दीर : पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि पूर्वीच्या दीर संस्थानची राजधानी. हे पेशावरच्या उत्तर ईशान्येस सु. ९२ किमी. आणि मलकंदच्या दक्षिणेला ११० किमी. दीर नदीच्या थोडे उत्तरेस वसले आहे. याची स्थापना मुल्ला इलियास (अखुंद बाबा) या संताने सतराव्या शतकात केली, असे म्हणतात. याच्या आसमंतात होणाऱ्या गहू, तांदूळ, मका, जव आणि विविध फळे यांची ही बाजारपेठ असून येथे इमारती व देवदार लाकूड उत्तम प्रतीचे मिळते. येथील बहुसंख्य लोक पुश्तू भाषा बोलणारे यूसुफझाई पठाण आहेत, तर पंजाबी बोलणारे काही गुजर लोकही आहेत.
कांबळे, य. रा.