जर्मनी, पश्चिम : जर्मन प्रजासत्ताक संघराज्य (फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी). मध्य यूरोपातील आर्थिक दृष्ट्या प्रगत देश असून या देशाचा विस्तार ४७° उ. पासून ५५° उ. व ६° पू. पासून १४° पू. पर्यंत पसरलेला आहे. या देशाच्या उत्तर सीमेलगत डेन्मार्क, पूर्व सीमेलगत पूर्व जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया, दक्षिण सीमेलगत स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया आणि पश्चिम सीमेजवळ नेदर्लंड्‌स, बेल्जियम, लक्सेंबर्ग व फ्रान्स हे देश आहेत. वायव्य किनाऱ्यालगत उत्तर समुद्र व ईशान्य किनाऱ्यालगत बाल्टिक समुद्राचा भाग पसरलेला आहे. उत्तर-दक्षिण लांबी ८२७·२ किमी. व पूर्व-पश्चिम ४५० किमी. आहे. पश्चिम जर्मनीमध्ये बर्लिनचा पश्चिम भाग समाविष्ट केला आहे. या देशाचे एकूण क्षेत्रफळ २,४८,६०१ चौ. किमी. असून या देशाचे राज्यकारभारासाठी एकूण दहा प्रांतांत विभाजन करण्यात आले आहे. या प्रांतांनाच ‘लँडर्स’ असे म्हणतात. ३१ डिसेंबर १९७३ ची एकूण लोकसंख्या ६,२१,०१,४०० असून पुरुष २,९७,१३,८६० व स्त्रिया ३,२३,८७,६०० आहेत.

भूवर्णन : भौगोलिक दृष्ट्या पश्चिम जर्मनीचे पाच भागांत विभाजन करता येते. उत्तर समुद्राच्या किनाऱ्यालगत विस्तृत सखल प्रदेश पसरलेला आहे. किनाऱ्यालगतचा भाग वाळवंटी असून मध्यवर्ती भागाकडे या सखल मैदानाची उंची ३०० मी. पर्यंत वाढत गेली आहे. हा प्रदेश ऱ्हाईनपासून पूर्व जर्मनीपर्यंत पसरलेला आहे. पश्चिम भागात ऱ्हाईन नदीच्या खचदरीचा भाग येतो. जर्मनीचा दक्षिण भाग पठारे आणि पर्वतरांगा यांनी व्यापलेला आहे. यात ब्लॅक फॉरेस्ट व ओडनव्हाल्ट या प्रमुख पर्वतरांगा असून त्या पुढे २,००० ते ३,००० मी. उंचीच्या बव्हेरियन आल्प्स या अती उंच पर्वतरांगेला येऊन मिळतात. या पर्वतरांगेपुढे स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया हे भाग पश्चिम जर्मनीपासून विलग झाले आहेत. त्सूकश्पिट्‌स हे पश्चिम जर्मनीमधील सर्वांत उंच शिखर आहे. समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची ३,२०० मी. आहे. कॉन्स्टन्स हे या देशातील सर्वांत मोठे सरोवर आहे परंतु या सरोवराचा काही भाग स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियामधे मोडतो. देशाचा दक्षिण भाग सोडल्यास या देशातील सर्व नद्या उत्तर समुद्राकडे वाहत जातात. पश्चिम भाग ऱ्हाईन व तीच्या उपनद्यांनी व्यापलेला आहे. मोझेल आणि मेन या तिच्या दोन उपनद्या आहेत. ऱ्हाईन नदी खचदरीतून सु. ८०० किमी. अंतरापर्यंत वाहत जाते. पूर्व भागात एम्स, वेझर, आणि एल्ब या नद्या आहेत. या नद्यांच्या मुखांशी खाड्या निर्माण झाल्या आहेत. या खाड्यांवर उत्तम बंदरे वसली आहेत. दक्षिण भागातून डॅन्यूब नदी सु. ६४० किमी. अंतरापर्यंत पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते. पश्चिम जर्मनीच्या वायव्य किनाऱ्यालगत फ्रिझियन बेटे आहेत. एल्ब नदीच्या मुखाशी हेल्गोलँड नावाचे लहानसे बेट आहे.

हवामान : पश्चिम जर्मनीचे हवामान सौम्य असले, तरी हवेत एकसारखा बदल होत असतो. जानेवारी महिन्याचे सरासरी तपमान स्थलकालपरत्वे –२·८° से. ते १·१° से. इतके असते. पर्वतीय भागात जानेवारी महिन्याचे तपमान सर्वांत कमी म्हणजे –६·१° से. इतके असते. उत्तरेकडील सखल प्रदेशात जुलै महिन्यातील सरासरी तपमान १६·१° से. ते १८·९° से. इतके असते. ऱ्हाईन नदीच्या वरच्या टप्प्यातील प्रदेशात जुलै महिन्यातील तपमान जास्त म्हणजे २०° से. इतके असते. वार्षिक सरासरी तपमान ८·९° से. असते. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांपासून वर्षभर पाऊस पडतो. उत्तरेकडील सखल प्रदेशात स्थलपरत्वे पावसाचे प्रमाण ५० ते ७० सेंमी., मध्य भागातील पर्वतीय प्रदेशात ६८ ते १०० सेंमी. इतके असते. बव्हेरियन आल्प्स पर्वतावर पावसाचे प्रमाण सर्वांत जास्त म्हणजे १९५ सेंमी. असते. जानेवारी ते मार्च या कालावधीत उंच पर्वतशिखरे हिमाने आच्छादिलेली असतात. जानेवारी महिन्यात हिमावरणाचे प्रमाण जास्त असते.

प्राणीववनस्पती : पश्चिम जर्मनीमध्ये मध्य यूरोपात आढळणारे प्राणी व वनस्पती आढळतात. येथे नद्यांत व उत्तर समुद्रात कार्प, टेंच, स्टर्जन, सॅमन इ. मासे सापडत असून स्थलांतरित पक्षीही बरेच आहेत. जंगली कबूतर, कोकीळ, सुतारपक्षी, जे इ. पक्षी असून रानडुक्कर, बॅजर, ऑटर, लिंक्स वगैरे प्राणी आढळतात. बराचसा भाग सूचिपर्णी अरण्यांनी व्यापलेला आहे. या प्रकारची अरण्ये पर्वतभागात आढळतात. यांशिवाय कमी पावसाच्या प्रदेशात पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. बीच आणि ओक या प्रमुख झाडांच्या जाती आढळतात. उंच पर्वतभागात स्प्रूस वृक्षांची जंगले, तर किनाऱ्यालगतच्या रेताड जमिनीवरच्या भागात पाइन व लार्च वृक्षांची जंगले आढळतात. ऋतूनुसार या भागात निरनिराळ्या जातींचे पक्षी स्थलांतर करताना आढळतात.

दाते, सु. प्र.

राजकीयस्थिती : मे १९४९ मध्ये हे संघराज्य स्थापन झाले. या संघराज्याचे दहा घटक प्रदेश आहेत. पश्चिम बर्लिन या प्रजासत्ताकाचा शासकीय घटक आहे. १९५५ मध्ये या संघराज्याला संपूर्ण सार्वभौमत्व देण्यात आले. प्रजासत्ताकाचे संविधान अंमलात येऊन सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर पश्चिमी देशांनी आपला लष्करी ताबा उठविला व लष्करी प्रश्नांवर स्वतंत्रपणे करार केले. या संघराज्याची राजधानी बॉन आहे.

पश्चिम जर्मनीत जुन्या अविभक्त जर्मनीच्या बहुतेक औद्योगिक विभागांचा समावेश आहे. १९४९–६३ या काळात डॉ. ⇨कोनराड आडनौअर  यांचे कणखर राजकीय नेतृत्व व लुडविग एरहार्ट यांचे कुशल आर्थिक धोरण पश्चिम जर्मनीला मिळाले. अमेरिकेच्या मार्शल योजनेनुसार १९४८–५१ या काळात ३ अब्ज ६३ कोटी डॉलर आर्थिक मदत तिला लाभली. पश्चिमी राष्ट्रांचा विश्वास संपादन करून जर्मनीच्या पुर्नरचनेला त्यांचे सहकार्य मिळविण्याचे आडनौअर यांचे धोरण होते.

१९५२ मध्ये आडनौअर यांनी फ्रान्स आणि इटली यांच्या सहकार्याने यूरोपीय कोळसा व पोलाद समूह म्हणजे कोळसा आणि पोलादासाठी यूरोपची सामूहिक बाजारपेठ स्थापन केली. १९५८ मध्ये यूरोपीय सामायिक बाजारपेठ व परमाणू संशोधनाची सामूहिक यंत्रणा (यूरोटॉम) निर्माण केली. आडनौअरच्या या उपक्रमांनी यूरोपात आर्थिक सहकार्याचे एक नवे युग सुरू झाले. व प. जर्मनीला यूरोपमध्ये पुन्हा मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले. आपल्या चौदा वर्षांच्या कारकीर्दीत आडनौअर यांनी प. जर्मनीची यूरोपशी एकात्मता घडवून आणली. पश्चिमी देशांशीच मित्रत्व राखून दुभंगलेल्या जर्मनीचे पुन्हा एकीकरण करता येईल, अशी त्यांची धारणा होती. पूर्व जर्मनीच्या स्वतंत्र राज्याचे अस्तित्व त्यांनी कधीच मान्य केले नाही. फ्रान्स व जर्मनीच्या एकतेला ते विशेष महत्त्व देत.

मे १९५५ मध्ये प. जर्मनी संपूर्ण सार्वभौम राष्ट्र झाले. नाटो या लष्करी करारातही प. जर्मनीला स्थान मिळाले. कोळशाच्या खाणी असलेला झारलँड प्रदेश फ्रान्सने आपल्या ताब्यात ठेवला होता. तोही १९५७ मध्ये प. जर्मनीला परत मिळाला. युद्धाच्या विध्वंसातून प. जर्मनीचे जे पुनरुत्थापन झाले, तो आधुनिक काळातील एक चमत्कार समजला जातो. १९५० पासून यूरोपीय व्यापारी देशांत प. जर्मनीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले. १९५६ मध्येच प. जर्मनीचे उत्पादन १९३८ च्या तिप्पट झाले होते. राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीने यूरोपीय देशांत प. जर्मनीचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.


१९६३ मध्ये आडनौअर यांनी फ्रान्सला भेट देऊन त्या देशाशी मैत्री जोडली. आडनौअर यांच्या राजवटीत अनेक नाझी व्यक्ती मोठ्या अधिकारपदांवर असल्यामुळे ब्रिटनमध्ये मात्र त्यांच्याबद्दल तेवढा विश्वास निर्माण झाला नाही.

१९६९ मध्ये सोशॅलिस्ट डेमॉक्रॅटिक पक्षाचे विली ब्रांट हे चॅन्सलर झाल्यावर प. जर्मनीच्या विदेशनीतीला त्यांनी नवे वळण दिले. रशिया व पूर्व यूरोपमधील समाजवादी देशांबरोबर मैत्रीचे संबंध जोडण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. सोव्हिएट रशियाशी राजकारणात शस्त्रबळाचा वापर न करण्यासंबंधी करार केला. पोलंड व हंगेरीशीही त्यांनी सख्य जोडले. पोलंडला लागून असलेली ओडर नदीची सीमारेषा मान्य केली. विली ब्रांट यांच्या प्रयत्नांमुळेच १९७२ च्या डिसेंबरमध्ये पश्चिम व पूर्व जर्मनीत करार होऊन उभय देशांत राजनैतिक संबंध प्रस्तापित झाले. नागरिकांना सवलती मिळाल्या व या करारामुळेच दोन्ही देशांना सप्टेंबर १९७३ मध्ये संयुक्त राष्ट्रांत प्रवेश मिळाला. १९७४ मध्ये विली ब्रांट यांचे निकटवर्ती सचिव हे पूर्व जर्मनीचे हेर असल्याचे उघडकीस आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.

पश्चिम जर्मनीचे संविधान संघराज्यात्मक आहे. प. जर्मनीच्या घटकराज्यांना अमेरिकेतील घटकराज्यांपेक्षा अधिक स्वायत्तता देण्यात आली आहे. संघराज्याच्या शासकीय यंत्रणेला समांतर अशी शासकीय यंत्रणा घटक राज्यात आहे. प. जर्मनीच्या घटनेतही मानवी हक्कांच्या मूलभूत तत्त्वांना ग्रथित करण्यात आले असून न्यायखात्याला निरपवाद स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

बुन‌डेसटाख म्हणजे केंन्द्रीय विधिमंडळ. दर चार वर्षांनी प्रौढ मतदानाने व प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने ते निवडले जाते. वरिष्ठ विधिमंडळात घटक राज्यांचे प्रतिनिधी राज्यांनीच निवडून पाठवावयाचे असतात. प. बर्लिनला सल्लागार सदस्य म्हणून दोन्ही सदनांत आपले प्रतिनिधी पाठविता येतात.राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख आणि चँन्सलर (महामंत्री) संघराज्याचा शासनप्रमुख असतो. बुनडेसटाखमध्ये निर्णायक बहुमताने संघराज्याचे प्रतिनिधी निवडले जातात. संघराज्याकडे परराष्ट्रव्यवहार, संरक्षण, नागरिकत्व, चलन, जकात, रेल्वे, टपाल इ. खाती असतात. शिक्षण व पोलीस ही खाती घटक राज्यांकडे आहेत. ६ ते १८ वर्षांपर्यंत शिक्षण सक्तीचे असते. राष्ट्राध्यक्षाची निवड पाच वर्षांकरिता होते.

पश्चिम जर्मनीचे संविधान संघराज्यात्मक असले, तरी न्यायव्यवस्था केंद्रीय आहे. शहर, जिल्हा, राज्य व केंद्र अशा चढत्या श्रेणीतील न्यायालये आहेत. केंद्रीय न्यायालयाचे न्यायाधीश संसदेच्या दोन्ही सदनांनी निवडलेले असतात. संसदेने मंजूर केलेल्या एखाद्या विधेयकाने संविधानास अथवा त्यात दिलेल्या हमीस बाधा येत असेल, तर अशी विधेयके रद्द करण्याचा या श्रेष्ठ न्यायालयाला अधिकार आहे. प. जर्मनीत देहान्ताची शिक्षा नाही.

