देवक : (टोटेम). देवासारखा. पूजनीय परंतु ज्याचे देवाइतके व्यापक माहात्म्य मानले जात नाही, असा पदार्थ म्हणजे देवक होय. कुलचिन्ह, कुलनाम, कुलाच्या पूर्वजाचे नाव व कुलाला पूज्य वाटणाऱ्या वस्तूचे नाव अशा विविध रूपांत देवक मानले जाते. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत, मेलानीशिया बेटे इ. प्रदेशांतील आदिम जमातींत ही प्रथा आढळते. काही प्रगत समाजांतही देवकप्रथेचे अवशेष आढळत असले, तरी ही प्रथा प्रामुख्याने आदिवासी धर्मकल्पनेचा एक भाग आहे. देवक मानणारे लोक देवकाबरोबर आपला गूढ व विशेष असा रक्तसंबंध आहे, असे मानतात. देवकापासून आपल्या वंशाची निर्मिती झाली असे मानणे, स्वतःला व आपल्या कुलाला देवकाचे नाव लावणे, देवकप्राण्याचा वध अथवा भक्षण निषिद्ध मानणे, एकच देवक असलेल्या स्त्रीपुरुषांनी आपापसांत विवाह न करणे इ. आचारविशेष या लोकांत दिसून येतात परंतु कोणत्याही एका समाजात देवकप्रथेची सर्व वैशिष्ट्ये एकत्र आढळत नाहीत. शिवाय, प्रगत समाजाप्रमाणेच आदिम जमातींतही काळाच्या ओघात अनेक बदल झाले असल्यामुळे त्यांच्यात आढळणाऱ्या देवकप्रथेची कोणती वैशिष्ट्ये मूळ स्वरूपात राहिली आहेत व कोणती बदललेल्या स्वरूपात आपल्यापुढे आली आहेत हे सांगणे कठीण आहे.

एखादा मानवेतर प्राणी किंवा एखादी वनस्पती यांना देवक मानण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात आढळते. कित्येकदा एखादी नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तूही देवक मानली जाते. काही देवके पुढीलप्रमाणे : देवक प्राणी–सिंह, वाघ, कुत्रा, हत्ती, डुक्कर, कांगारु, लांडगा, कासव, बेडूक, नाग, बगळा, मोर, कावळा, घुबड, पोपट, कोंबडा, कबूतर इत्यादी. देवक वनस्पती–जांभूळ, वड, उंबर, बोर, चिंच, आंबा, अमरवेल इत्यादी. देवक नैसर्गिक वस्तू–वारा, तारा, ढग, पाऊस, पाणथळ इत्यादी. देवक कृत्रिम वस्तू-कट्यार, तलवार, कुऱ्हाड, लोखंड इत्यादी.

देवकांचे कुलदेवक, लिंगदेवक, व्यक्तिदेवक, उपदेवक, सकुलक (फॅट्री) देवक, अंशदेवक इ. अनेक प्रकार आढळतात. यांपैकी सर्वत्र आढळणारा महत्त्वाचा प्रकार म्हणजे कुलदेवक होय. एखाद्या कुलातील सर्व व्यक्तींचे वंशपरंपरागत असे हे देवक असते. जे केवळ स्त्रियांचे अथवा पुरुषांचे म्हणून मानलेले असते, ते लिंगदेवक होय व ते बहुधा पक्ष्याच्या रूपात असते. हा प्रकार प्रामुख्याने ऑस्ट्रेलियन आदिवासींत आढळतो. भारतात मात्र तो आढळत नाही. एका व्यक्तीचा एखाद्याच विशिष्ट वस्तूशी खास संबंध आल्यामुळे तिने त्या वस्तूला देवक मानलेले असते, तेव्हा ते व्यक्तिदेवक होय. वंशपरंपरागत नसलेले हे देवक कुलप्रमुख, कुटुंबप्रमुख व शामान यांसारख्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे असते. ते बहुधा सर्पादी सरपटणाऱ्या प्राण्याच्या रूपात असते. क्वचित दोन कुलांचे मुख्य देवक एक, परंतु उपदेवक भिन्न असते. एकाहून अनेक कुले एका सकुलकामध्ये संघटित झाली असतील, तर जमात व कुल यांच्या मधल्या अवस्थेत येणाऱ्या या समूहाचे सकुलक देवक असते. याउलट एकाच कुलाची भिन्न भिन्न गटांत विभागणी झाल्यास अंशदेवके बनतात. अशा वेळी प्रत्येक गट मूळ देवकाच्या एकेका अवयवास देवक मानतो. क्वचित भिन्न जमातींतही समान देवक असते, तर कुठे एका कुलाचीही अनेक देवके असतात. जेव्हा देवकल्पनेचा उगम झाला, तेव्हा बहुधा मातृपरंपरेनेच देवक मानले जात असावे परंतु कालांतराने अनेकजण पितृपरंपरेने देवक मानू लागले, असे दिसते. भारतात तर ते प्रामुख्याने पितृपरंपरेने मानले जाते. कधी कधी मुलाला आई व वडील अशी दोघांची आणि विवाहितेला माहेर व सासर अशी दोन्हीकडची देवके मानावी लागतात.

