व पुरोहित होई. सॅव्हेज बेटात राजे हेच पुरोहित असत. दुष्काळ पडल्यास त्यांना जबाबदार धरून त्यांची हत्या केली जाई. दुष्काळासारखे दुसरे एखादे संकट आले, तरी पुरोहितालाच जबाबदार धरण्याची पद्धत इतरत्रही होती. पुरोहितांचा एखादा प्रयोग फसला, तर त्यांची प्रतिष्ठा नष्ट होई. शिवाय, त्यांना शिक्षा व प्रसंगी हत्या होण्याचीही भीती असे.

पुरोहितांचा सामाजिक दर्जा : धार्मिक विधी गुंतागुंतीचे झाले, की त्या विधींत पारंगत असलेल्या पुरोहितांची प्रतिष्ठा आपोआपच वाढत जाते. कित्येकदा त्यांची पूजा केली जाते आणि ते पृथ्वीवरील देवाचीच भूमिका पार पाडतात. ईजिप्तमध्ये पुरोहिताला देवाचा लाडका पुत्र, पिता व प्रतिनिधी म्हटले जाई. कुक बेटामध्ये त्याला देवमंजूषा म्हटले जाई. निसर्गशक्ती त्याच्या ठिकाणी केंद्रित आहे, निसर्गघटना त्याच्या हाती आहेत इ. समजुती असतात. म्हणूनच राजेलोकदेखील त्यांना भिऊन असत आणि आपल्या मुली त्यांना अर्पण करीत असत. दक्षिणेसारख्या विविध मार्गांनी त्यांना उत्पन्न मिळत असे. त्यांना करमुक्ती, युद्धकर्यातून सुटका इ. सवलतीही मिळत असत. त्यांना विवाहादी बाबतींत लोकांवर नियंत्रणे लादण्याचे अधिकार असत. समाजातील बुद्धिमंत वर्ग पुरोहितसंस्थेत एकत्रित झालेला असल्यामुळे परंपरा, कला, प्रचलित ज्ञान-विज्ञान इ. गोष्टी त्यांच्याच ठिकाणी केंद्रित होत असत. त्यामुळे आपोआपच त्यांची बौद्धिक कुवत आणि सामाजिक दर्जा क्रमशः वाढत जाई.

प्रतिष्ठेचा दुरुपयोग : पुरोहितांनी कळत-नकळत आपल्या प्रतिष्ठेचा दुरुपयोग केला आहे, अशा अर्थाचे विविध आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आले आहेत. ते अविवाहित असले, तरी त्यांच्या लैंगिक जीवनात स्वैराचार आढळतो. देवांना अर्पण केलेल्या देवदासींचा तेच उपभोग घेतात. भरपूर संपत्ती जमवून विलासी जीवन जगतात. आपापसात अथवा राजेलोकांशी संगनमत करून ते लोकांना आपल्या प्रभावाखाली ठेवतात. खोटे भविष्य सांगून लोकांना भीती घालतात. भविष्य सांगताना संदिग्धता ठेवतात आणि अपयश आले, तर ते दुसऱ्या कोणाच्या तरी माथी मारतात. कार्यपद्धतीत गूढता ठेवतात. अंग रंगवणे, केशभूषा व वेष इत्यादींमध्ये विचित्रता आणणे, सर्पदंश वगैरेंचा आपल्यावर परिणाम होत नाही असे दाखविणे इ. मार्गांनी लोकांना प्रभावित करून ते आपले हितसंबंध सांभाळतात. त्यांच्या आचारविचारांत ढोंगबाजीही असते. पुरोहितसंस्थेमुळे जातिसंस्थेसारख्या विषमतेवर आधारलेल्या संस्थाचे दृढीकरण, धार्मिक क्षेत्रातील मक्तेदारी, अंधश्रद्धेला खतपाणी इ. दुष्परिणामही घडून आले आहेत. म्हणूनच, प्रत्येक समाजात वेळोवेळी त्यांच्याविरूद्ध तीव्र प्रतिक्रिया झाल्या आहेत. याच कारणासाठी, ब्राह्म, प्रार्थना, सत्यशोधक इ. ‘समाजां’ नी समाजाला पुरोहितवर्गाची गरजच नाही, असे प्रतिपादन केले आहे.