साक्रीकर, दिनकर

संरक्षणव्यवस्था : दुसऱ्या जागतिक महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाला. दोस्त राष्ट्रांनी जर्मनीला संपूर्ण निःशस्त्र केले. अमेरिका, ग्रेट ब्रिटन व फ्रान्स यांनी प. जर्मनीत लष्करशाही किंवा तत्सम विचार निर्माण न होण्याची काळजी घेतली परंतु पूर्व जर्मनीमध्ये लष्करी बळाची होत असलेली वाढ पाहून, मे १९५५ मध्ये प. जर्मनीला नाटोचे (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सदस्य करण्यात आले. सदस्यत्वाबरोबर नाटो लष्करी संघटनेला लष्करी साहाय्य देण्याची जबाबदारी पश्चिम जर्मनीवर पडली आणि १९५६ मध्ये संरक्षणव्यवस्था अंमलात येऊन स्वेच्छा व सक्तीची सैनिकभरती सुरू झाली. १९७० पर्यंत सु. पाच लक्ष सैनिक भरती झाले. भूसेना, नौसेना, वायुसेना व सीमारक्षक सेना असे लष्करी व्यवस्थेचे चार भाग आहेत. संरक्षण–संघटनेला ‘बुंडश्वेहर’ म्हणतात. इतर राष्ट्रांच्या संरक्षण संरचनेप्रमाणे बुंडश्वेहरमध्ये जनरल स्टाफ नाही. संरक्षण व संबंधित समस्यांचा विचार आणि कार्यक्रम ही कामे एक समिती करते. ही समिती प. जर्मनीच्या बुंडस्टागला (लोकसभेला) जबाबदार आहे. संरक्षणमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो. नाटोच्या विभागीय सेनापतीच्या आधिपत्याखाली प. जर्मन सेना लष्करी कामे करते.

शीघ्रतेने हालचाल व चलन करू शकेल, या दृष्टीने भूसेनेची संरचना, शस्त्रास्त्रे व वाहनसामग्री योजलेली आहे. लष्करात चिलखती दलांचे प्राबल्य आहे. वायुसेनेकडे लढाऊ अंतर्भेदी व आघाती विमाने आहेत. बाल्टिक समुद्रात वॉर्सा करारातील पूर्व यूरोपीय देशांच्या नौसेनेशी मुकाबला करू शकेल अशी नौसेना आहे. नाटो संघटनेच्या लष्करी तंत्राप्रमाणे पारंपरिक किंवा अण्वीय युद्ध लढू शकेल, अशी संरक्षणबलाची उभारणी केली आहे. अमेरिका व नाटो संघटनेतील राष्ट्रांकडून लष्करी सामग्री पुरविली जाते. रणगाडे, जहाजे, प्रक्षेपणास्त्रे वगैरे प. जर्मनीत तयार केली जातात.

यूरोपातील राजकीय आणि प्रादेशिक स्थित्यंतरामुळे प. जर्मनीवर १९४५ नंतर फार दूरगामी परिणाम झाले. गुंतागुंतीच्या सामाजिक व राजकीय समस्यांवर मात करणे आवश्यक होऊन बसले. लोकांचे खचलेले मनोधैर्य, सार्वत्रिक पसरलेली युद्धघृणा, लष्करी अधिकाऱ्यांची कमतरता, समाजवादी राष्ट्रांनी चालविलेला प्रचार इ. समस्या लष्करी बलसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

संरक्षणबलासंबंधीच्या १९७५–७६ साली उपलब्ध झालेल्या आकडेवारीवर आधारित माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण संरक्षण खर्च : १,२६६ कोटी ९० लक्ष डॉलर स्वेच्छा व सक्तीची भूसेना : सैनिक ३,४५,००० रणगाडे : १६ ब्रिगेड्‌स (६,००० रणगाडे) चिलखती पायदळ : १२ ब्रिगेड्‌स (३,३५० चिलखती वाहने) मोटरगामी पायदळ : ३ ब्रिगेड्‌स, डोंगरी ब्रिगेड्‌स २ व छत्रीधारी ब्रिगेड्‌स ३ प्रक्षेपणास्त्र : १५ बटालियन नौसेना : नौसैनिक ३९,०००, किनारी पाणबुड्या २४, विनाशिका ११, फ्रिगेट ११, लढाऊ गस्ती, टेहळणी, पाणबुडीविरोधी जहाजे–बोटी १२४ वायुसेना : वायुसैनिक १,११,०००, लढाऊ विमाने ४४४ (एफ्‌. –४ –१०४ व जी. ९१). वायुप्रक्षेपणास्त्र तुकड्या ६८, शिवाय हेलिकॉप्टर व वाहतुकी विमाने सीमारक्षक सैनिक २,००,००० राखीव सैनिक सु. १३ लक्ष.

दीक्षित, हे. वि.

आर्थिकस्थिती : यूरोपच्या युद्धोत्तर काळात एकीसाठी पश्चिम जर्मनीने नेटाने जे प्रयत्न केले, त्यांना आर्थिक क्षेत्रात विशेष यश मिळाले. त्या प्रयत्नांतूनच १९५२ मध्ये ‘यूरोपीय कोळसा व पोलाद समूह’ आणि १९५७ मध्ये ‘यूरोपीय सामायिक बाजारपेठ’(ईईसी) व ‘यूरोपीय अणु-उर्जा समुह’ (युरेटम) यांची स्थापना झाली. यामुळे पश्चिम जर्मनीचा फायदा होऊन तिच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढला आणि पश्चिम जर्मनी हे पश्चिम यूरोपातील प्रमुख औद्योगिक राष्ट्र बनले. अमेरिकेकडून मार्शल योजनेखाली मिळालेली भरपूर आर्थिक मदत, सर्व थरांतील जर्मन लोकांनी केलेले कष्ट, कामगारांची कमी वेतनावर काम करण्याची तयारी व जर्मन व्यवस्थापकांचे व्यवस्थापनकौशल्य, हीच जर्मन आर्थिक विकासाची प्रमुख कारणे होत. ऑगस्ट १९७० मध्ये रशिया व पश्चिम जर्मनी यांच्यात अनाक्रमणाचा तह झाला. त्यामुळे उभय राष्ट्रांतील तणाव कमी होऊन आर्थिक प्रगती अधिक सुकर झाली.

शेती : पश्चिम जर्मनी हा छोट्या शेतकऱ्यांचा देश आहे. वारसाहक्कामुळे शेतीची विभागणी आणि तुकडीकरण सतत चालू असते. १९७१ मध्ये १२ लक्ष शेतांपैकी पाच लक्ष शेते पाच हेक्टरांहून कमी आकाराची होती. दुसऱ्या महायुद्धापूर्वी पश्चिम जर्मनीच्या २१७ लक्ष हे. जमिनीपैकी १४७ लक्ष हे. शेतीखाली व ७० लक्ष हे. जंगलाखाली होती. १९३८ मध्ये एकूण शेतांपैकी ९३% शेतांचे क्षेत्रफळ प्रत्येकी २० हेक्टरांहून कमीच होते. ५० हेक्टरांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या शेतांची संख्या एकूण शेतांच्या एक टक्क्याहुनही कमी होती. कृषीमध्ये त्यावेळी यांत्रिकीकरणाचा फारसा प्रभाव नव्हता. एकूण गरजेपैकी २०% अन्नधान्य आयात करावी लागे. राष्ट्रीय उत्पादनात शेतीच्या उत्पादनाचा भाग केवळ नऊ टक्के होता परंतु त्यासाठी एकूण कर्मचारी वर्गापैकी २२% लोकांना शेतीवर काम करावे लागे. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र कृषिव्यवसायाची उत्पादकता बरीच वाढली. खतांचा मोठ्या प्रमाणात वापर आणि यांत्रिकीकरणातील उल्लेखनीय प्रगती यांमुळे शेतीवर काम करणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊनही कृषीउत्पादन बरेच वाढले. १९६०–७० दरम्यान शेतीकाम करणाऱ्यांची संख्या ३६ लक्षांवरून २४ लक्षांपर्यंत घसरली. लोकसंख्येत वाढ झाली, तरी देशाची ७०% गरज भागविण्याइतके शेतीउत्पादन होऊ लागले. युद्ध संपले तेव्हा प्रतिदिनी प्रत्येकास १,००० कॅलरी इतके खाद्य मिळत असे, परंतु पाच वर्षांतच त्याचे प्रमाण २,८३८ कॅलरीपर्यंत वाढले होते. जसजसे कृषीमध्ये यांत्रिकीकरणाचे प्रमाण वाढत गेले, तसतसे शेतीचे एकत्रीकरणही वाढू लागले. कृषीची ही प्रगती समाधानकारक होती, तरी कृषीव्यवसायाला संरक्षणाची मदत चालूच ठेवावी लागली. १९७३ मध्ये पश्चिम जर्मनीमधील जमिनीचा वापर खालील तक्त्यात दाखविल्याप्रमाणे होता.


कृषि-उत्पादनाचा वाटा १९७१ च्या सुमारास एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या फक्त चार टक्के असून कृषीमध्ये एकूण लोकसंख्येच्या दहा टक्क्यांहून कमी लोक गुंतलेले होते. कृषिव्यवसायातील उत्पादकतेची वाढ अन्य व्यवसायांतील उत्पादकतेतील वाढीशी बरोबरी करू शकली नाही. साहजिकच अन्नपदार्थ आयात करणे पश्चिम जर्मनीस आवश्यकच आहे. गहू, ओट, बटाटे यांच्या बाबतीत मात्र ते राष्ट्र हळूहळू स्वयंपूर्ण बनत असून रायच्या उत्पादनाबाबत ते स्वयंपूर्ण आहे. १९७३ मध्ये लागडीखालील जमीन लक्षात घेता पश्चिम जर्मनीतील प्रमुख पिके पुढीलप्रमाणे होती (लक्ष हे.) : बार्ली १६·७, गहू १६·००, ओट ८·२, राय ७·४, बटाटे ४·८, बीट ३·५ व इतर धान्ये ३·४ पिकांचे उत्पादन लक्षात घेतल्यास पिकांची क्रमवारी १९७३ मध्ये पुढीलप्रमाणे होती (लक्ष मे. टन) : बीट १५८·५८, बटाटे १३६·७६, गहू ७१·३४, बार्ली ६६·२२, ओट ३०·४५, राय २५·७६ आणि इतर धान्ये १२·२६. फळांचे उत्पादनही पश्चिम जर्मनीत बरेच होते. द्राक्षे मुख्यतः नैर्ऋत्य जर्मनीत होतात व तेथील दारू प्रसिद्ध आहे. १९७२ मध्ये दुधाचे उत्पादन सु. २१५ लक्ष मे. टन होतेवअंड्याचेउत्पादन १,६०७·८ कोटीहोते. लोणीवचीजह्यांचेउत्पादनअनुक्रमे ४·८९ लक्षमे. टनव २·४९ लक्षमे. टनहोते. दारूचे उत्पादन १९७२ मध्ये ७५ लक्ष हेक्टोलिटरहोते. १९७२ अखेर देशातील प्राणिसंपत्ती पुढीलप्रमाणे होती (लक्ष) : गुरे १४३·६४, घोडे ३·१९, मेंढ्या १०·१५, डुकरे २०४·५१, कोंबड्या १,०२१·७३ बकऱ्यांची संख्या ३९,९०० होती.

जमिनीचा वापर

(लक्ष) हेक्टर

पिकांची लागवड

जंगले

कुरणे व गायराने

बागबगीचे व द्राक्षमळे

इमारती व पडीत

७५·५२

७१·७२

५३·४७

५·२९

४१·६२

एकूण

२४७·६२

जंगलसंपत्ती : प. जर्मनीला लागणाऱ्या एकूण इमारती लाकडापैकी / लाकूड आयात करावे लागते. यूरोपीय देशांशी तुलना करता, लाकूड उत्पादनाच्या बाबतीत, जर्मनीचा स्वीडन, फिनलंड व फ्रान्स यांच्यानंतर म्हणजे चौथा क्रमांक लागतो. १९७२ सालचे जंगलसंपत्तीचे पुढीलप्रमाणे उत्पादन होते कापीव इमारती लाकूड ९५·९२ लक्ष घ. मी., लाकूड लगदा सु. ८·४८, कागद ४२·८८, वृत्तपत्री कागद सु. ४·९२, सेल्यूलोज ६·९२, बोर्ड व कार्डबोर्ड १४·०९ (लक्ष टन). १९७३ साली जंगलव्याप्त क्षेत्र ७१·७२ लक्ष हे. एवढे होते. जंगल उद्योगांचे फार मोठे महत्त्व मानण्यात आले असून, केंद्रशासनच शास्त्रीय पद्धतींनी त्यांची काळजी वाहत असते.

खनिजसंपत्ती : पश्चिम जर्मनीचे सर्वांत महत्त्वाचे खनिज पदार्थ कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू, कच्चे लोखंड व पोटॅश हे होत. खनिजांचे मोठे साठे पुढीलप्रमाणे आढळतात : नॉर्थ ऱ्हाईन-वेस्टफेलिया क्षेत्र : कोळसा, लोखंड व इतर धातू मध्य जर्मनी : दगडी कोळसा लोअर सॅक्सनी : झाल्ट्सगिटर येथे लोहधातुक, हार्ट्‌झ येथे इतर धातु-खनिजे. देशातील प्रमुख तेलखाणी एम्सलांट (लोअर सॅक्सनी) येथे आहेत. पश्चिम जर्मनीचे कोळशाचे साठे पश्चिम यूरोपात सर्वांत महत्त्वाचे मानले जातात. उच्च प्रतीच्या डामरी कोळशाचे व तपकिरी कोळशाचे साठे अनुक्रमे १२,००० ते २०,००० कोटी टनांपर्यंत व ६,००० कोटी टन (मुख्यतः ऱ्हाईनलँड भागात) असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. उत्तम प्रतीचा दगडी कोळसा झारलँड व रुर भागांत सापडतो, तर लिग्नाइट कोळसा प्रामुख्याने ऱ्हाईनलँड भागात आहे. दगडी कोळशाचे १९७३ मधील उत्पादन ९७३·३९ लक्ष मे. टन व लिग्नाइटचे उत्पादन १,१८६·५८ लक्ष मे. टन होते. कोळशाची थोड्या प्रमाणात निर्यातही करण्यात येते. कच्चे लोखंड पश्चिम जर्मनीत काही प्रमाणात सापडते व त्यातून त्याची ४० टक्के गरज भागते. ६० टक्के लोखंड बाहेरून–मुख्यतः स्वीडन व फ्रान्समधून–आयात करावे लागते. १९७३ साली लोहधातुकाचे उत्पादन ६४.२९ लक्ष मे. टन व इतर धातुखनिजांचे उत्पादन १५·०७ लक्ष मे. टन होते. खनिज तेल थोड्या प्रमाणातच उपलब्ध असल्याने एकूण गरजेच्या ९२ टक्के पेट्रोल बाहेरून आणावे लागते. १९७३ सालचे खनिज तेल उत्पादन ६६·३८ लक्ष मे. टन झाले. पोटॅशचे उत्पादनही बऱ्याच प्रमाणात पश्चिम जर्मनीत होते (१९७३ साली २४९·५० लक्ष टन). तांबे, शिसे, जस्त व बॉक्साइट हे धातू अल्प प्रमाणात आढळतात.