आदिवासींच्या धार्मिक जीवनात देवकाला महत्त्वाचे स्थान असते. कुलसदस्यांच्या मनात त्याच्याविषयी भययुक्त आदर असतो. देवकप्राण्यापासूनच आपला वंश निर्माण झाला, त्याने मानवी रूप घेऊन वंश निर्माण केला किंवा त्याचा आपल्या मूळ पूर्वजाशी जवळचा संबंध होता, अशी त्यांची श्रद्धा असते. देवकाचे गुण आपल्यात आहेत, असे ते मानतात. देवकप्राण्याची वा वस्तूंची संख्या वाढावी व देवक हे हिंसक प्राणी असेल, तर त्याने दूर जावे यासाठी धार्मिक अथवा जादूटोण्याचे विधी करतात. देवक प्राण्याला स्वतः मारत नाहीत आणि इतरांनाही मारू देत नाहीत, त्याला खात नाहीत किंवा निदान त्याचा एखादा अवयव तरी वर्ज्य मानतात परंतु विशिष्ट समारंभांच्या वेळी अशा प्राण्यास मारण्याची व त्याचे मांस खाण्याची मुभा असते. किंवा काही वेळा आत्मसंरक्षणार्थ त्याला मारावे लागते. अशा वेळी त्याच्याकडे क्षमायाचना करून त्याला मारतात आणि नंतर बांधवाला मारले असे म्हणून पश्चात्ताप व्यक्त करतात. कधी कधी स्वतः त्याचे मांस न खाता त्याला देवक न मानणाऱ्या इतर कुलातील लोकांना त्याचे मांस देतात. इतर कारणांनी त्याचा मृत्यू झाल्यास त्याला पुरून त्याचे सुतक पाळतात. जन्म, यौवनप्रवेश, अंत्यक्रिया इ. प्रसंगी त्याचे कातडे पांघरून किंवा त्याचा मुखवटा धारण करून नृत्य करतात आणि त्याच्याशी आपली एकरूपता सूचित करतात. देवक हे झाड असेल, तर ते तोडत नाहीत आणि त्याच्या सावलीलाही बसत नाहीत. इतर वस्तू देवक असल्यास तिचा वापर करीत नाहीत. क्वचित तिला स्पर्श करणे व तिच्याकडे पाहणेही निषिद्ध मानतात. परंतु तो आवश्यक पदार्थ असेल, तर फक्त विशिष्ट परिस्थितीतच तो वर्ज्य मानला जातो. डुकराचे डोके सोडून बाकीचा भाग खावा, वडाचे फळ न विभागता खावे, नुसते मीठ खाऊ नये, लोखंडाला स्पर्श करावयाचा असेल, तर तो ओठाने किंवा जिभेने करू नये इ. प्रकारे निषेधाचे क्षेत्र मर्यादित केले जाते क्वचित ते विस्तृतही केले जाते. उदा., वाघ देवक असल्यास त्याच्याप्रमाणे पट्टे असलेल्या खारीलाही मारू नये वाघ ह्या शब्दाशी समान उच्चार असलेल्या माघ महिन्यात लग्न करू नये इत्यादी. हे लोक देवकाच्या चित्रांनी शस्त्रे व शरीरे रंगवतात किंवा ती अंगावर गोंदवून घेतात. लग्न–मुंजीसारख्या शुभप्रसंगी त्याची स्थापना व पूजा करून समारंभानंतर ते उठवतात. त्याला भाऊ, स्वामी, पिता किंवा आजोबा म्हणतात. कुलप्रमुखाला त्याच्या नावाने संबोधतात. काही ठिकाणी देवक–स्तंभ उभारलेले असतात. मात्र एवढ्यावरून देवक हे देव ठरत नाही. तरीही काहीजणांनी त्याला माना, नैतिक तत्त्व किंवा व्यक्तिनिरपेक्ष देव म्हटले आहे. हा धार्मिक संबंध उभयपक्षीय असल्यामुळे देवकही माणसांचे रक्षण करते उपदेशाची किंवा सूचक स्वप्ने पाडते आजारात वाचवते तसेच देवक हे नाग, सिंह यांसारखे हिंसक असेल, तर ते कुलसदस्यांना इजा करीत नाही इ. समजुती रूढ आहेत.


सामाजिक दृष्टिकोनातूनही देवकाला महत्त्वाचे स्थान असते. एकच देवक असलेल्या कुलातील लोक हे एकमेकांचे भाऊबहीण असल्यामुळे एकमेकांसाठी मदत, संरक्षण, आतिथ्य, शत्रूचा सूड इ. कर्तव्ये करण्यास ते प्रतिज्ञाबद्ध असतात. एकमेकांत विवाह वा विवाहबाह्यसंबंध निषिद्ध असतो, कारण तो अगम्य आप्तसंभोग ठरतो. तसे करणारास देहान्तासारखी शिक्षा दिली जाते. शिवाय त्याच्यावर भयानक रोग व मृत्यू यांसारखे संकट कोसळते असे मानतात. देवकल्पनेच्या अशा प्रभावामुळे कुलातील लोकांत ऐक्य राहते. इतिहासकाळात देवकप्रथेमुळे शेती, पशुपालन, खनिजांचा उपयोग व कलाविकास इत्यादींना काही प्रमाणात चालनाही मिळाली आहे, असे दिसते.

