द्यूबॉस, रने झ्यूल: (२० फेब्रुवारी १९०१ – ). अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. द्यूबॉस यांचे सुरुवातीचे शिक्षण कृषि विज्ञानातील असले, तरी त्यांनी आपले बहुतेक प्राध्यापकीय जीवन सूक्ष्मजंतुजन्य रोगांचा प्रायोगिक अभ्यास आणि पर्यावरण व सामाजिक घटक यांचे मानवाच्या कल्याणावर होणारे बरेवाईट परिणाम यांचे विश्लेषण व उकल करण्याच्या कामी व्यतित केले. मानवासह इतर प्राण्यांत शारीरक्रिया नीट होण्यासाठी तसेच स्वास्थ्यासाठी सूक्ष्मजीवजन्य पादपजात (वनस्पतिसमूह) असणे अत्यावश्यक असते, हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध झाले आहे.

द्यूबॉस यांचा जन्म सेंट ब्राइस (फ्रान्स) येथे झाला. त्यांचे शिक्षण पॅरिस येथील इन्स्टिट्यूट नॅशनल ऑग्रोनॉमिकमध्ये झाले. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी रोम येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर या संस्थेत काम केले. १९२४ मध्ये ते अमेरिकेला गेले व १९३८ मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.

इ. स. १९२७ मध्ये त्यांनी रटजर्स विद्यापीठाची पीएच्. डी पदवी संपादन केली. त्या विद्यापीठात तीन वर्षे काम केल्यावर १९२७ मध्येच ते रॉकफेलर विद्यापीठात पर्यावरणीय वैद्यकाचे प्राध्यापक झाले. प्रति जैव पदार्थ (अँटिबायॉटिक्स), स्वार्जित प्रतिरक्षा (जन्माच्या वेळी नसलेली, पण परिस्थितीच्या प्रतिक्रियेने प्राप्त झालेली रोगप्रतिकारशक्ति) व क्षय रोग यांवर संशोधन करून त्या क्षेत्रांत त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी ग्रॅम व्यक्त (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणाऱ्या जांभळटसर रंग टिकून राहणाऱ्या) सूक्ष्मजंतूंचा नाश करणाऱ्या मृदेतील सूक्ष्मजंतुकारकाच्या स्फटिकीय रूपाचा शोध लावला व त्यामुळे रासायनी चिकित्सेच्या नव्या क्षेत्राचा पाया घातला गेला.

द्यूबॉस यांनी विपुल ग्रंथ लेखन केले आहे. सूक्ष्मजंतुविज्ञानाचा परिस्थितिवैज्ञानिक दृष्टीने केलेला आपला अभ्यास त्यांनी द बॅक्टिरियल सेल (१९४५), बायोकेमिकल डिटरमिन्ट्स ऑफ मायक्रोबियल डिसीझेस (१९५४), द अनसीन वर्ल्ड (१९६२) आणि बॅक्टिरियल अँड मायकॉटिक इन्फेक्शन्स ऑफ मॅन (चौथी आवृत्ती, १९६५) या ग्रंथांद्वारे मांडला आहे. यांशिवाय पर्यावरणीय आणि समाजिक प्रेरणांच्या मानवी कल्याणावर होणाऱ्या परिणामांविषयी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले असून त्यांपैकी पुढील विशेष उल्लेखनीय आहेत : लुई पाश्चर : फ्री लान्स ऑफ सायन्स (१९५०), द व्हाइट प्लेग: ट्युबरक्युलोसिस मॅन अँड सोसायटी (१९५२), पाश्चर अँड मॉडर्न सायन्स (१९६०), मॅन ॲडाप्टिंग (१९६५) इत्यादी.

लास्कर पुरस्कार (१९४८), नॅशनल ट्यूबरक्युलोसिस ॲसोसिएशन पुरस्कार (१९६५), आर्चेस ऑफ सायन्स पुरस्कार (१९६६) असे अनेक बहुमान त्यांना मिळाले आहेत. यांखेरीज मॅलिबू (कॅलिफोर्निया) येथील पेपरडाइन विद्यापीठाचा १९७३ सालचा टायलर परिस्थितिवैज्ञानिक तृतीय पुरस्कार द्यूबॉस. अयेल ओल्मान व चार्ल्स एल्टन यांना देण्यात आला.

जमदाडे, ज. वि.