विद्युत् शक्ती : पश्चिम जर्मनीला कोळसा भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचे वीजउत्पादन यूरोपातील सर्व राष्ट्रांपेक्षा अधिक आहे. सु. ८० टक्के वीज कोळशापासून निर्माण केली जाते व इतर २० टक्के जलविद्युत् केंद्रे व अणुशक्ती केंद्रे यांतून मिळते. राष्ट्राच्या गरजेच्या मानाने वीजउत्पादन कमी पडत असल्याने विजेची आयात करावी लागते व म्हणून अणुकेंद्रे वाढवून वीजउत्पादन वाढविण्याकडे पश्चिम जर्मनीचा कल आहे. १९७३ साली एकूण वीजउत्पादन २९,८९९.५ कोटी किंवॉ. ता. एवढे झाले. १९६०–७० च्या दरम्यान पश्चिम जर्मनीतील ऊर्जेच्या उगमांमध्ये आश्चर्यकारक बदल घडून आला. एकूण ऊर्जेचा उपयोग ५० टक्क्यांनी वाढत. परंतु तीतील कोळशाचे प्रमाण शेकडा ६१ पासून शेकडा ३१ पर्यंत कमी झाले, तर लिग्नाइटच्या उपयोगाचे प्रमाण शेकडा १५ वरून शेकडा ९ पर्यंत उतरले. याउलट याच काळात तेलाच्या उपयोगाचे प्रमाण शेकडा २१ वरून शेकडा ५२ पर्यंत वाढले. तेल व नैसर्गिक वायूच्या वापराचे महत्त्व वाढल्याने पश्चिम जर्मनीला त्यांसाठी अधिककरून आयातीवर विसंबून रहावे लागते. कोळशाच्या उत्पादनात घट होत असली, तरी नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढत आहे. १९७२ साली नैसर्गिक वायूचे १,९२३·९ कोटी घ. मी. उत्पादन झाले. १९७५ पर्यंत जर्मन नैसर्गिक वायूचे उत्पादन राष्ट्राची फक्त १० टक्केच गरज भागवू शकेल व उर्वरित गरज नेदर्लंड्‌स आणि रशिया यांच्याकडून आयात केल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूने भागविली जाईल, असा अंदाज आहे. विजेच्या उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन औष्णिक केंद्रांतून होते. १० टक्के अणुकेंद्रे व जलविद्युत् केंद्रे यांद्वारा होत असते. एकंदरीत, दगडाच्या व धातूच्या खाणींचे पश्चिम जर्मनीच्या अर्थकारणातील स्थान गौण असून राष्ट्रीय उत्पन्नात त्यांचा वाटा अवघा ४ टक्के आहे.

मत्स्योद्योग : मत्स्योपादन मोठ्या प्रमाणावर होत असले, तरीही बाहेरून माशांची आयात करावीच लागते. उत्तर समुद्रात प्रमुख मत्स्यकेंद्रे असून त्यांमधून एकूण मत्स्योत्पादनापैकी २५% मासे–विशेषतः हेरिंग–सापडतात उत्तर अटलांटिकमध्येही मत्स्योत्पादन केंद्रे बरीच आहेत. १९७३ साली एकूण मत्स्योत्पादन ४.५६ लक्ष मे. टन झाले. त्याचे मूल्य ४,२६० लक्ष डॉइश मार्क होते. त्याच वर्षी मासेमारी जहाजांची संख्या १०१ ट्रॉलर, १० लगर व ८६३ कटर एवढी होती.

उद्योग :   पश्चिम जर्मनीत औद्योगिकीकरणाचा वेग चांगलाच असून विविध उद्योग तेथे चालू आहेत. औद्योगिक व्यवसायात पुढील क्षेत्रे प्रमुख आहेत : (१) रुर व वेस्टफेलिया क्षेत्र – हे सर्वांत मोठे क्षेत्र असून यामध्ये रसायने व धातूंवर आधारित अवजड उद्योग, कापड कारखाने व उपभोग्य वस्तू निर्माण करणारे उद्योग विशेषत्वाने आढळतात. (२) अपर ऱ्हाईन खोरे – मोटारी, रसायने व इतर वस्तू निर्माण करणारे उद्योग. (३) दक्षिण जर्मनी – म्यूनिक, ऑग्झबर्ग यांसारख्या केंद्रांत मोटारी व इतर यंत्रे बनविणारे उद्योग आहेत. (४) ब्रेमेन व हँबर्ग–या विभागात जहाजे बांधण्यात येतात. (५) पश्चिम बर्लिन–हा भाग विद्युत् यंत्रे, यंत्रसामग्री व उपभोग्य वस्तू बनविणाऱ्या कारखान्यांचे मोठे केंद्र आहे. (६) मध्य जर्मनी–या विभागात मोटार कारखाने व इतर उद्योग आहेत. या विभागात झाल्ट्सगिटर, कासेल, हॅनोव्हर, ब्रंझविक यांसारखी मोठाली औद्योगिक शहरे आहेत. १९७० मध्ये निर्मितिउद्योगांचे उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४३ टक्के होते. १९६०–७० या दशकात ते ७५ टक्क्यांनी वाढले. उपभोग्य वस्तूंपेक्षा भांडवली वस्तूंचे उत्पादन अधिक वेगाने वाढल्याचे दिसते. भांडवली वस्तुउद्योगांमधील अग्रेसर उद्योग म्हणजे विद्युत् अभियांत्रिकी, वाहतूकसामग्री व बांधकाम यंत्रसामग्री हे होत. १९६० च्या पुढे प्रति–कामगार उत्पादन व प्रति–कामगार तास उत्पादन या दोन्ही दृष्टींनी उत्पादकतेत वाढ झाल्याचे दिसून येते.


दुसऱ्या महायुद्धात जर्मन कारखाने उद्ध्वस्त झाल्यामुळे औद्योगिक उत्पादन बरेच घटले. जर्मन उद्योगधंदे पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतील की नाही, याविषयी त्यावेळी बऱ्याच लोकांना शंका होती. कारखान्यांच्या नुकसानीची काळजीपूर्वक पाहणी केल्यानंतर असे आढळून आले की, औद्योगिक क्षमता युद्धपूर्व क्षमतेच्या ६० टक्क्यांहूनही अधिक शिल्लक होती. पूर्व जर्मनीकडून पूर्वी चढ्या भावाने घ्यावा लागणारा कच्चा माल आता पश्चिम जर्मनीला जागतिक बाजारपेठांतून कमी किंमतीस घेता येऊ लागला. मनुष्यबळाची कमतरताही पश्चिम जर्मनीला फारशी भासली नाही कारण स्त्रियांना रोजगार देणे, कामाचे तास वाढविणे, सेवानिवृत्तीचे वय लांबविणे यांसारख्या उपायांनी औद्योगिक उत्पादकता वाढविता आली. युद्धकाळात काही कारखाने जरी उद्ध्वस्त झाले होते, तरी काही नव्यानेही उभारण्यात आले होते. या नव्या कारखान्यांतील यंत्रसामग्री आधुनिक आणि जास्त कार्यक्षम होती. पश्चिम जर्मनीवर रशियाचा प्रभाव पडू नये, अशी दोस्त राष्ट्रांची प्रबळ इच्छा असल्याने त्यांनी पश्चिम जर्मनीस मार्शल योजनेद्वारा आणि अन्य साधनांद्वारा मदत करून तेथील औद्योगिक विकासास शक्य तेवढी संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण पतकरले. तरीसुद्धा रुर भागातील सु. ६६ टक्के कारखाने युद्धात उद्ध्वस्त झाले होते. सायलीशिया व सॅक्सनी भागांतील कोळसा आणि लोखंडाच्या खाणींच्या उत्पादनास पश्चिम जर्मनीस मुकावे लागले होते. शिवाय पॉट्सडॅम तहानुसार काही कारखाने मोडीत काढणे भाग होते व काही उद्योगांवर बंधनेही आली होती. साहजिकच युद्धसमाप्तीनंतर लगतच्या काही वर्षांत पश्चिम जर्मनीची फारशी प्रगती होऊ शकली नाही. १९३६ च्या मानाने जर्मनीचे औद्योगिक उत्पादन १९४६ मध्ये सु. ३३ टक्केच होते, १९४७ मध्ये ते ४० टक्के झाले. चलनसुधारणेची योजना १९४६ मध्ये तयार झाली, तरी तिला पूर्व जर्मनीचे सहकार्य १९४८ पर्यंतही मिळण्याचे चिन्ह दिसेना. म्हणून जून १९४८ मध्ये दोस्त राष्ट्रांनी पश्चिम जर्मनीत नवीन चलन अंमलात आणण्याचे ठरविले. जुन्या चलनापैकी ९० टक्के चलन प्रचारातून काढून घेण्यात आले. या चलनसुधारणेच्या आधारावर जर्मन अर्थव्यवस्थेचा विकास झपाट्याने होऊ लागला. याच सुमारास मार्शल योजनेची मदत पश्चिम जर्मनीला मिळाल्याने औद्योगिक प्रगतीचावेगवाढूलागला. युद्धोत्तरऔद्योगिकप्रगतीचावेगवाढूलागला. युद्धोत्तरऔद्योगिक विकासाला जर्मनीने स्वीकारलेले आर्थिक धोरण मुख्यतः कारणीभूत झाले. मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रणाखाली चलनाची स्थिरता टिकवून धरणे व खाजगी उद्योगपतींना विकासाची भरपूर संधी देणे, यांवर एरहार्ड या अर्थमंत्र्यांचा विशेष भर होता. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या इष्ट त्या उद्योगांमध्ये गुंतवणूक व्हावी, या दृष्टीने योग्य असे राजकोषीय व करविषयक धोरण अवलंबिण्यात आले. शिधावाटप व भावनियंत्रणे शक्य तेवढी रद्द करण्यात आली. कोरियातील युद्धामुळे उत्पादनास वाढती मागणी आल्यानेही जर्मनीच्या औद्योगिक विकासास मदत झाली. १९५१ पर्यंत पश्चिम जर्मनीतील औद्योगिक उत्पादनाची पातळी १९३६ च्या पातळीबरोबर जाऊन पोहोचली. १९५८ मधील औद्योगिक उत्पादन १९५० पेक्षा ७७ टक्क्यांनीअधिकहोते. एकूणऔद्योगिक उत्पादनाचा २३ ते २५ टक्के हिस्सा कारखाने आणि यंत्रसामग्री सुस्थितीत ठेवण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी गुंतविण्यात आल्यामुळे व बाहेरून, विशेषत: पूर्व जर्मनीतून, आलेल्या कामगारांना कारखान्यातील रोजगारात सामावून घेतल्यामुळे हा औद्योगिक विकास शक्य झाला. त्यामुळे १९५१ मधील बेकारीचे प्रमाण १० टक्के होते, ते १९५९ च्या सुमारास २ टक्क्यांवर आले. याच काळात कामगारांची उत्पादकताही १९३६ च्या मानाने ५० ते ६८ टक्क्यांनी वाढली. निर्यातीत झपाट्याने वाढ होत गेल्यामुळेही औद्योगिक विकासास भरपूर संधी मिळाली. १९५८ साली एकूण खनिज पदार्थांच्या विक्रीमध्ये निर्यात विक्रीचे प्रमाण २० टक्के होते. यंत्रसामग्री, रसायने, अवजारे यांच्या बाबतींत निर्यातीचे प्रमाण १८ ते २५ टक्क्यांपर्यंत होते. त्याच सुमारास प्रतिवर्षी निर्मित वाहनांपैकी ३० टक्के आणि जहाजांपैकी ५० टक्के निर्यात होत असत. १९६०–७० या काळात औद्योगिक उत्पादन ७५ टक्क्यांहून अधिक वाढले. विद्युत् अभियांत्रिकी, वाहतूक सामग्री व यंत्रनिर्मिती या विभागांत औद्योगिक विकास प्रामुख्याने झाला. १९७१ मध्ये सु. १३२ लक्ष (एकूण कामकऱ्यांच्या ५० टक्के) कर्मचारी औद्योगिक क्षेत्रात गुंतले होते. सर्वांत महत्त्वाचे उद्योग यांत्रिक अभियांत्रिकी, रासायनिके, कापड व कपडे आणि वाहतूकसामग्री हे होते. १९७३ साली देशात त्यांमध्ये ५५,५०३ कारखाने (किमान दहा व त्यांहून अधिक कामगार) असून ८३,५२,५९९ कामगार गुंतले होते. त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे होती (आकडे लक्षांत) : यंत्रे व यंत्रसामग्री निर्मितिउद्योग १०·८१, कापड उद्योग ४·३५, विद्युत् अभियांत्रिकी उद्योग १०·८२, खाण उद्योग २·६१ आणि रसायनोद्योग ५·८५. महत्त्वाच्या औद्योगिक पदार्थांचे उत्पादन १९७३ साली पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष टनांत) : ॲल्युमिनियम ५.३३, पेट्रोल १३९·९९, डीझेल तेल १०९·७९, सिमेंट ४१०·९९, रासायनिक खते २५·४८, लाटीव पोलाद (रोल्ड स्टील) ३६७·०६, मोटारी ३६·४३ लक्ष, प्रवासी गाड्या व बसगाड्या २·९२ लक्ष, मोटार-सायकली आणि सायकली २९·०६ लक्ष, घड्याळे व मनगटी घड्याळे ४५४·५५ लक्ष.

जर्मनीमध्ये घडून आलेल्या फार मोठ्या प्रमाणावरील औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक मंदीच्या काळातही देशात करण्यात आलेली मोठी भांडवल गुंतवणूक हे होय. जपानप्रमाणेच जर्मनीनेही राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा (१९७१ मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या २७%) भांडवल गुंतवणुकीकडे वळविला. १९७१ मध्ये एकूण श्रमशक्तीच्या (१३२·२० लक्ष) ५० टक्के कामगार औद्योगिक क्षेत्रात गुंतलेले होते एकट्या निर्मितिउद्योगांत त्यांची संख्या ९८ लक्ष होती. रोजगार व आर्थिक प्राप्ती या दोन्ही दृष्टींनी सर्वांत मोठे उद्योग पुढीलप्रमाणे होते : यांत्रिक अभियांत्रिकी, विद्युत् अभियांत्रिकी, रसायने, कापड व वस्त्रोद्योग आणि वाहतूकसामग्री. हे उद्योग, कापड व वस्त्रोद्योग वगळता, जर्मनीचे आघाडीचे निर्यात उद्योगही आहेत.

औद्योगिक क्षेत्राच्या कित्येक उद्योगधंद्यांत १९६० च्या पुढील काळात, औद्योगिक एकत्रीकरणाची प्रवृत्ती मोठ्या वेगाने वाढत चालल्याचे आढळून आले आहे. ही गोष्ट विशेषेकरून पोलाद व पेट्रोरसायन उद्योगांमध्ये लक्षणीय ठरली आहे. १९७० च्या पुढे सरकारने मोठ्या उद्योगांच्या विलीनीकरणाच्या प्रवृत्तीला बांध घालण्यासाठी कार्टेल-प्रतिबंधक कायद्याची योजना आखली असली, तरीही जागतिक स्पर्धेला तोंड देण्याकरिता औद्योगिक एकत्रीकरणाची प्रवृत्ती पुढेही चालूच राहील असे दिसते. १९७१ साली पश्चिम जर्मनीच्या होक्सवॅगन या मोटारी उत्पादन करणाऱ्या व अंशतः सरकारी मालकीच्या उद्योगाचा सबंध यूरोपात चौथा क्रमांक होता, असे थोड्या प्रमाणात सरकारी मालकी असलेले काही उद्योगधंदे सोडले, तर पश्चिम जर्मनीचे उद्योगधंदे बव्हंशी खाजगी क्षेत्रातच आढळतात.


