दिगंबर पंथ: जैन धर्मातील एक प्रमुख पंथ. चंद्रगुप्त मौर्याच्या वेळी (कार. इ. स. पू. ३२२–२९८) मगधात मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी आचार्य भद्रबाहूंच्या नेतृत्वाखाली १२,००० जैन अनुयायी दक्षिणेत गेले. जे अनुयायी मगधातच राहिले त्यांचे नेतृत्व आचार्य स्थूलभद्र यांनी केले. स्थूलभद्रांनी एक परिषद भरवून जैन धर्मात काही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. भद्रबाहू दक्षिणेतून मगधात परतल्यावर त्यांनी हे नवे निर्णय मान्य केले नाहीत. या मतभेदातूनच पुढे जैन धर्मात श्वेतांबर व दिगंबर असे दोन प्रमुख पंथ निर्माण झाले. या दोन पंथांतील वेगळेपणा इ. स. पहिल्या शतकात स्पष्ट दिसू लागला आणि नंतर त्याला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले.
‘दिगंबर’ शब्दाचा अर्थ दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे म्हणजे नग्न, असा होतो. दिगंबर पंथाचे अनुयायी मोक्षप्राप्त्यर्थ नग्नतेचा पुरस्कार करतात तसेच स्त्रीमुक्तीचाही ते निषेध करतात. श्वेतांबरप्रणीत ४५ आगम त्यांना मान्य नाहीत. त्यांच्या मते मूळ आगमग्रंथ कालोदरात नष्ट झाले आहेत. जैन संघात भगवान महावीरांनंतर इंद्रभूती गौतम, सुधर्मा व जंबूस्वामीपर्यंतची परंपरा दोन्हीही पंथांना मान्य आहे. जंबूस्वामीनंतरची आचार्यपरंपरा मात्र श्वेतांबरांची व दिगंबरांची वेगवेगळी आहे. दिगंबरांच्या मते नंतर विष्णू, नंदी, अपराजित, गोवर्धन व भद्रबाहू नावाचे पाच श्रुतकेवली होऊन गेले. श्वेतांबरपरंपरेत प्रभव, शय्यभंव, यशोभद्र, संभूतविजय व भद्रबाहू हे श्रुतकेवली मानले जातात. महावीर निर्वाणाच्या ६०९ वर्षानंतर म्हणजे इ. स. ८३ मध्ये रथवीरपूर येथे शिवभूतीने बोटिक मताची म्हणजे दिगंबर मताची स्थापना केली, असा उल्लेख आढळतो.
भारतामध्ये राहणाऱ्या जैन धर्मीय लोकांतील दिगंबरांची वस्ती मुख्यत्वेकरून महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू आणि श्वेतांबरांची वस्ती मुख्यत्वेकरून गुजरात व राजस्थान यांमध्ये आढळते.
दिगंबर पंथाचे आदर्श साधू नग्न असतात. त्यांच्याजवळ मोरपिसांचा कुंचा किंवा पिंछी कमंडलू (कुंडिका) व शास्त्रग्रंथ या वस्तू असतात. दिवसातून एक वेळच ते अन्नपाणी घेतात. उभे राहून व पात्राचा उपयोग न करता हातातून ते अन्न सेवन करतात. पूर्वी वनात राहणारे साधू आता गावातील मंदिरांमध्ये किंवा मठांमध्ये राहतात. काही साधू वस्त्र धारण करणारे आहेत. त्यांना क्षुल्लक म्हणतात. दिगंबरातील पुष्कळ पोटजातींतील लोक वस्त्र धारण करणाऱ्या व मठांत वास्तव्य करून राहणाऱ्या भट्टारकांना गुरू मानतात.
स्थान व आचारभिन्नतेमुळे दिगंबर साधूंमध्ये वेगवेगळे संघ उत्पन्न झाले. त्यांमध्ये मूलसंघ, नंदिसंघ, सेनसंघ इ. संघ प्रसिद्ध होते. या संघांमध्येही अनेक लहानमोठे गट उत्पन्न झाले. ते गण व गच्छ या नावांनी ओळखले जाऊ लागले. जैन साधूंचा आचार, विशेषेकरून दिगंबर साधूंचा आचार अतिशय कठीण आहे.उत्तराध्यनयसूत्रात म्हटल्याप्रमाणे साधुधर्म आचरणे म्हणजे प्रवाहाच्या उलट जाण्यासारखे आहे.
दिगंबरांच्या मताप्रमाणे आगम वाङ्मय नष्ट झालेले आहे. श्वेतांबर ज्या वाङ्मयाला परंपरेने आलेले आगम सध्या समजतात, त्याला दिगंबराची मान्यता नाही. षट्खंडागम, कषायप्राभृत, मूलाचार, भगवतीआराधना, प्रवचनसार, पंचास्तिकाय इ. नंतरच्या आचार्यांनी रचलेले किंवा संकलित केलेले ग्रंथ दिगंबर पंथात आगमसदृश व प्रमाणभूत मानले जातात. या दोन प्रकारच्या आगमांमध्ये तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने फारसा फरक नाही. जीव, अजीव, पापपुण्य, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, ज्ञानचर्चा, संसाराचे असारत्व, मोक्षाचे श्रेष्ठत्व इ. गोष्टींविषयी दोन्हीही पंथांत सारखेच विचार आहेत. काही आचरांच्या बाबतीत मात्र फरक आहे. धार्मिक वाङ्मयाचे हे दोन प्रवाह मात्र प्रथमपासून भिन्न झालेले दिसून येतात. गौतम गणधराने आगमग्रंथांची रचना केली होती, असे दिगंबर समजतात. दिगंबर व श्वेतांबर हे दोन गट पूर्ण अलग झाल्यानंतर आपल्या मताला पोषक असलेल्या अथवा करून घेतलेल्या ग्रंथांचेच पठन त्या त्या गटात होऊ लागले. [ → जैनांचे धर्मपंथ].
संदर्भ :जैन, हीरालाल, भारतीय संस्कृति में जैन धर्म का योगदान, भोपाळ, १९६२.
पाटील, भ. दे.