पानचेटी : (इं. पॉइनसेटीया, ख्रिसमस फ्लॉवर, लॅ. पॉइनसेटीया पल्चेरिमा, यूफोर्बिया पल्चेरिमा कुल-यूफोर्बिएसी). सु. १ मी. पर्यंत उंच वाढणारे हे पानझडी झुडूप मूळचे उष्ण अमेरिकेतील (मेक्सिको) असून हल्ली बागेत शोभेकरिता कडेने किंवा वाफ्यात गटाने लावलेले सर्वत्र आढळते. खोडात पांढरा चीक असतो. पाने साधी, अंडाकृती-लांबट किंवा लंबगोल, अखंड किंवा काहीशी खंडित, तरंगित, १०-१५ सेंमी. लांब, गर्द हिरवी, किंचित लवदार व लालसर देठाची असतात. फांद्यांच्या टोकास अनेक लाल (किंवा पिवळट, गुलाबी) रंगाच्या पानांसारख्या छदांजवळ पेल्यासारख्या (चषकरूप) फुलोऱ्यांचा झुबका असतो प्रत्येकात एक परिदलहीन तीन किंजदलांचे स्त्री-पुष्प लांब दांड्यावर असून त्याभोवती अनेक तशीच प्रत्येकी एका केसरदलाची पुं-पुष्पे असतात. पेला अनेक हिरव्या छदांचे मंडल असून त्यावर एक पिवळे प्रपिंड (ग्रंथी) असते [→ फूल यूफोर्बिएसी], हेच पानचेटीचे आकर्षण होय. मेरी आइकमध्ये (दुहेरी पानचेटीमध्ये) छदांचे अनेक वेढे असून अधिक आकर्षक वाटते.
पानचेडी हे फार लोकप्रिय, पारंपरिक नाताळ (ख्रिसमस) पुष्प आहे. कलमे लावून नवीन लागवड करतात. चांगल्या निचऱ्याची भुसभुशीत मोकळी जमीन, चांगला सूर्यप्रकाश व प्रथम भरपूर पाणी लागते. हे १.५५० मी. उंचीच्या खाली चांगले वाढते.
जमदाडे, ज. वि.