पश्चिम जर्मनीतील औद्योगिक संबंधांना वैध वळण आहे. संघ कामगार न्यायालय व संघ संविधानीय न्यायालय यांचा मालकसंघ आणि कामगार संघटना यांच्यातील परस्पर-संबंधांवर बराच प्रभाव पडतो. १९७१ मध्ये एकूण कामगारांपैकी कामगार संघटनांचे ३३% हून थोडेसे कमी कामगार सदस्य होते. युद्धोत्तर न्यायालयीन निवाड्यांमुळे संपाच्या हक्कावर बंधन आले आहे. त्यामुळेच इतर औद्योगिक राष्ट्रांच्या मानाने पश्चिम जर्मनीतील संपांचे प्रमाण बरेच कमी आहे. एप्रिल १९७१ च्या जनगणनेनुसार आर्थिक दृष्ट्या लाभदायक रोजगारीत गुंतलेल्या कामगारांची एकूण संख्या ६१२ लक्ष होती. त्यांची विभागणी अशी (आकडे लक्षांत) : स्वयंव्यावसायिक : २६·६३, कौटुंबिक कामगार : १६·४७, कर्मचारी : २१७·९, शेती व जंगल उद्योग : २२, विद्युत्‌शक्ती, खाणकाम, निर्मितिउद्योग व बांधकाम : १२८·५८, वाणिज्य व दळणवळण : ४६·७४, इतर उद्योग व सेवा : ६३·७१, बेकार : २·०६. जून १९७२ मध्ये परदेशी कामगारांची संख्या २३·१७ लक्ष होती. जर्मन ट्रेड युनियन फेडरेशन (डी. जी. बी.) या कामगार महासंघाशी वेगवेगळ्या उद्योगधंद्यांतील १६ मोठ्या कामगार संघटना (६८ लाखांहून जास्त कामगार सदस्य संबद्ध) आहेत. पांढरपेशा व वेतनदार वर्गाचीही ‘जर्मन ऑफिसएम्प्लॉईजयुनियन’ अशी कामगार संघटना असून तिची सदस्य-संख्या सु. ४·७१ लक्ष आहे. कोळसा आणि पोलाद उद्योगांतील कामगारांना १९५१ पासूनच औद्योगिक व्यवस्थापनात भागीदारीचा हक्क मिळालेला असून, १९५२ च्या अधिनियमान्वये इतर उद्योगांतील कामगारांनाही मर्यादित प्रमाणात असा हक्क मिळाला आहे. सर्व उद्योगधंद्यांत कामगार समित्या स्थापना करण्यात आल्या आहेत. ४४ तासांचा कामाचा आठवडा सर्वमान्य होत असला, तरी कायद्याने साडेपाच दिवसांचा किंवा ४८ तासांचा (स्त्रियांसाठी ४४ तास) आठवडा निर्मितिउद्योग व बांधकाम उद्योगांतील कामगारांसाठी असून, २५ टक्के अतिकालिक वेतन, पगारी सुट्ट्या व रजा (किमान १२ कामाचे दिवस) आणि रात्रपाळीच्या कामाबद्दल १० टक्के वेतनदर त्यांना मिळतो. १ मे १९५९ पासून जर्मन कोळसा कामगारांसाठी सर्वप्रथम ४० तासांचा आणि पाच दिवसांचा कामाचा आठवडा करण्यात आला.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या १५–२० वर्षांच्या कालावधीत पश्चिम जर्मनीचा जो आश्चर्यकारक आर्थिक विकास घडून आला, त्याला ‘आर्थिक चमत्कार’ असे संबोधतात. या काळात तेथील एकूण राष्ट्रीय उत्पादन १९५० च्या मानाने सु. तिप्पट झाले. १९६०–७० या काळात पश्चिम जर्मनीचे औद्योगिक उत्पादन ७४ टक्क्यांनी वाढले. घरांचा तुटवडा १९५० मध्ये ६० लक्ष होता, तो १९६८ पर्यंत फक्त ५ लक्षच उरला. पश्चिम जर्मनीतील मोटारींचे उत्पादन यूरोपमधील इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा अधिक होते. दहा वर्षांत तेथील पोलादाचे उत्पादन चौपट झाले व त्यात अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि रशिया यांच्या खालोखाल पश्चिम जर्मनीचा क्रमांक होता. पेट्रोरसायने आणि विजेची उपकरणे यांसारखे नवे उद्योग पश्चिम जर्मनीत सुरू झाले. जर्मनीचे डॉइश मार्क हे चलन यूरोपमधील अत्यंत स्थिर चलन समजले जाऊ लागले आणि त्यामुळेही आर्थिक विकासाचा वेग वाढण्यास मदत झाली. १९७४ मध्ये पश्चिम जर्मनी हे जगातील चौथे सर्वांत मोठे औद्योगिक राष्ट्र बनले. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया व जपान यांच्या खालोखाल पश्चिम जर्मनीचा क्रमांक लागतो. या सर्व घटनांचा जर्मन नागरिकांच्या राहणीमानावर अनेक प्रकारे परिणाम झाला. त्यांचे खाणेपिणे वाढले आणि कपडे व पर्यटन यांवर ते अधिक खर्च करू लागले. या भरभराटीतूनच उद्योगपतींची एक नवी पिढी उदयास आली व त्यांनी विशिष्ट उत्पादनक्षेत्रे वाढवून औद्योगिक विकासात भर टाकली. उदा., ग्रुंडिंग याने रेडिओ, दूरचित्रवाणी संच आणि फीतमुद्रक यांचे उत्पादन हाती घेऊन आपले एक भलेमोठे साम्राज्यच फुर्थ येथे निर्माण केले. १९४६ मध्ये दहाबारा कामगारांसह काढलेल्या त्याच्या कारखान्यात १९६५ मध्ये तीस हजारांहून अधिक लोक कामावर होते. आज पश्चिम जर्मनीचे राहणीमान यूरोपमध्ये सर्वांत उच्च दर्जाचे आहे. तेथील कामगारांची आजची राहणी आरामशीर आहे. त्यांची घरेही चांगली आहेत. तेथे झोपडवस्त्या आढळत नाहीत.

ह्या आर्थिक चमत्काराची अनेक कारणे आहेत : एक तर, जर्मन लोकांनी केलेले कष्ट. जर्मन नागरिक हा जात्याच उद्योगप्रिय आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर त्याला आपल्या कामाखेरीज अन्यत्र लक्ष देण्याचे कारण उरले नाही. राजकारणापासून तो काहीसा अलिप्तच राहिला. अमेरिकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा पुरेपूर फायदा घेण्याची संधी त्याने वाया घालविली नाही. जुने कारखाने उद्ध्वस्त झाल्याने नवीन कारखाने आधुनिक यंत्रांनी सुसज्ज करता आले. १९४९–६३ पर्यंत अर्थमंत्री म्हणून एरहार्ड याने अंमलात आणलेल्या आर्थिक धोरणालाही जर्मन विकासाचे बरेचसे श्रेय देण्यात येते. त्याने मुक्त बाजाराच्या धोरणास विशेष पाठिंबा दिला. कोळसा व पोलाद यांच्या राष्ट्रीयीकरणास विरोध करून आयातीवरील बंधने कमी केली, आयात कर कमी केले व उद्योगसंस्थांना करांमध्ये सवलती देऊन त्यांना उत्पादन वाढविण्यास उद्युक्त केले चलनसुधारणा करून चलनात स्थैर्य आणले व काळ्या बाजाराचे उच्चाटन केले निर्यातीला योग्य प्रोत्साहन देऊन निर्यातीचे प्रमाण वाढविले. जर्मन कामगारसंस्थांनी संपाचे अस्त्र न वापरण्याचे व वेतनवाढीच्या मागण्यांवर भर न देण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे जर्मन उद्योगांची प्रगती सुकर झाली. शिवाय अमेरिकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा परिणाम जर्मन उद्योगपतींवर व व्यवस्थापकांवर होणे अपरिहार्य होते. महत्त्वाकांक्षी लोकांना व संस्थांना विकासाची भरपूर संधी देणे व सतत मेहनत करून औद्योगिक उत्पादन वाढविणे, ही अमेरिकन अर्थव्यवस्थेची ध्येये जर्मन उद्योगपतींनीही स्वीकारली.

जर्मन औद्योगिक विकासातूनच प. जर्मनीच्या गेल्या काही वर्षांतील अडचणीही उद्‌भवल्या आहेत. जर्मनीचा औद्योगिक विकास झाला खरा, पण तो प्रामुख्याने निर्यात व्यापारात त्या राष्ट्राला मिळालेल्या सुयशावर आधारित होता. म्हणूनच जर्मन अर्थव्यवस्था निर्यातावलंबी बनली आहे. निर्यात व्यापार पुढेही कसा टिकवून धरावयाचा हा प. जर्मनीपुढील यक्षप्रश्न आहे. निर्यात वाढविण्यासाठी जर्मन अर्थव्यवस्थेने भांडवली वस्तूंच्या उत्पादनावरील विनियोगाचे प्रमाण अतोनात वाढविले. त्या मानाने सेवानिर्मिती व उपभोग्य वस्तूंचे उत्पादन यांकडे दुर्लक्ष झाले. याचा परिणाम भाववाढ होण्यात झाला. भाववाढ रोखण्यासाठी चलनाचे पुनर्मूल्यन जेव्हा जेव्हा केले, तेव्हा तेव्हा मक्तेदारीवत् स्वरूपाच्या निर्यात मालाच्या किंमती वाढवून निर्यात चालू ठेवली व निर्यातदारांना कामगारांच्या वेतनवाढीच्या मागण्या मान्य करणे शक्य झाले. परिणामी जर्मनीतील भाववाढ कायमच राहिली. १९७३ पासून इतर पश्चिम यूरोपीय राष्ट्रांप्रमाणेच प. जर्मनीला पुढील अडचणी विशेष जाणवत आहेत : कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, भाववाढ, मुद्राविषयक अनिश्चितता, जागतिक खनिज तेलटंचाई आणि बिघडते औद्योगिक संबंध. एकूण राष्ट्रीय उत्पादन १९७३ मध्ये ५·३ टक्क्यांनी वाढले असले, तरी १९७४ मध्ये ही वाढ दोन टक्क्यांहूनही कमीच असण्याची शक्यता दिसते. १९७४ च्या सुरुवातीस झालेल्या संपावरून औद्योगिक संबंधांतही बराच बिघाड झालेला दिसतो. त्यामुळेच संघीय शासनाला सरकारी क्षेत्रातील सु. ४० लक्ष कामगारांना सु. १२·५ टक्के वेतनवाढ देणे भाग पडले. शिवाय सहभागीदारीचे तत्त्व सर्व मोठ्या कंपन्यांना लागू करण्यासाठी कायदाही करावा लागला.


पश्चिम जर्मनीपुढे देवघेवींच्या ताळेबंदाची एक मोठी समस्या आहे. औद्योगिक विकासासाठी प. जर्मनीला आप्रवासी कामगारांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागत असल्यामुळे काही अडचणी उद्‌भवतात. हे कामगार आपापल्या देशाला आपल्या मिळकतीचा काही हिस्सा पाठवीत असतात. त्यामुळे प. जर्मनीला अप्रत्यक्ष व्यापारात वाढती तूट येते. ती भरून काढण्यासाठी प्रत्यक्ष व्यापारात वस्तूंची निर्यात वाढत्या प्रमाणावर करणे आवश्यक होते. निर्यात व्यापारात अवजड यंत्रसामग्री, जहाजे, मोटारी, विमाने यांना विशेष महत्त्व आहे. अशा वस्तूंना असलेली मागणी चिरकाल टिकू शकत नाही व ती कमी झाल्यास जर्मन कारखान्यांना दुसऱ्या वस्तूंच्या उत्पादनाकडे वळणे जड जाण्याची शक्यता आहे. औद्योगिक विकासासाठी लागणारे जादा मनुष्यबळ प. जर्मनीकडे नसल्याने तिला आप्रवासी कामगारांवरच अवलंबून रहावे लागते व आप्रवासी कामगारांच्या वाढत्या लोकवस्त्यांमुळे जर्मन अर्थव्यवस्थेत आर्थिक व सामाजिक अडचणी उत्पन्न झाल्या आहेत. भाववाढीमुळे जर्मन कामगारही वेतनवाढीचा आग्रह धरू लागले आहेत आणि त्यांच्या मागण्या टाळता येणे उद्योगपतींना व शासनाला कठीण होत आहे.

एकूण राष्ट्रीय उत्पादन :एकूण राष्ट्रीय उत्पादन लक्षात घेता प. जर्मनी हे पश्चिम यूरोपातील सर्वांत प्रमुख आर्थिक राष्ट्र झाले असून त्या बाबतीत त्याने फ्रान्स व ब्रिटनलाही मागे टाकले आहे. प्रतिडोई एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या बाबतीत स्वीडन, स्वित्झर्लंड व डेन्मार्क यांच्या खालोखाल प. जर्मनीचा क्रमांक लागतो.

व्यापार :आयात मालाचे राष्ट्रात वाटप करणारी हँबर्ग व ब्रेमेन ही दोन प्रमुख केंद्रे आहेत. खनिज तेल व तत्सम पदार्थ, वनस्पती तेले, तंबाखू, रबर आणि पक्का माल हँबर्गमधून आयात होतो. कापूस, लोकर व अन्नधान्ये यांची आयात ब्रेमेनमधून होते. घाऊक व्यापारकेंद्रे अंतर्गत व्यापार हाताळतात. १९६६ मध्ये घाऊक व्यवसाय संस्थांची संख्या सु. १,२७,००० होती, तर किरकोळ व्यापारकेंद्रे सु. ४,२५,००० होती. किरकोळ व्यापारसंस्थांपैकी ६३ टक्के अल्प प्रमाणावर विक्री करणाऱ्या होत्या. ७,६५३ सहकारी भांडारे अन्नपदार्थांच्या वाटपात भाग घेत. १९६५ मध्ये अन्नपदार्थांच्या वाटप क्षेत्रातील सहकारी संस्थांची सभासदसंख्या सु. २५ लाख होती. साखळी दुकाने व टपाल विक्री व्यवसायही प. जर्मनीत बरेच वाटप करीत असतो. देशात महत्त्वाच्या अशा २० साखळी दुकानांच्या संघटना आहेत. टपाली विक्री व्यवसाय करणाऱ्या संस्थांमध्ये क्वेले केजी, नेकेरमान केजी, श्वाब केजीए व ऑटो व्हेर्सांट या अतिशय प्रसिद्ध टपाली विक्री संघटना आहेत. स्वयंसेवा विक्री केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. किरकोळ विक्री केंद्रे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत व्यवहार करतात. जाहिरात व्यवसाय मुख्यतः वृत्तपत्रे, मासिके, दूरचित्रवाणी, रेडिओ व चित्रलेखन या माध्यमांद्वारा चालतो. १९७२ साली मागील वर्षापेक्षा माध्यमांद्वारा जाहिरातींचे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढले. विविध जाहिरातमाध्यमांचे खर्चाचे शेकडा प्रमाण पुढीलप्रमाणे होते : मासिके ४०·९५, वृत्तपत्रे ३०·९८, दूरचित्रवाणी १६·३५, व्यापारी प्रकाशने ६·५ व रेडिओ ५·२२. १९७२ सालचा जाहिरातींवरील एकूण खर्च ४३१ कोटी डॉ. मा. होता. मोठमोठ्या शहरांतून व्यापारजत्रा वेळोवेळी भरत असतात. प. बर्लिनमध्ये प्रतिवर्षी औद्योगिक प्रदर्शन व कृषिजत्रा भरतात. हॅनोव्हर जत्रेत औद्योगिक माल, फ्रँकफुर्ट जत्रांतून पुस्तके व उपभोग्य वस्तू, न्यूरेंबर्ग जत्रेत खेळणी, म्यूनिकजत्रेतहस्तव्यवसायाचामाल, कोलोनजत्रेत लोखंडी सामान व गृहोपयोगी वस्तू, ड्युसेलडॉर्फ जत्रेत आंतरराष्ट्रीय व्यापारी माल आणि प्लॅस्टिक उद्योग अशी निरनिराळ्या जत्रांची वैशिष्ट्ये आहेत.

