कुमारिल भट्ट : (सु. ६२०–६९०). जैमिनिप्रणीत पूर्वमीमांसा दर्शनावरील शबरस्वामीच्या भाष्यावर विवेचनात्मक ग्रंथ लिहिणारातत्त्वज्ञ. कुमारिल भट्टाने शाबरभाष्यावर लिहिलेल्या विवरणामध्ये जेमीमांसेचे तत्त्वज्ञान मांडले आहे, त्याला स्वतंत्र तत्त्वज्ञानाचा दर्जा प्राप्त झाला. पूर्वमीमांसेच्या अनेक संप्रदायांमध्ये कुमारिलाचा संप्रदाय इतरांपेक्षा अधिक महत्त्वास प्राप्त झाला. याला ‘भट्ट संप्रदाय’ म्हणतात.  पूर्वमीमांसेच्या शाबरभाष्यावर प्रभाकर भट्टाचेही विवरण प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये सांगितलेली मीमांसापद्धती आणि तत्त्वज्ञान अनेक महत्त्वाच्या बाबतींत भिन्न असल्यामुळे, त्या संप्रदायाला ‘प्रभाकर संप्रदाय’ किंवा ‘गुरूमत’ असे म्हणतात.

प्रभाकर भट्ट कुमारिलाच्या पूर्वी झाला, असे एक मत आहे आणि नंतर झाला, असे दुसरे मत आहे. या दुसऱ्या मताप्रमाणे प्रभाकर हा कुमारिलाचा शिष्य होता, अशी प्रसिद्धी आहे परंतु त्याला आधार नाही. मुरारीमिश्र (सु. सतरावे शतक) याचा तिसरा मीमांसा संप्रदाय होय. परंतु या संप्रदायाचे ग्रंथ मुरारीमिश्राच्या अंगत्व-निरूक्ति या लहानशा ग्रंथाशिवाय उपलब्ध नाहीत. पूर्वमीमांसेचे ‘भाट्ट संप्रदाय’ व ‘प्रभाकर संप्रदाय’ हे दोनच खरे संप्रदाय होत.

शांतरक्षित (७०५-७६२) या बौद्ध तत्त्वेत्याच्या त्त्वसंग्रह या ग्रंथामध्ये कुमारिलाची मते विस्तृत रीतीने मांडून त्यांचे खंडन केले. असल्यामुळे, कुमारिलाचा काळ सातव्या शतकाच्या मध्याचा निश्चित ठरतो. डॉ. दासगुप्त इत्यादिकांनी कुमारिलाला शंकराचार्यांचा समकालीन (सु.७८८) म्हटले आहे. तिबेटमधील बौद्ध साहित्यात कुमारिल हा बौद्ध तत्त्वज्ञ धर्मकीर्तीचा (सु.६००–६५०) समकालीन म्हणून निर्देश केला आहे. ‘कुमारील’ हे नाव’कुमारलील’ या शब्दाचा संक्षेप आहे, असे तिबेटी साहित्यातील निर्देशांवरून ठरविता येते व ते पटतेही. धर्मकिर्ती कुमारिलाचा भाचा होता, अशीही प्रसिद्धी आहे.

कुमारिल भट्टाचे शाबरभाष्यावरील श्लोकवार्ति, तंत्रवार्ति  व टुपटीका असे तीन ग्रंथ आज उपलब्ध आहेत. पूर्वमीमांसेच्या बारा अध्यायांपैकी प्रथमाध्याच्या प्रथम पादावर श्लोकवार्ति, बाकीच्या तिसऱ्या अध्यायांपर्यंतच्या भागावर तंत्रवार्तिक  आणि चौथ्यापासून बाराव्या अध्यायापर्यंतच्या मार्गावर टुपटीका  लिहीली आहे. बृहत्टीका  व मध्यमटीका  नावाचे ग्रंथही शारभाष्यावर कुमारिलाने लिहीले होते, याचे काही पुरावे सापडतात. परंतु हे ग्रंथ आज, लुप्त झाले आहेत. कुमारिल भट्टानंतर जे जैन, बौद्ध, न्यान, वैशेषिक व वेदान्त दर्शनांवरील मोठमोठ्या आचार्यांचे व पंडितांचे ग्रंथ झाले, त्यांच्यामध्ये कुमारिलाच्या विधानांचा किंवा विचारांचा पूर्वपक्ष म्हणून किंवा सिद्धांत म्हणून संक्षेपाने वा विस्ताराने परामर्श घेतलेला आढळतो. विशेषतः जैन व बौद्ध यांच्या दर्शनग्रंथांमध्ये कुमारिलाच्या मताची विस्ताराने चर्चा करून त्याचे खंडन केलेले आढळते. कुमारिलानंतरच्या हजार बाराशे वर्षांच्या अवधीत जे संस्कृतमध्ये तत्त्वचिंतन झाले, त्याच्यावर कुमारिलाचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो. मायावादी शांकर अद्वैत तत्त्ववेत्यांनीही कुमारिलाची प्रमाणपद्धती व मीमांसानियम मान्य केले आहेत. खुद्द ⇨ शंकराचार्यांच्या ग्रंथांमध्ये मात्र कुमारिलाची प्रमाणपद्धती स्वीकारलेली दिसत नाही. कुमारिल ज्ञानाची सहाप्रमाणे मानतो. उलट, शंकराचार्य प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द या तीनच  प्रमाणांचा आपल्या भाषांमध्ये निर्देश करतात. शंकराचार्यांना कुमारिल माहीत असावा, याचे दर्शक असे शांकरभाष्यात काहीही सापडत नाही.

