जॅझ : जॅझ (जाझ) हा मुळात निग्रो संगीतातून विकसित झालेला अमेरिकन संगीतप्रकार आहे. अमेरिकेच्या वसाहतपर्वात कॅरिबियन बेटाद्वारे निग्रो गुलामांकडून आफ्रिकन संगीताचीही आयात झाली. त्यात साध्या ख्रिश्चन स्तोत्रांचे, मजुरीवर पाठविलेल्या गुन्हेगारांच्या उत्स्फूर्त श्रमगीतांचे व कृषिगीतांचे मिश्रण होऊन जॅझचा उगम झाला, असे इतिहासकार सांगतात.

 आधुनिक जॅझचा उगम एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस न्यू ऑर्लीअन्सच्या वेश्यावस्तीत झाला. तिथे येणाऱ्या गिऱ्हाईकांचे मनोरंजन निग्रो संगीतकार करीत. संगीताचे शिक्षण नसलेल्या या संगीतकारांचा अनुभव रस्त्यांवरील संचलन बँडमधील वादनापुरता मर्यादित होता. त्यांचा भर तत्कालस्फूर्त वादनावर असे. त्यामुळे त्यांच्या वादनप्रकारांचा पुरावा राहिलेला नाही. सर्वांत आधीची जॅझ ध्वनिमुद्रिका १९१६ च्या सुमाराची असावी. १९२० च्या सुमारास ‘रॅगटाइम’ या त्यावेळच्या लोकप्रिय संगीतास जॅझने मागे टाकले होते. जॅझच्या ध्वनिमुद्रिका प्रारंभी फक्त निग्रो चाहत्यांपुरत्याच मर्यादित असत. पुढे सर्व प्रकारच्या जनतेमध्ये त्यांचा प्रसार वाढला. अल्पावधीतच जॅझचा समावेश लोकप्रिय संगीतात झाला. यानंतरचा जॅझ इतिहास म्हणजे नवीन शैलींचा उदय, त्यांची अफाट लोकप्रियता आणि कालांतराने अधोगती असा सांगता येईल. लूई आर्मस्ट्राँग, ड्यूक एलिंग्टन, बेनी गुडमन, चार्ली पार्कर, डिझी गिलेस्पी हे काही प्रख्यात जॅझ रचनाकार होत.

 १९२० नंतर काही संगीतरचनाकारांनी जॅझचे काही रचनाविशेष शिष्टमान्य संगीताच्या बांधणीत वापरायला सुरुवात केली. १९५० नंतर व्हेबर्नच्या अनुयायांनी जॅझची व यूरोपीय शास्त्रीय संगीताची सांगड घालण्याचाही प्रयत्न केला. ही प्रक्रिया अजूनही चालू आहे.

संदर्भ : 1. Feather, Leonard, The New Encyclopedia of Jazz, New York, 1960.

           2. Stearns, Marshall, The Story of Jazz, Oxford, 1956.

रानडे, अशोक