एकूण जागतिक व्यापारात १९६८ मध्ये प. जर्मनीचा १० टक्के हिस्सा होता. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनंतर जगातील दुसरे मोठे व्यापारी राष्ट्र म्हणून प. जर्मनीची गणना होते. १९७० मध्ये प. जर्मनी हे जगातील दुसरे सर्वांत अधिक निर्यात करणारे राष्ट्र होते व १९७१ मध्ये ते जगातील दुसरे सर्वांत अधिक आयात करणारे राष्ट्र होते. १९६० पासून पुढे विदेश व्यापाराला पश्चिम जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत अधिक महत्त्वपूर्ण स्थान मिळत गेले. १९७१ मधील आयात व निर्यात अनुक्रमे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या २० व २१·५ टक्के होती. १९६१–७० या दशकात परदेशी बाजारपेठांत जर्मन मालाची स्पर्धाक्षमता अतिशय दृढ राहिल्याचे दिसून येते. याच दशकात सरासरी वार्षिक निर्यात विकास दर ११·१ टक्के होता. निर्यात व्यापारामधील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रवृत्ती ही की, त्यामध्ये निर्मितिउद्योगाचा माल अधिककरून (अलीकडील काही वर्षांत ८५% हूनही जास्त) असतो. एकूण निर्यातीमध्ये पक्का माल ८५% होता. त्यामध्ये प्रामुख्याने यंत्रे व अवजारे, रसायने, पोलादाचे पदार्थ, वाहने व वाहतूक सामग्री, विद्युत् अभियांत्रिकीय वस्तू, कापड व वस्त्रे, सूक्ष्म व अचूक यंत्रे, प्रकाशीय उपकरणे आणि जहाजे यांचा समावेश होतो. शिवाय मोटरी व विमाने, विजेची उपकरणे, घड्याळे आणि कोळसा व कोक यांचीही मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. आयात व्यापारात मुख्यतः अन्नपदार्थ, तेल व डांबर, कापड व कपडे, यंत्रे, धातू, कागद व लगदा आणि इमारती लाकूड यांचा समावेश होतो. निर्यात माल विशेषेकरून फ्रान्स, अमेरिका, नेदर्लंड्स, इटली, बेल्जियम, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रिया व स्वीडन या देशांकडे जातो. आयात मालही मुख्यतः त्याच देशांतून येतो. पूर्व जर्मनीशीदेखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. प. जर्मनी जरी यूरोपमधील सर्वांत महत्त्वाचे निर्यात करणारे राष्ट्र असले, तरी अलीकडे कपडे व प्रशीतक यांच्या निर्यातीत त्याला इटलीने मागे टाकले आहे. त्याचप्रमाणे मोटारी, कॅमेरे व इलेक्ट्रॉनीय उपकरणे यांच्या बाबतींत जपानी मालाची स्पर्धा जर्मनीला अधिक धोक्याची वाटू लागली आहे.

पश्चिम जर्मनीची निम्मी निर्यात यूरोपीय आर्थिक संघ-राष्ट्रांकडे जाते, त्यांमध्ये पहिला क्रम फ्रान्सचा लागतो त्यापाठोपाठ नेदर्लंड्स, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इटली व बेल्जियम–लक्सेंबर्ग हे देश येतात. १९६१–७० या दशकात आयात विकासाचा सरासरी वार्षिक दर ११% म्हणजे निर्यात विकास दराएवढाच होता. १०% निर्यात विकसनशील राष्ट्रांना व ५% पूर्व यूरोपीय राष्ट्रांना होते. आयातीपैकी ४५% माल यूरोपीय आर्थिक संघ राष्ट्रांकडून, १६% विकसनशील राष्ट्रांकडून व ४% पूर्व यूरोपीय गटाकडून येतो.

अर्थकारण :डॉइश मार्क हे अधिकृत चलन असून १ डॉ. मा. १०० फेनिगमध्ये विभागलेला आहे. एक, दोन, पाच, दहा व ५० फेनिगची आणि एक, दोन व पाच डॉइश मार्कची नाणी असून ५, १०, २०, ५०, १००, ५०० व १,००० डॉइश मार्कच्या कागदी नोटा वापरात आहेत. मार्च १९७४ मध्ये विदेश विनिमय दर १०० डॉ. मा. = १६·२९ स्टर्लिंग पौंड = ३७·८१ अमेरिकन डॉलर असा होता.


दुसऱ्या महायुद्धानंतर दोस्त सैनिकी शासनाने जर्मनीच्या मध्यवर्ती बँकव्यवस्थेचे विकेंद्रीकरण केले, राइशबँक या मध्यवर्ती बँकेऐवजी प्रादेशिक लोक बँकांचा समूह अस्तित्वात आणला. परंतु १९५७ मध्ये संघीय शासनाखाली नवीन मध्यवर्ती जर्मन संघीय बँक फ्रँकफुर्टमध्ये स्थापून तिच्या अकरा शाखा निरनिराळ्या राज्यांत सुरू केल्या. नवीन मध्यवर्ती बँक ही एक स्वतंत्र संस्था असली, तरी तिच्या अध्यक्षाची व संचालक मंडळाची नेमणूक संघीय शासन करीत असते व तिचे भांडवलही संघशासनाच्या मालकीचे आहे. मध्यवर्ती बँकेचे सर्व अधिकार तिला देण्यात आले असून इतर मध्यवर्ती बँकांप्रमाणेच तिची कार्ये आहेत. परंतु मध्यवर्ती बँकेवर संघशासनाचे काहीही नियंत्रण नसल्यामुळे शासनाशी तिचे वारंवार मतभेद संभवतात. मध्यवर्ती बँकेशिवाय इतर चार प्रकारच्या बँका प. जर्मनीमध्ये आहेत : व्यापारी बँका, बचत बँका, गहाण व स्थावर संपदा बँका आणि सहकारी बँका. १९७१ मध्ये ३११ व्यापारी बँकांपैकी सु. १७२ खाजगी मालकीच्या होत्या. सर्वांत मोठ्या असलेल्या ६ व्यापारी बँका एकूण बँकांच्या मत्तेपैकी ४० टक्क्यांवर अधिसत्ता चालवितात व एकूण बँकव्यवहारांपैकी ३० टक्के व्यवहार त्यांच्यातर्फे चालतात. तीन मोठ्या बँका ‘द डॉइश बँक एजी’, ‘द डेझ्नर बँक एजी’व ‘कोमर्झ बँक एजी’या असून त्यांच्या शाखांचे सबंध देशभर जाळे पसरले आहे. चौथी सर्वांत मोठी बँक प. जर्मनीच्या मोठ्या कामगार महासंघातर्फे सहकारी तत्त्वांवर चालविली जाते. या मोठ्या बँकांचे केवळ वित्तक्षेत्रावरच वर्चस्व आहे, असे नसून औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष भाग घेण्याची त्यांची प्रदीर्घ परंपरा आहे. या तीन मोठ्या बँका परंपरेने चालत आलेला वैश्विक बँकव्यवहार करतात : डॉइश बँक व कोमर्झ बँक यांच्या अनुक्रमे ८०० व ७०० हून अधिक शाखा असल्या, तरी या दोन्ही बँकांच्या ८३% शाखा लहान असून त्यांमध्ये दहापेक्षाही कमी कर्मचारी असतात. बचत बँका ८५०, गहाण व स्थावर संपदा बँका ४८ व सहकारी बँका २,१४४ होत्या. यांशिवाय १७ खास सहकारी पतसंस्था होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर पुढील चार खास बँकाही अस्तित्वात आल्या आहेत : पुनर्निर्माण कर्ज निगम (उद्योगधंद्यांना उभारणीसाठी कर्जे तसेच विकसनशील देशांनाही कर्जे देतो), निर्यात पत निगम (निर्यातीसाठी कर्जे), उद्योग पत बँक (उद्योगधंद्यांना मध्यम-व दीर्घ-मुदतीची कर्जे पुरविते) व युद्धबळी आणि निर्वासितांसाठी स्थापिलेली बँक. पश्चिम जर्मनीतील बँक व्यवसायाचे एक खास वैशिष्ट्य हे की, या व्यवसायाकडून उद्योगधंदे, सरकार व स्थानीय प्राधिकरण संस्था यांना दीर्घ मुदतीचे कर्जसाहाय्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध केले जाते.

पश्चिम जर्मनीत कोलोन (देशातील सर्वांत जुना), ब्रेमेन, प. बर्लिन, ड्युसेलडॉर्फ, फ्रँकफुर्ट, हँबर्ग, हॅनोव्हर, म्यूनिक व स्टटगार्ट येथे रोखेबाजार आहेत. कॉफी व साखर वायदे बाजार हँबर्गमध्ये व कापूस वायदे बाजार ब्रेमेनमध्ये आहेत. विशिष्ट शेतमालासाठी देशात इतरत्रही वायदे बाजार आहेत. देशात सु. ८,९०० विमाकंपन्या व ३१ बांधकाम संस्था आहेत. २५१ विमाकंपन्या (आयुर्विमा), २२० निवृत्तिवेतने, १०० अपघातविमा, १७२ सर्वसाधारण विमा, ८५ कृषिविमा, ३८ जहाजविमा आणि ३४ पुनर्विमाविषयक व्यवहार करतात. १६८ परदेशी विमाकंपन्याही देशात कार्यशील आहेत. मूलभूत कायद्यानुसार उलाढाल कर, आयात-निर्यात कर, जकात कर व उपभोग कर या अप्रत्यक्ष करांचे उत्पन्न संघशासनाकडे जाते, तर प्रत्यक्ष करांचे उत्पन्न राज्य शासनांना मिळते. मात्र राज्य शासनांना प्रत्यक्ष करांच्या वसुलीचा काही हिस्सा संघशासनाला द्यावा लागतो. एकूण करांच्या उत्पन्नापैकी सु. ३६% उलाढाल करापासून मिळते, तर आयकराचे उत्पन्न एकूण करवसुलीच्या सु. २५ टक्क्यांइतके असते. कंपनी कराचे (अविभाजित नफ्यावर ४५%) उत्पन्न सु. ७% आहे. जुलै १९७० पासून प्राप्तिकर व कंपनीकर या दोहोंवर प्रत्येकी १०% उपरिकर आकारण्यात येऊ लागला. उदार व्यापार धोरणामुळे आयात कराचे उत्पन्न अलीकडील काळात बरेच कमी झाले आहे. साखर, बीर, मीठ, अल्कोहॉल, कॉफी, आगकाड्या, चहा, पत्ते, तंबाखू, पेट्रोलियम आणि तज्जन्य पदार्थ, प्रदीपक, व्हिनेगर, मद्ये व वाहतूक सामग्री यांवर अबकारी कर आकारला जातो. १९७४ पासून अप्रत्यक्ष करांवर अधिक भर देण्यात येऊ लागला. यूरोपीय आर्थिक समूहाच्या धोरणांमुळे प. जर्मनीच्या वित्तरचनेत बरेच बदल होऊ लागले आहेत. १९७१ पासून यूरोपीय आर्थिक समूहाच्या एकत्रित अर्थसंकल्पात कृषीपासून शासनाला मिळणारे महसुली उत्पन्न जमा होऊ लागले आहे. १९७५ सालापासून समूहाच्या एकत्रिक अर्थ-संकल्पात आयात-निर्यात कर उत्पन्न तसेच १% विक्रीकर उत्पन्न जमा करण्याच्या योजना होत्या. समूहाच्या आर्थिक निर्णयानुसार प. जर्मनीने १९६८ पासून मूल्यवर्धित करपद्धती (व्हॅल्यू ॲडेड टॅक्स) अवलंबिली आहे. १९७३ च्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न (राजस्व) व खर्च अनुक्रमे ११,६२९ कोटी डॉ. मा. व १२,०३९ कोटी डॉ. मा. होते. राजस्वामध्ये पुढीलप्रमाणे उत्पन्न मिळाले (कोटी डॉ. मा.) : केंद्राचे कर व आयात-निर्यात कर यांपासून ३,५२२·१, केंद्र व राज्यांचे संयुक्त कर व व्यापार कर यांपासून ७,७४७·९ आणि इतर करांपासून ३५८·३. खर्चाच्या बाबी पुढीलप्रमाणे (कोटी डॉ. मा.) : संरक्षण २,७८४·६, सामाजिक सुरक्षा ३,४२०·३, शेती व अन्न ३२३, दळणवळण ९८४·७, वीज, गॅस व पाणी ३१३·२, शिक्षण व विज्ञान ६६६·६, गृहनिवसन, १८२·२ आणि इतर ३,३६४·४.

आंतरराष्ट्रीय पातळीवर तुलना करू जाता १९७०–७५ या काळात प. जर्मनीची आर्थिक परिस्थिती फारशी चिंताजनक नव्हती. या काळात चलनवाढ समस्या ही केवळ घरगुती स्वरूपाचीच नव्हती, तर तिला जागतिक स्वरूप प्राप्त झाले होते. अर्थव्यवस्थेमधीलठळकदोषअसाकी, १९७० पर्यंतच्याकाळात अर्थव्यवस्थेत जी तेजी निर्माण झाली होती, ती मुख्यतः निर्यात आघाडीचा परिणाम होता आणि त्याच कारणासाठी जर्मनीचा आर्थिक विकास हा तिच्या महत्त्वाच्या बाजारपेठांवर अवलंबून होता. यावर उपाय म्हणजे निर्यातीवर खर्ची पडणारा साधनसामग्रीचा ओघ अर्थव्यवस्थेच्या अधःसंरचनेचा विकास करण्यासाठी वळविणे हे काम अवघड होते. शासनाने शाळा, रुग्णालये व सामाजिक सेवासुविधा यांचा दर्जा सुधारण्याकरिता त्यांवर बराच खर्च केला असला, तरी दूरगामी अशी सुधारणा करणे, मोठ्या प्रमाणात कर वाढविल्याखेरीज शक्य नाही, हेही तितकेच खरे. कृषिविभाग व अर्थव्यवस्थेचे इतर विभाग यांमधील उत्पन्नाची दरी कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न चालूच आहे.

