दीद्रो, दनी : (५ ऑक्टोबर १७१३–३० जुलै १७८४). फ्रेंच साहित्यिक, फ्रेंच विश्वकोशाचा प्रमुख संपादक म्हणून विशेष प्रसिद्ध. जन्म लांग्रेस येथे झाला. त्याचे शिक्षण स्थानिक जेझुइट शाळांतून झाले व कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून तो चमकला. एकोणिसाव्या वर्षी पॅरिस विद्यापीठाची एम्. ए. ही पदवी त्याने संपादन केली पण आपल्या ज्ञानसाधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून पुढील अनेक वर्षे कोणताही स्थिर व्यवसाय न पतकरता कलंदर वृत्तीने तो जगला. ह्या अवधीत स्वतः अभ्यास करून त्याने गणितावर प्रभुत्व मिळविले आणि ग्रीक, इंग्रजी व इटालियन भाषांचे उत्तम ज्ञान संपादन केले. १७४३ मध्ये त्याने आंत्वानेत शांप्यॉ ह्या स्त्रीशी विवाह केला. धार्मिक वृत्तीची ही स्त्री कजागही होती. आझेलीक ही त्याची मुलगी सोडली, तर त्याची इतर उपत्ये लहानपणीच मृत्यू पावली. ह्या कारणांमुळे दीद्रोचे वैवाहिक जीवन सुखी नव्हते. त्या काळी अनेकदा घडत असे त्याप्रमाणे त्याचा प्रथम मादाम प्यूईझ ह्या स्त्रीशी व नंतर सोफी व्होलांव्ह हिच्याशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होता पण सोफीच्या सहवासात आल्यानंतर तो आयुष्यभर तिच्याशी एकनिष्ठ राहिला. तिला त्याने पाठविलेल्या पत्रांवरून दीद्रो व त्याचे तत्त्ववेत्ते मित्र ह्यांच्या दैनंदिन जीवनाची चांगली कल्पना येते.
सुरुवातीच्या काळात इंग्रजी ग्रंथांच्या त्याने केलेल्या भाषांतरांमुळे दीद्रो प्रसिद्धीस आला. शॅफ्ट्सबरीच्या इन्क्वायरी कन्सर्निंग व्हर्च्यू अँड मेरिट ह्या पुस्तकाचे त्याने केलेले भाषांतर विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय स्वतंत्र ग्रंथरचनाही त्याने बरीच केली. पांसे फिलॉझॉफीक (१७४६, इं. शी. फिलॉसॉफिक थॉट्स), प्रॉमनाद द्यु सॅप्तीक (१७४७, इं. शी. वाँडरिंग्ज ऑफ अ स्केप्टिक), लॅत्र स्युर लेझाव्हरल (१७४८, इं. भा. ॲन एसे ऑन ब्लाइंडनेस, १७५०) हे त्याचे ह्या काळातील प्रसिद्ध ग्रंथ होत. ॲन एसे ऑन ब्लाइंडनेस ह्या पुस्तकात आपल्या साऱ्या कल्पनांची उत्पत्ती ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला जी वेदने लाभतात त्यांच्यापासून झालेली असते, हा मुद्दा मांडला आहे व ह्यासाठी दृश्य वेदने ज्या माणसाला लाभत नाहीत त्याच्या कल्पनांचे स्वरूप कसे असेल ह्याचा परामर्ष घेतला आहे.
