सायबीरिया : रशियन सिबीर. रशियातील एक विस्तृत प्रदेश. याचा विस्तार पश्चिमेस उरल पर्वतश्रेणीपासून पूर्वेस पॅसिफिक महासागर किनाऱ्यापर्यंत, तसेच उत्तरेस आर्क्टिक महासागर किनाऱ्यापासून दक्षिणेस उत्तर-मध्य कझाकस्तानमधील टेकड्यांपर्यंत आणि मंगोलिया व चीनच्या सरहद्दीपर्यंत झालेला आहे. सायबीरियाने रशियाचे सु. ७५ टक्के क्षेत्र (सु.१,३४,८८,५०० चौ. किमी.) व्यापले असून त्यात रशियातील फक्त २० टक्के लोक राहतात. तार्तर लोक सायबीरियाचा उल्लेख स्लीपिंग लँड (निद्रिस्त भूमी) असा करीत असत.

भूवर्णन: प्राकृतिकदृष्ट्या सायबीरियाचे पुढीलप्रमाणे मुख्य चार विभाग पडतात: (१) पश्चिम सायबीरियन मैदानी प्रदेश, (२) मध्य सायबीरियन मैदानी व पठारी प्रदेश, (३) ईशान्य सायबीरियाचा पर्वतीय श्रेण्यांचा प्रदेश (रशियन फार ईस्ट) आणि (४) दक्षिण व आग्नेय सायबीरियाचा उच्चभूमी व पर्वतीय प्रदेश. पश्चिमेस उरल पर्वतश्रेणीपासून पूर्वेस येनिसे नदीपर्यंत पश्चिम सायबीरियाचा सखल मैदानी प्रदेश असून त्यात दक्षिणेस कझाकस्तानमधील स्टेपच्या निमओसाड प्रदेशापासून उत्तरेस आर्क्टिक किनाऱ्यावरील बर्फाच्छादित अतिथंड प्रदेशापर्यंतचा समावेश होतो. ओब या मुख्य नदीने या प्रदेशाचे जलवहन केलेले असून त्यातील बराचसा भाग दलदलयुक्त आहे. हा जगातील सर्वांत विस्तृत दलदली प्रदेशांपैकी एक आहे. ही सखल भूमी फारच विस्तृत असून तिचे क्षेत्रफळ सु. २·५ द. ल. चौ. किमी. आहे. या प्रदेशाची उंची क्वचितच ६०–९० मी. पेक्षा अधिक आहे.समुद्रकिनाऱ्यापासून १,६१० किमी. अंतर्गत भागात असलेले ऑम्स्क हे शहर स स. पासून केवळ ८२ मी. उंचीवर आहे.

पश्चिमेस येनिसे नदीपासून ते पूर्वेस लीना नदीपर्यंत मध्य सायबीरियन मैदानी व पठारी प्रदेश आहे. या प्रदेशाला अंगारा ढालक्षेत्र असेही संबोधले जाते. प्रदेशाची सर्वसाधारण उंची ३०० ते ९०० मी. दरम्यान असून उच्चभूमी प्रदेशात ती १,२०० मी. पेक्षा अधिक आढळते. ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश या तिसऱ्या प्राकृतिक विभागात अनेक ओबडधोबड पर्वतश्रेण्या आहेत. त्यांपैकी पश्चिम भागातील याब्लोनाय, जुग्जूर व व्हर्कोयान्स्क पर्वतश्रेण्या, मध्य भागातील चेर्स्की पर्वतश्रेणी (उंची २,७०० मी.) आणि पूर्व भागातील अनादीर व कॅमचॅटका या प्रमुख पर्वतश्रेण्या आहेत. कॅमचॅटका द्वीपकल्पावरील श्रेदीनी पर्वतश्रेणीत काही जागृत ज्वालामुखी आहेत. त्यांपैकी क्लीऊचिफ्स्काय (उंची ४,७५० मी.) हा सायबीरियातील सर्वोच्च जागृत ज्वालामुखी आहे. दक्षिण व आग्नेय सायबीरिया उच्चभूमी व पर्वतीय प्रदेश आहे. या भागात अल्ताई, तन्नुओला, सायान व सीखटे अल्यीन या ओबडधोबड पर्वतश्रेण्या आहेत.

