दुधाणी (फुलांफळांसह फांदी)

दुधाणी :  (दुधनी, दुधिका हिं. दुधिया लता गु. जलदुधी क. दुग्धिके सं. दुग्धिका, मरूद्‌भवा लॅ. ऑक्सिस्टेल्मा एस्क्युलेंटम, . सेकॅमाॅन कुल–ॲस्क्लेपीएडेसी). एक नाजूक चिकाळ वेल ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), पानझडी, अनेक फांद्यांची व तळाशी अनेक तंतूसारखी मुळे फुटलेली असून श्रीलंका, जावा व भारत येथे बहुतेक पाण्याच्या सान्निध्यात सर्वत्र आढळते. पाने साधी व समोरासमोर, अरुंद (४·५–९ X ३·८ सेंमी.), पातळ व फिकट हिरवी असतात. फुले मोठी, आकर्षक, दोन–चारच्या वल्लरीत किंवा चवरीसारख्या लोंबत्या फुलोऱ्यात डिसेंबरात येतात. पुष्पमुकुट पांढरा किंवा फिकट गुलाबी, खाली नळीसारखा पण वर बशीप्रमाणे पसरट, विभागलेला व लवदार असून त्यातील तोरण पंचखंडी असते. पेटिकाफळे ४–७ सेंमी. लांब, हिरवी, गुळगुळीत, भाल्यासारखी व जोडीने येतात बिया अनेक, काळ्या व शिखाल (केसाळ). इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲक्स्लेपीएडेसी  कुलात (रुई कुलात) दिल्याप्रमाणे असतात.

हिची ताजी मुळे काविळीवर चांगली गुणकारी असतात वनस्पतीचा काढा तोंड आल्यास व घसा खवखवण्यावर गुळण्या करण्यास उपयुक्त असतो. दुधी चीक जखमा धुण्यास आणि टर्पेंटाइनाबरोबर खाजकंडूवर लावतात. चीक पाळीच्या तापावर व दूध वाढविण्याकरिता देतात. दुष्काळात फुले, फळे व पाने खातात तसेच मुळे आणि पाने जनावरांस चारतात. ह्या वनस्पतीत दुधी चिकामुळे जंतुनाशक व दुग्धवर्धक गुणधर्म आढळतात.

परांडेकर, शं. आ.