लॅत्र स्युर ले सूर ए ले म्युये (१७५१, इं. शी लेटर ऑन द डेफ अँड द डम) ह्या पुस्तकात ह्याचे स्वरूपाचे बहिरे आणि मुके ह्यांच्या अनुभवांविषयांचे परीक्षण पुढे चालू ठेवले आहे. आपले ज्ञान आपल्याला जो अनुभव प्राप्त झालेला असतो त्याला सापेक्ष असते, हा ह्या साऱ्या विचारमंथनाचा निष्कर्ष होय. पण ह्याचा अर्थ असा, की ईश्वराविषयीची आपली संकल्पनाही सापेक्ष असणार. शिवाय ॲन एसे ऑन ब्लाइंडनेसमध्ये निसर्गाच्या व्यवस्थेमागे कोणताही उद्देश किवा रचना नसणे शक्य आहे, ही भूमिका मांडण्यात आली आहे. निसर्गनियमांना अनुसरून हरतऱ्हेच्या शरीररचनांचे प्राणी निर्माण होतात व ज्यांची रचना परिस्थितीला अनुरूप असते तेवढेच प्राणी टिकून रहात असल्यामुळे आपल्या दृष्टीस पडणाऱ्या सर्व प्राण्यांची शरीरे सुरचित असतात. ह्यामुळे त्यांची कुणीतरी जाणीवपूर्वक रचना केली असली पाहिजे, असा भास आपल्याला होतो. ह्या प्रकारची पाखंडी, धीटपणे मांडलेली मते त्या वेळच्या अधिकारी वर्गाला रुचणे शक्य नव्हते आणि दीद्रोला त्यासाठी तुरुंगाची हवा तीन महिने खाण्यासाठी पाठविण्यात आले. आपल्या पुढील पांसे स्युर लँतॅरप्रेतास्यॉ द् ला नात्यूर (१७५४, इं. शी थॉट्स ऑन द इंटरप्रिटेशन ऑफ नेचर) ह्या पुस्तकात सृष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेताना वैज्ञानिक रीतीचा काटेकोरपणे अवलंब करणे आवश्यक आहे, ही भूमिका त्याने मांडली आणि ह्या रीतीचा वापर केला असता निसर्गाविषयी कोणते निष्कर्ष स्वीकारावे लागतात ह्याचेही स्पष्टीकरण त्याने केले.
दीद्रोची महान साहित्यिक निर्मिती म्हणजे त्याच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली रचण्यात आलेला लांसिक्लोपेदी (विश्वकोश). त्याच्या ज्ञानसाधनेचे, सर्वगामी प्रतिभेचे, दीर्घोद्योगाचे, बौद्धिक नेकीचे व मानवतावादी वृत्तीचे हा विश्वकोश म्हणजे एक चिरंतन स्मारक होय. त्या वेळचे सर्व ज्ञान, सर्व नवीन कल्पना, तंत्रज्ञान एकत्रित करायचे असा हा संकल्प होता. ह्या एकत्रित केलेल्या ज्ञानाचा व कल्पनांचा एकवटलेला आघात जेव्हा सुशिक्षित वर्गावर होईल, तेव्हा केवळ गतानुगतिकत्वामुळे स्वीकारलेल्या कल्पनांचे जे अर्थशून्य अडसर मानवी कर्तृत्वाला पडलेले असतात, ते गळून पडतील अधिक समंजस, मानवतावादी, डोळस मूल्ये समाजात रुजतील आणि सुखी व समाधानी जीवन निर्माण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या कृती अधिक कार्यक्षम बनतील, असा विश्वास ह्या प्रकल्पामागे होता व हेच त्याचे अंतिम उद्दिष्टही होते. ह्या विश्वकोशाचा पहिला खंड १७५१ मध्ये बाहेर पडला आणि शेवटचे खंड १७७२ मध्ये प्रसिद्ध झाले. ह्या वीस वर्षांच्या काळात तो विश्वकोशासाठी अहोरात्र खपत होता. त्याला अनंत अडचणीही आल्या. तसे पाहता ह्या विश्वकोशात फ्रान्सच्या तत्कालीन राजवटीवर, चर्चच्या धार्मिक सिद्धांतांवर किंवा फ्रान्सच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर चर्चची जी जबरदस्त मगरमिठी होती, तिच्यावर उघड उघड हल्ला करण्यात आला नव्हता पण सामाजिक प्रगतीसाठी धार्मिक सहिष्णुता व विचारस्वातंत्र्य आवश्यक आहे, सर्वसामान्य जनतेचे हित साधणे हेच सरकारचे कर्तव्य असते, विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान व औद्योगिक उत्पादन ही सुखी समाज निर्मिण्याची समर्थ साधने आहेत, ह्या आधुनिक लोकशाहीवादी मूल्यांचा पुरस्कार विश्वकोशाच्या नोंदीतून करण्यात आला होता. ह्या विचारात व्यापक सामाजिक क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य बीजरूपाने आहे, हे चर्च आणि राज्यकर्ते ह्या दोघांनी हेरले. विश्वकोशावर दोनदा बंदी घालण्यात आली होती. ह्यामुळे विश्वकोशाचे काम बंद पडले नाही पण दीद्रोच्या अडचणी वाढल्या. त्याचा प्रमुख सहकारी आलांबेअर हा ह्या निष्कारण करण्यात येणाऱ्या कटकटींना वैतागून काम सोडून गेला. त्यूर्गोसारख्या काही लेखकांनी सहकार्य करण्याचे थांबविले. तरीपण दीद्रोने चिकाटीने, उद्योगाची पराकाष्ठा करून काम तडीस नेले.