परकीयभांडवल :प. जर्मनीच्या सर्व औद्योगिक क्षेत्रांत परदेशी भांडवलाची गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. अलीकडील काही वर्षांत सु. अर्धी परदेशी गुंतवणूक खनिज तेल, रसायन, मोटार व विद्युत् यंत्रे या उद्योगांत विशेषेकरून झाली. १९६८ च्या अखेर, परदेशी भांडवल-गुंतवणूक ७०० कोटी डॉ. मा. (१३·५ टक्के) होती. ही गुंतवणूक खालील क्षेत्रांत अधिककरून झाली आहे : तेलशुद्धीकरण व प्रक्रिया उद्योग एकूण परदेशी भांडवलाच्या २१%, यंत्रे मोटार-उद्योग १४%, रसायने आणि प्लॅस्टिके १२·१%, विद्युतीय परिशुद्धी यंत्रे व प्रकाशीय उद्योग ११·३%, खाद्यपदार्थ आणि पेये ९·९%. परदेशी भांडवल मालकीचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे : तेलशुद्धीकरण ८४%, खाद्यान्ने व पेये ४८%, प्लॅस्टिक व रबर ३५%, वीज उद्योग ३१%, मोटार यंत्रोद्योग २५% आणि खाणकाम २५%. परदेशी गुंतवणूक मुख्यत्वे पुढील देशांकडून होते : अमेरिकेची संयुक्त संस्थाने ४३·६%, नेदर्लड्स १३·४%, स्वित्झर्लंड १२·६% आणि ग्रेट ब्रिटन १०%. एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ९०% निर्मितिउद्योगात असते. १९५२ पासून जर्मनीने परदेशांत भांडवल गुंतवण्यास प्रारंभ केला. १९६६ च्या सुमारास प. जर्मनीची परदेशांतील भांडवल गुंतवणूक ९०० कोटी डॉइश मार्कच्या घरात पोहोचली होती. या गुंतवणुकीची विभागणी अशी होती : जवळजवळ अर्धीअधीक रक्कम यूरोपमध्ये, अमेरिका खंडातर्गत देशांत ७,६०० लक्ष डॉ., आफ्रिका १,४१० लक्ष डॉ., आशिया ७८४·५ लक्ष डॉ. आणि ऑस्ट्रेलिया व ओशिॲनिया ३८४·५ लक्ष डॉलर. जर्मनीची परदेशांतील गुंतवणूक मुख्यतः अवजड उद्योगधंदे, रसायने व औषधी उद्योग, वीजनिर्मिती, यंत्रे व यंत्रसामग्री आणि वाहने या उद्योगांमध्ये झालेली आहे.


वाहतूक व संदेशवहन : प. जर्मनीमध्ये लोकसंख्या दाट व औद्योगिक विकास भरपूर असल्यामुळे वाहतूकीस विशेष महत्त्व आहे. शिवाय यूरोपच्या मध्यभागी असल्यामुळे प. जर्मनीला यूरोपची मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर हाताळावी लागते. म्हणूनच देशाची वाहतूकव्यवस्था प्रगतिशील व विकसित अशी आहे. तिच्यात दिवसेंदिवस सुधारणा करण्याच्या योजनाही अंमलात येत आहेत. वाहतूक मुख्यत्वे उत्तर-दक्षिण मार्गांवरून होत असते. एकूण मालवाहतुकीपैकी ३३% रेल्वेने, २५% अंतर्गत जलमार्गाने, १५% सागरमार्गाने व मोटर-ट्रकने होत असते.

रेल्वेमार्ग : जर्मनीची पहिली आगगाडी १८३५ साली न्यूरेंबर्ग-फ्यूर्ट या ८ किमी. मार्गावर धावू लागली. १९२० च्या सुमारास सरकारी मालकीची झालेली ही रेल्वेयंत्रणा एका शासकीय निगमामार्फत कार्य करू लागली. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीमध्ये सु. ५६,३२७ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. त्यांपैकी महायुद्धानंतर प. जर्मनीकडे सु. ३०,५७७·५ किमी. लांबीचे रेल्वेमार्ग शिल्लक राहिले व त्यांच्यापैकी बरेचसे उध्वस्त झालेले होते. ते दुरुस्त करून मोठ्या प्रमाणावर त्यांचे आधुनिकीकरण करावे लागले. १९७० मध्ये त्यांची एकूण लांबी २९,७७३ किमी. होती व त्यांच्यापैकी ८,५२९·५ किमी. लांबीच्या मार्गावर विजेची एंजिने वापरली जात. जहाज वाहतूक, रस्ते वाहतूक व रेल्वेवाहतूक या विविध प्रकारची मालवाहतूक सत्वर हाताळली जावी, या दृष्टीने रेल्वे मार्गावर आधानपात्र सेवेच्या (कन्टेनराइज्ड-फ्रेट फॅसिलिटिज) सर्व सोयी करण्यात आल्या. केवळ प. जर्मनीतील शहरांसाठीच नव्हे, तर यूरोपमधील इतर शहरांना जर्मन फेडरल रेल्वे द्रुत गाड्यांची (ट्रान्स यूरोपियन एक्स्प्रेसेस) सोय पुरविते. या गाड्या ताशी १४४ किमी. वेगाने धावतात. याहीपेक्षा जास्त वेगाने आगगाड्या धावविण्याचा प्रयत्न चालू आहे. हँबर्ग ते म्यूनिक हे ८४० किमी. लोहमार्गीय अंतर तोडण्यास अशा द्रुत आगगाड्यांना फक्त सात तास लागतात. १९७२ मध्ये प. जर्मन आगगाड्यांनी सु. ३,८८२ कोटी प्रवासी-किमी. प्रवासी-वाहतूक आणि ६,५६८ कोटी टन-किमी. मालवाहतूक हाताळली.

रस्ते :दुसऱ्या महायुद्धानंतर सु. १,२०,७०१ किमी. लांबीचे रस्ते प. जर्मनीकडे राहिले व त्यांपैकी सु. २,१४० किमी. मोटररस्ते होते. हे सर्व रस्ते युद्धोत्तर काळातील मोटरवाहतूक समर्थपणे पेलण्यास अपुरे होते आणि त्यांच्यात सुधारणा करण्याचीही गरज होती. १ जानेवारी १९७२ रोजी एकूण रस्ते १,६५,२९७ किमी. लांबीचे असून त्यांपैकी ऑटोबान्स ४,८२८ किमी., राजमार्ग (हमरस्ते) ३२,५९० किमी., प्रथमश्रेणी मार्ग ६५,३४० किमी. व द्वितीय श्रेणी मार्ग ६२,५३९ किमी. लांबीचे होते. १९८५ पर्यंत हमरस्त्यांची लांबी ५८, ७४१ किमी. पर्यंत वाढविण्याची योजना आहे. १९३०–३५ च्या दरम्यान नाझी राजवटीत ऑटोबान्स-द्रुतगती मार्ग बांधण्यास प्रारंभ झाला. १९४२ साली त्यांची लांबी २,१०८ किमी. होती. १९५७ पासूनहेमार्गमोठ्याप्रमाणातबांधण्यासवत्यांचाविस्तारकरण्यासशासनानेसुरुवातकेली. १९७२ मध्येत्यांचीलांबी ४,८२८ किमी. होती. जर्मनीतील मोटर रस्त्यांवरून नेदर्लंड्स, बेल्जियम व ऑस्ट्रिया यांसारख्या शेजारच्या राष्ट्रांच्या मोटररस्त्यांवर प्रवास करता येतो. अशाच प्रकारचा प्रवास डेन्मार्क, फ्रान्स व स्वित्झर्लंड या देशांतील रस्त्यांवर करता येईल, अशी योजना कार्यवाहीत येणार आहे. १९७२ अखेर प. जर्मनीतील एकूण मोटरवाहनांची संख्या सु. १९३·१० लक्ष होती. त्यांपैकी १५०·६४ लक्ष मोटरी, १२·५९ लक्ष इस्टेट कार, १०·६० लक्ष ट्रक, १५·१६ लक्ष ट्रॅक्टर, १·९७ लक्ष मोटरसायकली, ७·८ लक्ष ट्रेलरगाड्या व इतर वाहने २·१३ लक्ष होती.

जलमार्ग : पश्चिम जर्मनीतील अंतर्गत जलमार्गांची लांबी ६,००० किमी. आहे (१९७२). त्यांपैकी ४,०२३ किमी. नदीमार्गे व इतर कालवामार्गे आहेत. एकूण अंतर्गत जलवाहतुकीपैकी ७५% ऱ्हाईन नदीतून होते. या जलमार्गांत सतत सुधारणा करण्यात येत असतात. या मार्गावरून भारी माल, कच्चा माल व इंधने यांची कमी खर्चात वाहतूक होऊ शकते व म्हणून हे मार्ग बोटींनी गजबजलेले असतात. जर्मनीच्या महत्त्वाच्या कालव्यांपैकी मिट्ललँड कालवा (३२२ किमी. लांबीचा) हा एक आहे. दुसरा महत्त्वाचा कील कालवा होय. त्याची लांबी ९८ किमी. असून त्याने १८९५ पासून उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र जोडलेले आहेत. अंतर्गत जलवाहतुकीच्या बाबतीत जर्मनी व सर्व यूरोप यांना फायदेशीर ठरणारी महत्त्वाची घटना म्हणजे उत्तरेकडील नद्या व कालवे हे डॅन्यूब, तिच्या उपनद्या व कालवे यांना जोडण्याची योजना, नवव्या शतकातील शार्लमन राजाच्या काळापासून ह्या प्रकल्पाची योजना विचाराधीन असल्याचे आढळते. उत्तर समुद्र व काळा समुद्र यांना जोडणारा हा आंतर-यूरोपीय प्रकल्प १९८० च्या सुमारास कार्यन्वित होईल असा अंदाज आहे. १९७२ साली अंतर्गत जलमार्गांनी २,२८० लक्ष मे. टन मालवाहतूक करण्यात आली.

पश्चिम जर्मनीचा व्यापारी जहाजांच्या संख्येच्या बाबतीत जगात आठवा क्रमांक लागतो (८७ लक्ष टन एकूण नोंदलेला टनभार). हँबर्ग हे देशाचे प्रमुख बंदर आहे. १९७२ मध्ये प. जर्मनीच्या जहाजांची संख्या २,२४३ व टनभार सु. ७८ लक्ष टन होता.

हवाईवाहतूक : वैमानिकी विद्येच्या विकासात जर्मनीने लावलेले अनेक शोध लक्षात घेता, जर्मन राष्ट्र हे दोन महायुद्धांच्या दरम्यान हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात अग्रेसर राष्ट्रांपैकी एक ठरले असल्यास नवल नाही. मुळातील १९२६ मध्ये स्थापन झालेल्या ‘डॉइश लुफ्तहंसाएजी’ या खाजगी हवाई कंपनीवरूनच आताच्या सरकारी मालकीच्या हवाई कंपनीने ‘लुफ्तहंसा’ हे नाव घेतले. मूळची कंपनी यूरोपभर नियमित प्रवासी वाहतूक करण्यात अग्रेसर होती व १९३६ च्या सुमारास उत्तर अटलांटिक हवाई मार्गांवरून वाहतूक करीत होती. ६ जानेवारी १९५३ रोजी शासनाने ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली व तेच नाव कायम ठेवले. तेव्हापासून जगामधील मोठ्या हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये ‘लुफ्तहंसा’ कंपनीचे नाव सुविख्यात झाले आहे. या कंपनीचे ४० कोटी डॉ. मा. भांडवल असून तिचे प्रधान कार्यालय कोलोन शहरात आहे. ७४·३% भांडवल शासनाच्या मालकीचे असून, खाजगी उद्योगाच्या मालकीचे १७·८% भांडवल आहे. प. जर्मनीतील जलद रेल्वेगाड्यांमुळे अंतर्गत हवाई वाहतूकीला फारसे महत्त्व नाही परंतु प. जर्मनीचे स्थान यूरोपात मध्यवर्ती असल्यामुळे यूरोपच्या हवाई प्रवासी-वाहतुकीमध्ये प. जर्मनीचा फार मोठा वाटा आहे. १९७२ साली ‘लुफ्तहंसा’ विमानांनी ८,५२० लक्ष प्रवासी २·०८ लक्ष टन माल व ३५,५६९ टन टपाल यांची वाहतूक केली.

फ्रँकफुर्टचा ऱ्हाईन-मेन हा विमानतळ लंडन व पॅरिस यांच्या खालोखाल यूरोपमधील सर्वांत मोठा विमानतळ समजला जातो. त्याशिवाय प. जर्मनीत आणखी दहा विमानतळ मोठ्या शहरांना हवाई वाहतुकीची सोय पुरवितात. म्यूनिक व हँबर्ग या शहरांकरिता मोठे विमानतळ बांधण्यात येत आहेत. प. जर्मनीला ५५ परदेशी हवाई वाहतूक कंपन्या आपली वाहतूकसेवा उपलब्ध करतात.

देशात १९७१ च्या अखेरीस, २४,८९२ डाककचेऱ्या व १०,८८९ दूरसंचरण कार्यालये होती. १९७२ मध्ये दूरध्वनी, रेडिओ व दूरचित्रवाणी यांची संख्या अनुक्रमे १,६५,२१,००० १,९१,९९,३२० व १,७१,००,१३३ होती.


पर्यटन : पश्चिम जर्मनीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १९५१ मध्ये त्यांची संख्या ३३ लक्ष होती परंतु १९७० मध्ये ८० लक्ष प्रवाशांनी प. जर्मनीला भेट दिली. पर्यटक मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, नेदर्लंड्स, फ्रान्स, इंग्लंड, डेन्मार्क व बेल्जियम या देशांतून येतात. प्रवाशांना जर्मनीत अनेक आकर्षणे आहेत. उदा., ऱ्हाईन नदीचे खोरे व जलपर्यटन, दक्षिण भागातील पर्वतांतील केंद्रे व किनाऱ्यावरील प्रवासकेंद्रे. जर्मन लोक स्वतः अत्यंत प्रवासप्रिय असून यूरोप व इतर देशांत पर्यटनासाठी जाणाऱ्या जर्मनांची संख्या सतत वाढत आहे. १९७२ साली जर्मनीस सु. ७५·६५ लक्ष प्रवाशांनी भेट दिली व ५९७·३० कोटी डॉ. मा. खर्च केले. १९७३ साली निवासांमध्ये प्रवाशांसाठी ११,४६,८६६ खाटा उपलब्ध होत्या.

धोंगडे, ए. रा.

