दिनकर्द : पेहलवी भाषेतील एक पारशी ग्रंथ. यात असलेल्या एकूण ९ भागांपैकी पहिले दोन भाग आणि तिसऱ्या भागातील १–२ पाने आज उपलब्ध नाहीत. आज उपलब्ध असलेल्या ग्रंथात एकूण १,६९,००० शब्द आहेत. या ग्रंथात जरथुश्त्रप्रणीत पारशी धर्मविषयक वादविवाद, तत्त्वज्ञानविषयक चर्चा, जरथुश्त्राचा जन्म, त्या वेळी घडलेले अनेक चमत्कार, जरथुश्त्रास वेळोवेळी झालेले साक्षात्कार, त्याच्या अहुर मज्दाशी झालेल्या भेटी व संवाद, दुष्ट प्रवृत्तींवर त्याने केलेली मात, सद्धर्मप्रचारार्थ त्याने केलेले प्रयत्न व घेतलेले कष्ट, विरोधकांशी झालेले त्याचे झगडे, वीश्तास्प ते खुस्रु–इ–कवतन यांसारख्या धर्मशील राजांची कारकीर्द व गोष्टीरूप इतिहास तसेच इतरही बऱ्याच ऐतिहासिक घडामोडींचे वर्णन आलेले आहे. अहुर मज्दाशी झालेल्या भेटीनंतर जरथुश्त्राचा वीश्तास्प राजाच्या दरबारात झालेला प्रवेश, दरबारात त्यास झालेला विरोध, चमत्कारांच्या अनुभवांनंतर वीश्तास्पाने जरथुश्त्रप्रणीत धर्माचा केलेला स्वीकार इ. अनेक घडामोडींचे विस्तृत वर्णन या ग्रंथात येते. सॅसॅनिडी राजांच्या कारकीर्दीत २१ भागांत उपलब्ध असलेल्या अवेस्ता वाङ्मयातील आशयही या ग्रंथात प्रतिबिंबित झाला आहे. या पहेलवी ग्रंथाची रचना नवव्या शतकात झाली. एकंदरीत हा ग्रंथ म्हणजे प्राचीन काळी इराणी जनतेत प्रसृत असलेल्या जरथुश्त्रप्रणीत तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, धर्मतत्त्वे, रूढी, परंपरा, इतिहास यांचा संस्कृतिकोशच होय.
या ग्रंथाची पेहलवी हस्तलिखित प्रत प्रथम बगदादमध्ये १०२० मध्ये सापडली. या ग्रंथाची पेहलवी भाषेतील संहिता १८७४ मध्ये अनेक खंडांत प्रसिद्ध झाली असून तिची यूरोपीय आणि भारतीय विद्वानांनी केलेली इंग्रजी व गुजराती सटीप भाषांतरेही प्रसिद्ध झाली आहेत.
तारापोर, जे. सी. (इं.) सोनटक्के, ना. श्री. (म.).