खनिजे : सायबीरियात नैसर्गिक संसाधने विपुल आहेत. खनिज तेल, नैसर्गिक वायू, दगडी कोळसा, सोने, हिरे, लोह खनिज, प्लॅटिनम, टंगस्टन यांचे विपुल साठे आहेत. १९६० च्या दशकात वायव्य सायबीरियातील ओब नदीखोऱ्यात विस्तृत खनिज तेलसाठे सापडल्याने सॅकालीन बेटावरील तेल उत्पादन घटले. १९८० मध्ये संपूर्ण सोव्हिएट युनियनला लागणाऱ्या तेलापैकी जवळजवळ निम्मे तेल पश्चिम सायबीरिया पुरवीत होता. नैसर्गिक वायूचे समृद्घ साठे ईशान्य सायबीरियातील ट्यूमेन ओब्लास्ट व याकूत्स्कजवळ सापडले आहेत. तेथील तेल उत्पादनास १९७० च्या दशकात सुरुवात झाली. कुझनेट्स्क बेसिन, टुंगुस्टा पठार, इर्कुत्स्क व ट्रान्स बैकलिया प्रदेश व लीना नदीचे खोरे येथे प्रमुख कोळसा क्षेत्रे आहेत. बैकल सरोवराभोवतीत सेचलीना व कोलीमा नद्यांच्या खोऱ्यांत सोन्याचे साठे आहेत. कुझनेट्स्क बेसिन व ट्रान्स बैकलिया प्रदेशात लोहखनिजाचे साठे आहेत. पश्चिम याकुतियामध्ये हिऱ्याचे साठे सापडले आहेत. याशिवाय शिसे, जस्त, निकेल, टंगस्टन, कथील, मॉलीब्डेनम आणि मँगॅनीज या खनिजांचे उत्पादनही सायबीरियातून होते.

 मृदा : आर्क्टिक किनाऱ्यापासून २४० ते ३२० किमी. पर्यंतच्या अंतर्गत प्रदेशात गोठलेल्या अवस्थेतील टंड्रा मृदेचा पट्टा आहे. या मृदा अम्लीय व शेतीस निरूपयोगी आहेत. या पट्ट्याच्या दक्षिणेस राखाडी रंगाच्या पॉडझॉल मृदेचा रुंद व सलग पट्टा आढळतो. ह्या मृदा अतिशय निक्षालित असून सूचिपर्णी वनस्पतींच्या वाढीला विशेष पोषक ठरल्या आहेत.नैर्ऋत्य भागात चर्नोसेम ह्या सुपीक मृदेचा पट्टा असून तो गवत व वनस्पतींच्या वाढीला पोषक ठरला आहे. हाच स्टेपचा गवताळ प्रदेश आहे.

नद्या व सरोवरे : सायबीरियात अनेक मोठ्या नद्या असून त्या प्रामुख्याने उत्तरेस आर्क्टिक महासागराकडे वाहत जातात. अमूर ही एकमेव मोठी नदी ओखोट्स्क समुद्राला मिळते. उत्तरवाहिनी नद्यांची खालच्या टप्प्यातील पात्रे दीर्घकाळ गोठलेली असतात. त्यामुळे त्यांचा जलवाहतुकीसाठी उपयोग होत नाही. पश्चिम सायबीरियाच्या सखल भूमीचे जलवाहन ओब-इर्तिश या नदीप्रणाली करतात. पश्चिम-मध्य सायबीरियातून येनिसे नदी वाहत असून ती मध्य सायबीरियाच्या उच्चभूमीचे जलवाहन करते. बैकल सरोवराजवळ उगम पावणारी लीना नदी उत्तरेस वाहत जाते. अगदी पूर्व भागातून इंडिगिर्का, कोलीमा व अनादीर नद्या वाहतात. आग्नेय भागाचे जलवाहन अमूर व तिच्या अर्गून आणि उसूरी या उपनद्या करतात. 

