तेल माड : (आफ्रिकी तेल माड इं. ऑइल पाम लॅ. एलिइस गिनीन्सिस कुल–पामी). सुमारे ६–२४ मी. उंच, उपयुक्त, शोभिवंत आणि ⇨ नारळासारखा सरळ वृक्ष. हा मूळचा उष्ण कटिबंधीय, पश्चिम व मध्य आफ्रिकेतील असून तेथे तो जंगलात व समुद्रकिनारी आढळतो. ब्रिटीश गियाना, ब्राझील, पेरू, व्हेनेझुएला आणि वेस्ट इंडिज येथेही तो आढळतो. उष्ण कटिबंधातील (अशिया, अफ्रिका व अमेरिका) सु. १२५–२५० सेंमी. व वर्षभर थोडा थोडा पडत राहणाऱ्या पावसाच्या प्रदेशात हल्ली तो लागवडीत असून एकंदरीत उबदार हवामानात त्याची वाढ चांगली होते. १९५० सालच्या सुमारास भारतात त्रावणकोर येथे व्यापारी दृष्ट्या याची लागवड केली होती परंतु ती यशस्वी झाली नाही. मात्र काही मोठ्या शहरातील शास्त्रीय उद्यानात लावलेली झाडे आजही चांगल्या स्थितीत आहेत. फळांतील तेलाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकार पाहून व नवीन संकरज (डेली टेनेरा) बनवून काँगोत व प. आफ्रिकेत या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मलेशिया, सुमात्रा, जावा व कांगो येथे याचे मळे व तेलाचे कारखाने अनेक वर्षे चालू आहे.

आफ्रिकी तेल माड : (१) वृक्ष, (२) फळांचा गुच्छ, (३) फळाचा उभा छेद.तेल माडाचे शाखाहीन खोड भरभक्कम असून त्यावर खोलगट वलये असतात. शेंड्याकडे संयुक्त व पिसासारख्या, मोठ्या (३–५ मी. लांब), काटेरी देठाच्या भरपूर पानांचा झुबका असतो व प्रत्येकावर ५०–६०, तलवारीसारखी लांब, टोकदार व जाड दले असतात. शेंड्यांकडे पानांबरोबरच आखूड आणि जाड फुलोरे (स्थूलकणिशे) येतात. ते एकाच वेळी ६ ते ८ असून नर–फुलोरे प्रथम व स्त्री–फुलोरे नंतर येतात. फुले एकलिंगी व एकाच झाडावर असून त्यांची संरचना सामान्यपणे ⇨ पामी अगर ताल कुलात वर्णिल्याप्रमाणे असते. प्रत्येक वृक्षाला दरवर्षी सु. २०० फळांचे १० घोस येतात. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे अक्रोडाएवढी (२·५–५ X १·८–४ सेंमी.), पिवळी, लाल, शेंदरी किंवा काळी आणि चकचकीत, लंबगोल, टोकदार असून त्यांची साल मांसल व त्यांत १–३ कठिण कवचाच्या बिया असतात. बियात पांढरा मगज (गर) असतो.

ताज्या व पक्व फळांपासून मिळालेल्या बिया नवीन रोपे तयार करण्यास वापरतात. त्या पन्हेरी वाफ्यात दोन ते तीन महिन्यांनी रुजतात परंतु रोपे सहा ते बारा महिन्यांची झाल्यावर ठरविलेल्या क्षेत्रात ०·६ X ०·६ X ०·६ मी. मापाच्या खड्ड्यात परस्परांपासून सु. नऊ मी. अंतरावर लावतात. साधारणपणे चार–सहा वर्षांत फळे येण्यास सुरुवात होते. या वेळी फॉस्फोरिक आम्लयुक्त व नायट्रोजनयुक्त खते देतात. झाड १२ ते १५ वर्षांचे झाल्यावर भरपूर बहर येतो, ३० वर्षांनी तो कमी होत जातो व ६० ते ७० वर्षांनंतर तो संपतो. फळ पक्व होण्यास सहा महिने लागतात. त्याच्या शेंदरी रंगावरून तेलाचा अंश भरपूर झाल्याचे समजतात. रानटी अवस्थेत एका झाडाची एकूण फळे २७–३६ किग्रॅ. भरतात, परंतू लागवडीतील प्रत्येक वृक्ष त्याच्या दुप्पट वजनाची फळे देतो. द. कारवारातील प्रायोगिक क्षेत्रातील काही झाडांपासून प्रत्येकी चार हजार फळे (वजन २७ किग्रॅ.) मिळाली परंतु सरासरीत प्रत्येकी उत्पादन फक्त ७ ते १० किग्रॅ. आढळले.