विश्वकोश हे जरी दीद्रोला गुंतवून ठेवणारे मध्यवर्ती कार्य होते, तरी त्याचे इतर लिखाणही चालूच होते. ल् फिस नात्युरॅल (१७५७, इं. भा. डॉर्व्हल ऑर, द टेस्ट ऑफ व्हर्च्यू, १७६७) आणि ल् पॅर द फामीय (१७५८, इं. शी. द फादर ऑफ द फॅमिली) ही नाटके त्याने लिहिली व पारादॉक्स स्युर ल् कॉमेदिया (प्रकाशित १८३०, इं. भा. द पॅरडॉक्स ऑफ ॲक्टिग, १९५७) हा नाटकाच्या स्वरूपाविषयीचा निबंध तसेच ह्या विषयावरील इतरही निबंध प्रसिद्ध केले. ‘अभिजात’ मानल्या गेलेल्या सांकेतिक नाटकांऐवजी खऱ्याखुऱ्या कौटुंबिक जीवनाचे व समस्यांचे गंभीर दर्शन घडविणारी नाटके लिहिली गेली पाहिजेत, ह्या मताचे त्याने प्रतिपादन केले. दीद्रोच्या नाटकांचा आणि नाट्यकलेच्या प्रयोजनाविषयीच्या मताचा लेसिंग ह्या जर्मन साहित्यिकावर फार परिणाम झाला. दीद्रोने आपला मित्र ग्रिम ह्याच्यासाठी लिहिलेली तत्कालीन चित्रांच्या वार्षिक प्रदर्शनांवरील परीक्षणेही अतिशय वाचनीय आणि उद्बोधक आहेत. चित्रकलेची प्रगल्भ जाण व तिच्याकडे पाहण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी त्यांतून प्रतीत होते. जाक ल् फातालीस्त (१७९६, इं. शी. जाक द फॅटलिस्ट) आणि ल् नव्ह द् रामो (लेखनकाळ १७६१–७४, इं. शी. रामोज नेव्ह्यू) ह्या त्याच्या उपरोधिक कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत.
दीद्रोने अनेकविध विषयांवर विपुल लेखन केले. हे अर्थात संपत्ती मिळवून देणारे लिखाण नव्हते. त्याच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी तिचा हुंडा देण्यासाठी आपला ग्रंथसंग्रह विकण्याची पाळी त्याच्यावर आली. पण रशियाची सम्राज्ञी कॅथरिन हिला दीद्रोविषयी जिव्हाळा आणि आदर होता. तिने त्याचा ग्रंथसंग्रह विकत घेतला पण तो पॅरिस येथेच त्याला ठेवायला सांगून त्याच्यावर दीद्रोची ग्रंथपाल म्हणून वार्षिक वेतनावर नेमणूक केली. १७७३ मध्ये दीद्रोने सेंट पीटर्झबर्गला भेट दिली आणि कॅथरिनबरोबर अनेक विषयांवर वादविवाद करण्यात काही महिने घालविले. आयुष्याची अखेरची वर्षेही व्यासंगात, नवीन ज्ञान मिळविण्यात, लेखन आणि विशेषतः मित्रांबरोबर आवेशने वादविवाद करण्यात घालविली. त्याच्या लिखाणापेक्षाही त्याचे आवेशपूर्ण, नवनवीन कल्पनांनी व युक्तिवादांनी खच्चून भरलेले बोलणे अधिक मोहक होते. पॅरिसमध्ये तो निधन पावला.