बैकल हे जगातील सर्वांत खोल (खोली १,७४२ मी.) सरोवर दक्षिण मध्य सायबीरियात आहे. या सरोवराने ६३६ किमी. लांबीची व ८० किमी. रुंदीची खचदरी आणि ३१,५०० चौ. किमी. चे क्षेत्र  व्यापले आहे.


 हवामान : सागरकिनाऱ्यापासून दूरवर पसरलेला हा प्रदेश असल्याने बहुतांश भागातील हवामान खंडीय विषम स्वरूपाचे आहे. वार्षिक तापमानकक्षा अधिक असते. उन्हाळे उबदार व अल्पकालीन, तर हिवाळे थंड व दीर्घकालीन असतात. सायबीरियाच्या विशिष्ट स्थानामुळे हिवाळ्यातील आशियाई भागातील सर्वांत जास्त वायुभाराचे स्थिर केंद्र बैकल सरोवराभोवती केंद्रित झालेले असते. जानेवारीमध्ये व्हर्कोयान्स्क येथील नीचतम तापमान−५०° से. पर्यंत खाली जाते. तेच कॅमचॅटका द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात व सॅकालीन बेटावर −९° से. आढळते. उन्हाळ्यात येथील जास्त भाराचे क्षेत्र क्षीण होत जाते. जुलैमध्ये आर्क्टिक किनाऱ्यावरील तापमान ५° से. तर मध्य सायबीरियात उन्हाळ्याच्या मध्यातील तापमान ३२° ते ३८° से. यांदरम्यान आढळते. ईशान्य सायबीरियात जानेवारीचे तापमान −५१° से. तर जुलैचे १५° से. असते. तेच स्टेपमध्ये अनुकमे −१६° से. व १८° से. असते.

वार्षिक सरासरी वृष्टिमान ३० सेंमी. असून उत्तर व ईशान्य भागात ते १३ सेंमी., कॅमचॅटका द्वीपकल्प आणि प्रिमॉरस्की काई (मॅरिटाइम टेरिटरी) प्रदेशात १०० सेंमी. तर स्टेप भागात ८० सेंमी. आढळते. पूर्वेकडे हवामान अधिक रूक्ष बनत असून तेथे वृष्टिमानही कमी आहे. तेथील बहुतांश भाग नित्य गोठीत असतो. हिवाळ्यातील बर्फाच्छादनाची खोली कॅमचॅटका द्वीपकल्पावर १३० सेंमी., वायव्य सायबीरियात ८१ ते १०० सेंमी. तर बैकल सरोवराच्या नैर्ऋत्येस ती फक्त १२·५ सेंमी. असते. प्रतिवर्षी बर्फाच्छादनाचा कालावधी दक्षिण भागात १४० दिवस तर उत्तर भागात २६० दिवसांपेक्षा अधिक असतो. सायबीरियातील नद्या दक्षिण भागात ४ ते ६ महिने तर उत्तर भागात ८ महिन्यांपेक्षा अधिक काळ गोठलेल्या असतात.

वनस्पती व प्राणी : सायबीरिया ही प्रामुख्याने वनांची भूमी आहे. बहुतांश प्रदेश दलदलीच्या अरण्यांनी किंवा तैगा प्रदेशाने व्यापला आहे. आर्क्टिक किनाऱ्याच्या अंतर्गत भागात ३२० किमी. पर्यंतच्या परिसरात टंड्रा प्रदेश असून त्यात हरिता, दगडफूल, गवत व कमी उंचीची झुडुपे आढळतात. सायबीरियाचे ४० टक्के क्षेत्र सूचिपर्णी किंवा तैगा (जंगलयुक्त दलदल) अरण्यांनी व्यापले आहे. साधारण पर्जन्य, निकृष्ट जलनिकास, कमी बाष्पीभवन यांमुळे बहुतांश तैगा प्रदेशात रूतन (बॉग) परिस्थिती निर्माण झालेली आहे. पश्चिम सायबीरियातील तैगा प्रदेश फर, बर्च व ॲस्पेन वृक्षांसाठी, तर पूर्व सायबीरियातील वने फर, लार्च, पाइन व स्प्रूस वृक्षांसाठी प्रसिद्घ आहेत. अमूर-उसूरी प्रदेशात मिश्र वने असून त्यांत फर, लार्च, पाइन, सीडार तसेच ओक, मेपल, एल्म, लाइम, विलो व इतर पानझडी वृक्ष आढळतात. ओखोट्स्क समुद्र किनाऱ्यावर लार्च वृक्षांचे आधिक्य आहे. नैर्ऋत्य सायबीरियात तैगा व पानझडी वने आणि स्टेपचा गवताळ प्रदेश असे मिश्र वनस्पतिजीवन आढळते. सायबीरियातील हा सर्वांत समृद्घ कृषी प्रदेश आहे.