जैमिनीची पूर्वमीमांसा सूत्रे  वेदांतील कर्मकांड किंवा यज्ञविषयक वाक्यांचाच अर्थ कसा करावा, याचे नियम सांगतात. म्हणूनच ⇨ जैमिनीच्या पूर्वमीमांसेस ‘कर्ममीमांसा’ अशी दुसरीही संज्ञा आहे. मूळसूत्रांमध्ये तत्त्वज्ञान असे नाहीच, असे म्हटले तरी चालेल. शब्द प्रमाणाच्या संदर्भात प्रत्यक्षादी प्रमाणांची व्याख्या तेवढी केलेली आढळते, तेवढेच तत्त्वज्ञान, त्यावरील शाबरभाष्यात बौद्ध दर्शनाचे विचार मांडून ⇨ शबरस्वामींनी त्याचे खंडन केलेले व अपूर्व किंवा पापपुण्य, अमर आत्मा व ज्ञानाची साधने म्हणजे प्रमाणे यांच्यासंबंधी संक्षिप्त विवेचन केलेले आढळते परंतु पूर्वमीमांसेच्या तत्त्वदर्शनाची विस्ताराने मांडणी कुमारील भट्ट व प्रभाकर भट्ट यांनी व त्यांच्या नंतरच्या पंडित अनुयायांनीच केलेली आहे.

न्याय–वैशेषिकादी तत्त्वज्ञानासारखे विश्वसत्यवादी व बहुपदार्थवादी स्वतंत्र असे सांगोपांग तत्त्वज्ञान शबरस्वामींनंतरच्या मीमांसाग्रंथामध्येच मांडले गेले. कुमारिलाने हे स्वतंत्र तत्त्वज्ञान प्रथम रचले असावे, असे अनुमान करण्यास हरकत नाही. कुमारिलाच्या काळी जैन व विशेषतः बौद्ध ह्यांच्या तत्त्वज्ञानांचा व धर्मांचा, विचारवंत व सामान्य जन किंवा वरिष्ठ सत्ताधारी वर्ग व बहुजन समाज यांच्यावर फार मोठा प्रभाव पडलेला होता. वैदिक, स्मार्त व पौराणिक धर्मांचे समर्थन करणारे आधारभूत असे हे तत्त्वज्ञान आहे. बौद्ध व जैन यांच्या वैचारिक अधिष्ठानावर आव्हानपूर्वक हल्ला करणारे असे बौद्धिक तत्त्वज्ञान कुमारिलाने मांडले. शंकराचार्यांना हे श्रेय देण्याची जी प्रथा आहे,  तिला वास्तविक पुरावा सापडत नाही. अवैदिक बौद्धादी नास्तिकांचा प्रभाव कुमारिलाला फार जाणवत होता ही गोष्ट त्याच्या वार्तिक ग्रंथांतील अनेक निर्देशांवरून लक्षात येते. एवढेच नव्हे तर पूर्वमीमांसेचेच नास्तिकांकडे लिहिले होते  पूर्वमीमांसकांनी लिहीले होते पूर्वमीमांसाच नास्तिकवादी बनलेली होती ‘तिला आस्तिक मार्गावर आणण्याकरिता, मी हा प्रयत्न करीत आहे’, असे कुमारिल वार्तिकाच्या प्रस्तावनेतच म्हणतो. जैन व बौद्ध हे संन्यासवादी होते गृहस्थाश्रमाला मोक्षाच्या दृष्टीने त्यांनी गौण स्थान दिले होते. कुमारिलाने आत्मज्ञानप्राप्ती व गृहस्थाश्रमाची कर्मे करणाऱ्यांनाच मोक्ष मिळतो, असा विचार मांडला. ‘तत्त्वज्ञान’ हे जितके मोक्षाला आवश्यक तितकेच कर्मही मोक्षाला आवश्यक आहे, असा ज्ञान–कर्मसमुच्चयाचा सिद्धांत त्याने मांडला. कुमारिलाने श्लोकवार्तिकात जैन–बौद्धांचा ‘सर्वज्ञवाद’ व न्याय–वैशेषिकांचा ‘ईश्वरवाद’ खोडला आहे. केवळ तर्काच्या म्हणजे बुद्धिवादाच्या साहाय्याने बुद्ध वा जिन हे सर्वज्ञ होते किंवा विश्वाचा कर्ता सर्वज्ञ ईश्वर आहे, हे सिद्ध होऊ शकत नाही असे त्याने श्लोकवार्तिकात दाखवून दिले. परंतु वेद, उपनिषदे [→ आरण्यके व उपपरमेश्वर याचे अस्तित्व मानावेच लागते, असे त्याने तंत्रवार्तिकामध्ये सिद्ध केले आहे.