समाजाला झालेले लाभ : प्राचीन परंपरांचे जतन, शिक्षणाचा प्रसार, साहित्यादी कलांची जोपासना, संस्कृतीचे संवर्धन इ. कृत्यांमुळे पुरोहितांनी मानवजातीवर उपकार केले आहेत. एक प्रकारे ते समाजाचे मार्गदर्शकच होते. विशिष्ट तत्त्वांच्या आधारे त्यांनी समाजाला एकत्रित ठेवण्याचे काम केले आहे. त्यांच्यामुळेच संकटग्रस्त माणसांच्या चिंता दूर होऊन त्यांना मनःशांती लाभते त्यांना सुरक्षितता वाटते आत्मविश्वासाने प्रगती करता येते आणि समाधानाने जगता येते. शिवाय, काही वेळा जरी ते ढोंगबाजी करीत असले, तरी बऱ्याच वेळा त्यांची स्वतःच्या कार्यावर मनोमन श्रद्धाही असते.

विविध समाजांतील पुरोहित : भारतात वैदिक काळापेक्षा ब्राह्मण काळात पुरोहितांचे महत्त्व वाढले. पुराणकाळात धर्मोपदेशक, पुजारी, कथाकार इत्यादींनी पुरोहितांची जागा घेतली. सध्याची पुरोहितसंस्था मूर्तिपूजेच्या आधारे टिकून आहे. जैनांच्या मंदिरांत पुजारी असतात. लिंगायतांच्या पुरोहितांना जंगम म्हणतात. मूळ बौद्ध धर्मात पुरोहित वर्गाला स्थान नव्हते. महायान व तांत्रिक पंथांतून मात्र ते काही प्रमाणात प्राप्त झाले. चीनमध्ये ‘वू’ नावाचे पुरोहित होते. शिवाय बौद्ध व ताओ पुरोहितही होते. तिबेटमध्ये लामा हा पुरोहिताचे काम करीत असे. जपानात अंत्यसंस्काराला बौद्ध पुरोहित, तर विवाह व जन्म या प्रसंगी शिंतो पुरोहितांना बोलावतात. मुसलमानांत पुरोहितांचा स्वतंत्र वर्ग नाही. ते प्रार्थनेच्या प्रमुखाला ⇨ इमाम म्हणतात. ख्रिस्ती लोक येशूला महापुरोहित मानतात. पीटर हा त्याचा परमशिष्य होता. पीटरच्या उत्तराधिकाऱ्यांना ⇨ पोपम्हटले जाते. तो रोमन कॅथलिक चर्चचा सर्वश्रेष्ठ अधिकारी असतो. त्याखेरीज, बिशप, प्रीस्ट, प्रेसबिटर, डीकन इ. पुरोहितांचे प्रकार असतात. [® ख्रिस्ती धर्मातील पदाधिकारी]. ज्यू लोकांत पुरोहिताला कोहेन व ⇨ राब्बी म्हणत. या लोकांत पुरोहितांचे वीस-बावीस वर्ग होते. बॅबिलोनियन पुरोहिताला ‘मस्तक’ या अर्थाचा ‘शांगू’ हा शब्द वापरला जाई. प्राचीन इराणात ‘आथ्रवन’ नावाचे पुरोहित होते. पश्चिम इराणातील पुरोहितांना⇨मागीअसे म्हटले जाई. जरथुश्त्र हा पारशांचा पहिला पुरोहित मानला जातो. त्यांच्या पुरोहितास ⇨ दस्तूर म्हणतात. ग्रीक लोकांत चारित्र्यवान अशा कोणत्याही व्यक्तीला पुरोहित होता येई. रोममध्ये पुरोहितांना विधिसभेच्या आज्ञेनुसार काम करावे लागे. तेथे  पाँटीफीस हा पुरोहितांचा मुख्य वर्ग होता. ईजिप्तमध्ये प्राचीन काळापासून पुरोहितांना महत्त्व होते.

संदर्भ : 1. Frazer. J. G. The Golden Bough, London, 1963.

           2. James. E.O. The Nature and Function of Priesthood, London, 1956.

           3. Landtman. G. The   Origin of Priesthood, Ekenaes. 1905.

           ४. मुरंजन, सुमंत, पुरोहितवर्गवर्चस्व व भारताचा सामाजिक इतिहास, वाई, १९७३.

साळुंखे, आ.ह.