फरयुक्त प्राणी हे सायबीरियातील प्राण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या प्राण्यांची शिकार हा तैगा प्रदेशातील प्रमुख व्यवसाय आहे. कडाक्याच्या थंडीमुळे येथील लोकांना फरयुक्त कपडेच वापरावे लागतात. कोल्हा, एल्क, रेनडीयर, खार, ससा, रानमांजर, लांडगा, अस्वल, अर्मिन, सेबल, लेमिंग, वीझल इ. प्राणी मोठ्या संख्येने आढळतात. त्याशिवाय अमूर-उसूरी प्रदेशात वाघ, हरिण, मृग, बिबळ्या हे प्राणी आढळतात. येथील नद्यांमध्ये मासे व जलचर भरपूर आहेत. अगदी पूर्व भागातील जलाशयांत कॉड, सॅमन व हेरिंग मासे मोठ्या प्रमाणावर पकडले जातात. आर्क्टिक किनाऱ्यावर सील, वॉलरस व व्हेल आढळतात.

इतिहास : सायबीरियात वसाहतीसाठी पहिल्यांदा आलेले लोक यूरोपमधून आले की मध्य व पूर्व आशियातून आले याबाबत एकमत नाही. अडीच दशलक्ष वर्षांपूर्वीपासून सायबीरियात वस्ती असावी. दक्षिण सायबीरियात पुराणाश्मयुगीन वसाहतीचे अनेक पुरावे मिळतात. इ.स.पू. १,००० पासून हा प्रदेश चीनच्या ताब्यात, तर इ. स. पू. तिसऱ्या शतकात तुर्की-मंगोल प्रभावाखाली आला. इ. स. दहाव्या शतकापासून  ते पंधराव्या शतकाच्या मध्यापर्यंत ‘गोल्डन होर्ड’ या मंगोल साम्राज्याचा सायबीरिया हा एक भाग होता. मंगोलांनी येथील मूळ जमातींना उत्तरेकडील अरण्यांत पिटाळून लावले. सोळाव्या शतकात रशियनांनी येथील तार्तरांचा पराभव करून तेथे आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी येथे अनेक लहानलहान वांशिक गटांचे लोक रहात होते. त्यांचे प्रामुख्याने शिकार, फळे व कंदमुळे गोळा करणे, भटके पशुपालन, रेनडीयर पाळणे असे व्यवसाय चालत. त्यांत गुरे व घोडे पाळणाऱ्या याकूत लोकांचे प्रमाण सर्वाधिक होते.