तेलगु, तमिळ इ. दक्षिण भारतातील भाषांशी कुमारिलाचा परिचय असावा, असे तंत्रवार्तिकातील निर्देशांवरून लक्षात येते. संस्कृतमध्ये शिरलेले ‘म्लेंच्छ’ म्हणजे प्राकृत किंवा अन्य भाषांतील शब्द त्या त्या भाषांमध्ये ज्या अर्थाने वापरले जातात, त्या अर्थानेच ते संस्कृतमध्ये वापरावे व संस्कृत शब्दासारखी त्यांची व्युत्पत्ती काढण्याचा प्रयत्न करू नये, असे त्याने म्हटलेले आहे. जैनांच्या ग्रंथात व शांककरदिग्विजयात  कुमारिलाचे थोडेसे चरित्र दिलेले दिसते. त्याच्या चरित्राबाबतची जैन ग्रंथातील माहिती अशी:‘आंध्र व ओरिसा ह्या प्रदेशांच्या मधून जाणाऱ्या महानदीकाठच्या जयमंगल या गावी यज्ञेश्वशर भट्ट नामक तैत्तिरीय शाखी तेलंगी ब्राह्मणाच्या पोटी त्याचा जन्म झाला. आईचे नाव चंद्रगुणा. जन्मकाल युधिष्ठिर शके २११०, वैशाखी पौर्णिमा,  रविवार मध्यान्ह. हा कार्तिकस्वामीचा अवतार होता. निकेतन या जैन वा बौद्ध आचार्याजवळ जैन व बौद्ध मतांचे त्याने छद्मवेषाने राहून अध्ययन केले. नंतर त्याला राजदरबारात मानमान्यता मिळू लागल्यावर, बौद्ध व जैन यांचा वादविवादात पाडाव केला व राजसत्तेच्या द्वारे त्याने त्यांचा छळही केला, नंतर वयाच्या ६३ व्या वर्षी त्याने अग्निप्रवेश केला. याच कथेस अनुसरून शांकरदिग्वजयताही कथा आहे: सुधन्वा नावाचा राजाच्या सभेत, कुमारिल भट्टाने बौद्ध व जैन पंडितांचा पराभव केला पर्वतावरून उडी मारण्यासाठी अनेक दिव्ये केली व त्या राजाच्या द्वारे बौद्ध व जैन पंडितांचा नाश केला. जैन वा बौद्ध गुरूंचा आपल्या हातून द्रोह झाला म्हणून त्याने तुषेच्या म्हणजे भुशाच्या अग्नीत प्रवेश करून स्वतःस जाळून घेतले, असाही निर्देश काही ठिकाणी आढळतो परंतु अग्निप्रवेश किंवा अन्य प्रकारे देहत्याग वृद्धापकाली आवश्यक वाटल्यास करावा, असे धर्मशास्त्र आहे. त्यास अनुसरूनच कुमारिलाने अग्निप्रवेश केला असावा. गुरूद्रोहाच्या प्रायश्चित्ताची कल्पना ही मागाहून केलेली मखलाशी असावी. जैन–बौद्धांचा छळ त्याने केल्याची कथाही कल्पितच असावी.

पहा: पूर्वमीमांसा.

संदर्भ :  1.  Bhattacharya Benoytosh, Shantarakshita, Ed., Tattvasamgraha, Vol. 1. (Introduction),

                  Baroda, 1926.

       २. केवलानंदसरस्वती, संपा. मीमांसाकोष, खंड १ प्रस्तावना, वाई, १९५२.

जोशी, लक्ष्मणशास्त्री