मागेलांग : इंडोनेशिया जावा बेटारील मध्य जावा प्रांताच्या याच नावाच्या जिल्ह्यातील प्रमुख शहर. लोकसंख्या ९६,००० (१९७५ अंदाज). हे जोगजाकार्ताच्या उत्तर वायव्येस ४० किमी. मौंट सुबिंग व मौंट मेरापी यांदरम्यान, प्रागा नदीकाठी वसलेले आहे. रस्ते व लोहमार्ग यांच्या सुविधांनी युक्त असे हे शहर १९४९ पर्यंत डचांचे लष्करी ठाणे म्हणून प्रसिद्ध होते. याच्या आसमंतात ऊस, तंबाखू, भात यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून कृषिमालाची मोठी बाजारपेठ म्हणून यास महत्त्व आहे. येथे कापड गिरण्या आहेत. शैक्षणिक दृष्ट्याही यास महत्त्व असून येथे सैनिकी अकादमीही आहे. मौंट सुबिंग हा प्रसिद्ध ज्वालामुखी आहे. शहराच्या दक्षिणेस असलेल्या बोरोबुदूरच्या इ.स.सु. ८०० मधील बुद्ध मंदिरांमुळे येथे पर्यटकांची गर्दी असते.

लिमये, दि. ह.