गोडा चेस्टनट : (१) फुलोऱ्यासह फांदी , (२) काटेरी छदासह फळ, (३) कपाली फळे.चेस्टनट: (लॅ. कॅस्टानिया कुल-फॅगेसी). फळासाठी व बागेत शोभेसाठी लावल्या जाणाऱ्या सु. १० जातींचे इंग्रजी नाव. ईशान्य अमेरिका, यूरोप, उ. आफ्रिका व आशिया येथे यांचा प्रसार आहे. प्रमुख जातीत जपानी (कॅ. केनॅटा ),  अमेरिकी (कॅ. डेंटॅटा ), यूरोपीय (कॅ. सॅटिव्हा ) किंवा ‘गोडा चेस्टनट’ या सर्वांचा समावेश होतो. शिवाय अनेक प्रकार लागवडीत आहेत. ह्या जाती पानझडी वृक्ष किंवा मोठी क्षुपे (झुडपे) असून खाद्य फळे, शोभादायक पाने व आकर्षक फुलांमुळे लोकप्रिय आहेत. फळांवर काटेरी छदांचे (फूल किंवा फुलोरा यांच्या तळाशी असलेल्या पानासारख्या भागांचे) आवरण असते.

‘ गोडी ’ जाती द. यूरोपात शेकडो वर्षे लागवडीत आहे. भारतात दार्जिलिंग, खासी टेकड्या, पंजाब व हिमाचल प्रदेश येथे तिची लागवड असून हिमालयात १,८६० मी. उंचीपर्यंत ती चांगली वाढते. हे वृक्ष १५–२५ मी. उंच, शाखायुक्त असून फांद्या गुळगुळीत व कळ्या पिवळट तपकिरी असतात. पाने रुंदट भाल्यासारखी, एकाआड एक, दातेरी, जाड, चिवट व कोवळेपणी खालून लवदार असतात. फुले एकलिंगी पण एकाच झाडावर, सरळ कणिशावर येतात [→फॅगेसी]. स्त्री-पुष्पे २–३ एकत्र फळेही तितकीच व काटेरी छदांनी वेढलेली [→फूल]. कवची फळांचे (कपाली) आवरण गर्द तपकिरी, जाड व चिवट असते. फळ सु. ५–८ सेंमी.  व्यासाचे असते. बियांतील मगज (गर) खाद्य असून तो कच्चा, शिजवून, भाजून किंवा पीठ करून ते इतर पदार्थांत घालून खातात. स्पेन, फ्रान्स व इटलीत ही फळे महत्त्वाचे अन्न समजतात. त्यांना आंबूस, काहीशी गोड किंवा पांचट चव असते. सर्व जातींचे लाकूड कठीण, टिकाऊ व उपयुक्त असून ते सजावटी सामान, सिलीपाट (स्लिपर), कुंपणाचे खांब इत्यादींकरिता वापरतात. झाडांपासून मिळणारे टॅनीन कातडी कमाविण्यास वापरतात. नवीन लागवड बियांनी किंवा कलमांनी करतात. सेरंग (इं. इंडियन चेस्टनट लॅ. कॅस्टानॉप्सिस इंडिका ) ही फॅगेसी कुलातील जाती खासी टेकड्या व बंगालमध्ये आढळते. तिची पाने बिड्यांकरिता वापरतात. फळांवर काटेरी छदांचे आवरण असून ती खाद्य असतात लाकडापासून तक्ते बनवितात. कॅस्टानॉप्सिस  वंशातील सु. नऊ जाती भारतात व ब्रह्मदेशात आढळतात. कॅस्टानोस्पर्मम ऑस्ट्रेल  अथवा मोरेटन-बे-चेस्टनट ह्या ऑस्ट्रेलियातून आणून लावलेल्या वृक्षाच्या बिया खाद्य आहेत.  

परांडेकर, शं. आ.