दीद्रोचे तत्त्वज्ञान वेदनवांदी आणि जडवादी होते. लॉक ह्या इंग्लिश तत्त्ववेत्त्याचा दीद्रो आणि त्याचे विश्वकोशातील सहकारी ह्यांच्यावर खूपच प्रभाव पडला होता. सारे मानवी ज्ञान आणि विचार माणसांना लाभणाऱ्या ऐंद्रिय वेदनांपासून परिणत झालेले असतात, हा सिद्धान्त लॉकपासून दीद्रोने स्वीकारला. निरीक्षण व प्रयोग ह्यांच्यावर आधारलेली शास्त्रीय विचारपद्धती ही ज्ञान मिळविण्याची एकमेव रीत आहे, ह्या मताचा त्याने पुरस्कार केला. पण त्याबरोबरच कवीला एखादी उचित, चपखल उपमा जशी त्याच्या प्रतिभेमुळे स्फुरते तसाच शास्त्रज्ञाला सर्व उपलब्ध पुराव्याचा उलगडा करणारा अभ्युपगम त्याच्या कल्पनाशक्तीमुळे स्फुरतो ह्यावरही त्याने भर दिला. गतिमान जडद्रव्य हेच अस्तित्वाचे एकमेव स्वरूप आहे, असे तो मानीत असे. गती हा जडद्रव्याचा अंगभूत धर्म असतो आणि ह्यामुळे गतीचे बाह्य कारण शोधावे लागत नाही. जडद्रव्याचे गतिमान अणू परस्परांवर क्रियाप्रतिक्रिया करतात आणि ह्यातून विश्वाचे स्वरूप विकसित होत जाते. ह्यासाठी ईश्वर मानण्याचे कारण नाही. गती हा ज्याप्रमाणे जडद्रव्याचा अंगभूत धर्म आहे त्याप्रमाणे संवेदनशीलता हाही त्याचा स्वभावधर्म आहे. ह्यामुळे सजीव आणि निर्जीव पदार्थ किंवा सचेतन व अचेतन पदार्थ ह्यांच्यात प्रकारभेद नसतो. सर्व सचेतन प्राणी व माणूसही जडद्रव्याने धारण केलेली विकसित रुपे आहेत. नीतिशास्त्रात दीद्रो सुखवादी होता पण सद्गुणी वर्तनानेच वैयक्तिक व सामाजिक सुख साधता येते, हे तत्त्व त्याने आग्रहाने मांडले आहे. ‘एकच सद्गुण, एकच न्याय, एकच कर्तव्य असते, ते म्हणजे सुखी होणे व ह्यापासून एकच गोष्ट निष्पन्न होते व ती ही, की जीवनाचा वाजवीपेक्षा अधिक आदर करता कामा नये आणि मृत्यूला घाबरता कामा नये’. सौंदर्यशास्त्रातही दीद्रोचा अभिनव दृष्टिकोण व्यक्त झाला आहे. कलाकृतीमध्ये भावना आणि त्यांना अनुरूप असलेले नाद, ताल, रंग, आकार व प्रतिमा ह्यांचा सुसंगत मिलाफ झाला पाहिजे हे मत त्याने मांडले पण त्याबरोबरच कलाकृतींनी रसिकांच्या भावनांना योग्य वळण देऊन त्यांच्या नैतिक वृत्तीचा परिपोष केला पाहिजे ही भूमिकाही त्याने स्वीकारली होती.
संदर्भ : Crocker, Lester G. Diderot, the Embattled Philosopher, Ann Arbor, Mishigan, 1954.
रेगे, मे. पुं.
“