इ. स. १५८१ मधील कॉसॅक स्वारीपासून सायबीरियावर रशियन अंमल सुरू झाला. सोळाव्या शतकाच्या अखेरीस तसेच सतराव्या शतकात रशियन फासेपारधी, फरचे व्यापारी आणि कॉसॅक समन्वेषकांनी सायबीरियाचा बेरिंग समुद्रापर्यंतचा प्रदेश काबीज केला. त्यांनी मोक्याच्या ठिकाणी तटबंदीयुक्त नगरे वसविली. ट्यूमेन (स्था. १५८५), टॉम्स्क (स्था. १६०४), कास्नोयर्स्क (स्था. १६२८) व इर्कुटस्क (स्था.१६५२) ही त्यांपैकी प्रमुख नगरे होत. इ. स. १६८९ मध्ये चीनबरोबर झालेल्या नेरचिन्स्क करारामुळे १८६० च्या दशकापर्यंत अमूर नदीखोऱ्याकडील विस्तारास रशियनांवर निर्बंध आले होते. तरीही सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत हळूहळू सायबीरियाचा बहुतांश भाग रशियाच्या आधिपत्याखाली आला. रशियनांच्या विस्ताराचे सायबीरियन लोकांवर वैयक्तिक रीत्या खूपच परिणाम झाले. पिळवणूक व नव्याने प्रसार झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे येथील लहानलहान मूळ जमातींचे अस्तित्व धोक्यात आले परंतु याकूत व बुर्मानसारख्या मोठ्या गटांनी रशियनांशी जुळवून घेऊन वसाहतकऱ्यांकडून आर्थिक लाभ उठविले. रशियनांनीही त्यांच्या अंतर्गत संस्था आणि चालीरीतींमध्ये हस्तक्षेप केला नाही. बहुतांश स्थानिक नाममात्र ख्रिश्चन बनले. मंगोलांना जसा कर द्यावा लागत असे त्याप्रमाणे रशियन राज्यकर्तेही स्थानिक रहिवाशांकडून विशेषतः फर व्यापाऱ्यांकडून कर वसूल करत असत.

स्थानिक रशियन प्रशासनामधील व्यक्तींची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी कृषी व्यवसाय करणाऱ्या रशियनांचे या प्रदेशात आगमन झाले. अठराव्या शतकात फरच्या व्यापारात घट झाल्यानंतर खनिजांचे उत्खनन हा येथील प्रमुख आर्थिक व्यवसाय बनला. आधीचा रशियन अंमल व त्यानंतर सोव्हिएट युनियनची सत्ता असताना लक्षावधी हद्दपारित गुन्हेगार व राजकीय कैदी सायबीरियातील एकाकी ठिकाणी ठेवले जात. त्यांतील अनेक कैद्यांना कारखान्यांचे बांधकाम, खाणकाम, लोहमार्ग बांधणी इत्यादींमध्ये कामगार म्हणून काम करण्याची सक्ती केली जाई. ट्रान्स-सायबीरियन लोहमार्ग बांधून पूर्ण होईपर्यंत येथील रशियन वसाहतीला विशेष महत्त्व नव्हते परंतु लोहमार्ग बांधणीनंतर या प्रदेशात येणाऱ्या स्थलांतरितांचे प्रमाण वाढले. दक्षिण सायबीरियात तृणधान्ये व दुग्धजन्य पदार्थ उत्पादनासाठी आधुनिक कृषी पद्घतींचा वापर करण्यात येऊ लागला. तसेच काही ठिकाणी दगडी कोळसा उत्पादनास सुरुवात झाली. रशियन यादवी युद्घकाळात (१९१७–२०) बोल्शेव्हिक शासन विरोधातील ॲडमीरल आल्येक्सांडर कल्चाक याच्या नेतृत्वाखाली १९२० पर्यंत सायबीरियाच्या बऱ्याच भागावर रशियाचा कबजा होता. रशियन नेतृत्वाखाली इ. स. १९२२ मध्ये सोव्हिएट युनियनची स्थापना झाल्यानंतर संपूर्ण सायबीरिया नव्या रशियाला जोडण्यात आला. पुढे १९९१ पर्यंत सोव्हिएट युनियनचे अस्तित्व राहिले.


 आर्थिक स्थिती : सोव्हिएट युनियनच्या पहिल्या पंचवार्षिक योजना काळात (१९२८–३२) सायबीरियाच्या औद्योगिक विकासास बऱ्यापैकी सुरुवात झाली. १९३० च्या दशकापासून दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व इतर खनिजांच्या खाणींमधून मोठ्या प्रमाणावर उत्पादने मिळू लागली. त्यासाठी सक्तीने आणलेल्या कामगारांचा वापर करण्यात आला. दुसऱ्या महायुद्घकाळात सोव्हिएट युनियनच्या पश्चिम भागातील अनेक कारखान्यांचे तसेच कामगारांचे सायबीरियात स्थलांतर झाले. १९३०–३३ या कालावधीत शेतीचे सामुदायिकीकरण केल्यामुळे कृषिक्षेत्राची खूप हानी झाली.

