जलंदर : पंजाब राज्यातील जलंदर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. दिल्लीपासून ३६८ किमी. वर व होशियारपूरपासून ३९ किमी.वर बसलेले ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले शहर. लष्करी छावणीसह लोकसंख्या २,९६,१०३ (१९७१). हे प्राचीन काळी जालंधर म्हणजेच त्रिगर्त या राज्याची राजधानी होते. मुहंमद गझनीच्या स्वाऱ्यांपासून ते कसेबसे तगून राहिले. ह्युएनत्संग सातव्या शतकात येथे येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. त्याने वर्णन केलेल्यांपैकी फक्त दोन बांधीव तलाव सध्या उरलेले आहेत. मोगल साम्राज्याच्या काळी सतलज (शतद्रु) आणि बियास (व्यास) या दोन नद्यांमधील प्रदेशाच्या राज्याची ही राजधानी होती. १८५७ मध्ये शेख करम बक्ष ह्या सुभेदाराने बांधलेली एक सुंदर सराई अजून चांगल्या स्थितीत आहे. येथे क्रीडा-साहित्याचा कारखाना आहे. रेशमी वस्त्रे, होजिअरी, शेतीउपकरणे, हातमाग, कापड रंगविणे, खेळणी, सिगारेट, आटा, तेलघाण्या, कातडी कमावणे इ. व्यवसाय व गहू, ऊस, कापूस, हरभरा यांचा व्यापार येथे चालतो. उत्तम सुतारकाम हे येथील वैशिष्ट्य आहे. शेतकी व अभियांत्रिकी शिक्षणाच्या सोयी आहेत.

नाईक, शुभदा