जॅक्सन : अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याची राजधानी. लोकसंख्या १,५३,०६८ (१९७०). न्यू ऑर्लीअन्सच्या उत्तरेस २९१ किमी. पर्ल नदीवर फ्रेंच-कॅनडियन व्यापारी ल्‌वी ले फ्लर याने १७९२ मध्ये वसविले. व्यापारी ठाण्याच्या जागी १८२१ मध्ये राज्याची राजधानी करून जनरल अँड्रू जॅक्सनच्या स्मरणार्थ यास जॅक्सन नाव दिले गेले. पहिला लोहमार्ग १८४० मध्ये सुरू झाला. यादवी युद्धात याची बरीच हानी झाली. येथे १९३० मध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन होऊ लागल्यामुळे याची झपाट्याने वाढ होऊन महत्त्वाचा लोहमार्ग, जहाज वाहतूक, निर्मिती-उद्योग व शैक्षणिक केंद्र इत्यादींचा सर्वांगीण विकास झाला आहे. १९६० मध्ये बांधलेल्या पर्ल नदीप्रकल्पामुळे उद्योग, शेती व मनोरंजन यांस उपयोग झाला आहे. शहरात विधी, वैद्यक इ. महाविद्यालये, मिसिसिपी विद्यापीठ, पंगुगृहे, कलावीथी, संग्रहालय, ग्रंथालय, चित्रपटगृहे, नृत्यगृहे, संगीतगृहे, सिंफनी वाद्यवृंद इ. शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था असून प्रत्येक वर्षी ‘मिसिसिपी आर्ट्स फेस्टिव्हल’ हा उत्सव असतो. येथे लाकूड, कपडे, सरकीचे तेल, वाहनांचे भाग, अनुस्फुरक दिवे, लोखंडी व पोलादी ओतकाम, संवेष्टित मांस इ. उद्योग चालतात. येथे अमेरिकेचा एक लष्करी विमानतळ व महाविद्यालय आहे.

कांबळे, य. रा.