अष्टपदी : अष्टपदी म्हणजे प्रत्येकी पालुपद वा ध्रुवपद असलेल्या आठ पदांची रचना. जयदेव कवीच्या ⇨गीतगोविंदकाव्यातील चोवीस कवनांना ‘अष्टपदी’ म्हणतात. त्यांतील पहिल्या दोन सोडल्यास बाकीच्या आठ पदांच्या रचना आहेत. त्यांची जातकुळी भक्तिसंगीताची असली, तरी त्या दाक्षिणात्य संगीतसभांमध्येही गाइल्या जातात. मात्र आज त्या मूळ गीतांत त्या त्या गीतासाठी म्हणून उल्लेखिलेल्या रागतालातच गाइल्या जात नाहीत. अष्टपदीचे उद्‍ग्राह व ध्रुव (म्हणजे नंतरचे ⇨ पल्लवी व ⇨चरण) असे दोन गानभान असतात. दाक्षिणात्य संगीतात विशेषत्वाने आढळून येणाऱ्या द्वितीयाक्षरप्रासाऐवजी अंत्यप्रासच यात असतो. नंतरच्या शतकात विकसित झालेल्या स्वर व नृत्य नाट्याची बीजे गीतगोविंदात आढळतात. चंद्रशेखरेंद्र सरस्वतीची शिवाष्टपदी, रामकवीची रामाष्टपदी, तसेच गीतसुंदरम् व स्कंदाष्टपदी अशा गीतगोविंदासारख्या रचिलेल्या रचनांचाही उल्लेख योग्य ठरेल.

सांबमूर्ती, पी. (इं.) मंगरूळकर, अरविंद (म.)