सायबीरियाचा औद्योगिक विकास वेगाने झाला तो प्रामुख्याने १९५० या दशकाच्या अखेरीस व १९६० या दशकात. याच काळात मुख्यतः पश्चिम सायबीरियात खनिज तेल व नैसर्गिक वायूक्षेत्रे उत्पादनास खुली झाली.जपानमधील पोलाद उद्योगांना दगडी कोळसा पुरविण्याच्या दृष्टीने पूर्व सायबीरियातील कोळसा खाणींचा विकास करण्याबाबतचा करार सोव्हिएट युनियन व जपानमध्ये झाला (१९७४). रशियातील निम्म्यापेक्षा अधिक विद्युत् शक्ती सायबीरियातील नद्यांवर उभारलेल्या जलविद्युत्-निर्मिती प्रकल्पांमधून मिळते. अंगारा, येनिसे व ओब नद्यांवर प्रचंड आकाराचे जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले. येनिसे नदीवरील सायानो-शुशेन्स्क धरण हे जगातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक  आहे. स्थानिक प्रदेशातून मिळणारा दगडी कोळसा, लोहखनिज, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि लाकूड या संसाधनांवर आधारित कारखानदारी येथे विकसित झाली आहे.

सायबीरियातील कारखानदारी मुख्यतः कुझनेट्स्क बेसिनमध्ये केंद्रीत झाली आहे. पोलाद, खाणकाम, ॲल्युमिनियम शुद्घीकरण, कागदाचा लगदानिर्मिती, बांधकामाचे साहित्य, रसायने व कृषियंत्रे ही येथील प्रमुख उत्पादने आहेत. मध्य सायबीरियात ॲल्युमिनिअम, सोने, निकेल, कथील,  टंगस्टन, लिथियम, बेरिलियम व इतर धातूंवरील प्रक्रिया उद्योग चालतात. येथील अल्युमिनिअम उत्पादन विशेष महत्त्वाचे आहे. मध्य सायबीरियाच्या दक्षिण भागात इर्कुत्स्क, ब्रात्स्क व क्रॅस्नोयार्स्क इ. ठिकाणी उभारण्यात आलेल्या जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्पांतून उपलब्ध झालेली स्वस्तातील वीज येथील औद्योगिक विकासास पूरक ठरली आहे. उस्ट-कूट यांदरम्यानचा लीना नदीवरील बीएएम (बैकल-अमूर मॅजीस्ट्रल) लोहमार्ग आणि अमूर नदीवरील कोस्मोमोल्स्क-ऑन-अमूर लोहमार्ग (लांबी ३,२०० किमी.) १९८० मध्ये बांधून पूर्ण झाले. त्याचाही मध्य सायबीरियाच्या विकासास फायदा झाला. सायबीरियाच्या मुख्य प्रदेशापासून बराच दूरवर असलेला अगदी पूर्वभाग इतर प्रदेशाच्या तुलनेत बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण आहे. येथील कारखानदारी, खाणकाम व कृषी व्यवसायातील उत्पादित मालाची मुख्यतः स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जाते. फर, सोने, मासे, अधातू खनिजे यांची येथून निर्यात केली जाते. याकूतियामधील मिर्नि जिल्हा हिरे उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे.