लोक व समाजजीवन : ३१ डिसेंबर १९७३ रोजी या देशाची बर्लिनचा पश्चिम भाग वगळून एकूण लोकसंख्या सु. ६,००,५३,५०० होती. लोकसंख्येचे सरासरी घनत्व दर चौ. किमी. ला २५० इतके आहे. प. बर्लिनची लोकसंख्या सु. २०,४७,९०० इतकी होती. एकूण लोकसंख्येपैकी २३% लोकसंख्या २,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये, ३९% लोकसंख्या २,००० ते ५,००० लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये, २२% लोकसंख्या ५०,००० ते ५,००,००० लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये व १६% लोकसंख्या ५ लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठमोठ्या शहरांमध्ये समाविष्ट झाली आहे. प. बर्लिन, हँबर्ग, म्यूनिक, कोलोन, एसेन, ड्युसेलडॉर्फ, फ्रँकफुर्ट, डॉर्टमुंड, स्टटगार्ट, हॅनोव्हर, ब्रेमेन आणि न्यूरेंबर्ग ही पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली मोठी शहरे आहेत. सु. २,८३,२६० लोकसंख्या असलेले बॉन हे शहर प. जर्मनीचे राजधानीचे ठिकाण आहे. एकूण लोकसंख्येपैकी ९९% लोक जर्मन आहेत. उरलेल्या लोकसंख्येत डॅनिश लोकांचे प्रमाण जास्त आहे. शुद्ध जर्मन भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे. स्थलपरत्वे भाषेमध्ये फरक पडताना जाणवतो. उत्तर समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या भाषेत अपभ्रंश आढळतो. या लोकांच्या भाषेवर डॅनिश लोकांच्या भाषेचा प्रभाव पडलेला जाणवतो.

१९५०–७० या काळात जननप्रमाण हजारी १६ व मृत्युप्रमाण हजारी ११ होते. या काळात लोकसंख्या प्रतिवर्षी २,९१,००० ने वाढल्याचे दिसते. केवळ हँबर्ग आणि प. बर्लिन या दोन ठिकाणी मृत्यूचे प्रमाण जन्मप्रमाणापेक्षा अधिक राहिल्याने लोकसंख्येत घट झालेली आढळते. प. बर्लिन एकाकी पडत असल्यामुळे तरुण पिढीतील रहिवाशांना तेथे टिकवून धरणे किंवा आकर्षून घेणे ही समस्या सतत असते. १९७० साली लोकसंख्येपैकी ४७·५ टक्के लोक ४५ किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे होते आणि त्यांपैकी ४५ टक्के लोकांचे वय ६५ पेक्षाही अधिक होते. १९७२ साली प. जर्मनीच्या लोकसंख्येत घट झालेली आढळते. जर्मनीत प्रथम विवाहाचे वय सावकाशपणे कमी होत असले, तरी जर्मन महिलांचे मुले होण्याचे वय तुलनेने उशिरा म्हणजे २९ ते ३० च्या आसपास आहे.

पश्चिम जर्मनीत सु. २५,००,००० स्थलांतरित लोक आहेत. यांत विदेशी लष्करी अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांच्या संख्येच्या समावेश केलेला नाही. यांतील / ते / लोक दक्षिण यूरोपातून हंगामी वास्तव्यासाठी आलेले कामगार आहेत. कामगारांची तूट हा प. जर्मनीला सतत भेडसावणारा प्रश्न आहे तेव्हा कमीअधिक प्रमाणात अशा नोकरदार स्थलांतरितांची बदलती संख्या जर्मनीच्या लोकसंख्येत नेहमी आढळणारे वैशिष्ट्य आहे. जर्मनीत येणारे हे कामगार आपली कुटुंबे स्वतःबरोबर सहसा आणत नाहीत किंवा जर्मनीतील आपल्या वास्तव्यात विवाह उरकून घेण्याचीही त्यांची प्रवृत्ती नसते. बहुतांशी ते मायदेशी परततात. असे फारच थोडे लोक जर्मनीत कायम वास्तव्य करून राहतात, पण ते अल्पसंख्याक म्हणून जर्मनीत आढळतात. यूगोस्लाव्हिया, इटली, तुर्कस्तान, ग्रीस, स्पेन आणि पोर्तुगाल या क्रमाने जर्मनीत या देशांतून आलेल्या स्थलांतरितांची संख्या आहे.

जर्मनीतील जवळजवळ निम्मी लोकसंख्या १० प्रमुख महानगरांमधून आढळते, तरीसुद्धा एकंदरीत जर्मनीतील लोकसंख्येचे वितरण बरेचसे अनुकूल व समप्रमाणात झालेले आहे. इतर यूरोपीय देशांत एखाददुसऱ्या महानगरात लोकसंख्येचे केंद्रीकरण होऊन बाकी प्रदेशांत फारच विषम वाटणी आढळते परंतु जर्मनीत मात्र असे केंद्रीकरण एका महानगरापुरते आढळत नाही. जर्मनीतील परंपरागत प्रादेशिकतेमुळे अशा रीतीने हितकारी आणि सम जनसंख्या-वितरण येथे झालेले आहे. त्याचप्रमाणे जर्मनीतील आर्थिक अनुकूलताही एखाद्या विशिष्ट शहराच्या परिसरात वा विशिष्ट क्षेत्रात एकवटलेल्या नाहीत.

एकतृतीयांशापेक्षाही थोडे अधिक लोक अद्यापिही ५,००० पेक्षा कमी वस्तीच्या खेड्यांतून राहतात आणि अवघे पाव हिस्सा लोक दहा हजार ते एक लाख वस्तीच्या शहरांमध्ये आहेत. पूर्वीच्या तुरळक वस्तीच्या मागासलेल्या क्षेत्रात झालेला व होणारा हलक्या उद्योगधंद्यांचा प्रसार आणि सर्वत्र उत्तम वाहतूकव्यवस्थेचा होणारा प्रसार यांमुळे लोकसंख्येचे हे सम वितरण जर्मनीत बराच काळ टिकू शकेल.

मेन नदीच्या उत्तरेकडील रहिवासी हे जर्मन माणसाविषयी ज्या सर्वसामान्य कल्पना आहेत, त्यांच्याशी बरेचसे मिळते-जुळते आहेत म्हणजे पिंगटवर्णी, निळसर डोळ्यांचे, कष्टाळू, उद्यमशील, सौम्य प्रवृत्तीचे लोक. ऱ्हाईनलँडमधील जर्मन मात्र त्यांच्या चिंतायुक्त स्वभावामुळे आणि लॅटिन यूरोपशी असणाऱ्या त्यांच्या गेलिक जवळिकीमुळे वेगळे वाटतात. दक्षिणेकडील फ्रँकोनियन मजबूत बांध्याचे, कामाला वाहिलेले आणि आपले परंपरागत वळण जतन करू पहाणारे तसे सनातनी वाटतात. ‘चलता है’ प्रवृत्तीचे, सर्व गोष्टी लीलया स्वीकारणारे बाडेनमधील रहिवासी आणि त्यांच्याबरोबरचे ॲलेमॅनियन–स्वेबियन यांच्यातील तफावत विरोधाने जाणवते. स्वेबियन हे सर्वांत जास्त उद्योगी, कष्टकरी, चोख व्यवहारी, अंतर्मुख आणि स्वावलंबी जर्मन मानले जातात. बव्हेरियन तसे तगडे, राकट प्रवृत्तीचे, विनोदप्रिय आणि अतिउत्साहाने वागणारे लोक होते. स्वेबीया बुद्धिवंत व कवींचे तर बव्हेरिया हे कलावंतांचे माहेरघर आहे.

प. जर्मनीने धर्मस्वातंत्र्य मान्य केलेले आहे. प्रॉटेस्टंट आणि रोमन कॅथलिक धर्मीयांची संख्या बरीचशी समसमान आहे. लोकसंख्येपैकी प्रॉटेस्टंट ४९% व रोमन कॅथलिक सु. ४५% आहेत. धार्मिक बंधने शिथिल झाली आहेत. त्याचबरोबर चर्च कर टाळण्यासाठी निधर्मीपणा वाढत आहे. ऱ्हाईनलँड, अपर बव्हेरिया हे रोमन कॅथलिकांचे, उ. जर्मनी प्रॉटेस्टंटांचे तर ऱ्हाईन-मेन, फाल्झ आणि नैर्ऋत्य जर्मनीतील जिल्ह्यांत दोन्ही धर्मपंथी आढळतात. जर्मनीत सध्या ६०,००० ज्यू असून ते बर्लिन, कोलोन, ड्युसेलडॉर्फ, फ्रँकफुर्ट या शहरांतून आणि बव्हेरियात विखुरलेले आहेत.

देसाई, दा. सी.

१९७२ मध्ये ३,५१९ इस्पितळांमधून ७,०१,२६३ खाटांची सोय होती. उच्च प्रतीची रुग्णसेवा उपलब्ध असून खेडोपाडीसुद्धा उत्तम सोयी आहेत. १९७० मध्ये दर ६१२ नागरिकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण होते. निम्मे डॉक्टर खाजगी व्यवसाय करतात. ३२,००० दंतवैद्यांपैकी ३०,००० खाजगीव्यवसायकरतात. क्षयरोगाचे प्रमाण खूपच कमी करण्यात यश मिळाले आहे. स्थानिक सार्वजनिक आरोग्यसंस्था क्ष-किरण चिकित्सेची मोफत व्यवस्था करतात. सार्वजनिक स्वच्छतासेवा उत्तम प्रतीची आहे.


कामगारांना, कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्तांना आरोग्य विमा सक्तीचा आहे. त्याखाली रोगावर इलाज, औषधे, इस्पितळ व शुश्रूषा सेवा, प्रसूतिसेवा, विमाधारक व त्यांचे कुटुंबीय यांना मृत्यु-उपदान व आजारसमयी सेवा इ. व्यवस्था आहे. सु. ९०% लोकसंख्येस सक्तीच्या आरोग्य विम्याचा लाभ मिळतो आणि खर्चाच्या ९०% रक्कम विमाधारकास मिळू शकते.

सर्व कामगारांना अपघात विमा सक्तीचा आहे. याशिवाय खाणीतील कामगार, वृद्ध शेतकरी व कामगार, अनाथ मुले, युद्धबळी इत्यादींसाठी स्वतंत्र विमाव्यवस्था आहे.

थोडक्यात, प. जर्मनीची समाजकल्याण सेवांची व्यवस्था ही जगामध्ये अतिशय प्रगत असून इतर राष्ट्रांनी या राष्ट्राच्या पावलावर पाऊल टाकून आपापल्या व्यवस्था उभारल्या आहेत.

दुसऱ्या महायुद्धात प. जर्मनीतील एकूण घरांपैकी २०% घरे उध्वस्त झाली व एकूण ५०% घरांची मोडतोड झाली. १९६५ पर्यंत २·५ कोटी लोकांसाठी ८८ लक्ष घरांची बांधणी पूर्ण झाली होती. सुरुवातीस यासाठी शासनाने पैसा पुरवला आणि काही परकीय मदतही मिळाली परंतु १९६५ च्या सुमारास गृहनिवसनासाठी लागणाऱ्या भांडवलाचा सु. ६६% हिस्सा खाजगी भांडवलरूपाने उभा करण्यात येत होता. व्यक्तीने काही वर्षे नियमित बचतीचे हप्ते भरल्यास शासनाकडून त्याला कर्जरूपाने घर बांधण्यास मदत मिळू शकते. अजूनही प. जर्मनीची घरटंचाई पूर्णपणे नाहीशी झाली नाही. घरभाडी व घरांच्या किंमती अद्यापही उच्च पातळीवर आहेत. १९७२ साली साली ६,६१,००० नवी घरे बांधण्यात आली. १९७३ मध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांनी घसरले (३,३०,६२४ घरे). १९७३ मधील मासिक सरासरी गृहनिवसन-प्रमाण २७,४५२ एवढे होते.

भाववाढ बरीच झाली असूनही सामान्य कामगाराचे राहणीमान बरेच वरच्या दर्जाचे आहे. संपत्तीचे विभाजनही फारसे विषम नाही. मध्यमवर्गीय कर्मचारी व औद्योगिक कामगार यांच्या उत्पन्नांत फारशी तफावत दिसून येत नाही.

युद्धपूर्व जर्मनीच्या वास्तुशिल्पीय संपत्तीपैकी बऱ्याचशा वास्तू प. जर्मनीकडे राहिल्या. त्याचप्रमाणे प. जर्मनीकडे बरीचशी ग्रंथालये, चित्रवीथी आणि नाट्यशाळा आल्या. जर्मनीच्या विभाजनानंतर पूर्व जर्मनीतून सांस्कृतिक मूल्यांची जपणूक आणि निर्मिती करणारे बरेच कलावंत प. जर्मनीत आले.

कलांना शासकीय मदत व उत्तेजन देण्याची जर्मनीची चारशे वर्षापासूनची जुनी परंपरा आहे. नाट्यगृहे बांधणे, संग्रहालये व ग्रंथालये स्थापणे, कवी, लेखक, चित्रकार व नट यांना पुरस्कार देणे ही अखंड जर्मनीची परंपरा प. जर्मनीतही चालू आहे. प. जर्मनीतील १९५ नाट्यगृहांना शासनाकडून किंवा नगरपालिकांकडून अनुदान मिळते. शिवाय ७० खाजगी नाट्यगृहेही आहेत. त्यांत ६० ऑपेरा संच आपापले कार्यक्रम पेश करीत असतात. जर्मन प्रेक्षक सर्व थरांतून येत असतात. संगीत जलसेही मोठ्या प्रमाणावर भरतात. निरनिराळ्या शहरांतून वर्षातील निरनिराळ्या वेळी संगीत महोत्सव होतात. उदा., बाइरॉइटमधीलव्हागनरमहोत्सव, बर्लिनमहोत्सव बॉनमधील बेथोव्हन महोत्सव वुर्ट्‌सबर्गमधील मोट्सार्ट महोत्सव.

असे असूनही वाङ्‌मयनिर्मिती वा नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रात युद्धोत्तर जर्मनीला आपली पूर्वीची प्रतिष्ठा अद्याप मिळविता आली नाही. विसाव्या शतकात फक्त चारच कवी-लेखकांना जागतिक कीर्ती मिळू शकली : फ्रांट्स काफ्का (१८८३–१९२४), टोमास मान (१८७५–१९५५), रायनर मारीआ रिल्के (१८७५–१९२६) व बेर्टोल्ट ब्रेक्ट (१८९८–१९५६). कादंबरीकारांपैकी फक्त दोघांच्याच कादंबऱ्यांची इतर भाषांतून भाषांतरे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. हाइन्रिख ब्योल व ग्गूंटर ग्रास, ब्रेक्ट व त्सुकमायर यांच्याखेरीज झीखफ्रीट लेंट्स आणि पेटर व्हाइस यांची नाटकेही जगात प्रसिद्धी पावली.

प. जर्मनीत पाचशेंहून अधिक संग्रहालये आहेत. प. बर्लिन, म्यूनिक, माइन्त्स, फ्रँकफुर्ट व बॉन येथील संग्रहालये विशेष प्रसिद्ध आहेत. यांशिवाय अनेक लहानलहान कलावीथी देशभर पसरल्या आहेत. विशिष्ट कलाप्रदर्शने वारंवार भरत असतात.

प. जर्मनीतील मोठ्या ग्रंथालयांपैकी पुढील अतिशय प्रसिद्ध आहेत : म्यूनिकचे बव्हेरियन राज्य ग्रंथालय, मारबर्गचे पश्चिम जर्मन ग्रंथालय, हायड्लबर्ग, कोलोन, गटिंगेन, ट्यूबिंगेन व म्यूनिक या विद्यापीठांची ग्रंथालयेही प्रसिद्ध आहेत. शिवाय प्रांतीय शासनांनी व नगरपालिकांनी चालविलेली ग्रंथालयेही ठिकठिकाणी आढळतात.