या वृक्षाच्या फळांपासून दोन प्रकारचे तेल मिळते. मांसल सालीपासून ३०–७०% पामतेल व बियांतील मगजापासून ४४–५३% पाम मगज तेल (पाम कर्नेल ऑईल) मिळते. या दोन्हींत काही फरक आढळतात. इतर कोणत्याही तेल बीजांपेक्षा तेल माडापासून काढलेल्या संपूर्ण तेलाचे हेक्टरी प्रमाण अधिक असते. चांगल्या प्रतीच्या पाम तेलाचा रंग फिकट पिवळा ते गर्द नारिंगी असून चवदार व सुवासिक असते. त्यातील मुक्त ⇨ वसाम्लाच्या प्रमाणावर त्याचा दाटपणा अवलंबून असतो. समशितोष्ण प्रदेशात ते कमी अधिक घन असते, म्हणजे ते वनस्पतीजन्य वसा (मेद) या सदरात येते. साबण, मार्गारीन, मेणबत्या व काही उद्योग (पोलाद व कथिलाच्छादित पत्रे) यांमध्ये त्याचा वापर मोठा आहे. हे प. आफ्रिकेत खाण्याकरीता बऱ्याच प्रमाणात वापरतात. बाजारात मिळणारे पाम तेलाचे प्रकार त्यातील मुक्त वसाम्लाच्या प्रमाणावर ठरविले असून भिन्न देशांनी (सुमात्रा, मलेशिया, काँगो व प. आफ्रिका) आपल्या मालातील अम्लांचे प्रमाण निश्चित केले आहे. पाम तेलात अ जीवनसत्त्व कॉडलिव्हर तेलाइतके आणि लोण्यातील जीवनसत्त्वाच्या दसपट अधिक असते. यामुळे त्याचा उपयोग अ जीवनसत्त्वाची कमतरता असलेल्या व्यक्तींना फार होतो. पाम मगज तेलाकरिता विशेषतः प. आफ्रिकेतून मगजाची निर्यात होते व ज्या देशात पेंडीचा उपयोग फार होतो तेथेच त्याची तेल गाळण्यास आयात करतात. हे तेल पातळ, पांढरे किंवा काहीसे पिवळट किंवा पिंगट असते. यालाही उत्तम खोबरेलाप्रमाणे काही गुणधर्म, सुवास व चांगली चव असते. मार्गारीन व साबण उद्योगात ते बरेच वापरले जाते. त्यातील स्टायरीन चॉकोलेटाकरिता उपयोगात असून विशेष शुद्ध केलेले तेल, औषधे, केशर्वधक तेले व सौदर्यप्रसाधने यांत वापरतात. युरोपात पेंड पाळीव जनावरांना खाऊ घालतात. तेल माडाच्या शेंड्यांना वा अपक्व फुलोऱ्याच्या दांड्यांना भोके पाडून ‘ताडी’ काढतात आणि त्यापासून प. आफ्रिकेत अर्राक (मद्य) किंवा साखर बनवितात. टोकांवरील कळ्यांची भाजी करतात. पानांच्या शिरापासून व देठांपासून टोपल्या व केरसुण्या करतात देठांतील काथ्या उश्यांमध्ये भरतात व करवंट्यांपासून शोभेच्या वस्तु बनवितात.

मलेशिया व इंडोनेशिया येथील पाम तेल निर्यात होते. ब्रिटन व अमेरिका ही या तेलाची मोठी ग्राहके होत. नायजेरीया (प. आफ्रिका)व मलेशिया येथून ब्रिटन आयात करते, तर इंडोनेशिया व झाईरे येथून अमेरिकेत आयात होते. पाम मगज तेलाची मुख्यतः प. आफ्रिकेतून आणि काही प्रमाणात मलेशियातून व इंडोनेशियातून निर्यात होते. जर्मनी व ब्रिटन यांची बरीच आयात करतात. प. आफ्रिका हे मगजाचे सर्वांत मोठे उत्पादन व निर्यात केंद्र आहे, त्यापेक्षा मलेशियाचे व इंडोनेशियाचे उत्पादन व निर्यात बरीच कमी आहे. पाम तेलाचे जागतिक उत्पादन (आकडे हजार टनातील) १९६१ साली १३०१ १९६५ साली १,३४४ व १९७० साली १,७६८ होते तर मगजाचे उत्पन्न १९६१ साली १,०७४, १९६५ साली १११३ व व १९७० साली १०६४ होते.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. III, New Delhi, 1952

परांडेकर, शं. आ.