धरणगाव : जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील एक शहर. जळगावच्या पश्चिमेस सु. ३० किमी. वर तसेच भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील स्थानक. लोकसंख्या २४,३६५ (१९७१). हे हातमाग उद्योगाचे केंद्र असून कपाशीवरील प्रक्रिया व तेलबियांसाठी प्रसिद्ध आहे. १८६६ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली. सतराव्या शतकातील दोनगाव, दोरोनगाव, द्रोणगाव यांसारख्या नावांनी एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून याचा उल्लेख आढळतो. १६०० च्या सुमारास चांगल्या प्रतीच्या कापडांसाठी प्रसिद्ध होते. या शहरी १६७४ मध्ये इंग्रजांनी व्यापारासाठी वखार स्थापन केली होती. १६७५ आणि १६७९ मध्ये शिवाजीने व १६८५ मध्ये संभाजीने हे शहर लुटले होते. मराठेशाहीच्या काळात भिल्लांचीही सतत आक्रमणे धरणगावावर होत. १८१८ मध्ये ते इंग्रजी अंमलाखाली आले. शहराच्या मध्यभागी असलेला दर्गा औरंगजेबाने बांधला आहे असे म्हणतात. येथे ३०० वर्षांपूर्वी बांधलेले पाताळेश्वराचे मंदिर आहे. शहरामध्ये ‘झुमकरण’ नावाचे सार्वजनिक वाचनालय आहे. येथे सरकी काढण्याचे आणि कापसाचे गठ्ठे बांधण्याचे कारखाने आहेत.

गाडे, ना. स.