देवककल्पनेची उत्पत्ती बरीचशी गूढ आहे. विशिष्ट वस्तूंना देवक मानण्यामागे कोणत्या समजुती व कारणे होती, याविषयी अनेक मते मांडली जातात. प्रत्येक कुलातील लोक विशिष्ट वनस्पती किंवा प्राणी यांवर निर्वाह करीत आणि त्यांचा व्यापार करीत सर्वांना लागणारे अन्न जपण्याची अथवा घातक वस्तूंचा नाश करण्याची जबाबदारी विशिष्ट कुलांवर असे जादूटोणा करून विशिष्ट वस्तू विपुल करण्याचा प्रयत्न केला जाई विशिष्ट वस्तूत व्यक्तीचा आत्मा असतो, मृताचा आत्मा विशिष्ट वस्तूत जातो, आदिम स्त्रीला ती गर्भवती असल्याची प्रथम जाणीव होई, तेव्हा एखाद्या वस्तूने उदरात प्रवेश केल्याचा भास होई एखाद्या पूर्वजाला स्वप्नात संरक्षक पिशाच दिसलेले असते अशा वेगवेगळ्या परिस्थितींत ती ती वस्तू देवक म्हणून मानल्याची शक्यता दिसते. व्यक्तीला व कुलात नाव देण्याच्या गरजेतून किंवा दोन कुलांचे वेगळेपण दाखविण्यासाठी त्यांना वस्तूंची किंवा प्राण्यांची नावे दिली, असेही एक मत आहे. फ्रॉइडच्या मते घरातील सर्व स्त्रियांवर सत्ता चालविणाऱ्या वडिलांचा त्याच्या मत्सरग्रस्त मुलांनी वध केला परंतु पश्चात्तापामुळे त्यांनीच नंतर वडिलांच्या जागी मानलेल्या देवक प्राण्याचा वध करणे व कुलांतर्गत स्त्रियांशी संबंध ठेवणे वर्ज्य मानले. आई किंवा वडिलांविषयीच्या प्रेम–द्वेषाच्या संमिश्र भावनेचे एखाद्या प्राण्यावर प्रक्षेपण करण्याचा मुलांचा अनुभव हा आदिवासींच्या देवकल्पनेशी जुळता आहे, असे काही मनोवैज्ञानिक मानतात.

आर्य, सेमिटिक व तुराणी लोकांत देवकप्रथा नव्हती, असे म्हणतात परंतु यूरोप व इतर काही देशांतील प्रगत समाजांत ती नसली, तरी तिचे काही अवशेष तेथे आढळतात. याउलट आशिया, आफ्रिका व अमेरिका खंडातील काही आदिम जमातींतून ती नसल्याचे आढळते.

भारतात अनार्यांत व मुख्यत्वे द्रविड लोकांत देवकप्रथा होती असे म्हणतात. परंतु वैदिक वाङ्‌मयातील अज, मत्स्य, गौतम, मांडूकेय इ. नावे ही वैदिक आर्यांमधील देवकप्रथेचे अवशेष होत, असे काहीजण मानतात. महाभारतातील सुपर्ण, नाग, नकुल इ. नावे ही देवकनामे होत हिंदू देवांचे काही अवतार व काही देवांची वाहने यांचा देवकांशी संबंध आहे जातिव्यवस्था देवकप्रथेतून निर्माण झाली किंवा जातिव्यवस्थेमुळे देवकप्रथेचा ऱ्हास झाला वाघ, नाग व वानर इ. मूळच्या देवकांची देव म्हणून पूजा करणे हा हिंदूंचा प्रभाव आहे इ. विविध मते पुढे आलेली आहेत. ब्राह्मणक्षत्रियांत ही प्रथा कमी असून इतरांत अधिक प्रमाणात आहे. तथाकथित खालच्या वर्गांत देवक हा शब्द गोत्र या अर्थाने येतो इ. माहिती मिळते. भारतातील गाय, बैल (नंदी), नाग, तुळस, शस्त्रे इत्यादींची पूजा ही देवकपूजा आहे, असे मानणे मात्र कठीण दिसते.

आधुनिक संस्कृतीच्या प्रभावाने व केवळ दुर्लक्ष करण्यानेही आता या प्रथेचा ऱ्हास होत आहे. देवकप्रथेतील निषेध नकळत मोडला, तर अपाय होत नाही असे मानणे, हे त्या प्रथेच्या ऱ्हासाचेच लक्षण म्हणता येईल.

संदर्भ : 1. Ferreira, J. V. Totemism in India, London, 1965.

          2. Frazer, J. G. Totemism and Exogamy, 4 Vols. , London, 1910.

         3. Freud, Sigmund, Totem and Taboo, London, 1960.

         4. Levi–Strauss, Claude, Totemism, London, 1962.

साळुंखे, आ. ह.