सायबीरियाच्या आर्क्टिक किनाऱ्यावर रेनडीयरपालन, शिकार व मासेमारी हे प्रमुख व्यवसाय चालतात. सुपीक काळ्या मृदेमुळे दक्षिणेकडील स्टेप प्रदेश शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गहू या प्रमुख उत्पादनाबरोबरच  बार्ली, राय, ओट, सूर्यफूल, तंतुमय अंबाडी, बटाटा, वैरण पिके इ. कृषी उत्पादने घेतली जातात. पशुपालन व्यवसायही महत्त्वाचा असून गुरे, मेंढ्या व रेनडीयर हे प्राणी पाळले जातात. ताज्या दुधाला मर्यादित मागणी असल्यामुळे त्यांपासून दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. शुष्क स्टेप व अल्ताई पर्वतीय प्रदेशात गोमांस उत्पादक गायी तसेच मेंढ्या पाळल्या जातात. रशियातील सर्वाधिक लाकूड उत्पादन सायबीरियातून होते.

सायबीरियाच्या दक्षिण भागातून जाणारा ट्रान्स-सायबीरियन लोहमार्ग सायबीरियाच्या अर्थव्यवस्थेचा मूळ आधार असल्याने त्याला ‘सायबीरियाची जीवनरेषा’ असे मानले जाते. या लोहमार्गापासून उपमार्ग काढलेले असून त्यांद्वारे ऑम्स्क, ट्यूमेन, तातारस्क, कुलुंडा नोव्होसिबिर्स्क,  बार्नौल अचिन्स्क, आबाकान इ. प्रमुख ठिकाणे जोडली आहेत. सायबीरियातील प्रमुख नद्या हिमाच्छादित आर्क्टिक महासागराकडे वाहत जातात. त्यामुळे या नद्यांमधून हिमविरहित असताना साधारण सहा महिने जलवाहतूक केली जाते. एरव्ही बर्फफोडी बोटींच्या साहाय्याने मार्ग काढत वाहतूक केली जाते. खनिज तेल व नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी नळमार्गाचा वापर केला जातो.

लोक व समाजजीवन : सायबीरियातील लोकसंख्यावाढीचा वेग बराच कमी आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे बऱ्याच लोकांनी इतरत्र स्थलांतर केले आहे. त्यामुळे सायबीरियात लोकसंख्या विरळ आहे. लोकसंख्येचे केंद्रीकरण प्रामुख्याने पश्चिम व दक्षिण भागात झालेले आहे. पूर्व सायबीरिया हा सर्वांत विरळ लोकसंख्येचा प्रदेश आहे. सायबीरियातील बहुसंख्य रहिवासी रशियन असून त्याशिवाय युक्रेनियन, मंगोल, खाकास,  ट्रव्हिनियन, कझाक, चुकची, कॅमचॅटकन,  कोर्याक व सॅमाइड लोक आहेत. तुर्की भाषा बोलणारे याकूत, सायबीरियन, तार्तर मांचू-तुंगूझ भाषिक इव्हेन्क, इव्हेन फिनो-उगिक भाषिक खान्त, यान्सी व मंगोलिक भाषिक बुर्यत हे इतर भाषिक गटाचे लोक येथे आहेत. शेतीमध्ये प्रामुख्याने रशियन व युक्रेनियन असून त्यांनी १८९० च्या दशकात यूरोपीय रशियातून येथे स्थलांतर केलेले आहे. येथील स्थानिक रहिवाशांपैकी फिनिक जमातीचे लोक अरण्यमय व टंड्रा प्रदेशात तर तुर्की जमातीचे लोक अल्ताई पर्वतीय प्रदेशात राहतात. ओस्तियाक (खांटी), व्होगुल (मान्सी) व सॅमाइड (नेन्टसी) या फिनिक जमातीमधील उपजाती आहेत. शिकार, मासेमारी व रेनडीयर पाळणे हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत. अल्ताईमधील जमाती शिकारी व गुराखी आहेत. सायबीरियात नागरी वस्तीचे प्रमाण अधिक आहे. नोव्होसिबिर्स्क (लोकसंख्या १.४३ द. ल.–२००२), ऑम्स्क (१.१३ द. ल.), नोव्होकुझनेट्स्क, बर्नाऊल, केमेरोव्हो, प्रकॉप्येफ्स्क, टॉम्स्क, कॅस्नोयार्स्क ही सायबीरियातील प्रमुख नगरे आहेत.

चौधरी, वसंत