जर्मनीत सु. २,५०० प्रकाशनसंस्था आहेत. त्यांतील बऱ्याचशा मध्यम व लहान आकाराच्याच आहेत. १९७१ मध्ये सु. ४७,००० पुस्तकांचे प्रकाशन झाले, त्यांपैकी सु. ३९,००० चे प्रथमच प्रकाशन झाले.

प. जर्मनीत १९७१ च्या अखेरीस ३,३१४ चित्रपटगृहे होती आणि त्यांमधून सु. १३ लाख प्रेक्षकांची बसण्याची सोय होती. चित्रपट निर्मितीच्या बाबतीत प. जर्मनीने विशेष प्रगती केल्याचे आढळत नाही.

प. जर्मनीत १९७३ मध्ये ४३२ दैनिके व ६३ साप्ताहिके (रविवार) असून त्यांच्या एकूण सरासरी २१० लक्षांच्यावर प्रतींचा खप होतो. हे प्रमाण सबंध यूरोप खंडात पहिल्या क्रमांकाचे आहे. त्याच वर्षी मासिके आणि नियतकालिके यांचा आकडा ८७८ व एकूण खप सु. ९०० लक्ष होता. इतर राष्ट्रांत इतकी वृत्तपत्रे क्वचितच असतात. देशातील ॲक्झेल स्प्रिंगर समूह हा सबंध यूरोप खंडात सर्वांत मोठा वृत्तपत्रसमूह गणला जातो. रेडिओ व दूरचित्रवाणी, टपाल व दळणवळण मंत्रालयाच्या आधिपत्याखाली सार्वजनिक निगम, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी सेवा पुरवितात. निगमांना आपापले धोरण ठरविण्यास मुभा असते. दहा निगम निरनिराळ्या प्रदेशांत आकाशवाणी सेवा पुरवितात. १९७२ मध्ये रेडिओ परवानेधारक १,९१,९९,३२० आणि दूरचित्रवाणी परवानेधारक १,७१,००,१३३ होते.

संगीताच्या बाबतीत श्रोत्यांना अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील बंदिशकार विशेष प्रिय वाटतात. प्रत्येक मोठ्या शहराचा वाद्यवृंद आहे. संगीताच्या मैफली वारंवार भरत असतात. बाइरॉइट येथे प्रतिवर्षी व्हागनर संगीतोत्सव भरतो. बर्लिन, व्हीस्बाडेन, बॉन, वुर्ट्‌सबर्ग येथील संगीतोत्सवही प्रसिद्ध आहेत. बर्लिन, बामबेर्क, स्टटगार्ट येथील वाद्यवृंदांची जगातील अग्रेसर वाद्यवृंदांमध्ये गणना होते.

पश्चिम जर्मनीत नभोवाणी व दूरचित्रवाणी सेवा लोक निगमांमार्फत पुरविल्या जातात व त्यांना आपापली धोरणे आखण्यास मुभा आहे. दहा प्रादेशिक निगम निरनिराळ्या प्रदेशांसाठी नभोवाणी कार्यक्रम आखतात. एक निगम तीस भाषांतूनही जगाच्या निरनिराळ्या भागांसाठी कार्यक्रम सादर करीत असतो. १९७२ मध्ये प. जर्मनीत सु. १९२ लक्ष नभोवाणी परवाने व १७१ लक्ष दूरचित्रवाणी परवाने चालू होते.

शिक्षण : शालेय शिक्षण ६ ते १८ वयाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत व सक्तीचे आहे. शिक्षणव्यवस्थेच्या बाबतीत प्रत्येक प्रांतास स्वातंत्र्य असले, तरी अभ्यासक्रम व शिक्षणमान यांत एकरूपता साधण्याचे सतत प्रयत्न चालू असतात. दहा वर्षे वयापर्यंत सर्व मुले प्राथमिक शाळांत शिकतात. त्यांच्यापैकी बरीचशी मुले पुढील पाच वर्षांसाठी मुख्य शाळांत जातात. त्यानंतर व्यावसायिक शाळांतून त्यांना व्यापारी वा औद्योगिक शिक्षण मिळू शकते. सु. १४% विद्यार्थी उच्च माध्यमिक (जिम्नेसिअम) शाळांतून ७ ते ९ वर्षे अवधीचा अविश्रांत अभ्यासक्रम पूर्ण करून ‘अबितुर’ हे प्रमाणपत्र मिळवून विद्यापीठप्रवेशास पात्र होतात.


मध्ययुगीन काळापासून जर्मन विद्यापीठांनी दोन स्वातंत्र्यांची जपणूक केली आहे. काय शिकवावे हे त्यांनीच ठरवायचे व काय, कसे, कोठे व किती वर्षांत शिकावयाचे हे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असे परंतु उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे जर्मन विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य आता अबाधित राहू शकले नाही. त्याचप्रमाणे प्राध्यापकाच्या अधिसत्तेवरही बंधने आली आहेत. उच्च शिक्षणाची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न अद्याप यशस्वी झाले नाहीत. विद्यार्थ्यांवरील येणाऱ्या बंधनांविरुद्ध त्यांनी १९६०–७० मध्ये उठाव केले. हे उठाव आता थंडावले असले, तरी उच्च शिक्षणपद्धतीतील परिवर्तनाची दिशा अद्याप अस्पष्टच आढळते.

ऑक्टोबर १९७२ मध्ये प. जर्मनीत १९,५९० प्राथमिक व माध्यमिक शाळा होत्या. त्यांत २,०९,९५९ शिक्षक व ६५,०९,२८६ विद्यार्थी होते. विशिष्ट शाळांमधून २५,०८९ शिक्षक ३,६४,६८८ विद्यार्थ्यांना शिकवीत होते. २,२२० आधुनिक माध्यमिक शाळांत ४०,२४८ शिक्षक आणि ९,८१,२०२ विद्यार्थी होते. २,२६८ ग्रामर शाळांत ७५,६३६ शिक्षक व १५,६७,२७४ विद्यार्थी होते. शिवाय १४५ समावेशक शाळांतून व्यावसायिक शाळा निराळ्या होत्या. १,५५० अर्धवेळ शाळांत २५,३९९ शिक्षक व १६,१९,२१६ विद्यार्थी आणि २,८३१ पूर्णवेळ शाळांत ११,५७४ शिक्षक व २,३९,०३४ विद्यार्थी होते. प्रगत व्यावसायिक शाळा १,३८० असून त्यांमधून १,२२,७४७ विद्यार्थी शिकत होते.

१९७२ मध्ये १४७ उच्च तांत्रिक महाविद्यालये होती व त्यांत १,०३,४८६ विद्यार्थी होते. उच्च शिक्षणाच्या एकूण ५९ संस्था होत्या. त्यांत ४६ विद्यापीठे (३,८०,०७९ विद्यार्थी) व १३ धर्मपंथीय महाविद्यालये होती. शिक्षक-प्रशिक्षण संस्था ४९ असून त्यांत ७४,७८४ शिक्षक प्रशिक्षणार्थी होते. शिवाय १४ संगीत महाविद्यालये, १२ कला महाविद्यालये व १ चित्रपट व दूरचित्रवाणी महाविद्यालय असून त्यांतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या १३,२३९ होती.

धोंगडे, ए. रा.

भाषा साहित्य : जर्मन भाषा बोलणाऱ्या मंडळीत खूपच विविधता आणि वैचित्र्य आहे. त्यांचे वांशिक, बोली-भाषिक, राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक असे अनेक गट पडू शकतील. यांखेरीज जर्मनीत आलेल्या कामगारांची संख्या तेवीस लक्षांच्या घरात जाते. प. जर्मनीतील परंपरागत लोक हे बरेचसे आजच्या प्रादेशिक विभागांशी मिळतेजुळते आहेत. त्यांचा उगम रोमन राजवटीतील टोळीवाल्यांशी संबंधित आहे. बाल्टिक भागातून मध्य यूरोपात उतरलेल्या या लोकांनी तेथील केल्टिकांना पश्चिमेकडे रेटले व काहींना आपल्यात सामावून घेतले. नद्या, डोंगर, वस्त्यांची नावे मूलतः केल्टिक आढळतात. उदा., ऱ्हाईन, डॅन्यूब, नेकार इत्यादी. जर्मनीत आढळणाऱ्या प्रमुख जमाती म्हणजे ॲलेमॅनिक, बव्हेरियन, थुरिंजियन, फ्रँक, सॅक्सन, फ्रिझियन. जर्मनीत अल्पसंख्य असणारे इतर लोक म्हणजे ज्यू, स्लाव्ह, ह्यूगेनॉट, डेन, पोलिश इत्यादी.

९९ टक्के लोक अर्थातच जर्मन आहेत. जर्मन लोक उद्यमशील, शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व विज्ञाननिष्ठ म्हणून ओळखले जातात. मध्यंतरी नाझी राजवटीत ते उद्धट, हिंसाचारी, आक्रमक म्हणून ओळखले जात. आजचा जर्मन हा त्याचा कार्यक्षमता, कर्तृत्व, शिस्तबद्धता इत्यादींनी जगात आघाडीवर राहण्यात प्रयत्नशील आहे. राष्ट्र-उभारणीच्या व राष्ट्र अग्रेसर बनविण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटून जर्मन लोक जलदीने कामाचा उरक पाडीत आहेत.

जर्मन ही राजभाषा आहे. बोलीभाषेतील फरक शहरी विभागात जाणवत नाहीत. बोलीभाषांनुसार जर्मनीत तीन विभाग आहेत : (१) अपर जर्मन–द. जुरा, डॅन्यूब खोरे आणि आल्प्समधील डोंगराळ प्रदेश, (२) सेंट्रल जर्मनी–मध्यवर्ती उंचवट्याचे प्रदेश, (३) लोअर जर्मनी–उत्तर जर्मनीचे मैदान.

साहित्यनिर्मितीला शासकीय उत्तेजन इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनसुद्धा अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील साहित्यिकांशी बरोबरी करू शकणारे कवी व लेखक फारच अल्प प्रमाणात निर्माण झाले आहेत. अलीकडील प्रसिद्ध साहित्यिकांमध्ये फ्रांट्स काफ्का, टोमास मान, रायनर मारीआ रिल्के व बेर्टोल्ट ब्रेक्ट यांची गणना होते. जर्मन कादंबरीकारांपैकी हाइन्रिख ब्योल व ग्यूंटर ग्रास या दोघांच्याच कादंबऱ्यांची इतर भाषांत भाषांतरे झाली आहेत. ब्रेक्ट, त्सुकमायर, लेंट्स व पेटर व्हाइस यांच्या नाटकांचे जर्मनीबाहेर चांगले स्वागत झाले आहे.

जर्मन भाषा, साहित्य व संस्कृती यांची इतर देशांना ओळख पटावी म्हणून खास प्रयत्न करणाऱ्या काही संस्था आहेत. पुस्तके व चित्रपट यांद्वारा अशा संस्था जर्मन संस्कृतीची माहिती पुरवितात. शिवाय इतर देशांतील साहित्यिकांना जर्मनीस येण्याचे निमंत्रणही दिले जाते. म्यूनिकमधील गटे इन्स्टिट्यूटच्या प. जर्मनीत २१ आणि परदेशांत १२० शाखा असून त्या जर्मन भाषाप्रसाराचे कार्य करीत असतात.

प्रेक्षणीयस्थळे : प. जर्मनी हा प्रामुख्याने छोट्या व मध्यम शहरांचा देश आहे. बर्लिन, हँबर्ग व म्यूनिक या तीन शहरांची वस्ती तेवढी प्रत्येकी दशलक्षांवर आहे. ४७% वस्ती पुढील दहा केंद्रांच्या वाणिज्य आणि नागरी प्रभावाखाली येते. ऱ्हाईन-रुर, ऱ्हाईन-मेन, हॅनोव्हर-ब्रंझविक, प. बर्लिन, मॅनहाइम-लूटव्हिख्‌सहाफेन व झारलँड. ऱ्हाईन-रुर हा भाग यूरोपातील सर्वांत जास्त गजबजलेला, अवजड व हलक्या उद्योगांचे माहेरघर असलेला विभाग आहे. हँबर्ग-ब्रेमेन विभागात नौकानयन, व्यापार, सागरी उद्योग आणि उत्पादन केंद्रित झालेले आहे. प. बर्लिन, हॅनोव्हर, ब्रंझविक म्हणजे कारखाने व व्यापार यांची केंद्रे आहेत. ऱ्हाईन-मेन विभाग अवजड उद्योगधंदे, व्यापारकेंद्रे यांबद्दल महत्त्वाचा आहेच परंतु त्याच्या मध्यवर्ती स्थानामुळे तो वाहतूककेंद्रही बनला आहे. स्टटगार्ट विभागात थोडेसे प्रमुख उद्योगधंदे आहेतच, पण मुख्यतः लघु व मध्यम उद्योगांची तेथे बरीच भरभराट झालेली आहे. म्यूनिक या आग्नेयीकडील प्रमुख केंद्रात युद्धोत्तर काळात छोटे उद्योगधंदे खूप विकसित झाले आहेत. झारलँडची ख्याती कोळसा, लोखंड आणि पोलाद निर्मितीसाठी तर फ्रँकफुर्ट, ड्युसेलडॉर्फ ही अर्थपुरवठा करणारी केंद्रे आहेत. फ्रँकफुर्ट, ड्युसेलडॉर्फ, म्यूनिक व हँबर्ग येथे बड्या आंतरराष्ट्रीय महामंडळांची प्रमुख केंद्रे आहेत.

देसाई, दा. सी.

संदर्भ : 1. Beaver, S. H. Ed. A Geographic and Economic Survey of Central Europe, 1965.

            2. Dickinson, R. E. Germany : A General and Regional Geography, London, 1961.

            3. Hoffman, G. W. Ed. A Geography of Europe, London, 1961.

            4. Pounds, N. J. G. The Economic Patterns of Modern Germany, London, 1966.

            5. Stopler, Gustav, German Realities, New York, 1948.

            6. Wallich, H. C. Mainsprings of the German Revival, New Haven, 1955.


पश्चिम जर्मनी


ऑलिंपिक मनोरा, म्यूनिक प्राचीन ऱ्हाईनस्टाईन किल्ला, बिंगन ऱ्हाईन नदीवरील ड्युसेलडॉर्फ बंदर काँग्रेस भवन, बर्लिन ब्रांडेनब्रुर्क गेट बर्लिन.  रुर नदीखोऱ्यातील कोळसा खाण आनेग्रेट रिख्‌टर : माँट्रिऑल ऑलिंपिकमध्ये (१९७६), १०० मी. धावण्यातील सुवर्णपदक विजेती.  म्यूनिकमधील शालेय विद्यार्थिनींची कवायत

बॉनच्या परिसरातील मूरघासाच्या टाक्या.जुन्या बाजाराचे दृश्य, हँबर्ग